शांतवती आणि शोभावती

 

  शांतवती आणि शोभावती

       प्रवीण दीक्षित DIG ट्रेनिंग असतांना;  नागपूर, जालना, अकोला असा सारखा प्रवास करावा लागे. जिथे रस्ता चुकायची संधी नसेल तिथेही आमचा गाडीचालक  रस्ता चुकवून दाखवी. पण प्रवीण म्हणे, ``टिम आपल्याला पाहिजे तशी कधीच मिळत नाही. जे असतील त्यांच्याकडून आपल्याला हवे ते काम करवून घेणे हे खरं कौशल्य.’’ अकॅडमीत त्यांना घुडसवारी असे. घोड्याच्या नाठाळपणाला घाबरून तेथील कॅडेटनी घोड्यावर चढायला नकार दिला तर त्यांचे ट्रेनर्स म्हणत, `` साहब घोडा नहीं चलाओगे तो डिस्ट्रिक्ट कैसे चलाओगे?’’ थोडक्यात प्रवीण दीक्षित अत्यंत सतर्क राहून रस्त्याला एक जरी फाटा असेल तरी ``सरळ, डावीकडे, उजवीकडे’’ असं सांगून गाडी आणि चालकाला कायम योग्य मार्गावर ठेवे. नागपूर ते अकोला बिनचूक प्रवास झाल्यावर परतीच्या प्रवासात मूर्तिजापूरला अरे अरे अरे म्हणे पर्यंत चालकानी गाडी उजवीकडे वळवून  मला माहित आहे इथून एक shortcut  आहे म्हणत एका बोळात गाडी इतक्या शिताफिनी घुसवली की मागे ये म्हणायची शक्यताच राहिली नाही. बरं बोळ इतका अरुंद होता की गाडी वळवायला जागाही  नव्हती.  पुढे जाऊन थोडी जागा मिळाल्यावरच गाडी वळवता येणार होती. पुढे  रस्ता संपत होता. तेथे एका फलकावर लिहीलं होतं, - ``येथे दुःखद अंतःकरणाने आपले स्वागत आहे.’’ समोरच्या चौथर्‍यावर काही माणसे उभी होती. ज्वाळा वर वर उसळत होत्या. त्यांचे चट चट आवाज येत होते. ते आवाजही तेथे भरून राहिलेल्या अनामिक शांतीमधे विरून जात होते. ते लोक दुःखात चूर होते पण आम्ही एका तटस्थ भावनेनी ते दृश्य बघत असल्याने ``स्मशानशांतता’’ हा शब्द पहिल्यांदाच दृश्य आणि शब्दातून व्यक्त होणार्‍या अर्थाची सांगड घालून गेला. बाहेरची ती शांतता गाडीच्या खिडक्यांमधून थेट आत शिरली. आम्ही सारेच मौनात गेलो. पुढे गाडी वळवून रस्त्याला लागली तरी कितीतरी वेळ त्या अनामिक शांतीचा अम्मल गेला नाही.

 

               असो!! पाहिलेल्या प्रसंगाच्या, स्थळांच्या आणि योग्य शब्दांच्या जोड्या मन कायम जोडून पहात राहतं. उमामहेश्वर स्तोत्रातील दोन शब्द मनात घोळत राहिले. शांतवती आणि शोभावती. महेश शांतवती  नगरीचा स्वामी तर उमा शोभावती नगरीची स्वामिनी. शांतीवती नगरी म्हणजे स्मशान!  ते वाचतांना मन भूतकाळात थेट मूर्तिजापूरच्या अनाम शांततेत जाऊन पोचलं.

                त्यासोबत लडाख मधल्या निसर्गाच्या भव्यतेनी, नीरव शांततेनी मनाला मौनात नेणार्‍या अनेक जागा मनाच्या पडद्यावर पुन्हा उमटल्या. लामायुरूला उल्कापाताने डोंगरात तयार झालेले एकेकाळचे सरोवर एका बाजूचा बांध फुटून गेल्याने वाहून गेले आहे. तेथील विरळ मानववस्तीचाही उबग येऊन डोंगरावर दुर्गम जागी कुटी बांधून राहणारे बुद्ध साधू आठवले. ब्रह्मचिंतनासाठी ह्या शांतीवती  नगरींमधे ब्रह्मवृंदासोबत राहणारा शिवशांतमूर्तीही तेथे असल्याची वारंवार होणारी जाणीव आठवली. 

                काशी नगरीला तर महास्माशान म्हणतात. दिवसाचे अष्टौप्रहर तेथे जळणार्‍या चिता गंगेच्या शांत, धीर, गंभीर पात्रातून जातांना पाहून तेथल्या गजबजाटातही ती एक वेगळीच अनाम शांती मनाला स्पर्शून गेली. शिवाच्या वास्तव्याची, अधिष्ठानाची पावती देऊन गेली.

               अमेरिकेत एकदा आम्ही दरहॅम ते कुठेसे---- बहधा रॅलेला बस नी जाणार होतो. शेवटच्या स्टॉपला आम्हाला न्यायला मित्र येणार होते. आम्ही बसमधे चढण्यापूर्वीच ड्रायव्हरने आम्हाला ``तुम्ही कुठे जाणार?’’ म्हणून सवाल केला. त्याला सांगितल्यावर त्याने परत विचारलं, ``परत कधी येणार? आज शुक्रवार आहे. शनिवार रविवार बस नसते. तुम्ही तेथून पुढे कसे जाणार आहात? तुम्हाला कोणी न्यायला येणार आहे का? तेथे तुम्ही पोचाल त्यानंतर दोन दिवस तुम्हाला एकही बस मिळणार नाही.’’ जेव्हा त्याची खात्री झाली की आम्हाला न्यायला कोणीतरी येणार आहे तेव्हाच त्याने आम्हाला बसमधे घेतले. त्याच्या काळजीचं कारण बसमधे बसल्यावर हळुहळु कळायला लागलं. लोकवस्ती विरळ विरळ होत घनदाट जंगल सुरू झालं. बाहेर  सूर्याची उन्हं कलायला लागली आणि मजा वाटण्या ऐवजी थोडी काळजीची सावली मनावरही पसरली. बसमधे आम्ही दोघंच उरलो. थांबा आला तेथे उतरल्यावर कोणीच दिसेना. मित्र घ्यायला येणार होते. मग?  आपण बरोबर ठिकाणी आलो ना? मोबाईल रोजरास वापरण्याइतके स्वस्तही झाले नव्हते. सर्रकन् माझ्या अंगावर काटा उमटला. बाहेर बर्फ पडायला सुरवात झाली होती. दहा मिनिटात मित्रही पोचले. पण तो पर्यंत विश्वेश्वरानी स्मशान शांततेचा--- शांतवती नगरीचा परिचय देऊन घेतला होता.

            शिव पार्वतीच्या वागण्यात जमिन अस्मानाचं अंतर. शून्यातून विश्व निर्माण करणारी , सर्व प्रकारचं ऐश्वर्य तयार करणारी (सर्वैश्वर्यकरी ) अशी पार्वती. तिचे अधिष्ठान असलेली नगरी म्हणजे कांची. कांचीचं ऐश्वर्य काय वर्णाव? कांचीची शोभा विस्फारल्या नेत्रांनी बघत रहावी अशी. सोन्याचे दागिने, रेशीम ह्या व्यवसायांनी आणि ज्ञानसम्पन्न पंडितांच्या वास्तव्यानी एकेकाळी भरभराटीला आलेली नगरी म्हणूनच तिचा उल्लेख शोभावती असा केला आहे.  तेथील सोन्याच्या भरजरी साडीचा उल्लेख कधी शंकराचार्यांच्या स्तोत्रातून येतो. तर कधी त्रिपुरसुंदरीचं वर्णन करतांना आचार्य म्हणतात, `रुधिरबिंदु निलांबराम्हणजे आकाशी साडीवर लाल बुट्टे असलेली रेशमी साडी ही जगज्जननी नेसली आहे. हाटक म्हणजे सोने. शाटी म्हणजे साडी तर कधी पार्वती अंगभर सोन्याची जर असलेली कांचीची साडी नेसते. कांचीदाम म्हणजे सोन्याचा कमरपट्टा.  पार्वतीचा अत्यंत कलाकुसर केलेला कमरपट्टा ही कांचीचाच.

           अशा शांतीवती आणि शोभावती नगरी मला गणिताच्या लिमिट ( Limit )  ह्या प्रकाराची आठवण ताजी करून गेल्या. लिमिट झिरो टू इनफिनिटी ( Lim. 0- infinity ) म्हणजे शांतीवती ते शोभावती हा प्रवास वाटला. शून्यापासून ते ब्रह्मांडापर्यंत आपल्या अस्तित्त्वानी, कृतीनी व्यापणारे हे उमामहेश्वर ह्या दोन नगरींमधून नव्याने माझ्या मनावर गारूड करून गेले.

नमः शिवाभ्यां विषमेक्षणाभ्यां

बिल्वच्छदा-मल्लिकदाम-भृद्भ्याम्

शोभावती-शान्तवतीश्वराभ्यां

नमोनमः शंकर-पार्वतीभ्याम् ।। 11

 

त्रिनेत्रधारी शिव-पार्वतीसी

 प्रणाम माझा अति आदरेची

वेणी सुगंधी बटमोगर्‍याची

 वेणीवरी पार्वतिच्या रुळे ती ।। 11.1

 

कंठी शिवाच्या बहु बिल्वमाला

 असे सदा भूषण त्या शिवाला

शांतिवती हीच स्मशानभूमी 

 निवास तेथे करि चंद्रमौळी ।। 11.2

 

महेश्वरासीच महास्मशान

 काशीपुरी हे प्रिय नित्य जाण

असे अधिष्ठानचि ते शिवाचे

 ती अन्नपूर्णाहि तिथे रहाते ।। 11.3

 

 वा थोर साधू वसतीच जेथे

 त्या शांत जागाच हिमालयात

तेथेचि कैलासपती रहात

 गिरीश गौरी सदनीच शांत ।। 11.4

 

ऐश्वर्य सौंदर्यचि अद्वितीय ।

 कांचीपुरी ती नगरी सुरेख

शोभावती ती प्रिय पार्वतीस

 तिचे अधिष्ठान असे तिथेच ।। 11.5

 

शोभावती शांतिवतीत ऐशा 

 निवास आहे शिव पार्वतीचा

उमा-महेशा गिरिजा-गिरीशा

 प्रणाम ऐशा शिवपार्वतीला ।। 11.6

----------------------------------------------

लेखणी अरुंधतीची

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -