शॉल

 

शॉल -

-----
तर-- वस्त्रोद्योगाला बहारीचे दिवस आणणार्‍या माझ्या सख्यांनो, महाराष्ट्रात असे पर्यंत साडी ह्या एकाच प्रकारच्या स्वर्गीय वस्त्राबद्दल माझं चित्त आणि ज्ञान मर्यादित होतं.

महाराष्ट्रात अशी कडाक्याची थंडी नसतेच त्यामुळे विविध प्रकारच्या शालींचं `शॉल महात्म्यही नसतं. आपल्याकडे शाल ही श्रीफळासोबत पांघरण्यापुरतीच मर्यादित असे. बाकी अति म्हातार्‍या आज्ज्या शालबिल घेऊन देवदर्शनाला जात असत. बाकी शालजोडीतले देण्यासाठी प्रत्यक्ष शालीची गरज नसे. त्यामुळे शाल तेंव्हाच्या माझ्या तरुण मनाला नकोशी वाटत असे. कधीकाळी औरंगाबादलाच अहोंचं पोस्टिंग असल्याने घेतलेल्या हिमरू शाली अंगावर घेण्यापेक्षा घरात ह्याच्यावर त्याच्यावर घालून घराचं सौंदर्य वाढवणे अथवा घरी येणार्‍या पाहुण्यांना दिसू नये असा पसारा वा गोष्टी झाकण्यासाठीच जास्त उपयोगात येत असत. कित्येकवेळा जरा जुनाट झालेल्या शाली जास्तीच्या वा रिकाम्या गॅससिलेंडरला गुंडाळून त्यावर ट्रे ठेऊन ऐनवेळचं टेबलही होत असे.

 

अंगभर कुरळ्या कुरळ्या लोकरीने गुबगुबीत झालेल्या मेंढ्यांचे कळप शेतात बसवलेले, डोंगर दर्‍यात चरतांना दिसत. उन्हाळा आला की मेंढपाळ ह्या मेंढ्यांची लोकर त्यांच्या अंगावरच कात्रीने कापतात. मेंढीच्या बाळाची पहिल्यांदाच कापलेली लोकर ही जास्त मऊ असते. लहान मुलाच्या जावळासारखी. म्हणून त्याच्यापासून बनवलेल्या कांबळ्यांना जावळीचं कांबळं म्हणतात हे इतर कांबळ्यांपेक्षा मऊ असतं. आणि वापरून वापरून ती अजून मऊ होत जातं. पंढरपूर, जेजुरी ही गाव अशा कांबळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. . पंढरपूरला हे जावळीचं काळं कांबळं अंगावर घ्यायचा मोह विठुरायालाही पडला बरं! कंबर, पाठ दुखत असली तर जावळीच्या कांबळ्यावर पाठ टेकवून झोपून बघा. विलक्षण आराम मिळतो. ऑस्ट्रेलियातील मरिना जातीच्या मेंढ्यांची लोकर ही जास्त चांगल्या प्रतीची समजली जाते. मेंढ्यांशिवाय इतरही काही प्राण्यांपासून लोकर मिळते हे मात्र हळु हळु नंतर समजलं.

दिल्लीच्या थंडीने माझ्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. अजमलखा रोडवर घेतलेला लांब गरम कोट अंगावर चढवून त्याच्या खिशात हात घालून हिंडतांना आपण साक्षात परदेशात वावरत आहोत असा गोड आभास वगैरे मला होत असे. हा कोट पुढे पुढच्या पिढ्या बिढ्यांपर्यंत पास ऑन झाला. (कोटाची किम्मत वसूल) तेथे थंडीसाठी मिळणार्‍या छान छान गरम टोप्या/गलोती आणि गरम ब्लाऊज पुण्या मुंबईच्या आज्ज्यानां सुखावून जात. लहान मुलांचे स्वेटरचे सेट तर इतके क्यूट असत की महाराष्ट्रात परत येतांना मला अनेकांसाठी तसे बेबीसेट न्यायला लागत. तेथील थंडीत साडीवर वापरण्यासाठी मॅचिंग कॅश्मिलॉन वा प्युअर वुलचे ब्लाऊज /पोलकी, अंगठावाले मोजे पहिल्यांदा मी आश्चर्याने बघत असे. काश्मिरी कशिद्याची गरम कपड्याच्या पंजाबीसूट्स् चे पीस तिकडे फार मोहक शिवून देत.

दिल्लीवारीने `शॉल'चा अद्भुत रम्य परिचय करून दिला. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यासोबत बाहेर निघणार्‍या ह्या शॉल्स् कधी घडी करून हातावर मिरवत जा वा एका खांद्यावर ओढणीची घडी मिरवल्याप्रमाणे मिरवा किंवा थंडीचा कडाका पाहून हात आत घेऊन कानावरून डोक्यावरून घ्या. साडी किंवा ड्रेसला मॅचिंग शाल मिळवण्यासाठी दिल्लीचा स्त्रीवर्ग धडपडत असे. पाहिजे तशी शॉल नाही मिळाली तर प्युअर वुलची पांढरी शाल विकत घेऊन मेहेरचंद, खन्ना, खान, सरोजिनीनगर ---- अशा असंख्य मार्केट्मधे हव्या त्या रंगात रंगवूनही मिळे. कॉशमिलॉनच्या किंवा सिंथेटिक शालीला रंगवता येत नाही. हळुहळु अनेक प्रसंगातून शॉल्स् आणि त्यांची श्रीमंती कळायला लागली.
कुलू मनालीच्या शाली, काश्मिरी शाली, मरिना वुलच्या शाली, अंगोराच्या शाली, सेमि पश्मिना, पश्मिना आणि ह्यांची ओळख झाली. पश्मिना आणि शहातूशच्या खर्‍याखुर्‍या शालींची खरीखुरी ओळख मात्र लडाखमधेच झाली. तर अंगोराची माऊंट अबूला.

अंगोरा ही लोकर काही ठराविक सशांपासून मिळते. त्यांच्या अंगावर वाढणारी ही लोकर इतकी दाट वाढते, की जटावाल्या साधूसारख्या त्यांच्याही लोकरीत जटा व्हायला लागतात. असा खूप जटा तयार झालेला ससा त्या लोकरीने हैराण होतो. त्याच्या सार्‍याच हालचाली मंद होतात. त्याची लोकर कापली की परत तो चपळ उत्साही होतो. मूळचे ऑस्ट्रेलियाचे हे ससे आता भारतात थंड हवेच्या ठिकाणी पाळतात. अबू येथे अशा सशांचे फार्म आहे. ही अंगोरा लोकर अत्यंत मऊ आणि उबदार असते. ह्या लोकरीचा मऊपणा मुलायमपणा हवाहवासा वाटणारा असतो. त्यापासून बनवलेले स्कार्फस्, स्तोल, शॉल्स् लोण्यासारखे मुलायम असतात.

आपल्या भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जावं तसतशी थंडी वाढत जाते. हिमालयाच्या उंच रांगांमधे हिमपात होतो आणि द्रास, गुमरी, सियाचिन अशा काही ठिकाणचं तापमान उणे 50 ते उणे 70 पर्यंत खाली घसरतं. थंडीला तोंड देण्यासाठी गरम कपडे हे समीकरण ठरलेलच. लडाख सारख्या बर्फाळ प्रदेशात काही दुर्गम भागात याकच्या अंगावरच्या लोकरीपासून बनवलेल्या कापडाचे उबदार तंबू तेथील लोकांचा थंडी आणि बर्फाळ वार्‍यापासून बचाव करतात. ह्या तंबूंना आतून याकच्या लोकरीचे कापड तर बाहेरून याकची कातडी असते. मेलेल्या याकची कातडी पाठीवर शालीसारखी घेऊन हे लोक थंडीपासून आपला बचाव करतात.


लडाखच्या हुंदर सुमूर, दिस्कित, न्युब्रा व्हॅलीमधील दोन वशिंडांचे उंट आढळतात. बर्फाळ वाळवंटात दोन वशिंडांचे तर गरम वाळवंटात एका वशिंडाचे उंट असतात. त्या उंटांच्या अंगावरील लोकर उन्हाळायात काढून घेऊन त्याच्या सुंदर शाली बनवतात. त्यांचा नैसर्गिक कॅमल कलर मोठा सुंदर असतो.


हिमालयाच्या कुशीत लडाखमधील अत्यंत दुर्गम भागात समुद्रसपाटीपासून 16,000 फूट उंचीवर चांगथांग ह्या प्रदेशात चांगपा आदिवासी पश्मिना बकर्‍यांचे कळप घेऊन फिरत असतात. ते स्थलांतर करण्यात अत्यंत पटाईत असतात. वर्षातून पाच सातवेळेला स्थलांतर हेच त्यांचं आयुष्य आहे. हिमालयाच्या अति उंच शिखरांवरून येणार्‍या बर्फाळ वार्‍यांना तोंड देत देत, उत्तुंग कड्यांच्या पडणार्‍या सावल्यांचा अंदाज घेत, पिवळ्या पडणार्‍या गवताची योग्य वेळेस नोंद घेत, नदी, झर्‍यांच्या गोठणार्‍या पाण्याचा अंदाज घेत, रात्रीच्या चांदण्यांच्या खूणा तपासत आपल्या पश्मिना बकर्‍यांना घेऊन ह्या निसर्गपुत्रांचं स्थलांतर सुरू असतं. जानेवारी फेब्रुवारीत -40 पर्यंत जाणारं तापमान लक्षात घेता त्याचं आयुष्य म्हणजे निसर्गाच्या तारेवरची कसरतच असते. निसर्गाबरोबर जुळवून घेतांना त्यांना थोडीशीही चूक करून चालत नाही. नाहीतर ती सर्वांनाच मृत्यूच्या दाढेत घेऊन जाणारी ठरते.

हिमालयाच्या ह्या उंचीवर ठिकठिकाणी तयार झालेल्या विस्तीर्ण खुरट्या गवताच्या प्रदेशात हे पश्मिना बकर्‍यांचे कळप चरत असतात. लडाखमधेच 11000 ते 12000 फुटावर न्यूमा ह्या गावी सरकारतर्फे पश्मिना पालन व्यवसाय चालतो.
ह्या बकर्‍या आकाराने जरा लहान, थोड्या बुटक्या पण लांब केसांच्या असतात. दर थंडीमधे ह्यांच्या अंगावर अत्यंत मऊ आणि उबदार लोकर केसांच्यामधून वाढते. त्यातल्या त्यात पोटाखाली ही लोकर जास्त दाट असते. प्रत्येक उन्हाळ्याच्या सुरवातीला ही लोकर आपोआप गळून जाते. थंडी संपली की जाड दात्याच्या लोखंडी फणीने किंवा कंगव्याने त्यांची आंगे विंचरून विंचरून ही लोकर काढून घेतात. जणु काही उन्हाळा आला म्हणून त्यांचा स्वेटर घडी घालून ठेऊन द्यावा. अंगोरा लोकर कापल्यावर ससा जसा उत्साही होतो तशा उन्हाळ्याच्या सुरवातीला पश्मिना काढून घेतल्याने ह्या शेळ्याही आनंदित होतात. प्रत्येक बकरीच्या अंगावर साधारण 200-300 ग्रॅम पश्मिना लोकर मिळते.

ह्या विंचरून कांढलेल्या पश्मिना लोकरीवर अजून बरेच कष्ट घ्यायला लागतात. प्राण्यांच्या अंगावरील केस आणि लोकर ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असतात. पश्मिना लोकर विंचरून काढतांना त्यात त्या शेळ्यांचे केसही मोठ्याप्रमाणावर मिसळलेले असतात. हे केस एक एक असे हाताने काढून टाकायला लागतात. बहुतेक वेळा थंडीमधे जेंव्हा घराबाहेर पडणं अशक्य असतं तेंव्हा घरातील म्हातार्‍या स्त्रिया पुरुष हे पश्मिना साफ करायचे काम करत असतात. पश्मिनातून केस वेगळे काढणं हे फार किचकट आणि जिकीरीचं काम असतं. बहुतेक वेळेला हे काम काही तिबेटन वृद्ध स्त्रियाच अत्यंत चिकाटीने करत. त्यानंतर केस काढून टाकून स्वच्छ केलेल्या पश्मिना लोकरीचा धागा काढायचं काम करायला लागतं. तेही घरोघरी केलं जातं. पश्मिना अत्यंत नाजूक असल्याने त्याचा धागा मशिनने काढता येत नाही. तो हातानेच काढावा लागतो. लडाख, हिमाचल, काश्मिर येथे हे काम फार सुबक रीत्या केलं जातं. त्याचप्रमाणे त्याच्यापासून ज्या शाली अथवा स्तोल किंवा स्कार्फस् बनवायचे असतील ते हातानेच बनवायला लागतात. ते मशिनवर होत नाहीत. चांगल्या प्रकारच्या पश्मिनाचा धागा हा केसापेक्षाही पातळ म्हणजे 15 - 19 microns इतका पातळ असतो. 19 microns पेक्षा कमी व्यासाच्या धाग्यापासून बनवलेल्या शाली अत्यंत मऊ आणि वजनाला अत्यंत हलक्या असतात. लडाख आणि हिमाचलपेक्षा काश्मिर घाटीत काढलेला पश्मिनाचा धागा हा अत्यंत पातळ असल्याने तेथील शाली अत्यंत तलम विणलेल्या असतात. त्यावर काश्मिरी कशिद्याचं सुबक सुंदर भरतकाम अत्यंत उठाव आणणारं असतं. त्याची रंगसंगती मन मोहवून टाकेल अशी असते. शालीवरील भरतकाम जितकं दाट आणि सुंदर तितकी शालीची किंम्मतही वाढत जाते हे सांगायला नको. पूर्वी श्रीनगर आणि काश्मीर घाटीत राहणार्‍या हिंदू पंडितांच्या लग्नात पश्मिनाची कशिदाकाम केलेली साडी आपल्याकडच्या शालूप्रमाणे नवर्‍यामुलीस दिली जात असे. हा पश्मिनाचा अनमोल शालू एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे आईकडून मुलीकडे जात असे. बकरीच्या रंगाप्रमाणे मोतिया किंवा ब्राऊन किंवा काळ्या रंगाच्या शाली ह्या नैसर्गिक रंगाच्या असतात. बाकी शाली रंगवलेल्या असतात.

काश्मिरची किंवा श्रीनगरची पश्मिना इतकी तलम असते की शालीची घडी एखाद्या छोट्याशा पर्समधेही मावू शकते. खरेतर इथल्या स्थानिक भाषेत पश्म म्हणजे लोकर. त्याच्यापासून काढलेला तंतु म्हणजे पश्मिना. पण काश्मिरमधून परदेशात पोचण्यामुळे बाहेरचे परदेशी नागरिक मात्र ह्याला Cashmere (काश्मिर) असेच संबोधतात.
 
सेमि पश्मिनाच्या शालीत काही दुसर्‍याही लोकरीचा किंवा सिंथेटिक लोकरीचा अंश असतो. ह्या शाली जरा स्वस्तही असतात. पण खरा पाचू एखाद्या चमकणार्‍या हिरव्या सेमीप्रेशस रत्नाहून श्रीमंत दिसतो, तशीच खरी पश्मिनाही स्वतःचा खानदानीपणा बघणार्‍याच्या नजरेला जाणवून देतेच.

पश्मिना ही कायम हातानेच विणलेली असल्याने बारकाईने पाहिल्यास मशिनमधून विणल्याने येणारा एकसारखेपणा दिसणार नाही. शिवाय ह्या शालीवर कुठलही लेबल चिकटू शकत नाही. सर्वात महत्त्वाचा म्हणजे पश्मिनाचा अत्यंत मुलायम स्पर्श. हीच पश्मिना ओळखायची खूण. काश्मिरी पश्मिनाचे देखणे स्तोल आणि स्कार्फ हे परदेशात फार वाखाणले जातात आणि खूप पैसेही मिळवून देतात.

पश्मिनापेक्षाही उबदार आणि अत्यंत मौल्यवान लोकर असते ती शहातूश किंवा तूश. तूशची शाल तळहातावर एकेरी पसरून कडेनी त्यावर हळुवार फुंकर मारली की त्या मुलायम शालीवर एकसारख्या लाटा उमटतात. तिचा खानदानीपणा हा सर्वोच्चच! पश्मिनापेक्षाही उबदार आणि अत्यंत मौल्यवान लोकर असते ती. ती हिमालयातील काही विशिष्ट जातीच्या हरिणांच्या अंगावर वाढते. पण ही हरणे पाळीव नसतात. तूश साठी त्यांची होणारी शिकार वाढीस लागल्याने ही हरणे आज दुर्मिळ होत चालली आहेत. त्यामुळे आता सरकारने तूशवरच बंदी आणली आहे. लडाखमधील काही जुने लोक सांगतात की पूर्वी लडाखच्या दुर्गम, अति उंच भागात निळ्या रंगाची हरणे होती. त्यांची लोकर ह्या तूशपेक्षा अत्यंत मुलायम, अत्यंत उबदार आणि कित्येक पटींनी महाग असे आता मात्र ती हरणे कालौघात नामशेष झाली आहेत. तूश, पश्मिना ह्या शालींना थोडाही खरखरीतपणा नसतो. थंडीमधे हया उबदार तरीही लोण्यासारख्या मऊ शाली अंगावर पांघरून घेणे हे परम सुख! अंगोराचा मुलायम स्तोल मिरवायला तरी थंडी ही वर्षातून एकदा पडायलाच हवी.

--------------------------------------

लेखणी अरुंधती

(इतर वेळेला काळजीपूर्वक उन्हं देऊन छान पॅक केलेले गरम कपडे थंडी पडली की बाहेर काढले जातात तशी माझी जुनी पोस्टही थंडी पडल्यावर बाहेर निघाली आहे. दिवस मोठा व्हायला लागला की थंडी वाढते असं थंडीचं समीकरण आहे. नुकताच 21 डिसेंबर सर्वात लहान दिवस होऊन गेला आहे. वाढणार्‍या दिवसासोबत 25 जानेवारीपर्यंत थंडी पडायला हरकत नाही. )

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -