Keep it simple and stupid!

 

 



Keep it simple and stupid!


" अरे यार, Keep it simple and stupid! " जाता जाता कानावर शब्द पडले. अमेरिकन मॅनेजमेंटच्या `फंडां' मधे आकंठ पोहणारी तरुणाई पाहून मजा वाटली.

एकदा का लाट आली की ती डोक्यावरून जाऊ द्यायला लागते. किनार्‍याकडे तोंड करून बसलं तर लाट डोक्यावरून अलगद निघून जाते. लाटेकडे तोंड करून बसलं तर नाकातोंडात पाणी जाऊन खारट चव देऊन जाते. आली लाट जाता जाता पाठीवर झेलत मीही पुढे विचार करु लागले, आपल्याकडे नाही का अस काही simple आणि stupid मॅनेजमेंट तत्त्वज्ञान?

विचार करता करता मला विदुर आणि धर्मराज आठवले. पांडवांना लाक्षागृहात रहाण्याचा `प्रेमळ (?)' आग्रह करणार्‍या दुर्योधनासमोरच विदुराने धर्मराजाला विचारलं, ``जंगलातल्या वणव्यात कुठला प्राणी जिवंत राहतो?'' धर्मराज उत्तरला, ``जमिनीखाली बीळ करुन राहणारा उंदीर!'' ज्याला जे सांगायचं होतं ते त्याने सांगितलं. ज्याला जे कळायला पाहिजे त्याला ते कळलं. दुर्योधन `स्टुप्पीडच' राहिला ! तेथे असूनही त्याला काहीच कळलं नाही.

मराठीत म्हणतात,`` वरून ताकभात कळलं पाहिजे. '' नको नको परत खाण्यावरून आलेल्या म्हणी समोर आल्या की मला उगीचच भकास भूतकाळ आठवायला लागतो. मग ` म्हटल की जाणणारा' - - कशी काय वाटते नवी म्हण? म्हटलं की जाणता आलं पाहिजे अशी वीजेसारखी तळपती बुद्धी असणारे विद्वान आपल्या भारतभूमीत होते. आजही आहेत.

आजही आपल्याकडे मॅनेजमेंटचा प्रचंड साठा असाच ठेवला आहे जाणेल त्याच्यासाठी simple आणि बाकीच्यांसाठी stupid. संस्कृतमधील सर्व ज्ञान मोठ्या खुबीने ठेवलं आहे. खूपसं नष्ट झालं असलं तरी उरलेलंही काही कमी नाही.

एकच गोष्ट लहान मुलाला सागितली तर ती त्याच्यासाठीची गोष्ट वाटावी, मोठ्याला त्यातील साहित्यिक ठेव्याचा मोह पडावा, एखाद्या नाटककाराला त्यात ओघवती स्वगते किंवा विलक्षण बुद्धिमत्तेची चुणुक दाखविणारे संवाद सापडावेत. तर खर्‍या जाणकारालाच त्यातील खरे इंगित कळावे.

बघा हं! हितोपदेश मधील एक गोष्ट अगदि थोडक्यात सांगते.

एक होता साधू. एका मठाचा मुख्य. रोज भिक्षा मागून आणायचा. भिक्षा असलेली झोळी खुंटीवर टांगुन ठेवायचा. रोज एक उंदीर उड्या मारून तेथपर्यंत पोचायचा आणि सर्व खाऊन जायचा. साधुने खुंटी खूप उंचावर ठोकून घेतली. पण उंदीर अजून अजून उंच उड्या मारायचा. सर्व खाऊन जायचा.

एक दिवस दुसर्‍या मठाचा मुख्य साधू ह्याच्याकडे आला. ह्याचा चिंताग्रस्त चेहरा पाहून त्याला चिंतेचं कारण विचारू लागला
साधूने अति उंच उडी मारणारा तो उंदीर दाखवला. सर्वसाधारण उंदराच्या तुलनेत फारच उंच उड्या मारणारा आणि भिक्षा खाऊन टाकणारा उंदीर पाहिल्यावर दुसरा मठाधिपती म्हणाला, ``हं! ह्या उंदराचं बीळ फार मोठ्या धनाच्या साठ्यावर आहे. चल आपण ते शोधून काढू.'' खरोखरच जवळच्या डोंगरावर असलेलं उंदराचं बीळ शोधून खणून काढल्यावर धनाचा प्रचंड साठा सापडला. तो घेऊन दोघे आनंदाने मठात आले आणि त्या दिवसापासून उंदराचा त्रास संपला.


लहानमुलांसाठी असलेली गोष्ट थोडी मोठ्यांच्या नजरेतून पाहू या.

जेंव्हा ऑफिसमधे उंदरासारखा एखादा क्षुद्र कुणीतरी मग तो कुणी - --एखादा खालचा कारकून, चपराशीही जास्तच टिवटिव करत असेल तर त्याला साहेबाचा किंवा कोणा मोठ्याचा पाठिंबा आहे हे वेगळं सांगायला नको. कोणाच्या जीवावर कोण उड्या मारत आहे हे फक्त कळायला पाहिजे. एखादा क्षुद्र शेजारी अथक त्रास देता देता सहज म्हणतो. ``एऽऽऽ तुला माहित नाही का मी कोण आहे ते?'' की समजावं एखाद्या गुंडाचा आश्रय त्याला लाभला आहे. किंवा एखाद्या राजकीय पक्षात त्याचा आश्रित गुंड म्हणून समावेश आहे. एखाद्या लहान सहान पक्षाचा प्रमुखही जास्तच तोंड वाजवायला लागला की त्याच्या जिभेचं बळ कुठच्यातरी धनाच्या साठ्यावर आहे हे समजायला हरकत नाही.

पल्या देशातीलच छोट्या मोठ्या समस्या बघा. सहज संपवता येतील असं सर्वांनाच वाटत असतं. पण त्या समस्या खदखदत ठेवण्यासाठी काही छुप्या शत्रु-राष्ट्रांचा प्रचंड खजिना त्यासाठीच रिता होत असतो. ह्या खजिन्याच्या लालसेपोटी देशातीलच अनेक देशविघातक व्यक्ति वा संस्था त्या समस्या सोडविण्यापेक्षा वाढविण्यावर भर देत असतात. आन्तर्राष्ट्रीय मिडियावर त्याचा खोटा नाटा प्रचार प्रसार होत असतो.

पाकिस्तान सारखा इवलासा देशही कधी ब्रिटन कधी अमेरिका, कधी चीन यांच्या पाठींब्याने उन्मत्त असतो. समस्या पाकिस्तान नसते. समस्या चीन असू शकते. टर्की, कतार किंवा अजूनही कुठला मलेशिया वा अजनबी! वरवरची पालवी तोडल्यासारखे वरवरचे उपाय आत मधे समस्येचं मूळ वटवृक्षाच्या मूळासारखं पुष्ट करत असतात.

पंचतंत्र, हितोपदेश ह्या गोष्टींमधील कावळा चिमणीची वरवरची टरफलं काढून टाकली तर आतमधे तत्त्वज्ञान आणि मॅनेजमेंटचा अमृताचा झराच सापडतो. आपण मात्र आजही फक्त चिऊ काऊच घोकत राहतो. अनेक समस्यांची उत्तरं फळातल्या बीजाप्रमाणे ह्या गोष्टींमधे दडवून ठेवलेली असतात.

पंचतंत्र हितोपदेशाचं काय घेऊन बसला. आपल्याकडे सिद्ध मंत्र किंवा स्तोत्र म्हणून गणलेले अनेक मंत्र किंवा स्तोत्रेही काही वेगळ्याच गोष्टी स्वतःमधे दडवून आहेत ही कल्पनाही आपल्याला नसते. त्र्यम्बकम् यजामहे ---- हा सिद्ध मंत्र Copper ore पासून शुद्ध तांबे तयार करायचा विधी आहे हे आज तरी कुणाला खरे वाटेल का?

----------------------------------

 लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -