8 कपोत-लुब्धक कथा (कबूतर आणि फासेपारधी ह्यांची गोष्ट)

 

 

 8 कपोत-लुब्धक कथा

कबूतर आणि फासेपारधी ह्यांची गोष्ट

 

( मित्रांनो,

ही हृदयद्रावक कथा सांगण्यापूर्वी मला हे सांगावेसे वाटते की  कथा कोण सांगत आहे, कोणाला सांगत आहे, कुठल्या प्रसंगाच्या निमित्ताने सांगत आहे ह्याचा सर्वांगीण विचार करून मगच ही कथा वाचावी. एकतर राजाला सल्ला देणारे अनेकजण असतात. उलट, सुलट, चांगला, वाईट, मनात संदेह निर्माण करणारे, मनाला पाझर फोडणारे, अनेकोअनेक सल्ल्यांमधून राजाला नेमका योग्य सल्ला निवडता यायला पाहिजे. रक्ताक्षानी शत्रूच्या मंत्र्याला ताबडतोब मारून टाकायला सांगितलं. पण काहींना मात्र त्याची नको इतकी दया आली. तो काळही असाच होता जेव्हा अहिंसा इतकी बोकाळली होती की अनेक राजे स्वतः मेले, त्यांचे सैन्य, वंश, राज्य, प्रजा सर्व लयाला गेले तरी त्यांच्या माथी चढलेले अहिंसेचे भूत उतरले नाही.

मरण आले तरी चालेल पण अतिथी विन्मुख जाता कामा नये अशा अतिथी सत्काराच्या लादल्या गेलेल्या पुराणगोष्टींनी आपण तसे वागलो नाही तर आपण नरकात जाऊ ह्या भयाने अनेकजण पछाडले होते. मग तो अतिथी खरोखरचा भला माणूस आहे का क्रूर परकीय आहे असा विचार करण्याचेही लोकांचे  भान सुटले. न पाहिलेला स्वर्ग, न पाहिलेली प्रतिष्ठाच फार मोठी झाली. आणि लोक जीव गमावून बसले.

असा उपदेश भले कितीही मनास चाटून जाणारा वाटला तरी तो राज्याला कधीच हितकर नाही हे लक्षात घेऊनच ही गोष्ट वाचली पाहिजे.

पंचतंत्र लिहीणार्‍या विष्णुगुप्ताचेही हे मत नाही. पण गोष्ट म्हटली की त्यात योग्य अयोग्य पात्र आलीच. अयोग्य, अहितकारक पात्र समर्थपणे उभं  राहिलं तरच गोष्टीला खरेपणा प्राप्त होतो. त्यासाठी खलनायकाचे बारकावे सूक्ष्मपणे हेरून ते तसे गोष्टीत संवादाच्या रूपाने उभे करायला समर्थ लेखकच लागतो. राजाला मनापासून सल्ला दिला तरी तो मंत्री जर भलत्याच विचारांच्या आहारी गेला आहे, हा सल्ला योग्य नाही हा सारासारविचारही त्याच्या पासून दूर गेला आहे हे ओळखून

राजाला मोठ्या तटस्थपणे सर्व सल्ले ऐकता आले पाहिजेत. त्यातून सल्लागारांची योग्य पारखही होत असते. क्रूराक्षाचा सल्ला त्यावेळच्या अहिंसा परमो धर्मः ह्या डोक्यात घुसवलेल्या उक्तिनुसारच आहे.  )

एका वनामधे रोज एक पारधी येत असे. तो काळा कभिन्न पारधी, फास, जाळं, पिंजरा अशी प्राणी व पक्षी पकडण्याची सर्व साधने घेऊन वनात हिंडायला लागला की यमराजाचा जणु दुसरा अवतारच वाटे. त्याला दया माया जणू माहितच नव्हती. सारेच पशुपक्षी त्याला घाबरून असत. अत्यंत क्रूरपणे त्याला दिसेल त्या प्राण्यापक्ष्याला तो आापल्या जाळ्यात पकडत असे वा अत्यंत चलाखीने फास लावून पकडत असे. वा त्याच्या सोट्याने झोडपून मारत असे. फासात अडकलेल्या वा सोट्याने झोडपलेल्या प्राण्याला वा पक्ष्याला तो खाण्यासाठी घरी घेऊन जात असे.

कश्चित्क्षुद्रसमाचारः प्राणिनां कालसन्निभः ।

विचचार महाऽरण्ये घोरः शकुनिलुब्धकः ।। 133

एका वनामधे कोणी । होता हिंडत पारधी

जणू काळचि पक्ष्यांचा । आला पकडण्या वनी ।।

घातकी पातकी तोची । होता निर्दय अंतरी

व्यवसाय करे निंद्य । पोटासाठीच दुर्मती ।। 133

पोटासाठी असं निंद्य, वाईट काम करणार्‍या त्या पारध्याचा क्रूरपणा न पटण्यामुळे त्याच्यावर नाराज असणार्‍या सार्‍या नातेवाईकांनी, बंधूबांधवांनी, इष्टमित्रांनी त्याला सोडून दिलं होतं. आणि त्याच्यासोबत कुठलाही संबंध ठेवायला नकार दिला होता. ना त्याला कोणी नातेवाईक होते, ना मित्र होते ना सगेसोयरे! सर्वांनी त्याच्या बरोबरचे संबंध तोडून टाकले होते.

नैव कश्चित्सुहृत्तस्य न सम्बधी न बान्धवः ।

 स तैः सर्वैः परित्यक्तस्तेन रौद्रेण कर्मणा ।। 134

आप्त बांधव ना त्याला । ना होती मित्रमंडळी

त्यागिले क्रूरकर्म्यासी । सोयर्‍या धायर्‍यांनिही/

सोयर्‍या धायर्‍यांनी त्या । सोडिले पापबुद्धिसी ।। 134

सतत क्रूर काम करणारा, प्राण्यांचे प्राण घेणारा कोणी माणूस सर्वांना जणु विषारी सापा प्रमाणे भीतीदायक, नकोसा वाटायला लागतो.

ते नृशंसा दुरात्मानः प्राणिनां प्राणनाशकाः ।

उद्वेजनीया भूतानां व्याला इव भवन्ति ते ।। 135

हत्यारा प्राणिमात्रांचा । महाउपद्रवी कुणी

पाहुनी ज्यास प्राणीही । भयव्याकुळ अंतरी ।। 135.1

हिंसा करीच प्राण्याची । क्रूर भीषण निर्दयी

वाटे हिंस्र पशू तोची । काळसर्प भयंकरी ।। 135.2

रोज त्याचा एकच कार्यक्रम असायचा. रोज सकाळ झाली की तो नेमानी सोटा, जाळं, पिंजरा, निरनिराळ्या प्रकारचे फास अशी सर्व प्राणी वा पक्षी पकण्याची साधने घेऊन घेऊन रानाच्या दिशेने निघे.

स पञ्जरकमादाय पाशञ्च लगुडं तथा ।

नित्यमेन वनं याति सर्वप्राणिविहिंसकः ।। 136

सामग्री सापळा, सोटा, । पिंजरा, पाश घेऊनी

नेमने येतसे तोची । फासेपारधि त्या वनी ।। 136

एके दिवशी शिकारीच्या शोधात हिंडता हिंडता त्याला एका फांदीवर बसलेली एक कबुतरी/कपोती दिसली. एका क्षणात झडप घालून त्याने ती कबुतरी हस्तगत केली आणि जवळ असलेल्या पिंजर्‍यात अत्यंत निर्दयपणे टाकून दिली.

अन्येद्युर्भ्रमतस्तस्य वने कापि कपोतिका ।

जाता हस्तगता तां स प्राक्षिपत्पञ्जरान्तरे ।। 137

हिंडता एकदा रानी । क्षणी झडप घालूनी

कपोती पकडे वेगे । ठेवे कोंडून पिंजरी ।। 137

त्यादिवशी तो अजूनही जंगलात हिंडतच असतांना अचानक सर्व दिशा  भरून आल्या. सगळीकडे काळोख दाटून आला. मोठ्याने मेघगर्जना होऊ लागल्या. वीजा चमकू लागल्या आणि काही क्षणातच सोसाट्याच्या वार्‍यासह धुवाँधार पावसाला सुरवात झाली. मुसळधार पाऊस पडू लागला. जंगलांत सगळीकडे पाण्याचे लोंढे वाहू लागले. जणु काही प्रलय होतो की काय अशी महा पूरपरिस्थिती निर्माण झाली.

अथ कृष्णा दिशः सर्वा वनस्थस्याऽभवन् घनैः ।

वातवृष्टिश्च महती क्षयकाल इवाभवत् ।। 138

अजुनी तो असे रानी । तो ये काळोख दाटुनी

धुवाँधार सुरू झाला । मोठा पाऊस त्या वनी ।।138.1

झंझावातचि वार्‍याचा । वृक्षराजीस झोडपी

प्रलय पातला वाटे । भीती दाटेच अंतरी ।। 138.2

त्या पावसात कशीबशी वाट काढत तो एका झाडाच्या खाली जरा सुरक्षित वाटून उभा राहिला. पण आधीच तो पावसाने भिजला होता. थंडगार बोचर्‍या वार्‍याने कुडकुडतही होता. भुकेने कासावीसही झाला होता. अंगातले त्राण गेले होते.

ततः स त्रस्तहृदयः कम्पमानो मुहुर्मुहुः ।

अन्वेषयन्परित्राणमाससाद वनस्पतिम् ।। 139

शोधीत आसरा तोची । थांबे वृक्षातळी जरा

भिजून पावसाने तो । कापे थरथरा कसा ।। 139

बर्‍याच काळानंतर पाऊस थोडा कमी झाला. आकाश मोकळे होऊन आता तारे चमकतांना दिसू लागले. रात्र झाल्याने तो घरी जाऊ शकत नव्हता. शेवटी थंडीने कुडकुडत तो बोलू लागला, ``अरे ह्या झाडावर कोणी राहते का? त्याला मी शरण आलो आहे. थंडी, वारा, पावसाने अगदीच हतबल झालो आहे. भूकेने कासावीस झालो आहे. कोणी ह्या थंडीपासून माझं रक्षण करेल का? मला दोन घास का होईना अन्न देईल का? ह्या थंडीनी आणि भुकेनी माझी शुद्ध हरपेल की काय असं मला वाटायला लागलं आहे.

मुहूर्त पश्यते यावद् वियद्विमलतारकम् ।

प्राप्य वृक्षं वदत्येवं योऽत्र तिष्ठति कञ्चन ।। 140

काही काळ पडोनी तो । पाऊस थांबला पुरा

आकाश स्वच्छ होऊनी । दिसू लागति तारका ।। 140.1

रात्र झालीच पाहूनी । वृक्षाखाली भुकेजला

व्याकूळ होउनी बोले । पारधी तो असे तदा ।। 140.2

 

तस्याहं शरणं प्राप्तः सपरित्रातु मामिति ।

शीतेन भिद्यमानं च क्षुधया गतचेतसम् ।। 141

“अरे वृक्षावरी ह्याची । असे राहत का कुणी?

 आलो शरण त्याला मी । थंडीने कापतो अती ।। 141.1

कासावीसचि झालो मी । भुकेनेचि असह्य या

करावे रक्षणा माझ्या । हे वृक्षस्थित बांधवा” ।। 141.2

नेमकं त्याच झाडावर पकडलेल्या कबुतरीचा प्रियकर असलेलं ते कबुतर बसलं होतं. ह्या मुसळधार पावसात त्याच्या पत्नीची आाणि त्याची ताटातूट झाल्यामुळे ते अत्यंत दुःखी अंतःकरणाने आपल्या प्रियेची वाट बघत होतं. पत्नी विरहानी गलबलून जाऊन ते विचार करू लागलं, ``माझी प्रिया ह्या मुसळधार पावसात आणि सोसाट्याच्या वार्‍यात कुठे पडली असेल? नाहीतर अजूनपर्यंत ती येणार नाही असे होणार नाही. तिच्याशिवाय हे घर उजाड वैराण होऊन गेलं आहे. तिच्याशिवाय मी कसा जिवंत राहू?

 

अथ तस्य तरोः स्कन्धे कपोतः सुचिरोषितः ।

भार्याविरहितस्तिष्ठन् विललाप सुदुःखितः ।। 142

 त्याच झाडावरी होता । दुःखी कपोत बैसला

पत्नी विरह दुःखाने । त्याचा दाटून ये गळा ।। 142

 

वातवर्षो महानासीन्न चागच्छति मे प्रिया ।

तया विरहितं ह्येतच्छून्यमद्य गृहं मम ।। 143

“कुठे गेली प्रिया माझी । असेल पडली कुठे

झंझावातात ह्या गेली । ना आली फिरुनी इथे ।। 143.1

तिच्याविना कसा राहू । वैराण घर जाहले”

तिच्या आठवणीने तो । विलाप सारखा करे ।। 143.2

ज्याची पत्नी पतिव्रता असते, सतत पतीच्या हिताची काळजी करणारी असते, जिला पती प्राणप्रिय वाटतो आणि पतीलाही ती प्राणाहून प्रिय असते अशी पत्नी ज्याच्या नशिबी असते तो पुरूष खरा नशीबवान असतो.

पतिव्रता पतिप्राणा पत्युः प्रियहिते रता ।

यस्य स्यादीदृशी भार्या धन्यः स पुरुषो भुवि ।। 144

 “पतिव्रता असे पत्नी । प्राणासम पतीस त्या

जपे पति हितासी ती । ऐसा पुरुष धन्य हा ।। 144

 

घराला घरपण देणारी ती पत्नीच असते. नुसत्या घराच्या भिंतींना घर नाही म्हणता येणार. गृहिणीविना हे घर म्हणजे गहन, घनदाट, भीतीदायक अरण्यच आहे.

न गृहं गृहमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते ।

गृहं हि गृहिणीहीनमरण्यसदृशं मतम् ।। 145 

घरा न घर मानावे । गृहिणीच असे घर

उरे रानचि ओसाड । गृहिणीहीन ते घर” ।। 145   

आपल्या प्रियकराचा तो शोक, विलाप करतानाही त्याच्या मुखातून सहजगत्या आलेली आपली स्तुती ऐकून त्या पिंजर्‍यात अडकलेल्या त्या कबुतरीचे हृदय भरून आले. आपली मनापासून केलेली ती स्तुती ऐकून त्या दुःखातही ती अत्यंत समाधान पावली. आणि म्हणू लागली, ``खरच जी स्त्री आपल्या वर्तनाने पतीला कायम दुःखी करते ती स्त्रीच नव्हे. पती संतुष्ट असेल तर सार्‍या देवता संतुष्ट असतात. पती हाच स्त्रीचे आराध्य दैवत आहे. जर पती असमाधानी, कावलेला राहिला तर सार्‍या घराची शांती नष्ट होते.’’

पञ्जरस्था ततः श्रुत्वा भर्तुर्दुःखान्वितं वचः ।

कपोतिका सुसन्तुष्टा वाक्यञ्चेदमथाह सा ।। 146

विलाप करणार्‍या त्या । कपोताकडुनी स्तुती

ऐकताच कपोती ती । झाली संतुष्ट मानसी ।।

 

``न सा स्त्रीत्यभिमन्तव्या यस्या भर्ता न तुष्यति

तुष्टे भर्तरि नारीणां तुष्टाः स्युः सर्वदेवताः ।। 147

म्हणे पतीस ना ठेवी । पत्नी संतुष्ट जी कधी

पत्नी नसे असे वैरी । स्त्री संज्ञेस न पात्र ती ।। 147.1

ठेवता संतुष्ट भर्त्यासी । तोषती सर्व देवता

पती असेच नारीचा । देव हाची खराखुरा ।। 147.2

 

जी स्त्री पतीला संतुष्ट ठेऊ शकत नाही, जिचा पती कायम तिच्यावर क्रोधित आहे, अशा पतीपत्नींच्या घरात शांतता कशी नांदेल? त्यामुळे अशी स्त्री फुलांचे घोस लागलेल्या वेलीसारखी कितीही सुंदर वाटली तरी वनात लागलेला वणवा जसा अशा फुललेल्या वेलींनाही जाळून भस्म करतो त्याप्रमाणे नष्ट झालेलीच बरी.

दावाग्निना विदग्धेव सपुष्पस्तबका लता ।

 भस्मीभवतु सा नारी यस्या भर्ता न तुष्यति ।। 148

जी न ठेवी पतीदेवा । प्रसन्न कधिही मनी

जिणे असे अशा स्त्रीचे । व्यर्थ,वायाच सर्वही ।। 148

वणव्यात जळे वेली । मिरवे पुष्पघोस जी

तशीच नष्ट व्हावी ती । पत्नी उद्दाम ती मुळी ।।

तसं पाहिलं तर पित्याच्या घरी मुलगी किती थोडा काळ राहते. मुलांच्या संगोपनातही कितीतरी वर्ष जातात. त्यानंतर ती कर्ती मुलं आपल्या मायबापांकडे थोडसं लक्ष देतात. मोठा काळ पतीपत्नीच एकमेकांच्या सहवासात असतात. त्यामुळे आईवडिल बालपणापर्यंतच पुरतात. मुलंही थोडाकाळच सांभाळतात. पत्नीला फार मोठं सुख, आधार हा पतीकडूनच मिळतो. असं असतांना पत्नीने आपल्या पतीला सन्मान का बरं देऊ नये?  

मितं ददाति हि पिता मितं भ्राता मितं सुतः ।

अमितस्य हि दातारं भर्तारं का न पूजयेत् ।। 149

पिता बंधु मुले देती । मर्यादित चि मोजके

भर्ता पुष्कळ देतो त्या । का न सन्मान देतसे ।। 149

मग ती आापल्या पतीला ऐकू येईल, कळेल अशा आवाजात पुन्हा म्हणाली, ``हे प्रियकरा, हे कान्त, मी काय सांगते ते तू नीट लक्ष देऊन ऐक. मी आपल्या कल्याणाची गोष्ट तुला सांगत आहे. जो अतिथी आपल्या आश्रयाला आला आहे त्याचं रक्षण करणं, त्याचा जीव वाचवणं हाच उचित धर्म आहे. हीच योग्य रीत आहे. प्रसंगी प्राण देऊनही त्याचं रक्षण करायला पाहिजे.’’

श्रुणुष्वावहितः कान्त । यत्ते वक्ष्याम्यहं हितम् ।

प्राणैरपि त्वया नित्यं संरक्ष्यः शरणागतः ।। 150

हे कान्त सांगते मी जे । लक्षपूर्वक ऐकावे

 कल्याणाचे असे तेची । हिताचे आपुल्या असे ।। 150.1

आश्रया येतसे जोची । शरणागत जो कुणी

प्राणही देऊनी त्यासी । रक्षावे रीत ही अशी ।। 150.2

हा पारधी कितीही दुष्ट असला तरी अतिथी म्हणून आपल्याला शरण आलेला आला आहे. थंडीने काकडला आहे भुकेने कळवळून आपल्या दारात झोपी गेला आहे. आलेल्या अतिथिची योग्य सेवा शुश्रूषा करणे, त्याचा योग्य सत्कार करणे हाच खरा धर्म आहे.

एष शाकुनिकः शेते तवावासं समाश्रितः ।

शीतार्त्तश्च क्षुधार्त्तश्च पूजामस्मै समाचर ।। 151

कळवळे भुकेने भारी । थंडीने काकडे किती

भुकेला झोपला दारी । अतिथी आपुल्या घरी ।। 151.1

काळजी घेऊनी त्याची । द्यावे भोजन आाश्रया

शुश्रूषा करणे त्याची । अहो योग्यचि हे प्रिया ।। 151.2

त्यातून संध्याकाळी आलेला अतिथी हा धर्मानुसार फार पूजनीय असतो. (कारण अशा अतिथीची नंतर सोय होणे अंधारामुळे अजूनच अवघड होते. अशा लोकांना संकटात न सोडता त्यांची काळजी घेतली जावी म्हणून पूर्वी असा नियम असावा.) असा याचक जर असंतुष्ट, विन्मुख परत गेला तर तो आपलं सर्व पुण्य घेऊन जातो असं म्हणतात.

यः सायमतिथिं प्राप्तं यथाशक्ति न पूजयेत् ।

तस्याऽसौ दुष्कृतं दत्त्वा सुकृतं चापकर्षति ।। 152

सायंकाळीच येई जो । अतिथी आपुल्या घरी

मानसन्मान त्याचा ना । करिता पुण्य ने दुरी ।। 152.1

जाई देऊन तो सारे । यजमानास पाप ची

असंतुष्टचि जाता तो । अकल्याण सदा करी ।। 152.2

हे नाथ, त्यामुळे कुठलाही पूर्वग्रहदूषित विचार मनात न आणता, ह्या दुष्ट पारध्याने माझ्या प्राणप्रिय पत्नीला बंदी बनवलं आहे असा विचार न करता अतिथी समजून त्याचे आदरातिथ्य करा. माझ्यावर ओढवलेल्या ह्या प्रसंगामागे माझं काही पूर्व प्राक्तन, पूर्वजन्मीचं पापच कारणीभूत असेल. त्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून आज मी हे दुःख भोगत आहे. हा पारधी हे केवळ निमित्तमात्र आहे. प्रत्येक जण आपल्या पूर्वजन्माच्या पापाच्या वृक्षाची फळं चाखत असतात. माझ्यावर होणार्‍या अत्याचारांच्या साखळीचा दुवा थेट माझ्या पूर्व प्राक्तनाला जोडणारा आहे.

मा चास्मै त्वं कृथा द्वेषं बद्धाऽनेनेति मत्प्रिया ।

स्वकृतैरेव बद्धाऽहं प्राक्तनैःकर्मबन्धनैः ।।153

दुष्टाने कोंडले ह्याची । प्रियेस माझिया असे

घ्यावे वाटून ना ऐसे । माझे प्राक्तन हे असे ।। 153.1

पूर्व कर्म असे माझे । व्हाया दुःखद ही स्थिती

अत्याचारचि हे सारे। सोसते मीच त्यामुळे ।। 153.2

हे नाथ, आपल्या वाटेला आलेलं दुःख, भीषण आजार, दारिद्र्य हे प्रत्येकाला भोगावच लागतं. ते कोणाला चुकत नाही. कोणी कोणाचं दुःख, रोग घेऊ शकत नाही. ते ज्याचं त्यालाच भोगावे लागतं. ज्याचं त्याचं पापकर्म त्याला सोडत नाही.

दारिद्र्यरोगदुःखानि बन्धनव्यसनानि च ।

आत्मपराधवृक्षस्य फलान्येतानि देहिनाम् ।। 154

आपुल्या अपराधाच्या । वृक्षाची असती फळे

दारिद्र्य दुःख रोगादि । कोणा ना भोगणे चुके ।। 154

त्यामुळे ह्या पारध्यानी मला त्याच्या शक्तीचा दुरुपयोग करून बळाने पकडले आहे, बंदिवान केले आहे असा विचारही मनात आणू नका. आणि त्याचा योग्य तो सत्कार करा.

तस्मात्त्वं द्वेषमुत्सृज्य मद्बन्धनसमुद्भवम् ।

धर्मे मनः समाधाय पूजयैनं यथाविधि ।। 155

बळाने हरिले ह्याने । केले बंधक पत्निसी

द्वेष सोडून ऐसा हा । अतिथीस्वागता करी ।। 155

आपल्या प्रियेचे ते हृदयापासून आलेले बोल कबुतराला पटले. त्याचा दुःखावेग त्याने ओसरला. मन शांत झाले. मग अत्यंत निश्चिंत मनाने तो पारध्यापाशी गेला आणि अत्यंत नम्रपणे म्हणाला,

तस्यास्तद्वचनं श्रुत्वा धर्मयुक्तिसमन्वितम् ।

उपगम्य ततोऽधृष्टः कपोतः प्राह लुब्धकम् ।। 156

प्रियेचे ऐकुनी ऐसे । संभाषण असेचि हे

निःशंक पारध्यापाशी । पक्षी जाऊन तो वदे

 

हे श्रेष्ठ अतिथीदेवा, यावे, हे घर आपलेच आहे. आपण निःशंकपणे येथे रहावे. कुठल्याही गोष्टीने स्वतःस दूषणे देऊ नये वा बोल लावून घेऊ नये. मी आपले मनापासून स्वागत करतो. मी आपला सेवक आहे असे समजून आपण मला आज्ञा करावी. आपल्याला काय हवे आहे?

त्या घनदाट आरण्यात जिथे मदतीची अपेक्षाही व्यर्थ होती तिथे त्या कबुतराचं ते आश्वासक बोलणं ऐकून त्या पारध्याच्या मनात जरा आशा उत्पन्न झाली. बुडत्याला काडीचा का होईना पण आधार वाटतो त्याप्रमाणे हे कबुतर मला काही मदत करू शकेल असे वाटून तो म्हणाला, हे कबुतरा मी थंडीने पुरता गारठलो आहे. माझ्या अंगात अगदी त्राण उरले नाहीत. कसही कर पण माझं ह्या थंडीपासून तू रक्षण कर.

भद्र! सुस्वागतं तेऽस्तु ब्रूहि किङ्करवाणि ते

सन्तापश्च न कर्तव्यः स्वगृहे वर्तते भवान् ।। 157

अहो निःशंक यावेची । घर हे आपुले असे

पश्चात्ताप नको चित्ती । असो स्वागत आपले ।। 157.1

असे सेवक मी नम्र । आज्ञा कायचि सांगणे

ऐकून बोलणे त्याचे । पारधी बोलला असे ।। 157.2

तस्य तद्वचनं श्रुत्त्वा प्रत्युवाच विहङ्गहा

कपोत! खलु शीतं मे हिमत्राणं विधीयताम् ।। 158

कडाक्याच्याच थंडीने । कपोता कापतो अती

थंडीपासून करी माझे । तूची रक्षण सत्वरी ।। 158

पारध्याच्या आज्ञेची अंमलबजावणी करण्यासाठी ते कबुतर कुठूनतरी अग्नी घेऊन आलं. त्याने शेकोटी पेटवली. पावसापासून वाचलेली काही सुकी पानं फांद्या त्या अग्नीत घालून रसरशीत पेटलेल्या त्या शेकोटीवर त्या अतिथी म्हणून आलेल्या पारध्याला त्याचे अंग शेकण्याची विनंती करत तो आदरानी म्हणाला, मी शेकोटी पेटवली आहे. आपण मनावर उपकाराचं कुठलंही ओझ न बाळगता अत्यंत शांतपणे, आरामात आपलं सगळं अंग छान शेकून घ्या. त्याने आपल्याला जरा उबदार वाटेल.

 

स गत्वाऽङ्गारकं नीत्वा । पातयामास पावकम् ।

ततः शुष्केषु पर्णेषु । तमाशु समदीपयत् ।। 159

निखारे घेउनी आला । कपोत तोचि कोठुनी

घालुनी शुष्क पर्णे त्या । शेकोटी तेज छान पेटवी ।। 159

 

सुसन्दीप्तं ततः कृत्वा । तमाह शरणागतम् ।

प्रतापयस्व विश्रब्धं स्वगात्राण्यत्र निर्भयः ।। 160

शेकावे अंग सारेची । स्वस्थ निश्चिंत होउनी

बोलला अतिथीसी तो । कपोत आदरे अती ।। 160

मी आपल्या थंडीची थोडीफार काळजी घेऊ शकतो. पण! अनेकजणांकडे जसं मोठं ऐश्वर्य असतं तसं माझ्याकडे कुठलंच मोठं ऐश्वर्य वा वैभव नाही. ज्यांच्याकडे अशी समृद्धी असते ते अनेक जणांचे पोषिंदे असतात. दहा बाराच का शंभर जणांसाठीही सहजपणे अन्नछत्र चालवू शकतात. पण माझ्या सारख्या गरीबाला माझंच पोट भरणं मुश्किल तिथे मी अजून इतरांना काय देणार? 

न चास्ति विभवः कश्चिन्नाशये येन ते क्षुधम् ।

सहस्रं भरते कश्चिच्छतमन्यो दशाऽपरः ।

ममत्वकृतपुण्यस्य क्षुद्रस्यात्माऽपि दुर्भरः ।।

नाही जवळ माझ्या हो । ऐश्वर्य कोठले असे

आपली भूक ज्यायोगे । शांत मी हा करू शके।। 161.1

विश्वामध्ये किती ऐसे । असती धनवान ते

पोषिंदे जे अनेकांचे । पोसती शेकडोंस ते ।। 161.2

भराया पोट माझेची । वानवा मजला असे

दुजासी भोजना द्याया । मी अकिंचन तो असे ।। 161.3

असा अकिंचन यजमान असेल तर त्याच्याकडे आलेल्या अतिथीला मानसन्मान, रुचकर भोजन सोडाच पण क्लेश आणि दुःख मात्र वाट्याला येईल.

एकस्याऽप्यतिथेरन्नं यः प्रदातुं न शक्तिमान्

तस्याऽनेकपरिक्लेशे गृहे किं वसतः फलम्? ।। 162

नाही कुवत ज्याची हो । क्षुधा तोषवण्याचिही

अतिथीस घरी त्याच्या । नशीबी क्लेश निश्चिती ।।162

दारी आलेल्या अतिथीला विन्मुख पाठवू नये असं म्हणतात. आपल्याकडे दारी आलेल्या अतिथीचा सत्कार करण्याचीही कुवत असू नये, त्याला मनासारखं भोजन देण्याइतकंही आापलं सामर्थ्य नसावं ह्यासारखी मनाला सलणरी दुसरी गोष्ट नसेल.

तत्तथा साधयाम्येतच्छरीरं दुःखजीवितम् ।

यथा भूयो न वक्ष्यामि नास्तीत्यर्थिसमागमे ।। 163

दारीच्या अतिथीला हो । पाठवावेच विन्मुख

असे दुःसह ते भारी । मनासी दुःखदायक ।। 163.1

पण आज मी ह्या समस्येचं उत्तर शोधलं आहे. ह्यापुढे माझ्या दारातून एकही अतिथी विन्मुख जाणार नाही. आणि त्याला नाही म्हणण्याचा लाजिरवाणा प्रसंग माझ्यावर येणार नाही. दारी आलेल्या अतिथीला संतुष्ट करण्यासाठी मी माझं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

ह्यापुढे अतिथी कोणी । जाऊ नयेच विन्मुख

उपाययोजना ऐसी । करतो आज निश्चित ।।163.2

व्हावा दुःखमयी ह्याची । जीवनाचाच अस्त ह्या

अतिथी तोषवूनीया । योग्य निर्णय हा भला ।। 163.3

पारध्यानी कबुतराच्या प्रियेला अत्यंत क्रूरपणे बंदिवान बनवलं होतं. ती त्याच्या कब्जात होती हे सर्व माहित असूनही आपल्या प्रियेच्या शब्दांना मान देऊन त्या कबूतरानी पारध्याला कुठलीही दूषणं दिली नाहीत; त्याची निंदाही केली नाही; पारध्याबद्दल त्याने कुठलेच अभद्र शब्दही उच्चारले नाहीत; उलट दारी आलेल्या अतिथीचे आपण यथायोग्य स्वागत करू शकत नाही, पारध्याच्या भुकेची आपण व्यवस्था करू शकत नाही ह्याचे दुःख वाटून तो स्वतःचाच धिःक्कार करु लागला. शेवटी मनाचा काही निश्चय करून तो मोठ्या विश्वासाने पारध्याला दिलासा देत म्हणाला, आपण काही काळासाठी थांबावे. थोड्याच वेळात आपली भुकेची काळजी मिटेल.

स निनिन्द किलात्मानं न तु तं लुब्धकं पुनः ।

उवाच तर्पयिष्ये त्वां मुहूर्त्तं प्रतिपालय ।। 164

न देता पारध्यासी त्या । दूषणे लवमात्रही

आत्मनिंदा करूनी तो । बोले कपोत त्याप्रति ।। 164.1

क्षणमात्रचि थांबावे । अतिथीदेव हो तुम्ही

 भुकेची तुमच्या चिंता । दूर होईल सत्वरी ।। 164.2

असं म्हणून त्या धर्मात्मा कपोताने त्या पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातली आणि अत्यंत प्रसन्न चित्ताने अग्निप्रवेश केला. त्याची ती आहुती पाहून कोणाला असं वाटावं की जणु काही खूप दिवसांनी आपल्या स्वतःच्या घरी येऊन तो स्वगृहातच प्रवेश करत आहे.

एवमुक्त्वा स धर्मात्मा प्रहृष्टेनान्तरात्मना ।

तमग्निं सम्परिक्रम्य प्रविवेश स्ववेश्मवत् ।। 165

असे बोलून धर्मात्मा । अग्नीप्रवेश तो करी

करावा स्वगृही जैसा । चिंतामुक्त प्रवेशची ।। 165.1

अग्निप्रदक्षिणा तैसी । आनंदे करुनी भली

प्रसन्नचित्त तो पक्षी । देई आहुति आपुली ।। 165.2

त्या पक्ष्याचे ते कृत्य पारधी डोळे विस्फारून बघतच राहिला. त्याचं ते विलक्षण दातृत्त्व, असाधारण त्याग, स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन केलेली अतिथीच्या भूकेची व्यवस्था --- सगळच अद्भुत होतं. त्या पक्ष्याचं ते असामान्य वर्तन पाहून पारधी सुन्न झाला. त्याच्या कठोर हृदयालाही पाझर फुटला. तो अग्निमधला मृत पक्षी पाहून तो शोकाकूल झाला. त्याला अश्रू आवरेनात.

 

ततस्तं लुब्धको दृष्ट्वा कृपया पीडितो भृशम् ।

कपोतमग्नौ पतितं वाक्यमेतदभाषत ।। 166

पक्ष्याचे उच्च कोटीचे । दातृत्व पाहुनी मनी

पाहुनी त्याग पक्ष्याचा । असाधारण हया जगी ।। 166.1

पारधी द्रवला दुःखे । शोकाकूलचि हो मनी

पाहुनी मृत पक्ष्यासी । विलाप बहु तो करी ।।166.2

पश्चात्तापाने, दुःखावेगाने तो स्वतःलाच बोल लावू लागला, ``हाय रे हाय! माझ्यासारखा पापी कोणी नसेल. माझ्यासारख्या दुष्कर्म करणार्‍याला  त्याचे आप्तइष्ट तर सोडून देताताच पण त्याचा अंतरात्माही त्याला कुरतडत राहतो. अंतरात्माही त्याची छिथू करतो. त्यालाही अशा दुष्टाचा तिरस्कार वाटतो. शेवटी आपण केलेलं पाप आपल्याला ह्या जन्मीच भोगावं लागतं. ते आंतरात्म्याला छळत राहतं.

यः करोति नरः पापं न तस्यात्मा ध्रुवं प्रियः

आत्मना हि कृतं पापमात्मनैव हि भुज्यते ।। 167

दुःखावेगेच बोले तो । स्वतःसी बोल लावुनी

हाय! पाप करे जोची । आवडे ना स्वतःसही

दुखावे जो दुजासी तो । आत्मा त्या माफ ना करी

आत्म्याचे पाप आत्मा तो । भोगे जन्मी ह्याचची ।।167

अरेरे!! माझ्या सारखा घोर पातकी कोणी नसेल. माझ्या ह्या दुष्ट बुद्धीमुळे मी कायम दुष्कृत्ये करण्यातच आनंद मानत आलो. माझ्यासारख्या ह्या महापातक्यासाठी घोर नरकाशिवाय दुसरी कुठली गती असणार? मरणानंतरही माझा हा दुराचार मला रौरवासारख्या भीषण मार्गावर नेऊन सोडल्याशिवाय राहणार नाही.

सोऽहं पापमतिश्चैव पापकर्मरतः सदा

पतिष्यामि महाघोरे नरके नाऽत्र संशयः ।। 168

तो मी असे महा पापी । बुद्धी माझीच पापिणी

केले मी आजपावेतो । पापकर्मच एकची ।।168.1

नाही शंका मनी माझ्या । आता हो लेशमात्र ती

घोर नर्कात हो माझी । ठरलीसे रवानगी ।। 168.2

त्याच्या उलट ह्या लहानशा पक्ष्यानी मात्र माझ्या सारख्या दुष्टाचाही अतिथी-सत्कार करून; आपल्या अत्युच्च बलिदानानी, आज दातृत्त्वाचा, अतिथी सत्काराचा, सन्नीतीचा एक उच्च आदर्श स्थापन केला आहे. धन्य आहे त्याची!

नूनं मम नृशंसस्य प्रत्यादर्शः प्रदर्शितः ।

प्रयच्छता स्वमांसानि कपोतेन महात्मना ।। 169

अर्पुनी मांस क्रूरासी । दुष्टास माझियासमा

स्थापिला आज आदर्श । पक्ष्याने ह्या लहानशा ।। 169

ह्या पक्ष्याची आाठवण म्हणून आजपासून मी सर्व सुखोपभोगांचा त्याग करतो. मी सर्व ऋतूंमधे होणारा त्रास ह्यापुढे विनातक्रार सोसीन. एखाद्या उथळ तलावातलं किंवा डबक्यातलं पाणी जसं उन्हाळ्यात सुकून जातं; त्याप्रमाणे मी महाभयंकर पापी माझा देह सुकवून टाकीन त्याचे कसलेही लाड करणार नाही.

अद्यप्रभृति देहं स्वं सर्वभोगविवर्जितम् ।

तोयं स्वल्पं यथा ग्रीष्मे शोषयिष्याम्यहं पुनः ।। 170

आजपासून मी सारे । त्यागीन भोग सर्वही

थंडी वारा उन्हाळा मी । विनातक्रार सोसुनी ।।

उन्हाळ्यात सुके जैसे । जल अल्प तलावाचे

सुकवीन तसे देहा । महापापीच जो असे ।। 170

माझ्या पापांचं प्रायश्चित्त घेण्यासाठी आता मी ह्या वनातच राहीन. उपवास करून, कठोर तप करून, पूर्णपणे निस्पृह होईन. ह्या कृष झालेल्या तनुचा सुद्धा त्याग करीन. त्यामुळेच ह्या शरीरानी केलेल्या सर्व पापांचं क्षालन होईल.  

शीतवातातपसहः कृशाङ्गो मलिनस्तथा ।

उपवासैर्बहुविधैश्चरिष्ये धर्ममुत्तमम् ।। 171

ऊन पाऊस वा वारा । जीवघेणीच थंडि वा

असो ऋतू कितीही ते । कष्टदायी तनूस ह्या ।।

उपवास करूनी मी । आचरीन महातपा

करून कृश कायेसी । निःस्पृही करीतो मना ।।171.2

प्रायश्चित्तचि पापाचे । पूर्ण भोगीन मी वनी

पापमु्क्तचि होण्या हा । मार्ग उत्तम एकची।। 171.3

इतकं बोलून अत्यं पश्चात्तापाने दग्ध झालेल्या पारध्याने आपली, काठी, फास, जाळं तोडून मोडून फेकून दिलं. आणि आत अडकलेल्या पक्षिणीला मोकळं करून पिंजराही मोडून टाकला.

ततो यष्टिं शलाकां च जालकं पञ्जरं तथा ।

बभञ्ज लुब्धको दीनां कपोतीञ्च मुमोच ताम् ।। 172

कठोर निश्चयू ऐसा । पारधी करता मनी

देई फेकून तो काठी । जाळे, गलोल, फासही ।।172.1

तोडून टाकल्या वस्तू । शिकारी साधनेच ती

मुक्त केले कपोतीसी । तोडुनी पिंजर्‍यासही ।।172.2

पिंजर्‍यातून मुक्त झालेली ती कबुतरी उडून जेव्हा बाहेर आली तेव्हा, समोरच, आपल्या पतीचं अग्नीत पडलेले निष्प्राण कलेवर पाहून तिच्या शोकाला पारावार राहिला नाही. ते हृदयद्रावक दृश्य पाहून ती अत्यंत आर्त स्वरात विलाप करू लागली.

 

लुब्धकेन ततो मुक्ता दृष्ट्वाऽग्नौ पतितं पतिम् ।

कपोती विललापार्त्ता शोकसन्तापमानसा ।। 173

 मुक्त पाशातुनी होता । पाहे पति कलेवरा

टाहो फोडून दुःखाने । करे शोक कपोतिका ।। 173.1

`` हे प्रिय नाथ! आपण मला सोडून गेला. आपल्या शिवाय ह्या जगत मी एकटीच जगून काय करू? आता माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहिला नाही. पतीच्या विरहाने अत्यंत नकोसे वाटणारे, दयनीय, अभागी, दुःखी जीवन कंठण्याचे माझ्या सारख्या अभागिनीला आता काहीच प्रयोजन उरले नाही.  

 

न कार्यमद्य   मे नाथ! जीवितेन त्वया विना ।

दीनायाः पतिहीनायाः किं नार्या जीविते फलम् ।। 174

बोले आर्त स्वराने ती । आता ना अर्थ जीवनी ।

अहो नाथ! अनाथा ह्या । उरे कर्तव्य ना जगी ।। 174.1

पतीवीण नको ऐसे । जगणे हीन दीन हे

माझ्या अभागिनीच्या ह्या । जिण्याचा लाभ कायसे? ।। 174.2

तसेही पतीच्या मृत्यूच्या पश्चात पत्नीचा मान, सन्मान, स्वाभिमान सर्वच नष्ट होतो. आप्तांकडून मिळणारी आपुलकी, योग्य आदरभाव, समाजातून मिळणारा यथोचित मानसन्मान ह्याला ती पारखी होते. कुलाचार, कुलधर्म ह्या सगळ्याचा अधिकार गमावून बसते. ना अधिकारवाणीने ती नोकराचाकरांना आज्ञा देऊ शकते; ना नोकर चाकर तिच्या आज्ञेचा आदर करतात.  वारंवार होणार्‍या अवहेलनेला तिला सामोरं जावं लागतं. पतीच्या पश्चात पत्नीला ताठ मानेनी जगणं अशक्य होऊन जातं.

मानो दर्पस्त्वऽहङ्कारः कुलपूजा च बन्धुषु ।

दासभृत्यजनेष्वाज्ञा वैधव्येन प्रणश्यति ।। 175

वैधव्य काढुनी घेते। मान सन्मान आदरा

आटते प्रेम नात्यांचे । मनाई कुलपूजना ।। 175.1

सेवकांकडुनी होते । अवज्ञा सहजी तिची

ना अधिकार वाणीने । आज्ञा देऊ शकेच ती ।। 175.2

जगणे ताठ मानेने । मानसन्मान स्नेहही

ती पक्षिणी असा खूप विलाप करू लागली.  शेवटी त्या पतिव्रता पक्षिणीने दुःखावेग न आवरल्याने ज्या पेटलेल्या शेकोटीत तिच्या कपोत पतीने स्वतःची आहुती दिली होती; त्या पारध्यासाठी पेटवलेल्या शेकोटीमधे स्वतःही उडी मारली आणि आपली जीवनयात्रा संपवली.

 

एवं विलप्य बहुशः कृपणं भृशदुःखिता ।

पतिव्रता सुसन्दीप्तं तमेवाग्निं विवेश सा ।। 176

दीन दुःखी कपोती ती । विलाप बहु तो करे 

पेटल्या अग्निमध्ये ती । उडी घेईच सत्वरे ।। 176

तिने हा भौतिक देह त्याग केल्यावर तिला एक अद्भुत दृश्य दिसलं. तिचा पती अत्यंत सुंदर, दिव्य वस्त्रे नेसून एका अद्भुत विमानात बसला होता. त्याच्या अंगावर दिव्य आभूषणे शोभून दिसत होती. त्याचा देहही विलक्षण तेजस्वी दिसत होता. तिला पाहून तो म्हणाला, ``प्रिये, तू खरोखरच एक पतिव्रता साध्वी स्त्री आहेस. तू माझ्या पश्चात  मला अनुसरून, अग्नीत सहगमन करून जे वर्तन केलेस ते अत्यंत महान, आदरणीय आणि तुझी कीर्ती वाढवणारे आहे.

ततो दिव्याम्बरधरा दिव्याभरणभूषिता ।

भर्तारं सा विमानस्थं ददर्श स्वं कपोतिका ।। 177

सोऽपि दिव्यतनुर्भूत्वा यथार्थमिदमब्रवीत् ।

अहो ममानुगच्छन्त्या कृतं साधु शुभे! त्वया ।। 178

त्यागता देह ती पाहे । अद्वितीयचि दृश्य ते

अलौकिक विमानी हो । पती आरूढ होतसे।। 177.1

लेऊनी दिव्य वस्त्रांसी । घालुनी दिव्यभूषणे

 झाली दिव्य तनू त्याची । बोलला तो तिच्यासवे ।। 177.2

माझ्या मागे प्रिये तूची । केले वर्तन योग्य ते

पतिव्रताच साध्वी तू । शुभे आदरणीय गे ।। 178

तो कपोत अजून पुढे म्हणाला, पतीनिधनानंतर जी स्त्री सती जाते, ती साडेतीन कोटी  वर्ष स्वर्गसुखाचा आनंद मिळवते.

तिस्रः कोट्योऽर्धकोटी च यानि रोमाणि मानुषे ।

तावत्काल वसेत्स्वर्गे भर्तारं याऽनुगच्छति ।। 179

पती मागे सती जाई । करे नारीच दिव्य हे

साडेतीनचि कोटी ती । वर्षे स्वर्गचि भोगते ।। 179

अशाप्रकारे स्वर्गवासी झालेले ते कपोत आणि कपोती त्यांच्या पूर्व पुण्याईच्या जोावर अनेक कोटी वर्ष स्वर्गसुखाचा आनंद घेत होते. रोज संध्याकाळ झाली की त्यांना आपला पूर्वजन्मीचा पक्षीदेह प्राप्त होत असे. त्या प्रेमी जीवांचे रोज अशाप्रकारे मिलन होई.

कपोतदेहः सूर्यास्ते प्रत्यहं सुखमन्भूत ।

कपोतदेहवत्सासीत् प्राक्पुण्यप्रभवं हि तत् ।। 180

स्वर्गवासीच ते दोघे । कपोती अन् कपोत तो

रोज सूर्यास्त होताची । घेती स्वर्गीय मोद तो ।। 180.1

शरीरे लाभती दोघा । पक्ष्यांची रोज रोज ती

होई मिलन दोघांचे । पुण्याई ती फळे अशी ।। 180.2

त्या पक्ष्यांनी आपल्या धर्माचे पालन करण्यासाठी इतक्या सहजपणे केलेला तो अग्निप्रवेश पाहून, पश्चात्तापाने पोळलेला, अत्यंत शोकाकूल झालेला तो फासेपारधी पूर्णपणे पालटून गेला. त्या फासेपारध्याने त्या वनातच राहण्याचा निश्चय केला. त्याचा पूर्वीचा हिंसक स्वभाव पुरताच बदलला. त्याने प्राणीहिंसा सोडून दिली.

शोकाविष्टस्ततो व्याधो विवेश च वनं घनम् ।

प्राणिहिंसां परित्यज्य बहुनिर्वेदवान् भृशम् ।। 181

अग्निप्रवेश पक्ष्यांनी । केला सहज पाहुनी

शोकाकूलचि तो झाला । पश्चात्तापेच पारधी ।। 181.1

प्राणीहिंसा त्यजूनी तो । राहू लागे वनी घनी

आमूलाग्र असा झाला । त्याच्या बदल तो मनी ।। 181.2

अत्यंत कठोर नियमांचे पालन करून तो पारधी राहू लागला. एक दिवस जंगलात पेटलेला वणवा पाहून विरक्त झालेला तो पारधी आपणहून त्या वणव्यात शिरला. त्याच्यासोबत त्याची सारी पापेही जळून गेली. दोषमुक्त होऊन त्यालाही स्वर्गात स्थान मिळाले. अत्यंत समाधानाने तो स्वर्गात राहू लागला.

तत्र दावानलं दृष्ट्वा विवेश विरताशयः

निर्दग्धकल्मषे भूत्वा स्वर्गसौख्यमवाप्तवान् ।। 182

एके दिनीच तो पाही । वणवा पेटला वनी

शिरे विरक्त भावाने । वणव्यातच पारधी ।। 182.1

पापे जळून त्याची ती । जाहला निष्कलंक तो

पापमुक्तचि होवोनी । भोगे स्वर्गसुखास तो ।। 182.2

मी जो श्लोक पहिल्यांदा सांगितला की एका कबूतराने दारी अतिथी म्हणून आलेल्या शत्रूचंही कसं आतिथ्य केलं ती गोष्ट ही अशी होती.

``हंऽऽऽऽ!’’ राजा अरिमर्दनाने एक दीर्घ सुस्कारा टाकला; आणि क्रूराक्षाची गोष्ट ऐकून घेतल्यानंतर मंत्री दीप्ताक्ष यांच्याकडे पहात त्याने विचारले, ``मंत्रीवर आता ह्या प्राप्त परिस्थितीत आापलं काय मत आहे?’’

दीप्ताक्ष म्हणाला, महाराज ह्या शरण आलेल्या शत्रूच्या मंत्र्याला मारणे योग्य होणार नाही. कारण कधिकधी आपल्या विरुद्ध बाजूचा माणूसही कधि कधि आपल्याला हितकर वागू शकतो.

 

या ममोद्विजते नित्यं सा मामद्यावगूहते ।

प्रियकारक! भद्रं ते यन्ममास्ति हरस्व तत्’’ ।। 183

चौरेण चाप्युक्तम्-

`` हर्तव्यं ते न पश्यामि हर्तव्यं चेद्भविषयति ।

पुनरप्यागमिष्यामि यदीयं नावगूहते’’ ।। 184

 

 

 

अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल

( ललल /गलल नको ) न आणि भ गण नको

ग ल । ग ग ल । ल ग ल । ग ग

 

 

 

अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल

( ललल /गलल नको ) न आणि भ गण नको

ग ग ल । ग ग ल । ल ग ल ग ग

 

 

 

 

ग ग ल । ग ग ल । ल ग ल । ग ग

अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल

 ( ललल /गलल नको ) न आणि भ गण नको

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -