9 चोर आणि म्हातारा वाणी ह्यांची कहाणी

 


9 चोर आणि म्हातारा वाणी ह्यांची कहाणी

( ऐकता आले पाहिजेत. त्यातून सल्लागारांची योग्य पारखही होत असते.)

एका कुठल्यातरी नगरीमधे ‘कामातुर’ नावाचा एक म्हातारा वाणी रहात होता. त्याची बायको मेली. पण हा इतका स्त्रीलंपट होता की त्याने एका दरिद्री वाण्याला पैसे देऊन त्याच्या तरूण मुलीशी लग्न लावलं. ती बिचारी नुकती नुकती वयात आलेली मुलगी, तिला वडिलांनी ह्या अशा म्हातार्‍याच्या गाठीला बांधलं म्हणून अत्यंत दुःखी असे. तिला त्या थेरड्याचं तोंडही बघावसंही वाटत नसे. बरोबरच आहे म्हणा, 

श्वेतं पदं शिरसि यत्तु शिरोरुहाणां,

स्थानं परं परिभवस्य तदेव पुंसाम्।

आरोपिताऽस्थिशकलं परिहृत्य यान्ति

चाण्डालकूपमिव दूरतरं तरुण्यः ।। 185

ते श्वेत केश शिरि पाउल ठेवता का

प्रारंभ होय अपमानचि सोसण्याचा

पाहून हाड विहिरीवर टांगलेले

`पीण्या न योग्य जल हे’ कळते जनाते ।। 185.1

 

ही चामडे कमविण्यास विहीर आहे

हेची कळून जल पीत न कोणि त्याचे

जाती दुरून सगळे जल ना पिताची

वृद्धांस टाळिति तशा नित त्या तरूणी ।। 185.2

 

गात्रं सङ्कुचितं गतिर्विगलिता दन्ताश्च नाशङ्गताः

दृष्टिर्भ्राम्यति रूपमप्युपहतं वक्त्रञ्च लालायते ।

वाक्यं नैव करोति बान्धवजनः पत्नी न शुश्रूषते

धिक्कष्टं जरयाऽभिभूतपुरुषं पुत्रोऽप्यवज्ञायते ।। 186

जातो देह सुकून वृद्धपण ते देहास ह्या स्पर्शिता

चालाया बहु त्रास तो अडखळे; ना दात राहे मुखा

दृष्टी होय अधू; न डौल शरिरी होई धनुष्याकृती

लाळेने मुख सर्व ते लडबडे, सारे तया टाळिती ।। 186.1

 

बोले अक्षर ना कुणी करतसे त्याची जरा चौकशी

शुश्रूषा नच पत्निही करतसे टाळे पतीसीच ती

देती पुत्र दुरुत्तरे नच कुणी सन्मान देती मुळी

सातत्ये अपमान घोर करती हा हाय वृद्धत्वची ।।186.2

एक दिवस त्या म्हातार्‍याची पत्नी त्याच्या सोबत एकाच पलंगावर पण त्याच्याकडे पाठ फिरवून झोपली असतांनाच त्यांच्या घरात एक चोर घुसलेला तिने पाहिला. चोर पाहून अत्यंत भयाने ती आपल्या म्हातार्‍या पतीला घट्ट बिलगली. नेहमी फटकून वागणार्‍या पत्नीच्या वागण्यात अचानक असा सुखकारक बदल झालेला पाहून कामातुरही चक्रावून गेला. पत्नीच्या अशा अचानक मिठीने आनंदाने तो रोमांचित झाला. त्याच्या मनात विचार आला, ``आज असं अचानक काय खास घडलं की, ज्याच्यामुळे ही मला इतकी घट्ट बिलगली आहे?’’ पण जेव्हा त्याने आजूबाजूला बारकाईने पाहिलं तेव्हा घराच्या कोपर्‍यात लपलेला चोर त्याला दिसला. त्याच्या मनात आलं, ``अरे ह्या चोरानी आज माझं भलच केलं आहे. ह्या चोराला घाबरून का होईना आज ही मला घट्ट चिकटून आहे.’’ त्यामुळे त्या चोराला उद्देशून तो म्हणाला,

``अरे भल्या गृहस्था,  तुझं कल्याण असो. माझी पत्नी कायम माझ्यावर कावलेलीच असे. सतत मला झिडकारत राही. आज मात्र ती तुझ्या भयाने मला गाढ आलिंगन देत आहे. त्यामुळे मित्रा, तुला जे जे काही चोरायचे असेल ते  ते तू चोरून ने. अशा चोरीने मला दुःख नाही तर सुखच मिळवून दिलं आहे.

या ममोद्विजते नित्यं सा मामद्याऽवगूहते ।

प्रियकारक! भद्रं ते यन्ममास्ति हरस्व तत् ।। 187

तिरस्कार करे माझा । मुरडे नाक नित्य जी

तीच आलिंगना देई । भयाने आपुल्या अती ।। 187.1

हितैषी हो अहो माझे । असो कल्याण आपुले

ना होई दुःख चोरीचे । घेऊनी जा हवेचि ते ।। 187.2

ते ऐकून चोरीचा बेत बदलून तो चोरही म्हणाला, ``चोरण्यासारखं तर मला तुझ्या घरात काही दिसत नाहीए पण जेव्हा तुझी पत्नी तुला झिडरून तुझ्यापासून वेगळी झोपेल तेव्हा मी परत येईन.

हर्तव्यं ते न पश्यामि हर्तव्यं चेद्भविष्यति ।

पुनरागष्यामि यदीयं नाऽवगूहते ।। 188

चोरावीच अशी काही वस्तू ना दिसते घरी

पुन्हा येईन जेव्हा ही । पत्नी झोपेल वेगळी ।।188

अशी गोष्ट सांगून झाल्यावर मंत्री दीप्ताक्ष म्हणाला, जिथे चोराला सुद्धा दया दाखवून त्याच्या कल्याणाची इच्छा केली तर तो उपयोगी ठरतो, मदत करतो, श्रेयस्कर असतो तर तिथे अजून एखाद्या शरणागताचं काय? आपल्या शत्रूनी ह्याला अपमानित करून, ह्याचा उपमर्द करून, जखमी अवस्थेत ह्याला सोडून दिलं आहे. आपण त्याच्यावर दया दाखवली तर ते आपल्या पथ्याचच असेल. हा आपल्या शत्रूचे गुप्त भेद सांगून त्यांच्या आतल्या गोटातील माहिती देईल. आणि म्हणूनच मी म्हणेन की हा दंडनीय नाही आणि मरणं ही योग्य नाही. हा अवध्य आहे.

दीप्ताक्षाची सारी बाजू ऐकून घेतल्यानंतर राजा अरिमर्दन आपल्या चौथ्या मंत्र्याकडे वक्रनासाकडे पाहून म्हणाला, ``मंत्रीवर, आपलं काय मत आहे? अशा परिस्थितीत मी काय करावं असं आपल्याला वाटत?’’

वक्रनास म्हणाला, `` महाराज! हा अवध्य आहे. कारण शत्रूसुद्धा कधी कधी भलताच उपयोगी सिद्ध होतो.

शत्रवोऽपि हितायैव विवदन्तः परस्परम् ।

चौरेण जीवितं दत्तं राक्षसेन तु गोयुगम् ।। 189

संघर्ष दोन शत्रूंचा । करी कल्याण आपुले

ब्राह्मणाच्याच प्राणांसी । चोर एकचि वाचवे ।। 189.1

वाचवी वासरांसीही । चोरापासून त्या महा

ब्रह्मराक्षस होताची । वाद दोघात तो पहा ।। 189.2

अरिमर्दन म्हणाला, ``हे काय नवीन?’’

वक्रनासाने सांगायला सुरवात केली -----


 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -