सरसोत्सव

 

 

सरसोत्सव

हिंदू धर्मातील सर्व देवदेवता ह्या निसर्गाचं, निसर्गातील विविध स्थित्यंतर वा चक्र, जसे जलचक्र, ऋतुचक्र, कालचक्र, जन्म-मृत्यूचक्र, उत्पत्ती-स्थिती-विलय, नवनिर्मिती आाणि विनाश, दृश्य आणि अदृश्य ह्यांचं एकमेकात होणार्‍या रूपांतरांशी निगडीत विश्वाच्या अनादि अनंत काळ चाललेल्या स्थित्यंतराचं, निसर्गात चाललेल्या घडामोडींचं प्रतिक आहेत. आपल्या पूर्वजांनी, आपलं जीवन ज्यांच्या ज्यांच्यावर अवलंबून आहे अशा, आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत, निसर्गात घडणार्‍या विविध घटनांना एका छानशा दृश्य प्रतिकात बद्ध करून त्यांच्या भोवती सामान्यांना आकर्षक वाटतील, सहज कळतील, रुचतील, पचतील अशा गोष्टींची निर्मिती केली. वर वर वाटणार्‍या गोष्टींमधे आकाशातील तार्‍यांची, त्यांच्या स्थितींची, त्यांच्या रहस्यांची पृथ्वीवरील घटनाक्रमाची, सर्वांमध्ये असलेल्या समान सूत्राची विविध माहिती दाटपणे गुंफून ठेवली. ती उलगडून पहायची शोधक नजर मात्र हवी!

शिव आणि पार्वती हेही निसर्गातील अनेक घटनांचं प्रतिक! निसर्गात  चालू असलेल्या अनेक निसर्ग चक्रांचं प्रतिक! जन्म-मृत्यूच्या चक्राचं! ऊन, वादळ, पाऊस ह्यामुळे डोंगरांची होणारी धूप/झीज आणि दुसर्‍या बाजूला नद्यांमुळे तयार होणार्‍या सुपीक खोर्‍यांची निर्मिती ह्यांचं प्रतिक!  भरती, ओहटींचं प्रतिक! एका नाण्याच्या दोन बाजूंनी ते नाणं बनतं त्याप्रमाणे, ज्या दोन विरुद्ध वाटणार्‍या पण एकमेकांवर ज्यांचं अस्तित्त्व अवलंबून अशा विश्व चालण्यास आवश्यक असलेल्या क्रियांना पतिपत्नीच्या अभिन्न रूपात दाखवणार्‍या आपल्या पूर्वजांचं कौतुक करावं तेवढं थोडच!

 हे दोघेही पतिपत्नी अभिन्न आहेत. एकमेकांना पूरक आहेत; पण त्यांचे स्वभाव एकमेकांच्या पूर्ण विरुद्ध आहेत. दोघांच्या क्रियाशीलतेच, आचरणाचं, वागण्याचं वर्णन करतांना श्री आद्य शंकराचार्य विश्वात चाललेला हा `सरसोत्सव’ आहे असं म्हणतात. रसांचा महोत्सव!

तरल म्हणजे वायुरूप पदार्थ आणि द्रवरूप पदार्थ, दोन्ही पदार्थांना संस्कृतमधे रस (fluid) म्हणतात. दोन्हीही प्रवाही. जेव्हा एखादा पदार्थ रसाने संपृक्त झालेला असतो, त्याच्यात घनदाट रस भरलेला असतो तेव्हा तो `रसा सहित' म्हणजे `सरस’ होतो. ह्या रसांचं सतत चालू असलेलं हर्षनृत्य, निरंतर , जराही न थांबता, विना विश्रांती सुरू असलेलं आनंदपर्व, अथक चाललेला रसोत्सव हे त्या शिव पार्वतीचं रूप आहे.

थोडा विचार केला तर हा उत्सव सर्व प्राणी मात्रांच्या शरीरात श्वास आणि उच्छ्वास ह्या रूपात अखंड, निरंतर चालू आहे. प्राणी झोपतील, विश्रांती घेतील पण रोज चाललेला हा चैतन्याचा सोहळा मात्र निमिषासाठीही थांबत नाही. चैतन्याच्या ह्या प्रवाहीपणामुळेच हे विश्व अखंड चालू आहे. सर्व विश्वाचं असलेलं हे खरं गमक, सनातन रहस्य हिंदू धर्मानी आदरानी आपल्या धर्मात घेतलं आहे. ह्या सरसोत्सवाला नमन करण्यासाठी, आदरभाव व्यक्त करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अत्यंत खुबीने त्याचं प्रतिक असलेलं एक शिवलिंग तयार केलं. लिंग म्हणजे चिह्न, निशाण, प्रतिक! शिव म्हणजे कल्याण! शिवलिंग म्हणजे कल्याणाचं प्रतिक !

श्वास घेणे आणि सोडणे/ लोम-विलोम ह्या कृतीकडे पाहिल्यास एका नाकपुडीने श्वास घेणे आणि दुसर्‍या नाकपुडीने सोडणे ह्या कृतीतील वाहणार्‍या वार्‍याचा आलेख काढला तर तो इंग्रजीत Hyperbola किंवा इंग्रजी U ह्या अक्षराला उलटे करून त्याचे दोन्ही पाय रेषेला /जमिनीला चिकटवून उभे केल्याप्रमाणे असेल. हेच तर आमचे कल्याणप्रद शिवलिंग! शिवलिंगाखाली असलेली पिंड एका गोलाकाराला बरोबरची खूण वा दोन समांतर रेषा जोडल्याप्रमाणे दिसते. ही समतल गोल विस्तृत भूमी प्राणवायू सर्व बाजूने समानतेने शरीरात पसरल्याचे प्रतिक! (assimilation & absorption)  हा सर्व प्राणवायू सर्व पेशींना पोचवून पेशींमधला एकत्र केलेला, बाहेर टाकून देण्यास सज्ज असलेला दूषित वायू एका कॅनॉल मधून, पाटामधून, दोन समांतर रेघांच्या खुणेमधून परत निसर्गात टाकला जातो. 

समुद्राच्या पाण्याची सतत वाफ होऊन ती वरती जात असते.  त्याचे ढग बनून पाऊस होऊन खाली येत असते. हे कल्याणकारी निसर्गचक्रही Hyperbola म्हणजे शिवलिंगच आहे. हे पाणी धरणीवर सर्वत्र पसरल्याचे दाखवणारी आणि शेवटी ते सारं पाणी एकत्र येऊन पाटातून वा फनेल शेपच्या आकाराने परत समुद्राला मिळाल्याचे प्रतिक म्हणजे शिवलिंगाखालील पांडुरंगाच्या गंधाच्या आकाराची भूमी! तीच ती दोन समांतर रेघांची खूण.

 एखाद्याचे प्राणोत्क्रमण झाले की प्राण/ आत्मा वा तो जीव वर आकाशात स्वर्गस्थ झाला म्हणतात.  जीव जन्माला येतांना मात्र आकाशातून / स्वर्गातून/  वा उल्कारूपाने खाली आला असं समजतात.  कुठल्याही धर्मात स्वर्ग वर आकाशाच्या दिशेलाच दाखवला जातो आणि पाताळ जमिनीच्या खाली. ह्या जन्ममृत्यू चक्राचा आलेख काढायचा झाला तरी तो एक Hyperbola म्हणजे शिवलिंगच येईल. विश्वाचा विस्तृत प्रपंच शिवलिंगाखालील गोल भूमी दर्शवते तर  एका बाजूला त्याला जोडलेल्या समांतर रेषा परत हा जीवनाचा ओघ अंताकडे जातांना दर्शवतो.

जीवनाचा, नरदेहाचा, सकल विश्व प्रपंचाचा, त्यांच्या मधे असलेल्या समानतेचा म्हणजेच ``जे पिंडी ते ब्रह्माडी''चा इतका सविस्तर विचार हिंदू धर्मातच दिसेल. 

असे शिव आणि शिवा म्हणजे पार्वती सर्व विश्वाचा रसोत्सव आहेत. अविरत चाललेला हा रसांचा महोत्सव विश्वाच्या अस्तित्त्वासाठी आवश्यक आहे. त्या रसोत्सवावर कोणाचेही नियंत्रण शक्य नाही. अनादि अनंत काळापासून ते चालू आहे चालूच राहील. त्याचा कर्ता कोणालाही माहित नाही. कर्ता आाणि क्रिया हेही वेगळे नाहीत. एखाद्या विशाल यंत्रांचे अनेक छोटे छोटे भाग असावेत त्याप्रमाणे आपणही सारे त्याचाच एक अंशमात्र भाग आहोत. अशा ह्या जगताच्या कल्याणस्वरूप, शिवस्वरूप मायबापांना वंदन करतांना श्री आद्य जगद्गुरू शंकराचार्य उमा महेश्वर स्तोत्रात म्हणतात,

नमः शिवाभ्यां सरसोत्सवाभ्यां

नमस्कृताभीष्ट-वरप्रदाभ्याम् 

नारायणेनार्चित-पादुकाभ्यां

नमो नमः शंकर-पार्वतीभ्याम् ।। 2

 

संपृक्त आनंदरसेची  दोघे । कृपाळु मेघासम सौख्यदाते

करीति भक्तांवर सौख्यवृष्टी । उमा महेशास प्रणाम त्याची ।। 2.1

 

भक्ता मनीचे गुज ओळखोनी  तयास देती वर योग्य तोची

मुकुंद ज्यांचे पद वंदितोची । उमामहेशा नमितोच त्या मी ।। 2.2

कित्येक वेळेला निसर्गात होणारे उत्पात सर्वच प्राणीमात्रांना भयभीत करतात पण तरीही हे विश्व चालण्यासाठी तेही आवश्यक असतात. म्हणून पुष्पदंत आपल्या शिवमहिम्नात म्हणतो,

जगाच्या कल्याणा कृति तवचि प्रत्येक असते

जगासी सा र्‍या या परि भिववि हे तांडव कसे?

कृती कल्याणाचीपरि न कळते ही तव मुळी

प्रभो सामर्थ्याची उचित असुनी  दुःखद कृती।।16.4

अशा ह्या सनातन प्रतिकामागील थोर संकल्पना जाणून न घेता, पदोपदी त्याचा कोणी अपमान केला म्हणून त्याचे महत्त्व, थोरवी यत्किंचितही कमी होत नाही.

( हे संपूर्ण माझे मत आहे.  स्वच्छ मनाने पाहिल्यास सर्व निसर्गाचे अवलोकन करून आपल्या पूर्वजांनी केलेले हे graphical representation किंवा निसर्गाचे प्रतिक असावे असे मला वाटते.)

 

------------------------------------------

 

#लेखणीअरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -