तिरंगा

 

तिरंगा

आमची अनेक वेळा मुंबईला बदली झाल्या आणि प्रत्येकवेळेला नवीन घर, नवीन परिसर परिचित होत गेला. दादर, वरळी, पेडर रोड, बाणगंगा/दाभोळकर मार्ग, मरीन ड्राईव्ह, मंत्रालय ---! सगळी घर सुंदरच असायची पण प्रत्येकाची वेगवेगळी खासियत असे. रहायला गेल्यानंतर काही दिवसातच अरेच्चा म्हणावं असं नवीन काही तरी नवीन आश्चर्य समोर येई.

 सरकारी सेवेतील शेवटचं सरकारी घर सगळ्यात वरच्या म्हणजे 10व्या मजल्यावर मंत्रालयासमोर होतं.  पूर्वेच्या खिडक्यांमधून दिसणारा गेट वे ऑफ इंडिया जवळील समुद्र तर पश्चिमेच्या खिडक्यांमधून दिसणारा मरीन ड्राइव्हचा समुद्र!  भले, गगनचुंबी इमारतींनी त्याचा भला मोठा `स्पेक्ट्रम’ कमी केला असला तरी समुद्र तो समुद्रच! सूर्योदयाच्याही आधी आणि सूर्यास्तासोबत निसर्गाचं चालू असलेलं `वॉटर कलर पेंटिंग’ रोज नवीन असे. रोज पूर्वेला समुद्रातून बाहेर येणार्‍या तेजोनिधीचं चैतन्य आगळवेगळं अद्वितीयच  असे.

 घराचा नवीन नवीन  परिचय होत होता. एक दिवस पहाटे आवरून फिरायला जायला सज्ज झालो. सूर्य उगवणारच असतांना मंत्रालयाकडील उत्तरेच्या खिडकीतून पाहतांना मंत्रालयावर झेंडा चढतांना दिसला. ``लवकर या! लवकर या!’’ आम्ही एकमेकांना बोलावून झेंडा चढतांना दाखवला. झेंडा वर चढवल्या चढवल्या पूर्व-पश्चिम फडकायला लागला. एका पोलीस ऑफिसरने सॅल्युट केला नसता तरच नवल. उत्स्फूर्तपणे जनगण मंगल----म्हणताना अभिमानासोबत आपल्याला रोज झेंडा चढता उतरतांना दिसणार ह्याचा आनंद झाला. रोजच्या सूर्योदय आणि सूर्यास्तच्या वेळा पाहून त्यावेळेला आम्ही झेंडा चढतांना पाहून घरातूनच ध्वजवंदनाही करू लागलो. खालून इवलासा दिसणारा ध्वज प्रत्यक्षात खूप मोठा असल्याने चढवण्यासाठी चार सहा जणांचे हात मदतीला लागत.

ह्या झेंड्यांची एक गम्मत असे. सकाळी झेंडा चढवला की तो पूर्वेकडून पश्चिमेकडे फडफडत असे. संध्याकाळी मात्र पश्चिम पूर्व अशी आपली दिशा बदलत असे. जणू सूर्याच्या आगमनाची सूचना देणारा बिनीचा स्वारच! खारे वारे मतलई वारे शाळेत असे शिकवले तर पटकन कळतील मुलांना! आपली दिशा बदलण्यापूर्वी दुपारी काहीकाळ झेंडा आपल्या पोलादीदंड तनुला हात चिकटवून चुपचाप असा उभा जसा की, शाळेचा मुलगा हातावर पट्ट्या बसतील ह्या शिक्षेच्या भीतीने हात मांडीजवळ घट्ट धरून ताठ उभा असावा. अशावेळेला झेंड्याचे रंगही दिसणार नाहीत.

24 ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्रसंघ (युनायटेड नेशन्स) स्थापना दिवस (24 ऑक्टो. 1945) असे. त्यादिवशी संयुक्त राष्ट्रसंघाचा आकाशी निळ्या रंगाचा ध्वज मंत्रालयावर फडकत असे. इतर सर्व दिवशी सर्वात उंच उभा असणारा भारताचा ध्वज संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकाशी निळ्या ध्वजाला सन्मान देत त्या दिवशी थोडा खाली उभा राहून फडकत असे;  तर क्वचित प्रसंगी, अर्ध्यावर फडकणारा तिरंगा कोणा महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन  झाल्याचे मूकपणे सांगत असे.

एखादं वादळ येणार असेल तर रोजचे सर्व नियम गुंडाळून बंड करत, सूर्यदेवांनाच जाब विचारण्याच्या इराद्याने झेंडा सूर्याकडे तोंड करून जोरजोरात फडफडत असे. दक्षिण-पश्चिमेकडून (नैऋत्य) येणारा मान्सून  पुढे सरकत असल्याची ती निशाणी असे. इतका वेळ निळ्याशार असलेल्या आकाशात थोड्याच वेळात काळ्या घनदाट कादंबिनी/ मेघमाला झेंड्याच्या पाठीमागे गोळा होत. वारा, मेघ ह्यांची सेना काही वेळात सूर्यराव तळपद्यांना निष्प्रभ करून झाकोळून टाके. ह्या मेघमालेच्या पडद्यावर झेंडा फारच उठून दिसत असे. पंचतंत्रातील गोष्ट झेंड्यालाही लागू होती तर! जेव्हा एखादा निर्बल, माणूस/ जीव बलाढ्य माणसाच्या विरोधात उभा राहतो तेव्हा त्याच्यापाठीमागे कोणी तरी मोठी ताकद असते. हे ह्या सृष्टीनियमातही खरं होतं.

पावसाळ्यात कधी इतकं वारं असे की, शिडात वारं भरून घेतलेल्या नौकेसारखा झेंडाही वर चढवण्या आधीच असा काही फुरफुरत असे की सहा सहा माणसं झेंडा धरून उभी असली तरी कमि पडत आहेत की काय असे वाटे. वार्‍यासोबत जाणार्‍या झेंड्याला घट्ट बांधून ठेवणं ही मोठी कसरतच असे. एकदा का पाऊस वार्‍याने थैमान घालायला सुरवात केली की वादळाला तोंड देतांना क्षतिग्रस्त झालेला झेंडा काढून दुसरा झेंडा चढवावा लागे. कधी कधी  दिवसातून दोन  तीन वेळा नवीन झेंडा चढवण्याची कसरत ह्या पोलीस गार्ड्सना करायला लागे.  झेंड्याचा अपमान होऊ नये, तो बरोब्बर सूर्योदयाच्या वेळेला वर चढवणे, सूर्यास्ताच्याच वेळेला उतरवणे, दिवसभर तो मानाने फडकत आहे ना बघणे आणि त्यामधे एका दिवसाचीच का? एका क्षणाचीही कसूर होऊ न देणे म्हणजे पोलीस गार्ड्स साठी एक अवघड व्रतच आहे.

पोलीसांसाठीच का? आपल्या देशाचा झेंडा मानाने, डौलात आपल्या पुढे फडकत राहणे ही भारत मातेची शान आहे. कुठल्याही वादळ वार्‍यात तो भारतीयांच्याच बाजूने फडकेल ही जबाबदारी, हे व्रत भारतीयांचे! आपले ---सर्वांचे!

जय हिंद!

-------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -