2 शशकगजयूथप- कथा

 

2 शशकगजयूथप- कथा

             एका वनात हत्तींचा एक मोठा कळप राहात होता. चतुर्दन्त नावाचा  विशाल देहाचा, महाकाय हत्ती त्या कळपाचा प्रमुख  होता. एकदा त्या प्रदेशात फार मोठा दुष्काळ पडला.  बरेच वर्ष पाऊस न पडण्यामुळे तेथील सरोवरे, तलाव, सारेच जलस्त्रोत आटले.

             एकदिवस सारे हत्ती त्या गजप्रमुख चतुर्दन्ताकडे आले  आणि म्हणू लागले,  ``महाराज! पाणी पाणी करत अनेक गजबाळे मरणासन्न झाली आहेत. अनेक मृत्युमुखीही पडली. आता एखादा जलाशय शोधणे आपल्याला भाग आहे. त्यानेच  मरणाच्या मार्गावर असलेली  आपली ही छोटी छोटी पिल्ले वाचतील.

              बराचवेळ विचार करून चतुर्दन्त म्हणाला, माझ्या माहितीप्रमाणे  एका निर्जन जागी असा जलाशय आहे. तेथील जमीनही उंचसखल नसून तो संपूर्ण प्रदेश सपाट आहे. पाताळ गंगेच्या  जिवंत झर्‍यांमुळे तो जलाशय सतत काठोकाठ भरलेला असतो. मला वाटतं आपण तिकडे जाणे उचित होईल.

              आपल्या कळप-प्रमुखाच्या आज्ञेनुसार सार्‍या हत्तींनी लगेचच त्या जलाशयाकडे प्रस्थान केले. तब्बल पाच रात्री पाच दिवस  अथक चालत राहिल्यानंतर तो सर्व कळप त्या जलाशयापाशी येऊन पोचला. ते सुंदर, विस्तीर्ण सरोवर पाहून थकले भागलेले सारे हत्ती अत्यंत आनंदित होऊन सरोवरात शिरून  आनंदाने मस्त मजेत पाण्यात खेळू लागले. संध्याकाळपर्यंत मनसोक्त पाण्यात खेळून थकवा जाऊन तरतरीत झालेले सारे हत्ती हळु हळु पाण्याबाहेर यायला सुरवात झाली. त्या सरोवराभोवती अतिशय भुसभुशीत जमीन होती  आणि त्यात असंख्य सशांची बिळे होती. हत्ती त्या मातीत एकमेकांशी खेळत  सरोवराभोवती मनमुराद  फिरत बागडत असतांना त्यांच्या  नुसत्या पदाघातांनीच अनेक बिळं पार चिरडून तुटुन फुटुन गेली. हत्तीच्या पायाखाली अनेक ससे चिरडले गेले. त्या प्रलयकारी संकटामधे काही सशांचे हात,पाय तुटले तर काहींच्या माना मोडल्या.  अनेक ससे बेघर झाले. अनेक रक्ताच्या थारोळ्यात मरून पडले होते. ज्यांची लहान लहान पिल्ले चिरडली जाऊन मरण पावली त्यांच्या डोळ्यातून झरणार्‍या पाण्याला खळ नव्हता. जे थोडे फार ससे वाचले होते ते एकत्र येऊन बोलू लागले, तेव्हा एक ससा म्हणाला, ``आपल्यावर तर ही महा आपत्तीच कोसळली आहे. आपण आता संपल्यातच जमा झालो आहोत. एकतर बाकी सगळ्या तळ्यांचे आणि जलस्त्रोतांचे पाणी आटून ते कोरडे ठणठणीत पडले आहेत. ह्याच एका तळ्यात पाणी शिल्लक आहे. आता हे हत्ती रोज ह्या तळ्यावर यायला लागतील आणि आम्ही वर्षानुवर्ष राहात असलेलं हे आमचं निवासस्थान बेचिराख करतील.  आमचा विनाश आणि विनाशच आता नक्की आहे. हे हत्ती इतके ताकदवान आहेत की त्यांच्या खेळाखेळातल्या स्पर्शानेही जीव जाईल. बलशाली लोक तुमचा कसा जीव घेतील हे सांगता येत नाही. महा भयंकर विषारी सर्पाच्या नुसत्या फुत्कारानेच प्राणी  मरतो. तर पाताळयंत्री राजा आपल्या मिठ्ठास गोड वाणीने वर वर हासून आपुलकी दाखवून त्याच्या समोरच्याच्या मनात विश्वास उत्पन्न करून कसा काटा काढेल हे सांगवत नाही. तर दुष्ट पाताळयंत्री माणसे आदर,सत्कार  वा मोठा सन्मान करून आपल्या मार्गात येणार्‍याचा काटा काढतात.’’

स्पृशन्नपि गजो हन्ति जिघ्रन्नपि भुजङ्गमः ।

हसन्नपि नृपो हन्ति मानयन्नपि दुर्जनः ।। 81

स्पर्शाने नुसत्या मारी । हत्ती तो सहजी अती

 उच्छ्वासानेच दे मृत्यू । भुजंग अति निर्दयी ।। 81.1

हासता हासता घेई । सहजी प्राण भूपती

देऊन मान मोठा तो । उठे नीच जिवावरी ।। 81.2

 

``आपल्याला आपल्या बचावाचा आणि ह्या प्राणसंकटातून निभावून नेईल असा काहीतरी उपाय शोधला पाहिजे. आपल्याला आपली ही आवडती जागा सोडून द्यायला पाहिजे.

            श्री. मनुमहाराजांचा आणि भगवान व्यासांचा  उपदेश हेच सांगतो. की, ज्यात सर्वांचेच प्राण जाऊ शकतील असा मोठाच संकटप्रसंग जर कुटुंबावर ओढवला तर अशा वेळेला कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा त्याग करून जर बाकी परिवार वाचणार असेल तर एका व्यकतीचा त्याग करणेच उचित आहे. गावावर गुदरलेल्या प्राणसंकटातून सुटका होण्यासाठी गावातील एखाद्या परिवाराचा त्याग करावा लागला, बळी गेला  तर ते क्षम्य आहे. संपूर्ण देशासाठी एखाद्या गावाला दुःख सहन करावे लागले वा त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलायला लागले तर सर्व देशाच्या हिताचा विचार करता तेही योग्यच आहे. आणि जेव्हा मला माझा उद्धार व्हावा, माझे कल्याण व्हावे असे वाटत असते तेंव्हा मला पृथ्वीवरील सर्व सुखांचा, सर्वांचा त्याग करायला लागला तर मी तो केला पाहिजे. ‘’

त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।

ग्रामं जनपदस्यार्थे  आत्मार्थे पृथिवीं त्यजेत् ।। 82

करावा त्याग एकाचा । हितासाठी कुलाचिया

कुलाचा त्याग सोसावा । गावाचे हित साधण्या ।। 82.1

राज्यासाठीच गावाचा । त्याग तो करणे बरा

उद्धार आपुला होण्या । त्यागावी ही वसुंधरा ।।82.2

 

``आपण राहात असलेली भूमी कितीही सुपीक असली, गायी गुरांनी समृद्ध असली, ऐश्वर्यसम्पन्न असली तरी जोवर आपला जीव आहे तोवरच ह्या सगळ्याला अर्थ आहे. जर सर्वांच्या जीवालाच धोका असेल तर ती भूमी सोडणेच बरे.

क्षेम्यां सस्यप्रदां नित्यं पशुवृद्धिकरीमपि

परित्यजेन्नृपो भूमिमात्मार्थमविचारयन् ।। 83

उपकार जिचे भारी । पिकांनी डोलते अशी

पोषी गायी गुरांसी जी । वंशवृद्धी सदा करी ।। 83.1

राजा संकट काळी ती । भूमीही त्यागणे बरी

नको विचार थोडाही । जीव सर्वोपरी धरी ।। 83.2

              ``कधी अचानक कुठले व कसे संकट येईल हे सांगता येत नाही. अशा अज्ञात संकटकाळासाठी माणसाने सम्पत्ती, धन साठवून ठेवावे. महाभयानक संकटकाळी सम्पती वाचवावी का मुलेबाळे पत्नीला वाचवावे असा कठोर निर्णय घ्ययला लागलाच तर प्राथमिकता मुलेबाळे आणि पत्नीला देऊन आधी त्यांचे रक्षण करावे. कारण सम्पत्ती नंतर मिळवता येते. पण जेंव्हा आपण का सम्पत्ती, आपण का परिवार असा महा कठीण प्रसंग उद्भवतो अशावेळी मात्र स्वतःचा जीव वाचवावा. कारण तुमच्यावर अवलंबून असलेल्यांचा जीव वाचवून तुम्ही मरण पावला तर तुमच्या पश्चात अत्यंत हाल होऊन त्यांचाही जीव जाण्याचीच भीती असते. अशावेळेला किमान स्वतःचा तरी बचाव करावा. राजाचा जीव तर लाख मोलाचा असतो. त्याच्यावर संपूर्ण प्रजेचे असणे वा नसणे कल्याण वा वाताहात अवलंबून असते. त्यामुळे लाख मेले तरी लाखांचा पोशिंदा मरता कामा नये हे राजाने ध्यानात ठेवावे.

आपदार्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेद्धनैरपि ।

आत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि ।। 84

येणार्‍या संकटासाठी । संपत्ती रक्षिणे तुम्ही

सम्पत्तीहून पत्नीसी । जपावे नित्य संकटी ।। 84.1

परी बिकट काळी त्या । पत्नी सम्पत्ति ह्याहुनी

रक्षावे आपुल्या जीवा । मोठ्या प्राणभयातुनी।। 84.2

तेंव्हा दुसरा ससा म्हणाला, ते सर्व ठीक आहे पण आपली  वडिलोपार्जित,  आपल्या बापजाद्यांची, आपल्या मालकी हक्कची जमीन अशी सहजासहजी सोडून देणं आपल्याला शक्य नाही. ह्या हत्तींनाच घाबरविण्याचा काही उपाय केला पाहिजे. ते जर घाबरले तर  भीतीने परत येथे पाऊलही टाकणार नाहीत अशी काहीतरी शक्कल लढवायला लागेल.

          म्हटलच आहे की साप विषारी असो वा नसो पण  त्याने वारंवार शक्य असेल तेवढा मोठा फणा काढून फुत्कार सोडून सर्वांना भय दाखवलच पाहिजे. त्यानेच सारे त्याला घाबरून राहतात. त्याच्या वाट्याला जात नाहीत वा त्याच्यावर हल्ला करत नाहीत.

निर्विषेणाऽपि सर्पेण कर्तव्या महती फणा ।

विषं भवतु मा वाऽस्तु फटाटोपो भयङ्करः ।। 85

असो विष नसो वा ते । भीतीदायक तो फणा

पुन्हा पुन्हाचि काढोनी । फुत्कार सोडणे महा ।। 85.1

कृतीनेच अशा राही । सर्पाचा धाक तो जनी

धजावतोच ना कोणी ।  खोडी काढावया कधी ।। 85.2

म्हणून आपल्याला काही ना काहीतरी उपाय शोधायलाच लागेल. त्याचे बोलणे ऐकल्यावर बाकी काही ससे म्हणाले, तू म्हणतोस त्याप्रमाणे  त्यांना  धास्ती निर्माण होईल असा एक उपाय आहे. पण त्यासाठी एका हुशार आणि चतुर दूताची आवश्यकता आहे. त्याच्या वक्तृत्व कौशल्यावर आणि हजरजबाबीपणावरच आपले यशापयश अवलंबून असेल. त्यासाठी आपला विजयदत्त नावाचा राजा प्रत्यक्ष चंद्रम्यावर राहतो अशी बढाई मारून प्रत्यक्ष चंद्रराजांतर्फे खोटाच दूत  त्या गजराजाकडे पाठवावा लागेल. तो दूत `` स्वतः चंद्रमहाराजांनी तुम्हाला हया तळ्याचा वापर करायला मज्जाव केला आहे; कारण हे तळे साक्षात चंद्रमहाराजांचे असून चंद्रमहाराज आणि त्यांच्या परिवाराचे सदस्य ह्या तळ्यात येऊन राहतात.’’ असा संदेश देईल. त्याच्या सांगण्यावर विश्वास बसला तर संभव आहे की हे सारे हत्ती येथून काढता पाय घेतील.

 दुसरा म्हणाला, ``असं जर असेल तर आपल्याकडे लंबकर्ण नावा एक हुशार ससा आहे. तो बोलण्यातही चतुर आहे आणि दूत म्हणूनही अत्यंत मुत्सदी आहे. जसा दूत पाहिजे तसा तो आहे. दूत कसा असावा ते सांगितलंच आहे.

साकारो निस्पृहो वाग्मी नाना शास्त्रविचक्षणः ।

 परचित्तवगन्ता च राज्ञो दूतः स इष्यते ।। 86

 

( विचक्षण स्पष्टदर्शी, दूरदर्शी, सावधान, बुद्धिमान, चतुर, विद्वान. शास्त्रविचक्षणशास्त्रांमध्ये पारंगत. परचित्तवगन्ता (परचित्त + अवगन्ता) – मनकवडा, दुसर्‍याच्या मनातील जाणणारा  )

 

निष्ठावंतचि निर्लोभी । फर्डा वक्ताचि देखणा

सावधान सदा राहे । स्पष्टदर्शी असे सदा ।। 86.1

नाना विषय शास्त्रातें । पारंगत असे महा  

 चित्त जाणी दुजाचे जो । राजदूत असा हवा ।। 86.2

राजाचा दूत म्हणून नेमण्यात येणारा अधिकारी हा दिसण्यास उमदा असवा. त्याची छाप दुसर्‍या राज्याच्या राजावर, अधिकार्‍यांवर आणि लोकांवर पडली पाहिजे. तो अत्यंत विश्वासू, निस्पृह पाहिजे. अनेक शास्त्रांचा तो ज्ञाता असावा. हजरजबाबी वक्ता हवा आणि आपल्या बाजूने निर्णय करवून घेणारा मुत्सदीही हवा. विलक्षण बुद्धिमत्ता असलेला हवा. त वरून ताकभात ओळखणारा हवा. दुसर्‍यांच्या मनात काय चाललं आहे हे ओळखणारा मनकवडा हवा.

           दुसरं असं की, एखाद्या राजाने असा गुणी दूत न नेमता एखादा त्या विषयाची जाण नसलेला माणूस नेमला; तो जर आपला स्वार्थ साधण्यासाठीच त्या पदाचा वापर करणारा भ्रष्टाचारी असेल, स्वतःच्या फायद्यासाठी काहीही तोडगा मान्य करणारा असेल, वाटेल तशी आपणच केलेली विधाने फिरवून सर्वांचीच दिशाभूल करणारा खोटारडा असेल तर अशा व्यक्तीमुळे कुठलेच काम तडीस जात नाही.

यो मूर्ख लौल्यसम्पन्नं राजा दूतं समाचरेत् ।

मिथ्यावादं विशेषेण तस्य कार्यं न सिध्यति ।। 87

 

जाण ना विषयाची ज्या । हाव, लोभ मनी असे

झगारूनचि सत्यासी । फिरवे शब्द आपुले ।। 87.1

धरसोडपणा ऐसा । सत्यता न कृतीमधे

दूत ना उपयोगाचा । बिघडे कार्य त्यामुळे ।। 87.2

म्हणून हा सगळा विचार करता लंबकर्णाला लवकरात लवकर शोधून तातडीने गजप्रमुखाकडे  दूत म्हणून पाठविले पाहिजे. त्यामुळेच कदाचित ह्या भीषण संकटातून आपली सुटका होईल.

बाकीही ससे म्हणाले, आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी हाच एक उपाय दिसतो. ह्याच्याहून अधिक योग्य उपाय मिळणं कठीण आहे.

 शेवटी लंबकर्णाला दूत बनवून पाठविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आणि त्याप्रमाणे तो तेथे गेलाही. गजप्रमुखाच्या निकट पण जरा उंचावर असलेल्या एका  जागेवर जाऊन तो मोठ्या आत्मविश्वासाने त्या गजराजाला उद्देशून म्हणाला,  ``अरे दुष्ट गजा! कुठल्याही प्रकारे हा तलाव कोणाचा आहे नाही ह्याचा विचारही न करता तुम्ही ह्या चंद्रमहाराजांच्या जलाशयात कसे काय येता? परत येथे येण्याचे दुःसाहस करू नका. आत्ताच्या आत्ता येथून निघून जा.’’

त्या छोट्याशा सशाच्या इतक्या तडफदार वक्तव्याने आश्चर्यचकित झालेल्या त्या गजराजाने विचारले - `` तू कोण आहेस?’’

त्यावर तो ससा म्हणाला, ``मी लंबकर्ण नावाचा ससा आहे. मी चंद्रमंडलात राहतो. ह्या वेळेला महाराज चंद्रांनी मला येथे पाठवलं आहे. मी त्यांचा दूत आहे. तुला माहितच आहे की, जो वास्तविकतेला धरून असलेले सत्य भाषण करतो त्या दूताला अपराधी मानत नाहीत. कारण राजदूत राजाच्या वतीने बोलत असल्याने ते राजाचे जणु मुखच असतात.

इतकच नाही तर एखाद्या दूताने शस्त्र उपसले किंवा दरबारातील कोणाला मारले अथवा त्याने अत्यंत कडक भाषेत तंबी जरी दिली, त्याचं भाषण ऐकणार्‍याला कितीही झोंबलं तरी राजाने दूताचा वध करणे हे शास्त्रनियमांच्या विरुद्ध आहे. 

उद्यतेष्वपि शस्त्रेषु बन्धुवर्गेवधेष्वपि ।

परुषाण्यपि जल्पन्तो वध्या दूता न भूभुजा ।। 88

 

काढिले शस्त्र दूताने ।  वधिले बांधवा जरी

बोलला झोंबरी भाषा । अवध्य दूत तो तरी ।। 88

``त्यावर तो गजराज म्हणाला, अरे बाबा, लंबकर्णा, चंद्रमहाराजांचा संदेश तर सांगशील काय आहे तो! म्हणजे आम्हाला त्या संदेशाचे विनाविलंब पालन तरी करता येईल.’’

लंबकर्ण म्हणाला, `` काल तुम्ही झुंडीनी येथे आला आणि  अनेक सशांना निर्दयपणे पायदळी तुडवून त्यांचा वध केला. तुम्हाला माहित नाही काय की येथे माझा परिवार राहतो? जर तुम्हाला जिवंत रहायचं असेल तर कुठल्याही कारणाने ह्या तळ्याच्या बाजूलासुद्धा फिरकायचा प्रयत्न करू नका. हाच भगवान चंद्रमा यांचा तुम्हाला आदेश आहे.’’

गजपतीने विचारले, ``तुमचे चंद्रमहाराज कोठे आहेत?’’

ससा म्हणाला,  ``तुम्ही झुंडीने येऊन चंद्रमहाराजांच्या परिवारातील अनेक सशांना तुडवले. ठार मारले. त्यामुळे उरल्यासुरल्या सशांचे सांत्वन करून त्यांना खंबीर पाठिंबा देण्यासाठी ते स्वतःच ह्या जलाशयात येउन थांबले आहेत. त्यांनी मला त्यांचा दूत म्हणून तुमच्याकडे पाठवले आहे.’’

गजपती म्हणाला, ``जर असं असेल तर मलाही चंद्रमहाराजांच दर्शन घडव. त्यांचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार करून आम्ही दुसरीकडे निघून जाऊ.’’

ससा म्हणाला, ``ठीक आहे. आपण एकटेच माझ्यासोबत यावे. मी आपल्याला चंद्रमहाराजांचे दर्शन करवतो.’’

तो ह्त्तीप्रमुख तयार झाल्यावर ससा रात्रीच्यावेळेस त्या गजपतीला तळ्याच्याकाठी घेऊन गेला. शांत जलाशयात चमकणार्‍या चंद्राच्या प्रिबिंबाकडे निर्देश करून म्हणाला, हेच आमचे चंद्रमहाराज आहेत. ह्यावेळेला ते जलाशयात साधिस्थ बसले आहेत. तरी अत्यंत शांतता पाळून, त्यांची समाधी भंग पावणार नाही ह्याची काळजी घेऊन, कहीही न बोलता, न विचारता अथवा ते काही बोलतील ह्याची वाट न बघता त्यांना प्रणाम करून लगेचच येथून निघून जावे. चंद्र महाराजांची समाधी भंग पावली तर ते अत्यंत क्रुद्ध होतील.’’

 सशाच्या बोलण्यावर विश्वास बसून मनातून भयभीत झालेल्या गजपतीने चंद्रमहाराजांचे दूरूनच दर्शन घेतले. आणि परत कधीही चंद्रमहाराजांच्या सरोवरात येऊन त्यांना त्रास द्यायचा नाही असे ठरवून तो आपल्या कळपासहीत दुसरीकडे निघून गेला.

ही कथा सांगून झाल्यावर कावळा म्हणाला,- ``म्हणून मी म्हणतो की कधी कधी मोठ्या लोकांच्या नावाचा नुसता उल्लेखही पुरतो. त्यांच्याबरोबर आपले जवळचे संबंध आहेत ही गोष्टही तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकते. आणि अजून एक गोष्ट सांगतो की जो माणूस आपल्या सुरक्षित राहण्याची इच्छा करतो, ज्याला आपले प्राण प्रिय असतात त्याने नीच, आळशी, पाठीत सुरा खपसणार्‍या कृतघ्न, तोंडावर गोड बोलून पाठीमागे निंदा करणार्‍या वा दुष्ट कारवाया करणार्‍या व्यक्तीला कधीही राजा बनवू नये. पूर्वी अशा नीच तीक्ष्णदंत बोक्याला आपला राजा मानून त्याच्याकडे न्याय मागायला गेलेल्या  शीघ्रगती नावाच्या सशाला आणि कपिंजल नावाच्या चिमण्याला त्या बोक्याने कधीच फस्त केले 

 

क्षुद्रं अर्थपतिं प्राप्य न्यायाऽन्वेषणतत्परौ ।

उभावपि क्षयं प्राप्तौ पुरा शशकपिञ्जलौ ।। 89

 

भूपती कपटी मोठा । नानाच अंतरी कळा

दाखवे फार जिव्हाळा । न्याय देण्या उतावळा ।। 89.1

जाणावाच तिथे धोका । जीवितासचि आपुल्या

ससा नि चिमणा जैसे । बोक्याने मारले पहा ।। 89.2

----------------------------------------------------------

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -