संबोधन

 

संबोधन

               काही दिवसांपूर्वी एका सद्गृहस्थांनी माझा लेख त्यांच्या फेसबुकवर मला सांगून शेअर केला. लेखाविषयी अत्यंत आदराने त्यांनी मांडलेले विचार आणि नंतर ``आ. सैा. अरुंधतीबाई दीक्षित यांचा लेख मला विशेष भावला होता.  (बाईंनी हे आदर वाचक संबोधन आहे. उदा. अंबाबाई, राणी लक्ष्मीबाई, रमाबाई इ.)’’ असेही लिहीले. मला फार आवडले.

                  माझ्या मैत्रिणीची आई नांदेड, लातुर येथेच राहिली होती. पण कधी मुलीकडे रहायला आली आणि मी भेटायाला गेले की, ``माय गं आलीस का‘’? विचारत असे असे. पुरणपोळीसारखा अलवार तो ``माय गं’’ कधी माझ्या लेखणीनी  आत्मसात केला कळलच नाही.  पुण्याच्या मंडईत भाजीचा भाव करायला गेलं की मात्र ``मावशे जा पुढे!’’ ऐकूनही मला गालातल्या गालात हसू येई.

               लहानपणी मला हळदीकुंकवाची आमंत्रण करायचं काम असे. आम्ही पूर्वी रहात असलेल्या जुन्या वाड्यातील सर्वांना बोलवायला लागे. त्यात खांद्यावरून पदर पुढे घेणार्‍या ज्योतीभाबी होत्या. तोरोंच्या काकू होत्या. पाळंद्यांच्या मावशी होत्या. कोपर्‍यात छोट्याशा खोलीत मोलमजुरी करून राहणार्‍या शांतीला बोलावतांना शांताक्का म्हण हं अशी आईनी सूचना दिलेली असे.  पुढे सरलाबेन असायच्या. बहिणीच्या सासरी गुजरातीचा जास्त पगडा असल्याने शेट हे आदरार्थी संबोधन सवयीचे झाले.

             आम्ही औरंगाबादला असतांना  घरी येणारे जाणारे पोलीसदलातील कर्मचारी, अधिकारी प्रवीणना साबजी तर मला मेमसाब म्हणत. म्हणत. पहिल्यांदा खूपच तर्‍हेवाईक वाटलं. पण एकेकाळी तेथे असलेल्या निजामाच्या अम्मलाचा टिकून राहिलेला परिणाम त्यातून डोकावत असे. हे लोक ज्या आदबीने, आदराने  संबोधत ते पाहिल्यावर आपण त्या योग्यतेने वागायला पाहिजे ही बोच मला कायम तसेच वागायला लावे. निजामाच्या अम्मल संपलेल्या नगर दौंडला मात्र प्रवीणना हुजुर तर मला बाईसाहेब, वहिनीसाहेब म्हणत. आम्हीही आमच्या सिनिअर्सच्या पत्नींचा उल्लेख ताई वा वहिनीच करायचो. रावसाहेब सारखी काही हुद्दा दर्शविणारी संबोधने सरकारी खात्यांमधे अजून टिकून आहेत. ले ला गेल्यावर  एक गोड आदरार्थी संबोधन आमच्या मागे जोडले गेले. ते म्हणजे ``ले’’ सरले, मॅडमले जुले! जुले हा नमस्कार म्हणण्याचा गोड प्रकार होता.

             त्या त्या मातीतून आलेली संबोधने कधी चकित करत तर कधि अंतर्मुख करत. दिल्लीला ``अरे बेटा!’’ म्हणून कोणी हाक मारली की पहिल्या पहिल्यांदा मी सांगत असे, ``मी लहान दिसत असले तरी लहान नाही. मला बेटा आहे.’’ नंतर मात्र ``बेटा’’ची सवयच झाली. ती तेथील खासियत आहे. बेटा ह्या संबोधनातील माधुर्य वाढायला लागलं की समोरच्याच्या मनात काय शिजतय ह्या कल्पनेनी पोटात गोळाही येऊ लागला. दिल्लीत माझ्या शेजारी राहणार्‍या मल्याळी ऑफिसरची मुले आई-बाबांना अम्मा आणि अच्च्या म्हणत. तर लहान भावाला तंबी म्हणत.

             नंतर 16 वर्षांनी परत महाराष्ट्रात आलो तर विविधतेला एकतेच्या दोर्‍यात गुंफणारी ही संबोधनं कधीच एकतेच्या दोर्‍यातून गळून गेली होती. त्याजागी सर आणि मॅडम हया ठोकळेबाज संबोधनांनी आपलेपणाचा दुवा कधीच नष्ट केला होता. कित्येक गोड संबोधनं तर मीही विसरून गेले होते. पण त्या त्या गावच्या बाजारात ती ऐकली होती तेंव्हा त्या गावच्या इतिहासावरून आलेली मंद झुळुक मला स्पर्श करून गेल्यासारखी वाटे.

 

                 काही छान संबोधने काळाच्या रेट्यात आपण हरवून टाकली असं वाटलं. पहिले बाजीराव पेशवे, श्रीमंत नानासाहेब पेशवे, विश्वासराव, थोरले माधवराव पेशवे, मल्हारराव होळकर,  दामाजीपंत, नानाफडणवीस, चिमाजी अप्पा  सखारामबापू, तर गाण्याच्या क्षेत्रातीलही भास्करबुवा बखले, पंडित पलुस्कर ---- काय एकएक व्यक्तिमत्त्व होती. त्यांच्या नावांमागे, पुढे झोकात झुलणारी राव, अप्पा, नाना, अण्णा, बापू, बुवा ही आदरार्थी टोपण नावे वा, आदरार्थी पदव्या वा तेंव्हाचे अधिकार दर्शविणारे हुद्दे काळाच्या ओघात विरून तरी गेले वा इंग्रजीच्या मागे धावतांना आपण मातीमोल तरी केले किंवा त्या संबोधनांयोग्य माणसेच राहिली नाहीत.

                    असे असले तरी काही संबोधने काळाच्या पानावर इतिहासात आणि आमच्या मनात कायमची कोरली गेली आहेत.``यशवंतेऽऽ आता परत आलीस तर खांडोळी करीन तुझी!’’ तानाजीने घोरपडीला घातलेली साद. आज असं संस्कृतमधे वापरलं जाणारं संबोधनाचं सरिते, लते, दुर्गे हे एकारान्त वचन अबोल झालं आहे. काही काही संबोधनांमधेच काय दमदारपणा असतो नाही! ``आऊसाहेब!’’ महाराजांनी जिजाऊंना मारलेली हाक! संबोधनामागील आदर, संबोधनामागील तळमळ संबोधनांना जिवंत करतात. जातिवंत बनवतात. त्यांना अशा उच्च पातळीवर नेऊन ठेवतात की त्या संबोधनाच्या आठवणीने आजही पुलकीत होऊन जावे. आजही आऊसाहेब हे संबोधन ह्याच्या याच्या आईसाठी कोणी ऐरागैरा वापरू शकणार नाही आणि ज्या व्यक्तीला उद्देशून ती हाक असेल ती आई ते पेलू शकणार नाही.  ``हे जननि! हे माते! मी किती वेळ जागा आहे आता मला तुझ्या मांडीवर  माझ्या आयुष्याच्या अखेरची चिरनिद्रा घेऊ दे.’’ जगन्नाथ पंडिताने गंगेला घातलेली ही साद त्याला आणि त्याला कायमचे कुशीत घेणार्‍या गंगामातेला अजरामर करून गेली. आज जर कोणी जननि! माते म्हणून हाक मारली तर त्याच्या हाकेत ती आर्तता नसेल आणि ती पेलवणारी कोणी समर्थ आई पुढे येऊ शकेल असेही वाटत नाही. ``महाराज!’’ म्हणजे शिवाजी महाराजच! दुसरे कोणी त्या योग्यतेचे त्या संबोधनाच्या आजुबाजूला फिरकू शकत नाहीत. महाराणा म्हटलं की महाराणाप्रतापच आणि बाप्पा म्हटलं की रावळच!

                 स्त्रियांच्या बाबतीत बाई हे संबोधन थोडेसे चुटपुट टिकून आहे. पण तेही थोडंफार गावाकडेच. डिंपल, डॉली, मोना, बेला, रोमा मधे ताई, माई, अक्कांचं कधीच कंपोस्ट झाले आहे. आई, बाबा, नाना, तात्या, अप्पांना अजगराने गिळून टाकावे तसे मम्मी डॅडी, पप्पांनी गिळून टाकले आहे. आज कोणाला बाई म्हटले तर त्या बाईंनाही राग येतो हे भलतेच! एकदा एका समारंभात आदराने कोणी प्रमुख वक्त्यांचा उल्लेख मनोरमाबाई ( फक्त उदाहरणादाखल एक नाव ) केला मात्र! बाई बोलायला उठून उभ्या राहिल्यावर, ``मला बाई का बर म्हणता? पुरुषांना कोणाला बुवा म्हटलं तर आवडेल का?’’ असा सूर पकडल्यावर त्यांची ओळख करून देणारा आजीजिने माफी मागू लागला. त्यामुळे संबोधने कितीही योग्य असली तरी ती संबोधने तो माणूस कशी पेलतो हेही महत्त्वाचे. लक्ष्मीबाई, जिजाबाई, अहल्याबाई पंडिता रमाबाई ह्या आदरणीय स्त्रियांच्या नावापुढील बाई आम्हाला आता जड जातं का? आजी आजोबांनाही आता आजी आजोबा ह्या आदरणीय पदव्या वयानुसार पेलवत नाहीत. त्या वय दर्शवणार्‍या आहेत. आम्ही काय म्हातारे दिसतो का?  असा त्यांचा आक्षेप असतो. मग त्यांना मोठी आई, बडी माँ वा पप्पा, डॅडी अशाच बेगडी, खुळचट नावांचा आधार बरा वाटतो.                  

 

               आम्ही मॉरिशसमधे असतांना5 सप्टेंबर 2005 ला मराठी मंडळी फेडरेशनच्या वतीने पुण्यात Infosis मधे शिकण्यासाठी म्हणून पाठविलेल्या 11 जणांचा सत्कार होता. आम्हालाही निमंत्रण होतं. कार्यक्रम महात्मा गांधी Institute  (MGI) मधे होता. ही C.B.S.C. चा अभ्यासक्रम  असलेली सुंदर शाळा भारताच्या सहकार्यानेच बांधून दिली आहे. शिलाबाय बापू मंत्री प्रमुख पाहुण्या होत्या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच शिलाबाय बापू आणि कृष्णा बाबाजी हजर होते. सत्कार करण्यासाठी मुलांची नावं माईकवर घोषित करायला सुरवात झाली. नवीन पिढीची धुरा वाहणार्‍या  टाइट जिन्स, शॉर्ट टॉप्स, सुबक कापलेल्या केसांमधून मधुनच रंगवलेल्या केसांच्या लाल, पिवळ्या, जांभळ्या उठावदार बटा, अशा मुली, मुलं उठून येत होती. त्यांची नाव मात्र त्यांच्या पेहेरावाला कुठे जुळत नव्हती. त्या मॉड मुलींची नावं एसूबाय, शांताबाय, ईटाबाय, राहीबाई तर मुलांची बाबाजी, तानाजी, रामजी--- ऐकतांना काही काळ कानांना तरी पटत नव्हती. मराठी स्त्रीच्या नावापुढे बाई किंवा बाय लावायची शिवाजीकालीन प्रथा अचानक भेटल्याने आम्ही चक्रावून गेलो. जिजाबाई, येसूबाई, अहिल्याबाई नंतर खंडित झालेला भूतकाळ आज अचानक ह्या मुलांच्या रूपाने आमच्यापुढे उभा राहिला होता. जुना खजिना गवसावा तशी बाई, बाय, बाबाजी मला विलक्षण आपली वाटली. ज्या देखणेपणाने ती नावं मुलं स्वतःवर वागवत होती त्यातून भारतीयत्त्वाचा अभिमान ओतप्रोत भरला होता.

                 आपला अभिमानास्पद भूतकाळ परत कधी आपल्या पूर्वीच्या ह्या संबोधनांमधून जागृत होईल का?  ज्यावेळेला ह्या लुप्त झालेल्या संबोधनांना परत एकदा जनमानसात आदराने वागवलं जाईल तेंव्हा आमच्यावरचा मुसलमानी आणि इंग्रजी अम्मल खरोखरचा संपला असेल. मुसलमानांचे वा इंग्रजांचे आमच्या मनावर जराही वर्चस्व नाही हे सिद्ध होईल. परत एकदा आपल्यातले प्रखर राष्ट्रीयत्त्व जागे झाले असेल. परत एकदा अभिमानाने पुढची पिढी आम्ही भारतीय आहोत असे सांगत असेल. आम्हाला आमच्या भूतकाळाचा आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे असे ते सार्‍या जगाला ताठ मानेनी सांगत असतील. तो दिवस लवकरच येवो ही परमेश्वरचरणी प्रार्थना!

-----------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -