15 सिंहजम्बूकगुहा कथा ( सिंह आणि कोल्ह्याच्या गुहेची कथा )

 

15 सिंहजम्बूकगुहा कथा

सिंह आणि कोल्ह्याच्या गुहेची कथा

एका विशाल जंगलात खरनखर नावाचा एक सिंह त्याने त्याच्या आखत्यारीत केलेल्या प्रदेशात रहात होता. एक दिवस शिकारीच्या शोधात तो वनात इकडे तिकडे हिंडत होता पण, खूप प्रयत्न करूनही त्याला शिकार मिळाली नाही. भुकेने अत्यंत व्याकूळ होऊन तो इकडे तिकडे हिंडत असतांना संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला त्याला एक गुहा दिसली. त्या गुहेत शिरता शिरता त्याने विचार केला की, रात्री विश्राम करायला कोणी ना कोणी प्राणी येथे येईलच आणि मला आयती शिकारही मिळेल त्यामळे मी येथेच लपून बसतो आणि एखाद्या प्राण्याची वाट बघत बसतो.

त्याने जसा विचार केला होता तसच घडलं. काही वेळातच त्या गुहेमधे राहणारा दधिपुच्छ नावाचा कोल्हा तेथे आला. पण अत्यंत सतर्क असलेल्या कोल्ह्याने त्या गुहेच्या बाहेरच जमिनीवर उमटलेल्या सिंहाच्या पंजांचे ठसे पाहिले. नीट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की हे ठसे फक्त एकाच दिशेने म्हणजे गुहेकडे जाणारे आहेत. बाहेर येणार ठसे काही दिसत नाहीत. ते ठसे पाहून त्याने विचार केला की, ``आता तर मी मेलोच! ह्या गुहेत सिंह नक्कीच आला आहे. पण तो आत आहे का बाहेर निघून गेला आहे हे कसं काय कळेल?’’

 मग खूप विचार करून, मनात काहीसं योजून, तो गुहेच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहून जोरजोरात हाका मारू लागला, बीळा, ए बीळा! एवढी हाक मारून तो गप्प बसला. जेव्हा त्याला गुहेकडून काही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा तो म्हणाला,  अरे बीळा आपण दोघांनी एक करार केला होता तो तुला आठवत नाहिए का? आपण ठरवलं होतं की, मी जेव्हा बाहेरून येईन तेव्हा तुला हाक मारीन आणि त्यानंतर तूही मला प्रतिसाद म्हणून हाक मारशील. नेहमीप्रमाणे तू जर आज मला प्रतिसादच दिला नाहीस तर मी दुसरीकडे निघून जाईन आणि दुसर्‍या एखाद्या गुहेच्या आश्रयाने राहीन.

आत दबा धरून बसलेल्या सिंहाने ते ऐकलं मात्र  आणि तो विचार करू लागला,  बाहेरून हा प्राणी जर असं म्हणत असेल तर ही गुहा नक्कीच येणार्‍या प्राण्याला साद घालत असेल, पण! आज माझ्या भयाने ही गुहा बोलत नसावी. भीतीने प्राणी जणु काही पाषाणवत् होऊन जातो. विस्फारलेल्या डोळ्यांनी तो बघत राहतो. त्याच्या घशाला कोरड पडते. तोंडातून शब्दही फुटत नाही. सर्वांगाचा थरकाप होतो. 

भयसन्त्रस्तमनसां हस्तपादादिकाः क्रियाः।

प्रवर्तन्ते न वाणी च वेपथुश्चाधिको भवेत् ।। 213

चिडिचुप्प उभा राही । भीतीने ठोकळ्यासमा

नेत्र विस्फारुनी पाहे । पडे घसाचि कोरडा।।

शब्द तोंडातुनी ना ये । थरकाप उडे  असा

भयाने प्राणिमात्रांना । कार्य ना सुधरे जरा ।। 213

म्हणून आता ह्याच्या हाकेला जर ही गुहा प्रत्युत्तर देत नसेल तर  मीच प्रत्युत्तर देतो.  नेहमीप्रमाणे आपल्या हाकेला प्रत्युत्तर आलेलं पाहून बाहेर उभा असलेला प्राणी आत येईल आणि तो आत येताच मी त्याच्यावर तुटून पडेन. माझ्या भोजनाची चिंताच मिटेल. असा सगळा विचार करून सिंहाने जोरात डरकाळी  फोडली. त्याच्या त्या डरकाळीने गुहा दुमदुमून गेली. त्याच्या डरकाळीचे पडघम  दूरदूरच्या दर्‍याखोर्‍यांमधे  घुमले. जंगलातले सारे प्राणी भयभीत होऊन गेले.

कोल्हाही जीव वाचवण्यासाठी पळत सुटला. पळता पळता तो म्हणाला, जी व्यक्ती चहूबाजूंनी संकटांचा विचार करून मग हाती काम घेते तीच व्यक्ती यशस्वी होते. नंतर त्याच्यावर पश्चातापाची वेळ येत नही. ह्या रानात माझं सगळं आयुष्य गेलं. येथे मी अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवले आणि लहानाचा मोठा झालो. येथेच माझे केसही पिकले आणि मी  वृद्धही झालो. पण आजपर्यंत प्रतिसाद म्हणून गुहेने अशी हाक दिलेली मी कधी ऐकली नव्हती.

 

अनागतं यः कुरुते स शोभते,

स शोच्यते यो न करोत्यनागतम् ।

वनेऽत्र संस्थस्य समागता जरा,

बिलस्य वाणी न कदापि मे श्रुता ।। 214

सतर्कतेनेच विचार जो करी

प्रकल्प-प्रारंभ करेच नंतरी

विवेक ठेवीच सदैव मानसी

 न तोचि पस्तावतसेचि अंतरी ।।

वनात ह्या घालविलेच बाल्य मी

सरे कसा काळ घडेचि वृद्ध मी

कित्येक वर्षे, दशकेचि पाहिली

परी गुहेची नच हाक ऐकली ।। 214

दूरदर्शी रक्ताक्षाने ही गोष्ट आपल्या सेवकांना  सांगितली. ``आपण काय करतो आहोत, त्याचा परिणाम काय होईल ह्या गोष्टीचा पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. तुम्हाला जर मी काय सांगतो आहे ते लक्षात येत असेल आणि मी जे सांगत आहे त्यात तथ्य आहे असं वाटत असेल तर तुम्हीही सर्वजण माझ्यासोबत या. आपल्याला लवकरात लवकर येथून निघून गेलं पाहिजे.’’ जणु काही रक्ताक्षाला ती गुहेची साद ऐकू आली होती. रक्ताक्षाचे विचार पटून रक्ताक्ष आणि त्याचे अनुयायी, त्यांच्या परिवारांसह दुसरीकडे निघून गेले. 

 एकमेव द्रष्टा असलेला मंत्री रक्ताक्ष आणि त्याचे सजग अनुयायी निघून गेल्याचे पाहिल्यावर स्थिरजीव अत्यंत प्रसन्न झाला. जणु काही त्याच्या मनावरचा सर्व भारच उतरला. तो विचार करू लागला, ``अरे वा वा वा!!  रक्ताक्षाने ही गुहा सोडून जाणं ही माझ्यसाठी महा भाग्याची घटना आहे. त्याने निघून जाणं ह्याच्यासारखी आमच्यासाठी महाकल्याणकारक दुसरी गोष्ट नाही. हा एकमेव मंत्री घटनांची सांगड घालून भविष्य जाणण्याइतका  दूरदर्शी, जाणकार होता. बाकी मोठ्या मोठ्या बाता मारणारे हे सर्व मंत्री एकजात मूर्ख आहेत. आता सर्व परिस्थिती माझ्या आटोक्यात आली आहे. आता ह्या सर्वांना मी पुरून उरेन. मी एकटाच ह्या सर्वांना सहज स्वर्ग दाखवू शकतो. अनायासे माझं काम सहज सोपं झालं आहे. ज्या राजाकडे असे दूरदर्शी, कुलपरंपरेने आलेले मंत्री नसतात त्या राजाचा नाशही लवकरच होतो. ( आता कुलपरंपरेने ह्याचा अर्थ संकटातही अत्यंत विश्वासू, दगा न देणारे, वेळोवेळी पारखून त्याची निवड केलेले असाच  योग्य होईल)

न दीर्घदर्शिनो यस्य मन्त्रिणः स्युर्महिपतेः

क्रमायात ध्रुवं तस्य न चिरात्स्यात्परिक्षयः ।। 215

दूरदर्शी असा मंत्री । विश्वासार्हचि संकटी

नृपाजवळ ज्या नाही । नाश त्याचा घडे झणी ।। 215

ज्यांना स्वतःलाच परिस्थितीची जाण नसते, जे राजाला हिताचा सल्ला देण्याऐवजी खड्ड्यात घालणारा, राजाचा पराभव होईल, नुकसान होईल, असा सल्ला देतात, चुकीचा मार्ग घ्यायला लावतात असे मंत्री हे मंत्रीरूपात जवळ वाणारे शत्रूच समजावेत.

मन्त्रिरुपा हि रिपवः सम्भाव्यन्ते विचक्षणैः ।

ये हितं वाक्यमुत्सृज्य विपरीतोपसेविनः ।। 216

योग्य सल्ला न देती जे । गोंधळातचि पाडती

अशा मंत्र्यास मानावे । राजाने शत्रुच्यापरी ।। 216

असा नीट विचार करून आपल्या घरट्यासाठी एक एक काडी आणता आणता स्थिरजीवीनी आपलं घरटं चांगलं भलं मोठं बनवलं. पण त्या मूर्ख घुबडांना त्याचा हा सर्व कार्यप्रपंच/ उपद्व्याप /खेळ एक दिवस त्यांच्याच जीवावर बेतणार आहे हेही कळलं नाही. बघता बघता ती गुहा पूर्ण जळेल इतक्या काड्या  गुहेच्या तोंडाशीच जमवून स्थिरजीवीने आपलं घरटं इतकं मोठं केलं की त्याला आग लागलीच तर आतील एकही घुबड बाहेर येऊ शकणार नाही. 

एकदा का माणूस दुर्भाग्यग्रस्त झाला की त्या अभाग्याला  शत्रू मित्रं वाटायला लागतो तर मित्र शत्रू आहे असं वाटतं, मित्रालाच शत्रू समजून तो त्याचाच द्वेष करायला लागतो, त्याचाच तिरस्कार करायला लागतो आणि त्यालाच ठार मारण्याचं षड्यंत्रही करतो. आणि खरोखरच्या शत्रूला प्रेमानंदाने मिठी मारून त्याला स्वगृही घेऊन येतो. असा दुर्दैवी माणूस शुभाला अशुभ अशुभाला शभं, कल्याणकारी पुण्याला पाप आणि  सर्वनाशास कारणीभूत होणार्‍या पापास पुण्य समजतो. 

अमित्रं कुरुते मित्रं मित्रं द्वेष्टि हिनस्ति च ।

शुभं वेत्त्यशुभं पापं भद्रं दैवहतो नरः ।। 217

मित्राला समजे शत्रू । मित्र मानीच शत्रुसी

करी द्वेषचि मित्राचा । तिरस्कारी तया मनी

मारण्यासचि मित्राला । षडयंत्रहि आचरी

अयोग्या समजे योग्य । योग्य माने अयोग्यची  

कल्याणप्रद गोष्टींसी । माने अहित कारक

प्रतिकूल जयाचे हो । भाग्य तो बिघडे नर ।। 217

एक दिवस घरट्याच्या आवती भोवती चांगल्या भरपूर काड्या जमलेल्या पाहून, हीच योग्य वेळ आहे असा स्थिरजीवीने विचार केला. सूर्योदय होत होता. दिवाभीत घुबडांना दिसेनासं झालं होतं. सगळी घुबडं आपल्या गुहेत शिरून निःशंकपणे झोपायच्याच तयारीत होती. स्थिरजीवी घाईघाईने कावळ्यांचा राजा मेघवर्ण जेथे राहत होता. तेथे पोचला आणि म्हणाला, ``महाराज, मी शत्रूचा गड आता जाळण्यास योग्य बनवला आहे. आता आपण आपल्या सर्व परिजनांसह एक एक जळती काडी घेऊन, त्वरेने माझ्या मागे या आणि मी बांधलेल्या भल्या मोठ्या घरट्यात टाका.  आपला शत्रू मडक्याचं तोंड बंद करून चहूबाजूंनी आग लावताच  आतील भाजी शिजून निघावी त्याप्रमाणे `कुंभीपाकनरकात पडल्याचं दु;ख भोगत भोगत लवकरच मरण पावेल.’’

आपला अत्यंत विश्वासू, दूरदर्शी आणि आपल्याला संकटातून मुक्त करण्याची हिम्मत बाळगणारा, कुटिल नीती जाणणारा मंत्री स्थिरजीवी आलेला  पाहून  मेघवर्ण अत्यंत प्रसन्न झाला. आणि म्हणाला, `` मंत्रीवर, पहिल्यांदा आपण  ठीक आहात न? हे सांगा. सर्व कुशल आहे ना? किती दिवसानंतर आज आपण  अचानक आलात, दिसलात. आपण कुठे होता? काय करत होता?’’

स्थिरजीवी म्हणाला,  ``पुत्रा, हे सर्व सांगत बसायची ही वेळ नाही.  शत्रूच्या गुप्तचरांनी जर मी येथे आल्याची बातमी त्याला कळवली तर तो आंधळा तेथून निसटेल आणि पळून जाईल. माझे सर्व प्रयत्न पाण्यात जातील. म्हणून आता उशीर करू नकोस. तातडीने तेथे पोचू या. जे काम विनाविलंब, तातडीने करायला पाहिजे ते तातडीनेच करावे लागते. त्यात जर वेळकाढूपणा केला तर ते काम होत नाहीच पण कित्येकवेळा ते आपल्यावरच उलटते. जणु काही ते कार्य पूर्णत्त्वाला नेणार्‍या देवता रागाने त्यात विघ्ने उत्पन्न करतात.  आणि त्यातल्या त्यात जर एखादं महत्त्वाचं कार्य अगदी पूर्णत्त्वाला जात आहे, आता काय झालच! असा विचार करून जर शेवटच्या टप्प्यावर त्यात चालढकल केली तर हमखास त्यात ऐनवेळी काहीतरी आडथळा येतो. सहज हाताशी आलेले फळ लांबणीवर पडते. शेवटी त्याच्यात तथ्यच उरत नाही.

शीघ्रकृत्येषु कार्येषु विलम्बयति यो नरः ।

तत्कृत्यं देवतास्तस्य कोपाद्विघ्नन्त्यसंशयम् ।। 218

कार्य तत्परतेने जे । करावे  लागते नरा

चालढकल त्यामाजी । होता, कृत्य न ये फळा

देवता कार्यसिद्धीसी । नेती त्या क्रुद्ध होवोनी

आणती संकटे भारी । होऊ देती न कार्यही ।। 218

 

यस्य यस्य हि कार्यस्य फलितस्य विशेषतः ।

क्षिप्रमक्रियमाणस्य कालः पिबति तद्रसम् ।। 219

कार्याचे फळ लाभावे । आली जवळ वेळ ती

विशेषतः अशा कामी । विलंब करता कुणी ।।

 काळ शोषून तो घेई । रस कार्यातला पुरा

तथ्य ना उरते कर्मी । सारहीन घडे क्रिया ।। 219

म्हणून सत्वर त्या  गुहेपाशी जाऊन एकदा का सर्व शत्रूंचा पुरता बिमोड केला की अत्यंत शांत, निःशंकपणे सर्व हकिकत सविस्तरपणे तुला सांगीन.

त्याचे ते म्हणणे ऐकून सर्वजण त्या गुहेच्या प्रवेशद्वाराशी पोचले. सर्व कावळ्यांनी चोचीने एक एक जळती काडी गुहेच्या प्रवेशद्वारापाशीच बनवलेल्या घरट्यात टाकायला सुरवात केली. दिवसा न पाहू शकणार्‍या त्या घुबडांना  आता रक्ताक्षाचे बोल कानात घुमु लागले. गुहेच्या आतल्या आत कुंभात शिजवलेल्या भाजीप्रमाणे सर्व शिजून आणि जळून खाक झाले. गुहेचं एकमेव प्रवेशद्वारच बंद झाल्याने  कोणीही बाहेर पडू शकला नाही.

 अशाप्रकारे संपूर्ण शत्रूंचा संहार झाल्यावर मेघवर्ण परत कावळ्यांच्या त्या जुन्या वटवृक्षावर रहायला गेला. तेथे परत एकदा कावळ्यांची सर्व सभा भरवून सिंहासनावर विराजमान झाल्यावर मेघवर्णाने स्थिरजीवीला विचारलं, ``मंत्रीवर, इतके दिवस सातत्याने आपण शत्रूच्या सानिध्यात राहिला. तेथे आपला एकही विश्वासू नसतांना, चहूबाजूने सर्वत्र शत्रूपक्षानेच घेरलेले असताना आपण आपला काळ कसा घालवत होता? इतक्या दिवसांचा तेथील सर्व वृत्तांत जाणून घेण्यासाठी आम्ही सारे उत्सुक आहोत. अहो एकवेळ संत, महाजनांसाठी रसरसत्या अग्नीत प्राण देणं परवडलं पण आपलं कार्य साधून घेण्यासाठी शत्रूच्या नजरेखाली एक क्षणभर देखील राहणं अत्यंत धोकादायक असतं. प्राणसंकटात टाकणं असतं.

वरमग्नौ प्रदीप्ते तु प्रपातः पुण्यकर्मणाम् ।

न चारिजनसंसर्गो मुहूर्तमपि सेवितः ।। 220

बरा अग्निप्रवेशाने । सज्जनांस्तव मृत्युही

क्षणएक रहाणे ना । शत्रु-सन्निध ते परी

ते ऐकून स्थरजीवी म्हणाला, ``बाबा रे, पुढे मिळणार्‍या उज्ज्वल भविष्याच्या आशेने सेवक  आत्ता सहन करावे लागणारे महाकष्टही विसरून जातो. आणि खरं सांगायचं तर आपत्ती आल्यावर तिच्या निवारणार्थ जे जे म्हणून उपाय हितकर वाटत असतात ते सर्व उपाय शहाण्या माणसाने अत्यंत कुशलतापूर्वक शेवटपर्यंत अमलात आणावेतच! हा उपाय अगदिच थातुरमातुर वाटतोय, तो अगदिच क्षुल्लक आहे असं मनातही आणू नये. हे असलं हलकं काम माझ्या प्रतिष्ठेला बाधा आणणारं आहे असे तर मुळीच समजू नये. प्रत्येक उपाय मनापासून योजून बघावा. अहो, गांडीवासारखं महाधनुष्य उचलून आणि हत्तीच्या सोंडेसारखी टणक  आणि कणखर प्रत्यंचा ओढून ओढून अर्जुनाच्या हाताला घट्टे पडले होते. त्याचे जे हात दिव्य अस्त्र शस्त्र चालवण्यात निपुण होते, त्या हातांमधे त्याने मधुर किणकिणणार्‍या बांगड्याही घातल्याच नं? जशी वेळ असेल त्याप्रमाणे वागतांना लाज वाटू देऊ नये.

वृत्तहरिणी; अक्षरे – 17; गण- न स म र स ल ग; यति- 6,4,7

उपनतभयैर्यो यो मार्गो हितार्थकरो भवेत्

स निपुणतया बुद्ध्या सेव्यो महान्कृपणोऽपि वा ।

करिकरनिभौ ज्याघाताङ्कौ महास्त्रविशारदौ,

वलयरणितौ स्त्रीवद्वाहू कृतौ न किरीटिना? ।। 221

वृत्त - शार्दूलविक्रीडित

येता संकट ते अचानक पुढे त्याचा करी सामना

 जे जे शक्य उपाय थोर लघु वा सन्मान त्यांचा करा

दावा तत्परता लहान अथवा मोठ्याच कामी सदा

 वाटू देउ नकाच लाज हृदयी कैसी प्रतिष्ठा मला? ।।

 

त्रैलोक्यात महान वीर म्हणुनी ज्याचा दरारा महा

गांडीवासचि रज्जु बांधुन करा घट्टेच आले जया

तोची अर्जुन बांगड्या भरुनिया कैसे करी नर्तना

जैसी वेळ असे उपाय तसला योजीत जावा नरा ।। 221

संकटं कोणाला सोडत नाहीत? आयुष्यात प्रत्येकाला संकटांचा सामना करावा लागतोच. अशा वेळी ज्यांनी ज्यांनी मोठ्या मोठ्या संकटांचा सामना  कसा केला अशा महावीरांची आठवण केली तर असं दिसून येईल की ते बलवान असले तरी, `हा आपला विपरीत काळ आहे. त्यानी मी खचून जाता कामा नयेअशा निश्चयाने ते अत्यंत संयम बाळगून राहिले. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी माझे पौरुष दाखवून देईन, मी मला सिद्ध करून दाखवेन अशा जिद्दीने पण प्रसंगी दुसर्‍याचे हृदयाला बोचतील असे बोलही सोसत पण अत्यंत दक्षतेने राहिले. कुठल्या हलक्या कामाला त्यांनी नाक न मुरडता तीही कामे अत्यंत चोख रीतीने पार पाडली. त्यांची ही सोशीक, नम्र, दक्ष वृत्ती माणसाने आपल्यात बाणवण्याचा प्रयत्न करावा.

 

शक्तेनाऽपि सदा जनेन विदुषा कालान्तरापेक्षिणा,

वस्तव्यं खलु वक्रवाक्यविषमे क्षुद्रेऽपि पाते जने ।

दर्वीव्यग्रकरेण धूम्रमलिनेनायासमुक्तेन च

भीमेनातिबलेन मत्स्यभवने किं नोषितं सूदवत् ।। 222

दर्वीडाव, चमचे

राहे संकट घेरुनी चहुदिशी दुर्दम्य वीरा जरी

जाणोनी विपरीत काळ, धरतो तो नित्य मौना तरी ।

आहे काळ अयोग्य आज मजला येईल संधी उद्या

श्रद्धा ठाम हृदी अशी धरुनिया तो दक्ष राहे सदा ।।

 

दुष्टांच्या खल संगतीतचि तया लागे रहावे जरी

सोसूनी कडवेच बोल हृदया देतीच जे डागणी ।

राहे क्षुद्र खलांसवे प्रतिदिनी संकोच ना त्या मनी

सोसोनी अपमान तो निमुटची धैर्या न सोडे कधी ।।

 

राहे राबत भीमसेनचि कसा गाळून घामासही

धूराने भरल्या घरातचि करी कैसा स्वयंपाकची

हाती डाव धरून सार हलवे, भाजी करे वा कधी

होताची बलवान थोर  जरि तो राहे विराटा घरी ।। 222

 

यद्वा तद्वा विषमपतितः साधु वा गर्हितं वा,

कालापेक्षी पिहतनयनो बुद्धिमान् कर्म कुर्यात् ।

किं गाण्डीवस्फुरदुरुगुणास्फालनक्रूरपाणि-

र्नासील्लीलानटनविलसन्मेखली सव्यसाची? ।। 223

ऐसे कैसे न कळत कधी घेरता संकटाने

ज्यासी वाटे सुखरुप पुन्हा त्यातुनी पार व्हावे ।

काळाची तो अनुरुप अशा वाट पाहेच दक्ष

छोटी मोठी करतचि असे सर्व कर्मेचि चोख ।।

 

 

प्रत्यञ्चा ती सतत सहजी खेचुनी गांडिवाची

घट्टे ज्याच्या पडतिच करा, नाचला पार्थ तोची ।

ऐसी कैसी सजवुन कटी मेखलेने स्वतःची

माने ना तो उचित अथवा निंद्य हे कर्म चित्ती ।। 223

 

सिद्धिं प्रार्थयता जनेन विदुषा तेजो निगृह्य स्वकं,

सत्त्वोत्साहवताऽपि दैवविधिषु स्थर्यं प्रकार्यं क्रमात् ।

देवेन्द्रद्रविणेश्वरान्तकसमैरप्यन्वितो भ्रातृभिः,

किं क्लिष्टः सुचिरं त्रिदण्डमवहच्छ्रीमान्न धर्मात्मजः? ।। 224

ग ग ग । ल ल ग । ल ग ल । ल ल । ग ग ल । ग ग ल । ग

उत्साहे भरलाच वीरवर जो, जो शौर्य घैर्या धरी

जावे सिद्धिस कर्म सर्व मम ते, ऐसी अपेक्षा करी

चित्तासी लव घालुनी मुरडची तोची प्रतीक्षा करी

ओजस्वीपण आपुले बल महा तो आवरी शौर्य ही

 

घाले संयम राहतो दृढ मनी चित्ती प्रतीक्षा करी

होता ते अनुकूल भाग्य सहजी संधीही ये चालुनी

होते इंद्र कुबेर वा यम असे भाऊ जयाचे भले

त्या सम्राट युधिष्ठिरा न चुकले ते कंक होणे कसे ।।224

संकटं सर्वांनाच घेरतात. श्रीमंत, गरीब असा भेद करत नाहीत. कुठचीही जागा त्याला दुर्गम नाही. मदनाचे पुतळे शोभावेत अशा नकुल सहदेवांनाही संकटांनी सोडलं नाही. त्यांना विराटाची गायीगुरं सांभाळायला लावली. त्याच्या घोड्यांना खरारा करायला भाग पाडलं.

रूपाऽभिजनसम्पन्नौ कुन्तीपुत्रौ बलान्वितौ

गोकर्मरक्षाव्यापारे विराटप्रेष्यतां गतौ ।। 225

कुलीन देखणे दोघे । सहदेव नकूल ते

कुंतीपुत्र जरी होते । बलशाली महान ते

विराटापदरी त्यांसी । राबावे लागले किती

सांभाळित गुरे गायी । खरारा तुरगा करी

ती यज्ञातून उत्पन्न झालेली याज्ञसेनी, बलाढ्य राजा द्रुपदाची रूपगर्विता पुत्री द्रौपदी, पांचाल देशाची राजकन्या पांचाली,  रूप गुणांमधे लाखात एक अशी युवती, जिचे तेज पाहिल्यावर साक्षात लक्ष्मीच पृथ्वीवर अवतरल्याचा भास व्हावा अशी पांडवांची पट्टराणी! पण---! काळ फिरताच काय तिची दुर्दशा झाली! जिच्यासाठी अनेक दास-दासी राबत होत्या, कृष्ण जिचा सखा होता, त्या कृष्णेलाही स्वतः दासी बनून मत्स्य देशाच्या राजाकडे सैरंध्री नावाने राण्यांची केशरचना करत, त्यांच्या उटीसाठी बनवण्यासाठी चंदन उगाळण्याची पाळी आली.  हाय रे दैवा!

रूपेणाऽप्रतिमेन यौवन गुणैः श्रेष्ठे कुले जन्मना

कान्त्या श्रीरिव याऽत्र साऽपि विदशां कालक्रमादागता ।

सैरन्ध्रीति सगर्वितं युवतिभिः साक्षेपमाज्ञप्तया

द्रौपद्या ननु मत्स्यराजभवने घृष्टं चिरं चन्दनम् ।। 226

यज्ञातूनच जन्मली अनुपमा जी याज्ञसेनी महा

तेजस्वी कमलाचि भासत असे सौंदर्यशाली अहा

काळाचे फिरताच चक्र बनली दासी विराटाघरी

सैरंध्री बनुनी करीत फिरली कामेच अंतःपुरी

स्थिरजीवीचं ते बोलणं ऐकून  कावळ्यांचा राजा मेघवर्ण म्हणाला, ``मंत्रीवर, शत्रूच्या गोटात जाऊन रहायचं हे म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे महा कठीण असिधारा व्रतच म्हणावे लागेल.’’

स्थिरजीवी म्हणाला, महाराज! आपण म्हणता ते अगदी यथार्थच आहे. पण मी इतका  मूर्ख समाज आजपर्यंत पाहिला नव्हता. आणि रक्ताक्षाप्रमाणे महा बुद्धिमान, चाणाक्ष, अनेक शास्त्रांमधे पारंगत, कुशाग्रबुद्धी आणि अत्यंत द्रष्टा असा मंत्रीही मी आजपर्यत पाहिला नाही. त्याने मला पाहता क्षणीच माझ्या हृदयातला प्रतिशोध तत्क्षणीच जाणला होता.

 उलुक राजाच्या दरबारातील बाकी सर्व मंत्री हे नावाचेच मंत्री होते. पण प्रत्यक्ष ते महामूर्ख होते. त्यांना इतकही कळलं नाही की शत्रूच्या गोटातून आलेली  शत्रूसरकारात सेवा करणारी व्यक्ती आपल्या हिताची नसते. शत्रूच्या गोटात राहून सहजपणे त्याची बुद्धीही शत्रूच्या विचारांशी तर्कसंगत वा मिळतीजुळती असते. शत्रूदरबारी सेवा केल्याने तो त्याच्या राजाशी, राष्ट्राशी इमानदार असतो. दुसर्‍यांच्या नाही. वरवर गोड गोड बोलत असला तर ``मधु तिष्ठन्ति जिह्वाग्रे हृदये तु  हलाहलः’’ असा तो वरवर गोडबोल्या पण आतून मात्र अत्यंत दुष्ट, भयावह असतो. त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे आपणहून आपला घात करणे असते. अशी व्यक्ती अजिबात विश्वासार्ह तर नसतेच पण जर त्याच्यावर कधी विश्वास ठेवलाच तर तुम्हाला पश्चात्तापाची पाळी येते. कदित पश्चात्ताप करायला तुम्ही जिवंतही राहू शकत नाही.

अशी चाणाक्ष व्यक्ती दुसर्‍यावर बरोबर नजर ठेऊनच असते. आणि  आपला शत्रू जरा स्वस्थ बसलेला पाहून वा झोपलेले असता, भोजन, जलपान अशा बेसावध वेळेला, पूर्ण तयारीनिशी शत्रूवर निकराचा हल्ला चढवून त्यास ठार मारते.

अरितोऽभ्यागतो भृत्यो दुष्टस्तत्सङ्गतत्परः ।

अपसर्पसधर्मत्वान्नित्योद्वेगी च दूषितः ।।227

शत्रूच्या दरबारी जो । होता सेवक एकदा

असे हितैषी शत्रूचा । विचाराचाच शत्रुच्या ।।

दुष्टबुद्धी असे तो वा । चाणाक्ष हेर शत्रुचा

असे विश्वासघाती तो । लावे पस्तावया सदा ।।227

शत्रूचे गुप्त हेर हे कायम आपल्या आजुबाजूला वावरत आहेत हे लक्षात घेऊन राजाने अत्यंत सावध रहायला पाहिजे. जरा ढिलाई आली आहे हे पाहून शत्रूचे गुप्त हेर संधी साधून कधीही राजाचा खातमा करू शकतात. माणूस बेसावध असायच्या वा त्याच्या बंदोबस्तात कमी राहून जायचे रोजच्या आयुष्यातही अनेक प्रसंग असतात.  जेवतांना, झोपला असता, प्रवासात, स्वस्थ बसलेला असता, पेय पीतांना, दुष्ट शत्रू निराने हल्ला चढवतो.

आसने शयने याने पानभोजनवस्तुषु ।

दृष्टान्तरं प्रमत्तेषु प्रहरन्त्यरयोऽरिषु ।। 228

बसला स्वस्थ पाहूनी । वा प्रवासात पाहुनी

झोपला असतांना वा । करता भोजनस ही ।।

करता जलपानासी । बेसावधचि पाहुनी

निकराने करी हल्ला । शत्रूचा नाश तो करी ।।228

शरीरम् आद्यं खलु धर्मसाधनम् ! म्हणतात ते काही खोटं नाही. काहीही काम करायच असेल तर त्याला शरीराची आवश्यकता  असतेच. विचार करायला सुद्धा.  आपल्याला कुठलंही काम करण्यासाठी उपकरण म्हणून मिळालेलं हे शरीर काम होण्यासाठी अत्यंत सुयोग्य रीतीने ठीकठाक ठेवणे आवश्यक आहे. अनेक संकटांपासून त्याचं रक्षण करणे, ते नाश पावणार नाही, त्याला इजा होणार नाही, ह्यासाठी त्याची सर्वतोपरी काळजी घेतलीच पाहजे. चुका, घोडचुका टाळायलाच पाहिजेत.

तस्मात्सर्व प्रयत्नेन त्रिवर्गनिलयं बुधः ।

आत्मानमादृतो रक्षेत्प्रमादाद्धि विनश्यति ।। 229

(आदृत सन्मानित, प्रतिष्ठित, उत्साही, परिश्रमी, दत्तचित्त, सवधान ; प्रमादअवहेलना, असावधानी, अनवधान, घोडचूका, चुकीचे निर्णय घेणे, दुर्घटना,  उत्पात, संकट )

धर्म अर्‍थचि कामाचे । घर शाश्वत जे असे

प्रयत्ने त्या शरीरासी । सर्वतोपरि रक्षिणे

सावधान सदा राहे । संकटापासुनी सदा

सर्वनाश घडे ज्याने । टाळा घोडचुका अशा ।। 229

 

काही वेळेला माणूस आपल्या हाताने आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेत असतो.  आपल्या सर्वनाशाला तोच जबादार असतो. सर्व कळून सवरून रोग्याने पथ्य सांभाळलं नाही, वेळच्यावेळेस औषध घेतलं नाही, तर काय होईल हे वेगळं सांगायला नको. स्वतःला पुरण्यासाठी हा खड्डाच असतो. मंत्र्यांनी दिलेले बद्सल्ले राजाचं भलं सोडाच पण राज्य कारभारातच ढवळाढवळ झाल्याने राज्याला एका संकटाच्या गर्तेत नेण्याला पुरेसे असतात. जरा थोडे पैसे खुळखुळायला लागले की नम्र होणारा माणूस विरळा पैसा आला की माणसाचं डोकं फिरयलच म्हणून समजा. उद्दामपणा उद्धटपणा आणि गर्व त्याला झालाच म्हणून समजा. मृत्यू माणसाचा विनाशच करतो. भलं नाही. परस्त्रीचे मनात घोळणारे विचार चित्ताला शांती थोडेच देतात? अयोग्य गोष्टींचा एकच परिणाम असतो ---- विनाश! हे कळूनही माणसं नेमकी तसच वागतात.

सन्तापयन्ति कमपथ्यभुजं न रोगा,

दुर्मन्त्रिणं कमुपयान्ति न नीतिदोषाः ।

कं श्रीर्न दर्पयति कं न निहन्ति मृत्युः

कं स्त्रीकृता न विषयाः परिपीडयन्ति ।। 230

कंटाळतो सतत पथ्यचि आचराया

त्याला न रोग छळतो कधि हो असे का?

सल्ला अयोग्य  मिळता सचिवांकडूनी

चालेल राज्य सुरळीत असे घडे का? ।।

 

ऐश्वर्य गर्व नच दे घडते असे का ?

मृत्यू विनाश न करे कधि पाहिले का?

स्त्री-लंपटास कधि का मिळतेच शांती?

कल्याण काचि करतीच अयोग्य गोष्टी? ।। 230

काही गोष्टीच अशा असतात की त्यांचा नाश हा ठरलेलाच असतो.

1 धनावर डोळा ठेऊन जो सतत धनाच्याच मागे लागतो त्याचा विवेक सुटल्यातच जमा असतो. धनप्राप्तीसाठी जो कुठलाही मार्ग अयोग्य समजत नाही अशा लोभी माणसाचं यश त्याच्यापासून दूर दूर जात राहतं.

2 मैत्रीचं नाटक करणारा दुष्ट  वेशीपर्यंतच मित्र राहतो. दुष्टाची संगत फार काळ टिकत नाही.  कधी ना कधी तो आपला इंगा दाखवल्याशिवाय रहात नाही.

3 कुठलेही काम न करणार्‍या आळशाचे कुळ किती का मोठे असेना त्याच्या क्रियाहीनतेमुळे त्याचा आब, धनदौलत, कीर्ती सर्व सर्व नाश पावते.

4 व्यसनाधीन व्यक्ती कितीही बलवान विद्यासम्पन्न असली तरी त्याच्या व्यसनांमुळे त्याची तब्बेत खालावायला वेळ लगत नाही. विद्या असूनही तिचा काहीही उपयोग होत नाही. व्यसन ह्या  संस्कृत शब्दाच दुसरा अर्थ संकट असाही आहे. सतत संकटांचाच सामनाचा करावा लागत आहे, ज्याला पोटासाठी रोजचेच दोन घास मिळवण्यासाठी रात्रदिन झगडावे लागत आहे, त्याला कसबसे कदान्न खाऊन बलवान कसे होता येईल? त्याची आकलन शक्ती कितीही चांगली असली, डोक्याने तो कितीही तल्लख असला तरी---;  अशा हुशार, चलाख मुलाला विद्या मिळवण्यासाठी लागणारा वेळ, मनाची स्वस्थता कशी मिळणार?

5 कवडीचुंबक सतत व्यय होणार्‍या दोन पैशांनी दुःखी होत राहणार. सुख मिळवण्यासाठीही काही ना काही पैसे खर्च करावेच लागणार. जो पैसे खर्च करण्यासाठी काऽऽकू करत राहणार त्याला सुख कसे मिळेल?

6 त्या प्रमाणे जो राजा आणि त्याचे मंत्री  सत्तेने माजलेले आहेत; नीती अनीती ह्याची ज्यांना चाड राहिलेली नाही; ज्यांना प्रजेच्या सुखदुःखाची पर्वा नाही; ज्या राजाला  वा मंत्र्याला योग्य उपदेश कोणी दिला तर ते क्रुद्ध होतात; असा राजा, असे मंत्री आणि त्यांच्याबरोबर ते राज्यही धुळीला मिळाल्याशिवाय रहात नाही. 

लुब्धस्य नश्यति यशः पिशुनस्य मैत्री

नष्टक्रियस्य कुलमर्थपरस्य धर्मः ।

विद्या बलं व्यसनिनः कृपणस्य सौख्यं

राज्यं प्रमत्त सचिवस्य नराधिपस्य ।। 231

 जाते विरून यश ते धन-लुब्धकाचे

मैत्री प्रगाढ तुटतेच खलासवे रे

जाते लया कुळ महान चि आळशाचे

विद्या मिळे न बळ ते व्यसनी नराते ।।

 

हापापला नित धनास्तव त्या न नीती

आनंद ना मिळतसे कृपणा जराही

उन्मत्त भूप सचिवासह राज्य सारे

जाते लया न टिकते मदमस्ततेने ।।231

ग ग ल । ग ल ल । ल ग ल । ल ग ल । ग ग

एखादं महत्त्वाचं काम साध्य करायचं म्हणजे सर्व लक्ष `ते कसं साध्य होईलह्यावरच केंद्रित करायला लागतं.  अहंकार, दुराभिमान धरून  असाध्य ते साध्य होत नाही. उलट काम बिघडतच. आपल्यापेक्षा कामाला महत्त्व देऊन; अनेक वेळेला थोडं नमतं घ्यायला लागतं. कधी कधी काम साध्य होत असेल तर अपमान, अपमान न वाटून घेता पुरस्कार समजायला लागतो. पुढे दिसणार्‍या मोठ्या यशासाठी छोट्या मोठ्या अपमानांचं भांडवल न करता. निमूटपणे सर्व अपमान गिळून, सतत साध्यावर नजर ठेऊन, असाध्य काम तडीस नेणारा हा खरा चतुर असतो.  आपलं हित काशात आहे हे त्याला नक्की समजलेलं असत. त्याउलट थोड्या थोड्या कुरबुरींनी जो डोक्यात राख घालून घेतो, स्वतःच्या हितापेक्षा स्वतःचा मान अपमान मोठा समजतो आणि काम अर्ध्यात सोडून देतो तो मूर्ख असतो.   

अपमानं पुरस्कृत्य मानं कृत्वा तु पृष्ठतः ।

स्वार्थमभ्युद्धरेत्प्राज्ञः स्वार्थभ्रंशो हि मूर्खता ।। 232

मिरवी अपमानाही । मान ठेवेच मागुती

कार्य तडीस ने प्राज्ञ । सोडे अर्ध्यात मूर्खची ।। 232

कित्येक वेळेला शत्रूचं इतकं कौतुक करायला लागतं की त्याला डोक्यावर बसवायलाच बाकी असतं. डोक्यावर चढवलेल्या शत्रूशी गोड बोलत, नम्रपणे वागत सुयोग्य वेळेची वाट बघत रहावी लागते. आणि योग्य वेळ येताच डोक्यावरचा मातीचा घडा  खालच्या दगडावर आपटून फोडून टाकावा त्याप्रमाणे शत्रूचा नायनाट करायलाही मागेपुढे बघू नये. त्याचा समूळ नाश करावा. कृष्णसर्प खूप काळ बेडकांना आपल्या अंगाअंद्यावर वाहून नेत  होता. तो त्यांचं वाहनच झाला होता. पण यथावकाश त्याने त्या जलाशयातील  सर्व बेडूक खाउन टाकले. त्यांचा फन्ना उडवला.

 

स्कन्धेनाऽपि वहेच्छत्रु कालमासाद्य बुद्धिमान् 

वहता कृष्णसर्पेण मण्डूका विनिपातिताः’’ ।। 233

न्यावे वाहून शत्रूसी । प्रेमे खांद्यावरूनही

यथा योग्य सुवेळेला । दावावा स्वर्ग त्यासची ।।

काळसर्प जसा झाला । जरी वाहन बेडकां

साधून योग्य वेळेसी । गेला फस्त करून त्यां ।। 233

---------------------------------------

  आजवरीच मौजेने । गेलो ज्या वाहनातुनी

हत्ती घोडे रथातूनी । नौका वा  अन्य वाहनी ।।

त्या सर्व वाहनांमध्ये । सर एका नसे अशी


 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती