पुस्तके

 

 पुस्तके -

             

              एकदा एका प्रकाशकांबरोबर माझ्या ``नाते लडाखशी’’  पुस्तकाबद्दल बोलत असतांना त्यांनी मला विचारलं, ``तुम्हाला वाचकांना कुठे घेऊन जायचं आहे?’’ मला काहीच सांगता येईना. मी नवखी लेखिका असल्याने मला प्रश्नच उमजला नाही. ``मला कुठे जायचं नाही तर मी वाचकांना कुठे घेऊन जाणार? वाचकांना कुठे नेण्यासाठी मी पुस्तक लिहीलं नाही. ही माझी माझी अनुभूती आहे. कोणला पटली तर ठीक. मला वाटलं ते इतरांना वाटावं असा माझा कोणता प्रयत्न नाही.’’ प्रकाशक गप्प बसले. त्यांनाही माझं कच्चेपण जाणवलं असावं. नंतर पुस्तक प्रकाशित होऊन लोकांपर्यंत पोचायला लागल्यावर फोनचा वर्षावच सुरू झाला.  अनेक वाचकांचे फोन आले की, ``आम्ही तुमच्या सोबत लडाख हिंडून आलो.’’ तेंव्हा लक्षात आलं, कळत न कळत लेखक वाचकांना नेत असतो. कुठल्यातरी अज्ञात स्थळी. कुठल्यातरी अनवट वाटेवर. कुठल्या तरी अनोख्या प्रदेशात, कुठल्यातरी नवीनच विचारांच्या जगात. नवीन ज्ञानाच्या  अदृश्य गुहेत. तर कधी अज्ञानाच्या खाईतही.

               हे लक्षात आल्यावर मी नखशिखांत हादरले. आत्तापर्यंत जे माझे अनुभव होते ते मी लोकांपुढे मांडतांना माझ्या हे लक्षात आलं नव्हतं की हे पुस्तक आता माझं नाही लोकांचं आहे. कारण लोकं त्याची पारायणं करत होते. त्याहीपेक्षा लेखकाच्या खांद्यावर असलेली समाजाच्या योग्य वैचारिक पोषणाची जबाबदारी तेव्हा मला प्रकर्षाने जाणवली.

                कधीकाळी लहानपणी ऐकलेली एका बासरीवाल्याची गोष्ट आठवली. गावात झालेले उंदीर बासरीवाल्याच्या  गोड मधुर स्वरांवर इतके भाळून गेले की त्याच्या पाठीपाठी जात राहिले. बासरीवाला त्यांना घेऊन त्याने ठरवलेल्या मार्गावरून जात होता. आणि उंदीरही कुठलाच विचार न करता त्याच्या पाठी जात होते. बासरी वाजवत वाजवत बासरीवाला नदीत शिरला आणि त्याच्यापाठी उंदीरही. बघता बघता गावातले सारे लहानमोठे उंदीर नाकातोंडात पाणी शिरून मरून गेले. गाव उंदीरमुक्त झालं. गावातली मोठी आफत गेली म्हणून गावकरी खूष झाले. पण त्यांनी बासरीवाल्याला ठरलेले ईनाम दिले नाही. बासरीवालाही काही बोलला नाही. भांडला नाही. तो शांतपणे गावाबाहेर निघून गेला. गावाबाहेर पारावर बसून तो बासरी वाजवू लागला. त्याच्या बासरीचा तो मधुर स्वर ऐकताच त्या स्वरांनी आकृष्ट होऊन घराघरातील मुलं बाहेर पडली. त्या स्वरांच्या ओढीने गावाबाहेर  पारावर बासरी वाजवत बसलेल्या  बासरीवाल्या भोवती गोळा होऊन तल्लीन होऊन त्याची बासरी ऐकू लागली. बासरीवाला उठला आणि त्याने ठरवलेल्या मार्गावरून चालू लागला. हा उतरणीचा रस्ता नदीकडे जाणारा आहे हे पाहिल्यावर गावकर्‍यांच्या पोटात गोळा आला. बासरीवाल्याचा उद्देश लक्षात येऊन त्यांनी त्या बासरीवाल्याची माफी मागून त्याला पाहिजे तेवढी रक्कम देऊन  निरोप दिला.

               सुहृदहो, त्याक्षणी प्रत्येक लेखक मला बासरीवाला वाटू लागला.

गावाला संकटमुक्त करणारा किंवा संकटात ढकलणारा. लहानपणी मला अनेक पुस्तकं त्या लेखकाच्या शब्द फुलोर्‍याने इतकी आवडायची की मी ती पुस्तकं परत परत वाचून काढायचे. फळ पिकलं की त्याच्यातील बी चांगली टणक होते. तसं जग जवळून बघत गेल्यावर, भारतीयांना भ्रमित करण्यासाठी पाश्चिमात्यांच्या चालल्या जाणार्‍या हिणकस चाली पाहून पाहून मनही चांगलं टणकं झालं. तेंव्हा वाटायला लागलं, ही थोर थोर लेखकांची पुस्तकं वाचकांना भ्रमित करायला तर नाही लिहीली? कित्येकवेळा आपल्या धार्मिक श्रद्धा डळमळीत व्हाव्यात असा एक सुप्त उद्देश लेखकाचा  असावा का? का निरागसपणे तो कोणाच्या जाळ्यात अडकून असं लिहीत असावा?  कधी प्रत्यक्ष आपल्या आदर्शांना हात न लावता कुठल्यातरी  भलत्याच हिणकस व्यक्तिरेखेला उजाळा देऊन त्याच्यावरच सोनेरी शब्दांची उधळण करून त्यालाच आपल्या श्रद्धास्थानांपेक्षा मोठं दाखवण्याचा प्रयत्न त्याने का करावा?

              तर कधी अत्यंत पराक्रमी वीरांचा शौर्याचा, विद्वत्तेचा , धोरणीपणाचा इतिहास न सांगता खोटानाटा इतिहास सांगून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी नाटकं प्रभावी लेखणीने लिहून एखाद्या वर्गावर काय अन्याय झाला काय अन्याय झाला चा खोटाच डांगोरा का पिटत रहावा? परवा अशा एका गाजलेल्या विकृत मनोवृत्तीच्या नाटकाला एका राजकीय नेत्याने कसे उदंड  सहाय्य  दिले हे त्यातील नट निरागसपणे सांगून त्यांचे आभार मानत होता.

       नुसती बाहेरची दृश्य श्रद्धास्थानं उद्ध्वस्त करून ती अपवित्र केली जात नाहीत तर मनामनातील श्रद्धास्थानांवर एखादा कु लेखक त्याच्या प्रभावी लेखणीने गाढवाचा नांगर फिरवत असतो. कधी तो दारू, नशा, पार्टी कल्चरला उदात्त बनवून सुसंस्कारित जनसामान्यांना वेडं ठरवून आपण असं वागत नाही म्हणजे आपलच काहीतरी चुकतय असं वाटायला लावतो तर कधी आईवडिलांना नमस्कारही  लाजिरवाणा वाटायला लावतो. दूधाला वीष आणि चहाला अमृत ठरतो.

           एकदा एका लेखिकेनी माझी खिल्ली उडवत मला विचारलं हे काय? तुझ्याशी मी इतका वेळं बोलतीए तुझ्या तोंडातून एकही अपशब्द कसा येत नाही? तुला वावडं आहे काय अशा खमंग शब्दांचं? तू वरणभाती दिसतीएस.’’ वाक्यावाक्यातून गळणार्‍या अपशब्दांनाच वाचकांच्या मनावर प्रभावीपणे थोपवून हे असं बोलणं म्हणजेच खरं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं सागून आमच्या चांगल्या संस्कारांना मिळमिळीत गावंढळ ठरवायचं काय कारण? कधी कधी असे बटबटित आगावू वागणारे नव उच्चपदस्थ लेखक पाहून आमचे साधे भोळे नीतीमान सामान्य लोक विशेषतः तरुण आणि मुले गडबडून जातात आणि आपले चोख सोन्यासारखे संस्कार मोडीत काढतात. मला माझे वडिल सांगत, पारतंत्र्यात त्यांची शालेय पुस्तकं मुलांच्या मनात हिंदू धर्माची अस्मिता पूर्णपणे पुसून टाकली जाईल अशीच असतं. सहज जाता जाता जेवढं म्हणून brain washing  करता येईल तेवढी काळजी घेतली जात असे. त्यांच्या पुस्तकात असलेल्या Cow has no soul  ह्या वाक्याने अत्यंत उपयोगी अशा गायीला  कसं वागवायचं हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.

        भारतीय तत्वज्ञान बावळट, भारतीय भाषा मागास, भारतीय संस्कार म्हणजे पळीपंचपात्र आणि भटभिक्षुकीचे, आपला देश म्हणजे अडाण्यांचा गाडा, साप, अस्वलांचे खेळ करणार्‍या डोंबार्‍यांचा महामागास प्रदेश, भुताटकी, जारणमारण अंधविश्वासवाल्यांपासून आम्ही पाश्चिमात्यांनी दूर राहण्याची जागा , आपले कपडे म्हणजे भोंगळ, बोंगापोंगा वाले, इतकेच का पाश्मात्यांनी डोकं भादरलेल्या लेखकांच्या आणि विचारवंतांच्या विचारांच्या मधुर बासर्‍या ऐकत आपण कधी उतरणीला लागलो हे आपल्यालाच कळलं नाही. आज आपल्या जन्मदात्यांना परकीय भाषेत लाडेलाडे हाका मारणारा एकही देश नाही. इतकच कशाला, आपल्या घराच्या उंबर्‍यावर बसून इमाने इतबारे राखण करणार्‍या मोत्या, वाघ्यांना नाकारून आपण कधी आळशी लोदी कुत्री आपल्या गाद्या उश्यांवर आणून बसवली हे आपल्यालाच कळलं नाही.

ह्या फार ठळक आणि लक्षात येणार्‍या गोष्टी आहेत. काही काही गोष्टी अशा प्रकारे बेमालूम खर्‍याचे रूप घेऊन आपल्या मेंदूत सरकवल्या जातात की आपल्याला त्या  आपण कधी आत्मसात केल्या ह्याचा पत्ताच लागत नाही.

पंचतंत्रामधे एक सुभाषित आहे- शस्त्राने शत्रू मरत नाही  पण त्याची बुद्धी मारली तर तो समूळ नाश पावतो. `` न शस्त्रहता हताः भवन्ति । बुद्धिहताः हताः भवन्ति ।

 

          आज अनेक पुस्तकं आपल्यापर्यंत सहजपणे पोचवण्याची काळजी कोणीतरी घेत आहे. ही पुस्तकं आपल्याला उतरणीकडे नदीच्या बुडवणार्‍या प्रवाहाकडे तर घेऊन जात नाहिएत ना? ती आम्हाला, आमच्या संस्कृतीला, आमच्या देशाला, आमच्या धर्माला घातक तर नाहीत ना? ह्याचा विचार  प्रत्येकवेळेला पुस्तक वाचतांना  करायला विसरू नका मित्रांनो.

---------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -