कदंब

 


कदंब -

आइन्स्टाईन का कुणीसं म्हटलेलं ``ज्याला जे हव असतं तेवढच दिसत’’ अशा आशयाच्या वाक्याने विचारांचं एक नवीन दालन मला उघडून दिलं. खरच जग अपरिमित गोष्टींनी भरलेलं असतांना आणि प्रत्येकाला डोळे/नजर असूनही काही विशिष्टच गोष्टी आकृष्ट करतात. किंवा असही म्हणू शकतो की ज्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी मन धावत असतं त्या गोष्टी जगाच्या सार्‍या पसार्‍यातूनही त्याला स्पष्टपणे हुडकून काढता येतात. राजा शुद्धोदनानी राजपुत्र सिद्धार्थाला जराही दुःख दिसू नये ह्याची काळजी घेऊनही त्याला जगातलं दुःखच दिसलं. त्यानी तो विव्हल झाला आणि त्यातूनच त्याला त्याचा ज्ञानमार्ग सापडला. सर्वांनाच तो दिसत नाही. केकुलेला बेंझिनच्या मॉलिक्यूलच्या रचनेनी पिसाटलं आणि स्वप्नात त्याला एक साप त्याची शेपटी तोंडात धरून गोल गोल फिरतांना दिसला. केकुले खाडकन उठला बेंनझिन हे रिंग स्ट्रक्चर आहे हा शोध त्याला लागला. चुकलेल्या पै चा हिशोब नाथांना सापडलाच. झाडावरून दगड मारून पडलेली कैरी ही मला खाण्यासाठी असते. न्यूटन मात्र त्यातून गुरुत्वाकर्षण बघत असतो. पायाळू माणसाला म्हणे जमिनीच्या पोटातलं पाणीही दिसत असतं. ऐकू येत असतं.

जे तुम्हाला दिसेल ते मला दिसेलच असे नाही आणि मला जे दिसेल ते तुम्हाला दिसेल असं नाही. पण कधी कधी न दिसलेल्या ह्या गोष्टींची ओळख पूर्वजांच्या सांगण्यातून होते आणि अरे खरच की! असं म्हणायला होतं.

संस्कृत साहित्यातून अनेक तरुवल्लरींची ओळख होते. ती सुद्धा मोठ्या नजाकतीने! त्यातीलच कंदब हे सर्वांचं लाडकं झाड! ललितासहस्रनामातील ललिता ही ``कदंबकुसुमप्रिया’’ आहे तर कधी ``कदंबवनप्रिया’’ आहे. कृष्ण आाणि कदंबाचं नातंही असच फार फार जुनं! कदंबाच्या वनात बासरी वाजवणारा कृष्ण, कालियाच्या विषाने जळून गेलेल्या कदंबाच्या फांदीवर चढून कालिंदीच्या डोहात उडी घेणारा कृष्ण वा सख्यांसोबत रानात गेला असता कदंबाचे गेंद कानात कुंडल म्हणून घालणारा कृष्ण कदंबाची ओळख करून देतो. कदंबाचे गेंद कृष्णाच्या गोबर्‍या गालाला लाडानी घासत राहतात. इतकी सुरेख ओळख होऊनही मी कदंब पाहिला नाही ह्याची रुखरुख होती. शेवटी गुगुलगुरूपुढे माथा टेकवला आाणि काय आाश्चर्य! इतके दिवस कुठेही न दिसलेले कदंब मला जागोजागी दिसायला लागले. मुंबईला अरे!--- आपल्या घरासमोरच कदंब आहे हे पाहून माझ्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. तुजं आाहे तुजपाशी परंतु जागा चुकलासी ---- त्याच्याकडे बघण्याचे डोळेच मला तेव्हा नव्हते. माझे डोळे फक्त ओळखीच्या गोष्टींच्या टुमदार आरामदायी कुंपणात रममाण होते. ह्या ओळखीच्या चिमुटभर गोष्टींमधे कदंबही सामावला. त्याची नक्षीदार सुंदर पानं, आाणि त्याहून सुंदर टेबलटेनिसच्या चेंडुएवढी  एकसारख्या आकाराची पिवळट केशरी फुलं आता थेट कृष्णाच्या गोंडस मुखड्यासकट मला दिसू लागली. ऑगस्टच्या मागेपुढे श्रावणाच्या आसपास चारएक महिने कदंबावरचे हे मोतीचुराचे नाजुक नाजुक लाडू मनाला प्रसन्न करत राहतात.   

कदंब

सुवृत्त गोल केशरी कदंब गेंद बांधले

सुरेख एकसारखे तरूवरी कुणी कसे?

तरूवरी कितीक मोतिचूर लाडु लोंबती

न सोडती मधूघटांस जराहि पुष्पसोबती

 

सुवर्णभूषणे मला नको म्हणे मुकुंद हा

हवीत कर्णभूषणे कदंबगोलकांसमा

फिकेचि पुष्कराजही कदंबगोलकांपुढे

अहा! हवेत डूल हे मलाच शोभतील जे

 

मुकुंद गाल गोबरे तया कदंब गोल हे

करीत लाडिगोडि हो घासतीच अंग हे

वदे सुनेत्र सुंदरा उमाच मोहुनी तया

 कदंबपुष्प हे कसे मोहवीच मन्मना

 

नभी बघून श्याम मेघ जाहला उतावळा

तरू म्हणेचि सावळा मलाच येइ भेटण्या

उभा असेच मोहरून अंग अंग स्वागता

कदंब अन् मुकुंद भेट श्रावणी घडे पहा

 

ठसे मनात भेट ही सुरेख श्रावणातली

कदंब वाट पाहताच धावतो धरेवरी

सरींसवेच मेघश्याम घालतो गळामिठी

कदंबपुष्प डोलतीच मोहनासवे मनी

------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -