एक अलौकिक ब्रेकफास्ट

 

एक अलौकिक ब्रेकफास्ट

अगदी आत्ता आत्ता पर्यंत पुराणातल्या गोष्टी वाचतांना / ऐकतांना अमक्या तमक्या देवाने यज्ञात प्रकट होऊन तमक्या ढमक्याला कसलीशी खीर किंवा पायसान्न प्रदान केलं. त्या अमक्या तमक्याने ते प्राशन केल्यावर त्याचा जराजर्जर देह चिरतरुण झाला वगैरे वगैरे--- अशा सर्व गोष्टीतून पाहिजे तेवढा मतितार्थ घ्या बाकी पुराणातील वांगी पुराणात बरी म्हणून मी सोडून देत असे. पण----!

 चक्क एका वनदेवतेने एक अलौकिक अमृतमय ब्रेकफास्ट आमच्या हातात ठेवला आणि त्याच्या अलौकिक आस्वादाने आणि होणार्‍या तृप्तीने आम्ही परम संतोष पावलो. ही वनदेवता अमेरिकेला भेटल्यामुळे पायस किंवा खीर असा अलौकिक पदार्थ न देता तिला डिप डिप डिप टी /चहाच द्यावा लागला हा वेगळा मुद्दा!

ह्या आलौकिक अमृतमय ब्रेकफास्टची कृती मी चक्कटफू आपल्या सर्वांना सांगायला तयार आहे श्रावणातल्या कहाणीसारखी.  पण उतला मातला घेतला वसा टाकून दिला तर मात्र `नो फळ हं!'

आम्ही ड्युक येथे (नॉर्थ कॅरोलिना, म्हणजे अमेरिकची राजधानी वॉशिंग्टन डि सी पासून साधारण 200 कि. मी. दूर)  रहायचो.

तर --- ह्या कहाणीची आणि पर्यायाने ब्रेकफास्टच्या रेसिपीची तयारी जरा मोठी आहे. तेंव्हा तेथे ती कशी करायचो ती सांगते.

ड्युक युनिव्हर्सिटीच्या जवळ  ड्युक फॉरेस्ट असल्याची कुणकुण आम्हाला लागली होती. तेथे म्हणे जॉगिंगसाठी एक मस्त ट्रेल होता. तो लांब असल्याने रोज जाणे शक्य नव्हते. रोज तेथल्या सात मजली जिमचा आस्वाद घेत असू. पण रविवारी मात्र सहज शक्य होतं.  एका रविवारी भुरुभुरु बर्फात आम्ही तो ट्रेल शोधून काढलच. आमच्या घड्याळाप्रमाणे तेथे पायी पोचायला 20 मिनिटं लागली. विशाल रस्त्यावर आम्हा दोघांशिवाय चालणारे/चालू अजून कोणी नव्हते. एखादी लांबवर दिसणारी वेगवान गाडीही आम्हाला पाहून लांबवरच थांबत होती. वीस मिनिटं परत यायला लागतील असे गृहीत धरून आम्ही ट्रॅकवर पोहोचलो. सांगाचा उद्देश हा की मुंबईचा रानडे रोड, पुण्याची तुळशीबाग, नागपूरच्या महाल, दिल्लीचा चांदणी चौक ह्या भागातून इतरांच्या सरकण्याप्रमाणे तुम्ही पुढे सरकत असता तसं गोगलगायीच्या गतीने न जाता  झपाट्याने चालूनही 20 मिनिटं लागली.  पहाता क्षणी प्रेमात पडावा असा सुंदर मातीचा रस्ता होता. जराही प्रदूषण नाही. दोन्ही बाजूनी सरळसोट वाढलेलली उंच उंच पाईनची झाडं. त्यातून वर दिसणारं निळं आकाश, कुंदाच्या फुलांच्या पाकळ्या देवाने आकाशातून पुष्पवृष्टीसारख्या अंगावर भुरुभुरु टाकाव्यात अशा मंदमंद हिमवर्षावात आम्हीही मंदमंद गतीने जॉगिंगला सुरवात केली. ह्या woods मधून जातांना कसलं fresh वाटत होत. जराही दमायला होत नव्हतं.  नुकत्याच झालेल्या fall season मुळे लाल,पिवळी पानं जमिनीनर पडून जमिन रंगित झालेली!-- त्यावर बर्फाचा पातळ थर बसायच्या तयारीत होता. 

आम्ही उंचावरून जॉगिंग करतांना उजव्या हाताला उतारावर पसरलेलं खूप विशाल गोल्फ कोर्स (18 hole Golf Course ) मोठं विलोभनीय दिसत होतं. तेथील छान कापलेली विविध हिरव्या छटांमधील हिरवळ डोळ्यांना, मनाला थंडावा देत होती. मधून मधून त्याची काळजी घेणार्‍या बॅटरी ऑपरेटेड 1-2 पांढर्‍या गाड्या जातांना पहायलाही मजा येत होती. माझ्यातही जॉगिंगचा उत्साह संचारला होता. अर्धा तास झाला. दुडक्या चालीत पळून पण पुढच्या ट्रॅकचा अंदाज येईना. जेथून सुरवात केली तेथे परत पोचायला किती वेळ लागेल हे पुढे झाडात लुप्त होणार्‍या ट्रॅककडे पाहून कळायला मार्ग नव्हता. 40 मिनिटं खाली-वर, चढ-उतारावर जॉगिंग झाल्यावर मात्र उत्साहाला आहोटी लागायला लागली होती पण 40 मिनिटं परत मागे धावण्यापेक्षा पुढे गेलेलं बर म्हणून दौड सुरू ठेवली. चढ, उतार दमले बिमले म्हणत पार झाला. 55 मिनिटांनी हाशहुश करत सुरवातीच्या गेटपाशी आल्याचं पाहून अवर्णनीय आनंद झाला. गात्रन् गात्र उल्हसित झालेलं. परत घरी पोचायला चालत 20 मिनिटं मनालाही हुशारी देणारी होती. स्वच्छ, मोकळ्या हवेत झालेला व्यायाम काया-वाचा-मनाला किती प्रसन्न करणारा असतो हे अनुभवत उत्साहात घरी पोचल्यावर ब्रेकफास्टची आठवण झाली.

भारतासारखे छान छान पदार्थ, दूध, दुधाळ कॉफी, चहा असलं काही इथे संभवत नव्हतं. दूध नामक द्रवपदार्थात दुधाची चव ही अश्वत्थम्याला दिलेल्या दुधासारखी असायची. परत त्याला भेसळ म्हणायची टाप नाही; कारण त्यात भेसळ केलेल्या गोष्टी स्वच्छ शब्दात बाटली/कॅनवरच लिहिलेल्या असल्याने हे मक्याचं दूध आहे म्हणायचीही सोय नाही. ``हे बघा! आम्ही सांगूनच जे द्यायचं ते दिलं आहे. तुम्ही वाचून घेतलं आहे. ह्यात फसवणूक होत नाही.'' अशी मखलाशी असल्याने दुसरा पर्याय शोधला. वेगवेगळ्या अ‍ॅरोमाचे/ वासाचे चहा! (वासाला फ्लेव्हर म्हटलंकी जरा उच्च पेय प्यायल्यासारखं वाटतं नाही का?) म्हणजे गरम पाण्यात पुड्या सोडायच्या किंवा बुचकळायच्या!

आमच्या लहानपणी कॉफीच्या वड्या विकत मिळत. चुकून कोणी कॉफी पिणारा आलाच तर, आम्हाला समोरच्या किराणामालाच्या दुकानात जाऊन ``दोन कॉफीच्या वड्या दे रे’’ असं सांगायला लागायचं. बरणीच झाकण गोल फिरवत तो दोन वड्या कागदाच्या  तुकड्यात बांधून देई. ह्या अशा कॉफ्या वेलदोडा,जायफळ घालून किती छान झाल्या तरी त्या सर्व `प्रोसेस’ला गावंढळ ठरवून इथे आम्ही डिप डिप डिप (बुचकुळ बुचकुळ बुचकुळ ) चहा पित होतो. Chamomile, mint, vanilla, matcha  हे सर्व सुगंध आणून झाले होते. ह्या वेळचा फ्लेव्हरही बर्ग्यॅमॉट (bergamot) हा लिंबूवर्गीय फळाच्या सालापासून काढलेला फ्लेव्हर! उच्च तापमानाच्या पाण्यात केलेलं हे पेय; अमेरिकन आल्मंड, ब्राझिलनट, हॅझल नट, पेकन, वॉलनट अशा अनेक `नटां’सोबत घेतांना त्या ब्रह्मसमाधानाची म्हणून अशी काही नाट्यमय लाट अंगात निर्माण करत असे की आजचा रविवार रविवार म्हणून साजरा झाल्याचं पुण्य हृदयात दिवसभर झिरपत राही. चाळीशीतल्या आमचा कायाकल्प करून परत विशीचा आभास निर्माण करी. अर्थातच हा रविवारचा ब्रेकफास्ट आम्ही सहसा चुकवत नसू.

----------------------------

लेखणी अरुंधतीची -




Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -