महर्षी अंगिरस आणि महर्षी सांदिपनी

 

महर्षी अंगिरस आणि महर्षी सांदिपनी


अंगीरस मुनी अत्यंत तेजस्वी ब्रह्मज्ञानी होते. सर्वप्रथम त्यांनीच कृत्रिम रित्या अग्नीची निर्मिती केली असे म्हटले जाते. (अनेक पाठभेदही आहेत.) पण आजच्या भाषेत सांगायचं झालं तर अंगिरस हे महान शास्त्रज्ञ असले पाहिजेत.

अंगिरसांचा शिष्य परिवारही मोठा होता. अनेक बुद्धिमान शिष्य त्यांच्या गुरूकुलात शिकत होते विद्यापारंगत होत होते. त्यातच सांदीपनीही होता. सांदीपनी इतर विद्यार्थ्यांसारखा हुशार नव्हता पण सांदीपनीकडे एक  दुसराच गुण होता. त्याच्यात विलक्षण सेवाभावी वृत्ती होती. गुरूंची सेवा तो अत्यंत मनोभावे करत असे. त्याचा अनन्यभाव असा की माझ्या गुरूचे आसनही मीच घालीन, त्यांना पाणीही मीच देईन, अन्नही मीच रांधीन, वाढीनही मीच, त्यांचा बिछाना मीच घालीन, पायही मीच दाबीन, गुरूच्या मुखातून जे जे बाहेर पडेल ते ते मीच त्याला देईन. सांदीपनीच्या ह्या अनन्य सेवेमुळे अंगिरसाच्या मनात सांदीपनीबद्दल प्रेम नसते उपजले तरच नवल.

 एकदा अंगिरस ऋषी आजारी पडले. त्यांना आपल्या आजाराचं स्वरूप समजून चुकलं होत. ह्या आजारातून आपण बरे होऊ शकणार नाही हे लक्षात येताच अंगिरसांनी शेवटची निरवानिरव करायला सुरवात केली. सर्व शिष्य परिवार हाच त्यांचा परिवार असल्याने त्यांनी आपली सर्व संपत्ती शिष्यांच्या योग्यतेनुसार वाटून देण्याचे ठरविले. एके दिवशी सर्व शिष्यांना त्यांनी त्यांच्या जवळ बोलावले. त्यांना आपल्याला झालेल्या दुर्धर रोगाबद्दल सांगितले. आपण गुरूकुल सोडून जाणार असल्याचे सांगितले. त्यांचा हा निर्णय ऐकून सर्व शिष्यांच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. त्यांनी एकेका विद्यार्थ्याला जवळ बोलावून त्याच्यावर एकएक जबाबदारी सोपवायला सुरवात केली. त्यांच्या गुरूकुलाची धुरा अत्यंत विद्वान निरपेक्षपणे काम करणार्‍या एका शिष्योत्तमावर सोपवली. त्यांचा अमूल्य ग्रंथसंग्रह दुसर्‍यास दिला. कोणाला तेथील रम्य वनराईचा सांभाळ करावयास सांगितला.  त्यांची संपत्तीही त्यांनी सर्व शिष्यांमधे वाटून टाकली. हे सर्व करत असतांना कोपर्‍यात उभ्या सांदीपनीकडे मात्र त्यांच लक्ष गेलं नाही. सर्वांना सर्व देऊन टाकल्यावर सर्व शिष्य त्यांच्या पायावर वंदना करत असतांना सांदीपनीनेही गुरूच्या चरणावर आपलं मस्तक टेकलं आणि आचार्यांच्या लक्षात आलं की आपण सांदीपनीला काहीच दिलं नाही. त्यांना फार हळहळ वाटू लागली. सांदीपनीला मात्र आपल्याला गुरूजी विसरले ह्या बद्दल थोडंही वाईट वाटत नव्हतं. ``बाळ सांदीपनी आता माझ्याजवळ काहीच उरलं नाही. माझ्या सर्व गोष्टी मी दान करून टाकल्या.'' सांदीपनी म्हणाला, `` आचार्य आपण असं का म्हणता? साक्षात आपणच माझ्यासोबत कायम आहात. ल्याशिवाय मला कोणीच नाही. आपल्याशिवाय मी कोठे जाणार? आपण जेथे जाल तेथे मी येईन. आपली सेवा हेच माझे जीवन आहे.''

अंगीरस म्हणाले, ``बाळा, मला एका अत्यंत दुर्धर रोगानी ग्रासलं आहे. थोड्याच दिवसात माझ्या अंगातून अत्यंत दुर्गंधीयुक्त पू वहायला लागेल. त्या दुर्गंधीनी कोणी माणूसच काय पण पशूही माझ्याजवळ येण्याचं धाडस करणार नाही. म्हणूनच मी काशीला जाऊन तेथेच गंगेच्या काठी एक झोपडी बांधून लोकांपासून दूर राहीन म्हणतो.'' तू तुझ्या तुझ्या मार्गाने जा. तुला यश मिळेल.

सांदीपनीही हट्टाला पेटला. ``गुरुजी तुमच्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. मी तुमची काळजी घेईन. तुमची शुशृषा करीन. रोज गंगेच्या पाण्याने अंघोळ घालीन. पण मला तुमच्यापासून दूर रू नका.''

शेवटी अंगिरस आणि सांदीपनी काशीला पोहोचले. सांदीपनीने गुरुंसाठी झोपडी बांधली. रोज तो आपल्या गरूची काळजी घेत असे. भिक्षा मागून आणत असे. गरूला प्रसन्न ठेवत असे. अंगिरसाने आपल्याला जो रोग झाला असल्याचे निदान केले होते त्या रोगाची लक्षणं आता अंगिरसाच्या अंगावर दिसू लागली. त्याच्या अंगामधून पू वाहू लागला. अत्यंत दुर्गंधी येऊ लागली. त्या झोपडीच्या पंचक्रोशीत कोणी माणूस फिरकेना. सांदीपनी मात्र रोज तिन्ही त्रिकाळ गंगेचे पाणी घेऊन येई. देवाला अंघोळ घालावी त्या अनन्य भावे गरूला अंघोळ घाली. निरनिराळ्या आषधांचे लेप लावी. भिक्षा मागून आणून गुरूला जेऊ घाली. गुरूसेवेशिवाय सांदीपनीला दुसरे काहीच सुचत नसे.

  सांदीपनीची अशी वर्षानुवर्षाची दिनचर्या चालू होती. एक दिवस गंगेवरून पाणी घेऊन येतांना साक्षात वाराणसीस्वामी भगवान शंकर भोलेनाथ त्याच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले, ``सांदीपनी तू तुझ्या गुरूची घेत असलेली एवढी काळजी पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तू पाहिजे तो वर मागून घे.'' सांदीपनीने अत्यंत नम्रपणे भगवान भोलेनाथाला हात जोडले. त्याच्या पायी मस्तक टेकवून तो म्हणाला, ``भगवान आपण खरोखरच जर मला काही देऊ करत असाल तर माझ्या गुरूजींना, अंगिरसमुनींना रोगमुक्त करा. त्यांच्या वेदना मला बघवत नाहीत.''  शिव म्हणाले, ``अरे, मी तुझ्यासाठी काही माग म्हणालो तर तू तुझ्यासाठी काही मागता गुरूंसाठी कशाला मागतो आहेस?'' ``भगवान, मला बाकी काही नको. देणार असला तर एवढाच एक वर द्या.'' असं म्हणून क्षणभरही थांबता सांदीपनी पर्णकुटीच्या दिशेने चालू लागले. ``तथास्तु!'' म्हणून शंकर अतर्धान पावले.  नेहमी प्रमाणे गंगाजल घेऊन सांदीपनी कुटीत जायला निघाले असता  इकडे अंगिरसाचा देह दिव्य झाला. आपल्या स्वतःच्या रोगमुक्त शरीराकडे तो आश्चर्याने बघतच राहिला. हे कस शक्य आहे? त्यांनी समाधी लावली आणि त्यांना झालेली सर्व गोष्ट कळली. `अरे, मी माझे आयुष्य भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी त्याच्या सेवेत घालवलं पण माझ्या शिष्याने गुरूची सेवा करून प्रत्यक्ष शिवाला प्राप्त करून घेतल.' अंगिरसांच्या भावना त्यांच्या नेत्राद्वारे झरु लागल्या.

आपले गुरू निरामय झालेले पाहून गंगेचं पाणी घेऊन कुटीत आलेल्या सांदीपनीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ``गुरूवर!!!!!'' म्हणत तो त्यांच्या पायावर कोसळला. त्याला उठवत अंगिरसाने त्याला जवळ घेतलं. ``पुत्रा तू माझ्यावर इतके थोर उपकार केले आहेस ते मी कसे काय फेडणार? माझ्याकडे तुला देण्यासारखंही काहीच राहिलं नाही. पण एक आशीर्वाद मात्र मी तुला देतो. कृष्णावतारात जेंव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर जन्म घेतील तेंव्हा त्यांच भगवंतपण सिद्ध होण्यासाठी त्यांनाही गुरूगृही राहून शिकावं लागेल. अशावेळेस आपल्या सेवाभावीवृत्तीने साक्षात शंकरालाही प्रसन्न करणार्‍या तुझ्याशिवाय त्या परमात्म्याचं गुरूपद कोण भूषविणार? कृष्णाचाही तू गुरू होशील. आणि तुझं शिष्यत्व मिळवलेला तो भगवान कृष्णच तुझी सारी मनोरथे पूर्ण करील.

पुढे कृष्णावतारात सांदीपनी हे साक्षात भगवान कृष्णाचे गुरू म्हणून आपल्याला परिचित आहेतच.

बरेच दिवस शोधत असलेले सांदीपनींच्या गुरूचे नाव आणि अर्धी गोष्ट आज पूर्ण सापडली ह्या आनंदात ती लिहून पूर्ण केली. आपल्या सर्व जाणकार रसिक वाचकांना सादर अर्पण!

-------------------------------

लेखणी अरुंधतीची -

   

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -