।। यमुना ।।

 

  ।। यमुना ।।

झुळ झुळ मंजुळ गात तराणा कडे कपारी दर्‍यांतुनी

तव जल जाई पुढती पुढती मागे ना पाहे वळुनी  ।। 1

उरी तरंगांचे आंदोलन कृष्ण कृष्ण डोले गजरी

ऊर धपापे अजुन तुझे हे श्वास श्वास  निश्वास हरी ।। 2

कलिंदकन्ये सखे जललते सांग मला यमुने बाई

व्रजधामी तू कशी विसरली सुमनधना हरिच्या पायी ।। 3

पाहुन तुजला वाटे मजला गुपित ठेविसी खोल मनी

हृदयमंजुषी जपुन ठेविले हरवलीस का त्यात सखी ।। 4

आले तुजला मी भेटाया भान तुला कसले नाही

उघडुन काळी चंद्रकळा ती पुन्हा पुन्हा  निरखे नयनी ।। 5

घेसी अंगावरी पांघरुन   पुन्हा पुन्हा का उलगडुनी

कृष्णस्पर्श का आठवला तुज थर थर काया शहारली ।। 6

नीर-मौक्तिके हृदय-सूत्रि तव गुंफुन करिसी हार सखे

तरंग मालांचे या सुंदर तजेलदार का नित्य नवे ।। 7

फिरुन ओवसी फिरुन काढसी जलमौक्तिक का पुन्हा पुन्हा

याहुन सुंदर नीर मालिका गुंफिन म्हणसी कोणाला ।। 8

बोलत होते मी यमुनेशी  स्वतःमधे ती रमलेली

भाव समाधी तिची उतरण्या   जलतनुसी मी स्पर्श करी ।। 9

काय जाहले? ----- काय जाहले ?------

काय जाहले मला कळेना कसली बाधा मज झाली?

झर झर झर झर अंगामधुनी   चम चम चमके का बिजली ?।। 10

क्षणात फिरला काळहि मागे निघे व्रजासी यमुनाही

कृष्णनाम नावेत बैसले हरखुन गेले मी रमणी ।। 11

कालिंदी अन काळ संगती गोकुळधामी आले मी

आनंदाच्या लाटांवरती उचंबळे मम हृदय-गती ।। 12

तीरचि सजले कदंब फुलले होत्या तेथे फुलवेली

मंडप त्यांचे होते सुंदर घोस फुलांचे झुलताती ।। 13

तलम परिमला उडवित नेई चंचल पवन सुदूरवरी

सुमनवस्त्र ते पाहुन गंधित धुंदित धावे भ्रमर झणी ।। 14

लाजलाजती डुलती खुलती फुले सुगंधित किती किती

दलादलाने विकसे जाई जुई बकुल चंपाराणी ।। 15

मोतिचुराचे लाडु कितिक हे घेती झोके तरुवरती

किती लगडले गेंदचि पिवळे   कदंब कुसुमांचे प्रीती ।। 16

ग्रीष्म शरद अन वसंत वर्षा हेमंत शिशिर हे स्वच्छंदी

तिथे नांदती एका वेळी एकदिलाने ऋतु साही ।। 17

तोच घुंगरे घंटांचा तो मंजुळ  ध्वनि येई कानी

कपिला तांबू ढवळ्या गायी येतांना दिसल्या रानी ।। 18

हात गुंफुनी सवे परिमला सूर तरंगत ये कुठुनी

सूर ते जणु श्वास हरीचे अमृतमय स्पर्शे कानी ।। 19

प्रकाश सुंदर नीलवर्णी तो फाकु लागला सभोवती

सवंगड्याच्या सवेच कान्हा  अवतरला दृष्टीपुढती ।। 20

बालमूर्ति ती गोंडस सुंदर स्मित मोहक मधु मधुर मुखी

मुकुट शिरावर मोरपिसांचा कंठी वनमाळा बरवी ।। 21

आपाद फुलांची माला सुंदर मोहमयी आमोदमयी

मधमाशा अन षट्पद झुंडी फुलाफुलांवर रुणझुणती ।। 22

माला व्हावी अमुची सुंदर उत्कंठा त्या सुमनहृदी

गळाभेट का घडेल हरिची चरणस्पर्श हो आम्हासी ।। 23

गर्दी केली वनमालेतचि दाटीवाटीने बसली

हरि स्पर्शासी उत्सुक इतुकी प्रफुल्ल वदने जणु हसली ।। 24

कदंबकुसुमांचे ते कुंडल कानि मुकुंदाच्या डुलती

डुलता झुलता हळूच घेती मुकंदमुख ते चुंबूनी ।। 25

मुकुंदमुख चुंबण्या मिळावे ह्याहुन दुसरे सुख नाही

गाल गोबरे गोविंदाचे कुंभ अमृताचे दोन्ही ।। 26

कटि पीतांबर रेशीम शेला किणकिणते मेखला कटि

कमल-पाऊले पुढेचि पडता पायी तोरड्या छुमछुमती ।। 27

गळ्यात शोभे मौक्तिकमाला कौस्तुभ कंठी विराजला

कमलदलासम कोमल अस्फुट ओठी वेणू सुस्वरसा ।। 28

सुर वेणुचे मंजुळ मंजुळ तृप्त करीती कानांसी

आनंदाने हृदय डोलते व्रजभूमी हो सूरमयी ।। 29

अद्भुत सुर ते  वेड लावती चराचराला स्पर्शूनी

पुलकित होती गात्रे सारी आनंदाश्रू ये नयनी ।। 30

ताठ करुनिया कान ऐकती कपिला तांबू ह्या गायी

गवत राहिले मुखी तयांच्या चरायचे ते विसरोनी ।। 31

गुरे गुराखी गोप गवळणी टाकुनी कामे हातीची

शोधित फिरती गोविंदाला। कृष्णवेड लागून मनी ।। 32

विसरुन गेले देहभानही मी पण गेले वितळोनी

तीरावरच्या वनराजीतून कृष्णमेघ विहरे कोणी ।। 33

प्रीतजले ओथंबुन आला घननीळचि तो सर्वांगी

जीवन देई व्रजभूमीसी नित बरसे संपे कधी ।। 34

तुझ्या तिरी ही वेडी राधा झाली कृष्णे! कृष्णमयी

मला फसवुनी कारे कान्हा केली कालिंदी जवळी ।। 35

सखे पुसाया जाब तयाचा। डोकावे ती तुझ्या जळी

 जळी सावळ्या सहज उमटली राधामोहन  रांगोळी।। 36

राधामोहन चित्र सावळे पाहे हरखुन ती नयनी

हळुच हासला कृष्णसखा तो झाली राधा कृष्णमयी ।। 37

हाय हाय मी खुळावले गे करे स्पर्श मी  जलतनुसी

प्रतिबिंबासी धरता हाती जागृती आली मम नेत्री ।। 38

कालिंदी हे कलिंदकन्ये कुठे लोपला कृष्ण सखे

शोक अनावर झाला मजला विनाकृष्ण काही रुचे ।। 39

इथेचि होता कुठे गं लपला हृदयसखा तो वनमाळी

यमुना हसली वदली काही अस्फुटसे माझ्या कानी ।।40

आले धावत तळ्याजवळ मी खोल बदामी गहिर्‍या या

ओठी वेणु खट्याळ हसला अधीर पाहून मज कान्हा ।। 41

-----------------------

लेखणी अरुंधतीची -

( ‘‘ आले धावत तळ्याजवळ मी खोल बदामी गहिर्‍या या ’’ बदामी तळे चा अर्थ हृदय असा घ्यावा. स्वतःच्याच हृदयात डोकावून पाहिल्यावर प्रत्येकालाच तो सावळा कृष्ण भेटतो. )

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -