सावित्री आणि वटपौर्णिमा

सावित्री आणि वटपौर्णिमा

             संस्कृतच्या एका अत्यंत विद्वान पंडितांशी बोलत असतांना त्यांनी एकदा मला सांगितलं की, ``आपल्याकडे जे परंपरागत ज्ञान ठेवलं आहे ते मोठ्या खुबीनी ठेवलं आहे. वरवर पाहिलं तर ती गोष्ट वा स्तोत्र वाटते. ज्याला पुराणातील गोष्ट वा स्तोत्र म्हणून त्याकडे बघायचं आहे तो तसं पाहू शकतो. गोष्ट वाचण्यात मुलांचा आणि सर्वसामान्य जनतेचा वेळ चांगला जातो. पण थोडं ``डिकोडिंग’’ केलं, त्याचा खोलवर अभ्यास केला तर त्यातून  वेगळंच ज्ञान मिळतं. असं 4 ते पाच स्तरांवर गूढ ज्ञान त्यात ठेवलेल असतं. जो खरा अभ्यासू असेल त्यालाच त्यातील खरा खजिना मिळतो. घडणार्‍या /होणार्‍या सर्व घडामोडींकडे बघण्याचा Holistic Approach  एक समग्र दृष्टिकोण आपल्या तत्त्वज्ञानात आहे.’’ श्रीकृष्ण पार्थाला जेंव्हा विश्वरूप दाखवतात तेव्हा तो ते पाहू शकत नाही. मग श्रीकृष्ण त्याला दिव्य दृष्टी देतात आणि मग तो ते विश्वमय विश्वरूप पाहू शकतो. तशीच पूर्वीच्या गोष्टींकडे पहायची दृष्टी आपण थोडी विशाल केली तर अनेक गोष्टी वेगळ्याच जाणवू लागतात.

            अशीच ही वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या व्रताची तिथीही अशी शोधून काढली की पावसाला छान सुरवात झालेली असते. वटपौर्णिमा  साजरी करायची वेळ किती उचित आणि सुयोग्य! दोनचार भिजपाऊस होऊन गेलेले. गरम झालेली माती पहिल्या पावसात भिजून आतून आतून वाफा येणारी गरम असते. दोन चार पावसांनंतर तीही आतून निवते. अशावेळी नवीन रोपं लावायला योग्य काळ असतो. जमिनीच्या पोटातल्या गर्मीनी अंकूर जळून जात नाहीत. म्हणजेच वर्षानुवर्ष वटपौर्णिमा हा आपला भारतीय हिंदू परंपरेतील पर्यावरण दिन.

 

            ह्या वटपौर्णिमेच्या गोष्टीत परंपरा जपण्याच्या निमित्ताने शास्त्र, नियम, नीतिमत्ता/ सन्नीती, आरोग्य, बुद्धिचातुर्य, संभाषणकला, तर्क अशा अनेक ज्ञानाच्या शाखा सुसंगत, पूरक आणि अत्यंत अलवारपणे एकमेकात गुंफून, त्यांना गोष्टीरूपात लपेटून, त्याला व्रताच्या कर्तव्यभावनेला जोडून देऊन सर्व समाजाकडून निसर्गाची कशी काळजी घेतली जाईल ह्याचा आपल्या पूर्वजांनी केलेला विचार पाहिला की त्या पूर्वजांना माझे हात आपोआप जोडले जातात. परत हे सर्व ज्ञान इतक्या खुबीने लोकांपर्यंत पोचवलं आहे की माणसाची जशी कुवत असेल तितका आनंद व ज्ञानाचा त्याला लाभ व्हावा. मुलांनी गोष्ट म्हणून ऐकावी. स्त्रियांनी व्रत म्हणून आचरावी. एखाद्या खोलात शिरून पाहणार्‍याला त्यातील मेखही कळावी.

                          तशी सावित्रीची गोष्ट आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकलेली असते. परत एकदा वेगळ्याप्रकारे पाहू. मंद्र देशाचा राजा अश्वपतीची मुलगी सावित्री. मंद्र देश हा तेंव्हाच्या अखंड भारताच्या ( जेथे वैदिक संस्कृती मानली जात होती अशा) सर्वात पूर्वेचा देश. सर्वात आधी सूर्योदय होणारा देश. राजाचं नावही अश्वपती. सूर्याच्या सात अश्वांचा पती म्हणजे सूर्यच तर नाही? सूर्य सवितासवितृ म्हणजे अनेक लाखो प्रकाश किरणे असलेला. त्याचा एक किरण म्हणजे सावित्री. आपली सावित्रीही सूर्य किरणासारखी अत्यंत प्रखर बुद्धिमान मुलगी आहे. तिच्या बुद्धीचे तेज नारद, सावित्री आणि अश्वपतीच्या संवादातून चांगलच उठून दिसतं.  आणि नंतर यमाच्या आणि सावित्रीच्या संवादात तर त्याचा कस लागतो.

                                       सावित्रीने स्वतःचा पति म्हणून शोधलेला मुलगा शाल्वदेशाच्या राजा द्युमत्सेनाचा मुलगा सत्यवान. नारदांनी तो अल्पायुषी असून बरोबर वर्षाने त्याचा मृत्यू असल्याची भविष्यवाणी सांगितली. दुःखी पिता तिला दुसरा वर शोध म्हणू लागल्यावर सावित्री म्हणाली, ``लाकाडाची ढलपी तुटणं वा पाषाणखंड पाषाणापासून वेगळा होणं ही एकदाच पण कायम स्वरूपी होणारी क्रिया आहे. कन्यादान आणि `मी दिलेअसा संकल्प ह्या तीनही गोष्टी फक्त एकदाच होतात. मी ज्याला एकदा वरलं आहे तो दीर्घायुषी आहे का अल्पायुषी, गुणी आहे का अवगुणी ह्या गोष्टींनी आता काहीच फरक पडणार नाही. आता अन्य कुठल्या पुरुषाला माझ्या मनात स्थान नाही. एकदा मनाचा निश्चय झाला की मगच तो वाणीद्वारा व्यक्त होतो आणि त्यानंतर कर्मद्वारा केला जातो. माझं मन माझ्यासाठी प्रमाण आहे.’’

                                   सावित्रीचा पति सत्यवान सत्याची कास धरून चालणारा आहे. त्याचे वडील द्युमत्सेन एकेकाळी ( अर्थाप्रमाणे ) अत्यंत प्रभावशाली असले तरी अंध झाले आहेत. अंधपणा हा डोळ्याचाच असतो असे नाही. डोळसपणे जो निसर्गनियम पाळत नाही तोही अंधच. निसर्गाचा ऱ्हास होईपर्यंत ह्या प्रभावशाली द्युमत्सेनानी त्याला ओरबाडलं शेवटी राज्यातून परागंदा होऊन वनात जायची पाळी आली. सत्यवानाने तेथेही झाडे तोडली तर सत्यवान जगणार कसा? मरण पावला बिचारा.  सत्यवान अल्पायुषी असला तरी सावित्रीचा मात्र याला दीर्घायु करण्याचा निश्चय आहे. सतत ती त्याच्या बरोबर आहे. सावित्रीने अत्यंत नियमाने वागणार्‍या यमाकडून सर्वप्रथम सासर्‍यांना दृष्टी म्हणजेच विवेक मागून घेतला. ते आपला धर्मत्याग ( धर्म म्हणजे न्याय्य काम, विवेकशीलता, ) कधीही करणार नाहीत हा वर यमाकडून सावित्रीने मागून घेतला. गुणांचीही शृंखला असते. एक विवेक मागून घेतला की त्याच्यासोबत सारे गुण येतातच.  विवेकासोबत माणूस सूर्यासारखा तेजस्वी होऊन त्याला गत वैभव प्राप्त नाही झाल तरच विशेष! द्यमत्सेनाला राज्य मिळो हे मागून घेवो किंवा न घेओ ते मिळणारच. अश्वपती सावित्रीचा पिता त्याला पुत्र नव्हता. त्याचं तेजच सावित्रीच्या रूपाने दूर गेलं होतं. त्याला ही सूर्यासारखच काम करणारे शंभर पुत्र मागणं म्हणजे सूर्याला साक्षी ठेऊन पर्यावरणाचं कामं पुढे नेणारे शंभर नवे राजे, नवे पर्यावरण नेते तयार करणं होय. आणि शेवटी ह्या सावित्रीने स्वतःला औरस पुत्र मागितला. म्हणजेच सत्यमार्गावर चालणार्‍या सत्यवानापासून  आणि सूर्याच्या किरणांपासून होणारी निसर्गाची भरभराट.

                              ही सत्यवानाची नाही तर जंगलं तोडून उजाड करणार्‍या तुम्हा आम्हा माणसाची गोष्ट आहे. माणसाला परत मरणाच्या दारातून परत यायचं असेल तर दोघंच मदत करू शकतात. झाडं आणि सूर्य. वट आणि सावित्री. सर्व झाडांचं प्रतिक वड तर सूर्य किरणांचं प्रतिक सावित्री. सर्वांना जगवणारी एकच क्रिया photosynthesis. प्रकाशसंश्लेषण. निसर्गाने केलेल्या उपकाराचं स्मरण, संवर्धन त्यानिमित्ताने करायचं. वनात जायचं. झाडांची पूजा करायची. जातांना नैवेद्य म्हणून पाच फळं घेऊन जायची (हया दिवसात उपलब्ध असलेला आंबा, जांभूळ इ. ) सर्वांना आंबे आणि फळं दान द्यायची. आपणही फलाहारच करायचा. म्हणजे फळांच्या खूप बिया उपलब्ध होणारच. बिया नक्की रुजणार. आंब्याची कोय तर नक्कीच. वेगळा पर्यावरण दिन तो कुठला?

                                 ह्या निसर्ग रक्षणासोबत सावित्रीचे नीतीमूल्य जपणारे लखलखीत संवाद आपल्यालाही सन्नीतीच्या मार्गावर ठेवणारे आहेत. संभाषण चातुर्य बघावं तर सावित्रीचच! सासर्‍यांना डोळस करणारी, राज्य मिळवून देणारी आणि सरतेशेवटी सत्यवानालाही यमपाशातून सोडवणारी सावित्री अबला नाही तर एक अत्यंत बुद्धीमान, कणखर मनाची, भविष्यवाणीही आपल्या कर्तृत्त्वाने बदलवून दाखवणारी, सूर्यकिरणासारखी लखलखित तरुणी आहे. जिचा सर्वांनाच अभिमान वाटावा. महायोगी श्रीअरविंदांनी. आपल्या आयुष्याची पन्नास वर्षे सावित्रीच्या चिंतनात घालवली. त्यातून त्यांनी एक महाकाव्यच रचले. असो

सर्वांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि भारतीय पर्यावरण दिनाच्याही

--------------------------------

लेखणी अरुंधतीची -

(खालील अभिप्राय फेसबुकवर वाचकांनी पाठवलेला आहे.)

महाभारताच्या वनपर्वातील ही छोटीशी आख्यायिका अत्युच्च शिखरावर नेली ती मूळ इंग्रजीत असलेले आठशेवीस पानांच्या या काव्यात काय नाही. विस्ताराने येथे लिहिणे योग्य नाही. तुमच्या ह्या पोस्टमुळे मला मात्र सकाळपासून पाँडेचरीचा श्रीअरविंदाश्रम, ज्या घरात वरच्या मजल्यावर त्यांनी हे काव्य लिहिले, ते त्यांचे एकांत स्थान, पाँडेचरीतील "सावित्री"हे अभ्यास केंद्र,हे सगळं इतकं आठवतय,जणू मी आता तिथेच आहे. आज आपण ही पोस्ट संक्षिप्त लिहिली आहे. कधीतरी विस्ताराने लिहाल ही अपेक्षा.


Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -