चंद्रावरील बेडूक ( लहान मुलांची गोष्ट)

 

चंद्रावरील बेडूक

                माझ्या लहानपणी चांदोबा, किशोर, चंपक अशा कुठल्यातरी मुलांच्या मासिकात वाचलेली,  ``चंद्रावरील बेडूक’’ ही गोष्ट मला आजही आठवते. तेंव्हा जेवढी मला ती आवडली होती. तेवढीच आजही आवडते. त्यावेळेला त्या गोष्टीचे लेखक लक्षात ठेवावेत असं कधी वाटलं नाही ह्याची आज खंत वाटते. त्या गोष्टीतला बारीकसारीक तपशील नाही आठवत पण त्या गोष्टीतल्या मुलाचं नाव बहुधा चंदू होतं. चला मग चंदूपासूनच सुरवात करू या.  आमच्यावेळेला, बर कां मुलांनो चंदू नाव भलतच आवडतं नाव असावं. कारण माझ्या बाहुल्याचं नावही मी चंदू ठेवलं होतं.  असो.

              हा गोष्टीतील चंदू  मोठा चुणचुणीत मुलगा होता. त्याला आकाशातील गम्मत पहायला फार आवडायची. सूर्य, चंद्र, निरनिराळे ग्रह तारे बघता बघता तो अगदी गुंग होऊन जायचा. कितीतरी तास तो आकाशात बघत बसायाचा. शेवटी आई हाक मारायची, ``चंऽऽऽदू, बास झाल रे तुझा आकाशात बघणं. झोप बर आता.’’ चंदूच्या सुनीलकाकालाही ह्या सार्‍या तारांगणाची भारी आवड होती. सुनील काका आला की तो त्याला खगोलशास्त्रातल्या विविध आश्चर्यकारक गोष्टी सांगायचा आणि चंदू डोळे विस्फारून आश्चर्याने सार्‍या ऐकत राहायचा. ``चंदू, गुरू, शनी हे ग्रह वायूरूप आहेत बर का. शनी ग्रह आकाराने खूप मोठा असला तरी खूप हलका आहे. पाण्यात टाकला तर तरंगेल. आई एकटी बाजारात गेली तर झपाझप चालते पण गुंड्याला कडेवर घेऊन आणि तुझा हात धरून जाते तेव्हा  हळुहळु जाते ना त्याप्रमाणे शनीला खूप उपग्रह आहेत त्यामुळे तो हळहळु चालतो.’’ मुलांनो, तेंव्हा आत्तासारखे कॉम्प्युटर, गुगलगुरू काही काही नव्हतं. आम्ही तर काँम्प्युटर हे नावही ऐलं नव्हतं. त्यामुळे सुनील काकाकडून मिळणारी माहिती फार अनमोल असे.

                चंदूला तर सुनीलकाका कधी येतो असं झालेलं असे. तो कायम सुनीलकाकाची वाट बघत असे. तेंव्हा घरोघरी फोनही नव्हते. कोणालाही केंव्हाही फोन करता येत नसे. त्यामुळे सुनीलकाका आला की चंदू आनंदानी उड्याच मारायचा.

             ह्यावेळेला तर सुनील काकानी  चंदूच्या वाढदिवसाला त्याला अशी भेट दिली की चंदूच्या आश्चर्याला आणि आनंदाला सीमाच राहिली नाही. सुनीलकाकानी चंदूला एक दुर्बिण भेट दिली. ती दुर्बिण त्यांनी स्टँडवर त्याच्या टेरेसमधेच लावून दिली. आता तर चंदू तासन् तास ग्रह, नक्षत्र, ध्रुव तारा तर कधी त्याच्या भोवती फिरणारे सप्तर्षी  बघत बसे. दुर्बिणीतून चंद्रावर दिसणारे डाग म्हणजे तिथल्या दर्‍या आहेत हे तो पहायचा प्रयत्न करे. शनीची गोल कडी त्याच्या दुर्बिणीतून स्पष्ट दिसत.  आता चंदूच्या मित्रांमधे चंदूचा भाव भलताच वाढला. चंदू त्यांना ही आकाशातली गम्मत दाखवत असे. चंदूच्या दुर्बिणीतून आकाशाची मौज पहायला त्याच्या मित्रांची ही गर्दी होई.

              एका पौर्णिमेला चंदू दुर्बिण सज्ज करून तयारीतच होता. चंद्र दिसला की त्याच्यावरील मोठाल्या दर्‍या तो मित्रांना दाखवणार होता. चंद्राचं गोल गरगरीत शुभ्र बिंब क्षितिजावरून वर आलं. चंदूनी आपला डोळा दुर्बिणीच्या भिंगाला लावला आणि हे काय? चंदू बघतच राहिला. आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले. चंद्रावरती एक भला मोठा बेडूक हातपाय पसरून बसला होता. मधून मधून डोकही हलवत होता. त्या बेडकाला निळे निळे पंखही होते. केवढा मोठा हा बेडूक! आईने त्याला गोष्ट सांगितलेली आठवत होती; चंद्र आणि सशाची. चंद्र आणि हरणाची. चंद्राजवळ ससा असतो. हरीण असतं. हे त्याला माहिती होतं. पण हा पंख हलवणारा बेडूक! विस्मयाने त्याच्या तोंडाचा आ वासला गेला. आणि तो त्याच्या वाड्यात राहणार्‍या मित्रांना जोरजोरात हाका मारून  बोलावायला लागला. ``अरे राजू, ए कुमार, विवेक, सुरेश ---- अरे लवकर या. चंद्रावरचा बेडूक पहायला या. ए मंगल--- ए लता लवकर या. मी शोधून काढलेला चंद्रावरचा निळ्या पंखाचा बेडूक पहायला या. लवकर या. सर्व बाळ गोपाळ चंदूच्या हाका ऐकून धावत जमा झाले. दुर्बिणीला डोळा लावून बघू लागले. ``खरच की रे चंद्या! केवढा हा बेडूक.’’ मंगल म्हणाली ``ए मलाही दाखव रे.’’ ``ए आता मला!! ए आता मला.’’ मुलांनी नुसता गलका केला. तेवढ्यात `` काय चाललय रे मुलांनो?’’ म्हणत सुनील काका आले. चंदूनी आनंदानी उडीच मारली. ``सुनील काका , सुनील काका लवकर ये!!! अगदी लवकर ये!!!  मी एक मोठ्ठा शोध लावला आहे. ह्या चंद्रावरचा एक भलामोठा बेडूक शोधून काढला आहे.’’ सुनीलकाका चा हात धरून चंदू त्याला ओढत आधी टेरेसवर घेऊन आलां. सुनील काकानी वाकून डोळा दुर्बिणीला लावला . काही न बोलता तो परत सरळ झाला. दुर्बिणीच्या पुढच्या बाजूकडे आला. काका काय करतोय हे पहाण्यासाठी. सारी मुल काकाभोवती जमली. ``चंद्या गद्ध्या, अरे दुर्बिणीच्या लेन्सेस /भिंग पहाण्यापूर्वी किती वेळा तुला सांगितलं नीट पूसून घे. बघ काय आहे त्या भिंगावर ! चंदू पाहू लागला. त्याच्या बरोबर असलेली मुलंही कुतुहलाने बघू लागली. त्या भिंगावर एक माशी बसली होती. निळ्या पंखांची. ती तिचे पंख सारखे हलवत होती. चंदूचा चेहरा उतरला. मुलं खो खो हसू लागली. ``चंद्या! चंद्रावरचा बेडूक मस्त आहे हं तुझा.’’ कोणी म्हणे, ``चंद्या चंद्रावरचा बेडूक पृथ्वीवर अवतरला माशीचा अवतार घेऊन. सगळ्यांनी चंद्याच्या पाठीत धपके घालायला सुरवात केली. ``वा!!वा!! चंद्या! आम्हाला मारे हाका मारून मारून काय पहायला बोलावलं तर माशी! चंद्या रडकुंडीला आलेला पाहून. काकानी त्याला जवळ घेतलं. सगळ्याच मुलांना  दुर्बीणीतून चंद्र समजाऊन दिला. सगळीच मुलं चंद्र, ग्रह, तारे ह्यांची माहिती सुनील काकाकडून घेऊन मज्जेत घरी गेली.

------------------------------------

मूळ लेखणी कोणाची ते माहीत नाही. पण तुम्ही आपल्या ओळखीच्या लहान मुलांना सांगीतली तर नक्की आवडेल.

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -