बब्या आणि माझा बड्डे

 

  बब्या आणि माझा बड्डे  

काल कणिक मळत असतांना अचानक डोअरबेल वाजली.

``कोण मेलं ह्या वेळेला तडमडायला आलय?’’ असं म्हणत असतांना कोणी तरी परत परत बेल वाजवतच राहिलं. हात ध्वायलाही वेळ  न मिळाल्याने मी त्या सिनेमातल्या बाबी का कोणासारखी  कणकेच्या हातांनीच केस सावरत दरवाजा उघडायला धावले. दरवाजा उघडून बघते तर कोण?---- बब्या!!!!!!!!!!! माझा बालपणचा तिसरीपर्यंतचा शा.मि.( शाळामित्र) हातात भला मोठ्ठा फुलांचा बुके घेऊन उभा होता.(बब्या खूप वर्ष तिसरीतच होता. शाळेनी त्याला सोडलं. मग बब्या टामाटु विकायचा ह्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. आता राष्ट्र्सेना जॉईन केल्यापासून बब्या अंगावर 5-10 किलो सोनं सतत घालून फिरणारा Golden Boy  माझा शामि. आहे हे विसरून चालणार नाही. बब्या जेथे जातो तेथील सर्व दुकानदार, टपरीवालेएखाद्या जागृत दैवतापुढे ठेवावेत तशा आदराने नोटा धरून उभे असतात. )

  शक्य तेवढे डोळे विस्फारून  माझे दोन्ही कणकेनी भरलेले हात माझ्या गालांवर ठेऊन मी अत्यानंदानी एकदम ब्बब्ब्या! म्हणून ओरडलेच! बब्या स्वतः माझ्याकडे  येणार म्हणजे संत? (नको नको जरा शेळपटच वाटतं. धनवंत कस भारदस्त वाटतं. ) हं!! धनवंत येती घरा असं कायसं प्रफुल्लित वाटत होत.

बब्या!!! अचानक कसा काय ? - मी

तॉई ---  आज तुमचा बड्डे नव्ह!  हातातला भलामोठ्ठा पिवळ्या एमेरिलीस लीलीचा पुष्पगुच्छ माझ्या हातात सोपवून मला हेप्पी बड्डे म्हणत बब्या सोफ्यावर विसावला!

बब्या तुला माझा बड्डे पण पाठ आहे? मला गहिवरून यायचच बाकी होतं.

तॉई अवं असं काय म्हन्ता? आज ``बेंबेंबेंबें टाईम्स’’ला पैल्या पानावर छापलाय!

बब्या, बेंबेंबेंबें टाईम्स हे कुठलं रे दैनिक?

आवं समद्या VIP न्चया लेडिजचे बड्डे ते एक मैना आगुदर पासूनच देयला सुरवात करतात.  आवं  सायबाची लेडी खूश की सायब बी खुश र्‍हायलाच लागतं. तॉई तुम्हास्नी मी अक्षी खरंखुरं सांगतो.बब्यानी शपथ  घेतल्यासारखी बोटांची चिमुट गळ्याला लावली. म्हन्जी कुनाला कसं शेलिब्रेट करायचं ते अगुदरपासून इव्हेंट मॅनेजमेंट करता येतं. आमच्या भैरवसेनेनी कालच आपलं टेबल बुक करून बी ठेवलय!

हो हो हो हो!!  माझा चेहरा खुलला. मी VIPची लेडी असल्याचा मला सार्थ अभिमान वाटला. आमच्या ह्यांना मात्र मी VIPची लेडी असल्याचं काही कौतुकच नाही. असं मनातल्या मनात म्हणत, एक दीर्घ सुस्कारा सोडत मीही सोफ्यावर विसावले. हां हां हां! तॉई बसू नगा.  अन् असे हातबित कणकेत खराब बी करून घेऊ नगा. आज सायबांच्या लंचच घरची मेड बघेल. आज  माझ्या ताईंचा बड्डे ताज मधे!!!!!!!!

व्वाव! बब्या, तुझ्याकडून माझा बड्डे साजरा होणं --- is a feather in my cap!”  

तॉई असलं न कळनारं काय बी बोलू नगा! आवं आपल्याकडं कुठल्याही गार्डनच्या सम्होरून ग्येलं किंवा निस्त कबुतरखान्या जवळुन गेलं तरी डोक्यात पिसच पिस हुतात. त्यापेक्षा ``शेवंतीची वेणी ऑन माय आंबाडा’’ किंवा ``गुलाबाचं फूल  इन माय वेणी’’ आस्स कायस म्हना. बब्यानी चक्क इंग्रजीत डायलॉग फेकला.

मग ब्रूज इन माय बॉब म्हणू का? – मी

 मी जाम हरखून गेले.  बब्या त्याची BMW  खास माझ्यासाठी घेऊन आला होता. बब्यासोबतचा भैरवगण सफारीत स्थानापन्न होता. ( बब्या सोनबॉय असल्याने त्याच्या सुरक्षेसाठी पाहिजेच ना! ) आम्ही ताजच्या पोर्चमधे पोचताच दरवाजात उभ्या असलेल्या साडेसहाफुटी टर्बनधारी पठाणी ड्रेसधारीनी आदबीनी गाडीचा दरवाजा उघडून धरला. मला अगदि हवेवर तरंगत असल्यासारखं वाटत होतं. त्या पठाणीचं नेहमी कौतुक वाटायचं आज जरा त्याची कणव आली. पण मला बड्डेच्या मधुर वातावरणात त्याचा लगेचच विसरही पडला.

 मी सिंगापुरी लक्सा (Laksa) मागवला.  बब्यानी शेव मांचुरियन ची ऑर्डर दिल्यावर वेटर जरा  असलं काही मिळत नाही म्हणायच्या बेतात होता पण बब्यानी त्याच्याकडे नुस्तं आपाद मस्तक पाहिलं मात्र! तो य्येस्स्स सर म्हणत आतल्या दिशेनी धावला.

तॉई ह्या BMW  त काय चार्म राहिला नाय! बब्या जरा उदासपणे म्हणाला. छब्बीस जानवरीला त्ये ट्रॅक्टर पायले नवं? काय गरागर गरागर फिरवत हुते? अक्षि डुळ्याचं पारनं फिटलं. आपल्या `माहीचा  हेलिकॉप्टर शॉट पाहूनच जनु सार्‍यांनी ट्रॅक्टर गरगरा फिरवायची प्रॅक्टिस केली हुती. त्यात एक आधी एक नंतर जान गवा बैठे। तरी काय! जान हतेलीपर लेके सिखे ना! बब्या हिंदीमधे हेलिकॉप्टर शॉट मारत होता. सगळी खाकी वर्दी निस्ती कोंबड्याच्या पिलांन्वानी भिरभिरा भिरभिरा वुडत होती इकडं तिकडं! चिरडलं जाण्याच्या भयानं!

 होय रे बब्या! मलाही त्या आंदोलनात सामील व्हावसं केंव्हापासून वाटत  होतं! अरे ते दाखवत होते ना टिव्हीवर! एक एक टेंट म्हणजे गाद्या गिरद्या, कार्पेटस्!!! मी टिव्हीवर नुस्त्या पहायला मिळालेल्या त्या झाकींमधे रमून गेले. गादीवर बसून बसून पाय दुखायला लागले तर शेतकर्‍यांची सेवा म्हणून पाय आपोआप दाबायची पन्नास मशिन्स एका लायनीलावलेली! अहो शेतकर्‍यांचे पाय ते! अन्नदाते आपले! शिवाय पुर्षांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी अशी ब्युटीपार्लर सेवाही मोफत उपलब्ध होती. पुरुषही भुवया कातरून घेत होते. (करोना सुरू जाल्यापासून माझा मेलीचा बॉब जाऊन शेंडी झालीए !) टिव्हीत दाखवलेली ती चलत् दृष्य माझ्या डोळ्यांपुढून हलत नव्हती.  शेजारीच लंगर! तंदुरी नान, रोट्या काय छान छान वास दरवळत असतात!!! नाही तर इथे मला मेलीला रोज दोन पोळ्या लाटून घ्यायला लागतात. आणि पालेभाजीसोबत घशाखाली उतरवाव्या लागतात. डाएटच्या नावाखाली! अरे आपल्या केस पिंजारलेल्या खेदाताई खाटकर गेल्या. बन्ना बाळेगणासह जायच्या मार्गावर होते---

काय? गेल्या? एकदम धक्का  असह्य होऊन बब्या किंचाळला.

नाहीरे! गेल्या म्हणजे दिल्लीला गेल्या. मक्षिका व्रणम् इच्छन्ति । म्हणजे माशी जखमेची वाटच बघत असते तसं जिथं आंदोलन तिथं बन्ना त्यांच्या बाळेगणासह आणि खेदाताई त्यांच्या खोंडांसह पाहिजेतच ना! शिवाय आपले अनेक बारभाई ट्रॅक्टर घेऊन तेराव्याला निघालेएत. – काहीतरी चुकलच! हमम्ऽऽऽ--- काय ते --- तेहरी बॉर्डर रे !

आपली खोडसाळांची मैना बी जाणाहुती. – बब्या

कोण? शरू?  - मी

व्हय! तिला चालू ट्रॅकटर वरून अक्षि आयटेम साँग पेश करायचं होतं-

अहो राया तुम्हा लावते अत्तराचा फाया । एकही संधी दवडी ना मी वाया

लावालाव्या नीट लावाया । पिंगा घालते मी बाया !!!

मला हो म्हनतात लवंगी मिरची !!!! - -- -- -

पन काय उप्योग! तिसर्‍या अंकातिल डायलाग दुसर्‍यातच म्हनल्यावानि  हया शेतकर्‍यांचा फड दुसर्‍यातच आटिपला. शरुच्या दणक्यात होनार्‍या आयटेम साँगचा ट्रॅक्टर हिथच लवंडला! ---- बब्या

गप्पा मारत मारत आपली संधी हुकल्याच्या दुःखात चूर होऊन व्हॅनिला आयस्क्रिम वुइथ हॉट गुलाबजाम कसेबसे गालात घोळवत आणि घशाखाली ढकलत आम्ही उठायच्या बेतात असतांनाच वेटरनी बिल समोर ठेवलं आणि बब्या गरजला, ``एऽऽऽ मी कोन हे म्हाइत न्हाइ का?’’ बघता बघता त्याच्या भैरवसेनेनी तेथील हाताला येतील ते अत्यंत महागडे शोपीस नुसते हातात उचलून धरताच मॅनेजर धावत आला ``इकडून इकडून----‘’   असं म्हणत थेट आम्हाला गाडीपर्यंत पोचवायला आला. शामिची सिंघमगिरी आणि मॅनेजरनी ठेवलेली खास बडदास्त पाहून बाकी लोक डोळे विस्फारून बघत होते.

बब्यानी दारात उभ्या असलेल्या पगडीवाल्याच्या हातात पाचशेची नोट कोंबली, पैंयाजी! इधर कायकु टाईम घालवता है? तुमकु तो सिंघम बॉर्डरपर होना था!

कल तक वहीं था! लेकिन क्या करता वहा की बिजली और पानीही काट दिया। महिनो जिनके लिए बैठे उन्होने खाना देना भी बंद कर दिया। कल गाववालोने पिटाई करना शुरू की  इसलिए वापिस आ गया ! --- पैंयाजी पठाणी

पैंयाजी आपकु तो कानडामेंही जाना चाह्येबब्या

वहाँ रास्तेमे बैठे तो बहोत बेरेहेमीसे मारती हैं वहा की सरकार ! ये मजा तो यही हैं पैंयाजी पठाणी

आमची दिल्लीची मोफत ट्रिप आणि खास फायुस्टार पाहुणचार हुकल्याच्या दुःखाने हळहळत आम्ही घराच्या दिशेनी निघालो.

------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -