14 स्वर्ण पुरीष पक्षि कथा ( सोन्याची विष्ठा टाकणार्‍या पक्ष्याची गोष्ट )

 

 

14 स्वर्ण पुरीष पक्षि कथा

 ( सोन्याची विष्ठा टाकणार्‍या पक्ष्याची गोष्ट )

एका पर्वतीय प्रांतामधे एका उंचच उंच झाडावर सिंधुक नावाचा पक्षी रहात होता. त्याने टाकलेली विष्ठा जमिनीवर पडली की त्यापासून सोनं निर्माण होत असे. एकदा एक फासे पारधी पक्षी पकडण्यासाठी ह्या रानात आला असता त्याला पाहून उडता उडता सिंधुकाने पासेपारध्याच्या समोरच विष्ठा टाकली. जसा त्याच्या विष्ठेचा जमिनीला स्पर्श झाला तशी ती सोन्यात रूपांतरीत झाली. ते पाहून तो फासेपारधी आश्चर्यचकित झाला. मनात म्हणू लागला, मी माझ्या बालपणापासून आजपर्यंत पक्षी पकडण्याचाच व्यवसाय करत आहे. माझ्या ह्या ऐंशी वर्षांच्या आयुष्यात विष्ठेतून सोनं तयार होणारा  असा विलक्षण पक्षी मी कधी पाहिला नव्हता. सहाजिकच त्या पक्षाला पकडण्यासाठी त्याने त्या झाडावर ठिकठिकाणी कळणार नाहीत अशाप्रकारे जाळी लावून ठेवली. आणि स्वतः दिसणार नाही अशा  अंतरावर बसून प्रतिक्षा करू लागला.

तो मूर्ख पक्षीही हा फासेपारधी खरोखरच गेला आहे का नाही हयाची खात्री न करताच; आता हा दिसत नाही म्हणजे गेलेला दिसतोय अशा भ्रामक समजुतीने निःशंकपणे परत त्याच झाडावर बागडू लागला आणि नेमका त्या फासेपारध्याच्या जाळ्यात अडकला. दबा धरून बसलेला फासेपारधीही लगेच पुढे आला. त्याने त्या जाळ्यात अडकलेल्या पक्ष्याला काढून त्वरीत पिंजर्‍यात बंद केलं आणि त्याला घेऊन आपलं घर गाठलं. घरी आल्यावर मात्र तो पेचात पडला की, मी हा अजब पक्षी घरात कसा काय बरं ठेवावा? हा विस्मयकारी पक्षी जर आजूबाजूला राहणार्‍यांनी कोणी पाहिला तर ते लगेच राजाला खबर दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि राजाच्या कानावर जर ही बातमी गेलीच तर माझ्या जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही. राजाच्या बडग्याला तोंड देण्यापेक्षा मी स्वतःच राजाला हा पक्षी नजर करतो. भेट देतो. कदाचित इतका आश्चर्यकारक पक्षी पाहिल्यावर राजा खूश होऊन मला काही बक्षिसही देईल. असा विचार करून त्याने तो अद्भुत पक्षी आपणहूनच राजाला भेट दिला.

राजाही असा वेगळाच पक्षी पाहून खूश झाला. त्याने आपल्या रक्षकांना त्याची यथायोग्य काळजी घेण्यास आणि उत्तम बडदास्त ठेवण्यास सांगितले. त्याला जे काय आवडेल जेवढं तो खाईल तेवढं अन्नपाणी देण्याचा हुकूम त्यानी रक्षकांना दिला.

त्यावेळेला तेथे उपस्थित मंत्री म्हणाला, ``महाराज आजपर्यंत आपण अशा पक्ष्याबद्दल कधी ऐकलं तरी आहे का? आपल्याकडून काहीतरी बक्षिसी उकळण्याच्या हेतूने हा पारधी काहीतरी सांगत असावा. ह्या बेभरवशी, अडाणी खेडूताच्या सांगण्यावर उगीच विश्वास ठेऊ नका. ह्या पक्ष्याला उगीच पिंजर्‍यात बंद करून ठेऊन त्याची बडदास्त ठेवण्यात उगीच वेळ कशाला वाया घालवायचा? पक्ष्याच्या विष्ठेतून कधी सोनं उत्पन्न होईल का? असं असतं तर सोन्याच्या खाणींमधे व्यर्थ कोण राबत बसेल? ह्या पक्ष्याला पिंजर्‍यातून सोडून दिलेलं बरं.’’

मंत्र्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन, राजाने त्या पक्ष्याला पिंजर्‍यातून सोडून दिले. पिंजर्‍यातून सुटलेला पक्षी उडून मुख्य दरवाजाच्या तोरणार जाऊन बसला. स्वतःच्या घराच्या, जंगलांच्या दिशेने आकाशात उंच भरारी घेण्यापूर्वी, स्वतःला हलकं करण्यासाठी नेहमीप्रमाणे तेथे विष्ठा टाकून  तो म्हणाला, ``सर्वप्रथम मी महामूर्ख आहे. मग मला पकडणारा तो फासेपारधी अति मूर्ख आहे. हे सल्लागार मंडळातले राजाचे मंत्री मूर्ख आहेत आणि मंत्र्यांचा सल्ला अमलात आणणारा  हा राजाही मूर्ख आहे. ही सर्व मूर्खांचीच महासभा आहे.

पूर्वान्तादहं मूर्खो द्वितीयः पाशबन्धकः ।

ततो राजा च मंत्री च  सर्वं वै मूर्खमण्डलम् ।।

एकमेवची होतो मी । मूर्ख अत्यंत ह्या इथे ।

जाणावा तो दुजा मूर्ख । हा फासेपारधी सवे ।।

राजाही जाहला मूर्ख । मंत्रीमंडळ मूर्ख हे।

मूर्खाचीच सभा सारी । झाले निश्चित आज हे ।।

 

रक्ताक्षाने रक्ताचं पाणी करून कितीही पटवून द्यायचा प्रयत्न केला पण दैवाचा फासा फिरला की, दुर्दैवाचे दशावतार आठवल्याप्रमाणे त्यांना रक्ताक्षाचं म्हणणं जराही पटलं नाही. भाग्यचं फिरलं की अयोग्य गोष्टीच योग्य वाटतात. रक्ताक्षाच्या बोलण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून, काणाडोळा करून  ते पूर्वीप्रमाणे स्थिरजीवीला भरपेट मांस आणि इतर चांगले चुंगले पदार्थ खायला घालून त्याची काळजी घेत राहिले. त्याची अशी उत्तम बडदास्त पाहून रक्ताक्षाने आपल्या सर्व अनुयायांना, सेवकांना एकांतात बोलावले. आणि त्यांना तो म्हणाला,

 आजपावेतो ह्या राजाचे सर्व व्यवस्थित चालले होते. तो दक्ष असल्याने त्याचे सर्व कुशल मंगल होते. आपले हे राज्य ,आपला हा दुर्ग सुरक्षित होता. एका सच्च्या  मंत्र्याला ज्या योग्य गोष्टी जितक्या परखडपणे बोलायला पाहिजे होत्या तेवढ्या परखडपणे मी समजाऊन सांगितल्या. पण आता त्याचा माझ्यावर विश्वास राहिलेला नाही. किंवा माझ्या सत्य कथनात त्याला रुची राहिली नाही. म्हणून आता आपल्याला ह्या राज्याचा त्या करून दुसर्‍या एखाद्या पर्वतातील गुहेचा आश्रय घेणे उचित आहे. कारण जो दूरदृषटीने भविष्याचा विचार करतो,  त्याप्रमाणे आपल्या कार्याचं नियोजन करतो, आणि त्याप्रमाणे अमलात आणतो त्याचं नंतर कौतुक होतं. लोक त्याची वहाव्वा करतात. पण जी व्यक्ती आपल्या भविष्याबद्दल मागचा पुढचा विचार न करताच काही तरी काम पुढे ढकलत राहते, त्याला नशिबात कष्टच कष्ट सोसावे लागतात. तो लोकनिंदेचा धनी होतो.

तो कोल्हा असं म्हणाला होता,

जी व्यक्ती चहूबाजूंनी संकटांचा विचार करून मग हाती काम घेते तीच व्यक्ती यशस्वी होते. नंतर त्याच्यावर पश्चातापाची वेळ येत नही. ह्या रानात माझं सगळं आयुष्य गेलं. येथे मी अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवले आणि लहानाचा मोठा झालो. येथेच माझे केसही पिकले आणि मी  वृद्धही झालो. पण आजपर्यंत प्रतिसाद म्हणून गुहेने अशी हाक दिलेली मी कधी ऐकली नव्हती.

 

अनागतं यः कुरुते स शोभते,

स शोच्यते यो न करोत्यनागतम् ।

वनेऽत्र संस्थस्य समागता जरा,

बिलस्य वाणी न कदापि मे श्रुता ।। 212/214

सतर्कतेनेच विचार जो करी

प्रकल्प-प्रारंभ करेच नंतरी

विवेक ठेवीच सदैव मानसी

 न तोचि पस्तावतसेचि अंतरी ।।

वनात ह्या घालविलेच बाल्य मी

सरे कसा काळ घडेचि वृद्ध मी

कित्येक वर्षे, दशकेचि पाहिली

परी गुहेची नच हाक ऐकली ।। 214

रक्ताक्षाने असे सांगता, त्याचे सेवक आणि त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याला मानणारी जी काही बाकी घुबडप्रजा होती त्यांनी त्याला विचारलं,

मंत्रीमहोदय, ही कुठली गोष्ट आहे?

रक्ताक्षाने पुढील गोष्ट सांगायला सुरवात केली.------

------------------------------------

 

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -