2 ॥ दश-सुंदरी-चरितम् ॥ 2 पहिली मैत्री-
2 पहिली मैत्री
ह्या विश्वसुंदर्या दिशा सतत माझ्या बरोबर असल्या तरी त्यांची माझी खरी मैत्री लग्नानंतरच झाली. माझ्या माहेरी घरात सतत माणसांचा राबता असे. घराला कुलुप मी फारच
अभावाने
पाहिल होतं.
घरही भर वस्तीत
असल्याने
रस्त्यावर
उशीरापर्यंत
वर्दळ असे.
माणूस दिसणं हे किती किमती आहे हे जाणवलं
नव्हतं तेव्हा. रोज माझ्याभोवती अलगद फिरणार्या दिशांचीही कदर नव्हती मला. लग्नानंतर
मात्र हातात चुडा भरून प्रवीण दीक्षितांसोबत औरंगाबादला आले.
प्रवीण
ASP (Assistant Superintendent Of Police) होते.
(तेव्हा औरंगाबादला पोलीस कमिशनरेट झाली नव्हती.) चुडा भरतांना
मनगटावरून
उतरलेलं
घड्याळ
माहेरीच
राहून गेलं होतं.
एकटा जीव सदाशिव असलेल्या दीक्षितांच्या घरात दुसरं घड्याळ नव्हतं. जे होतं ते त्यांचं मनगटी घड्याळ त्यांना अत्यंत आवश्यक असल्याने घरी माझ्यासाठी ठेऊन चालणार नव्हतं. घड्याळ आणायला जायचं होतं पण रोज काही कारणं निघत असे. कधी दोन गटात तणाव, तणावाचं दंगलीत रूपांतर, कधी मर्डर,
कधी मोर्चा, वा कधी ऑफिसमधेच भेटायला येणार्यांची
गर्दी ---- एक ना दोन आणि आम्ही बाहेर निघालेलो
असतांनाच, तर कधी अर्ध्या
रस्त्यातून
प्रवीणना
तातडीने
जायला लागे.
मला घरी पोचवायची
वेगळी व्यवस्था
होई.
अथवा मी 15 मिनिटात येतो असं
सांगितलेल्या प्रवीणसरांची वाट बघता बघता दिवसच
संपून जाई.
एक ट्रांझिस्टर
होता घरात.
तो सतत चालू असे.
मला वेळ कळे पण रात्री
साडे अकराला
``बेलाके फूल’’ बरोबर तोही झोपी जायचा आणि इकडे पोलिसांचा दिवस उजाडायचा.
प्रवीण आले की पहिल्यांदा
माझा प्रश्न
किती वाजलेएत?
``अडिच! फिरायला यायचय?’’
माझा एकटेपणा
जाण्यासाठी
प्रवीण उत्साहाने
विचारायचे.
हो! !!! – मी. रात्री
अडिचच्या
मुहुर्तावर ‘‘सो गया है रस्ता-----’’ अशा सुनसान रस्त्याने
फिरायची
मजा काही औरच होती. दहा पंधरा मिनिटं
चालल्यावर
रस्त्याला
असलेल्या
एका कट्ट्यावर
आम्ही बसायचो.
नेमका त्याचवेळेला
लाबूंन
गस्तीचा
पोलीस येतांना
दिसायचा.
``त्याच्याकडे बघू नको.
विरुद्ध
दिशेला
बघ.’’ प्रवीण
सांगत रहायचे.
आम्ही दोघेही
त्याच्याकडे
लक्ष नाही असं दाखवत असलो तरी साहेब त्याच्या पत्नीसोबत बसलेले पाहून काय करावं हे त्यालाही उमगायचं नाही. तो पुढे गेला. आम्ही हुश्श! करून सुस्कारा सोडत असतांनाच त्यानी मागे वळून पहायला एकच गाठ
पडे. साहेबाचं आता तरी लक्ष आपल्याकडे
आहे म्हटल्यावर
अबाऊट टर्न करून कडक सॅल्यूट
ठोकला.
प्रवीणने
सॅल्युट
रिटर्न
करत आम्हीही
घरी रिटर्न
होत असू. रात्री अडिच वाजताही
एकांत अवघड होता.
पूर्वीच्या
राजाचं
बरं होतं.
तीन टाळ्या
वाजवल्या
आणि एकांत म्हटलं
की सारे निघून जायचे.
तरीही इतर जनांपेक्षा वेगळं असलेलं हे फिरणं मनातून सुखावत असे.
पण दर वेळेला
प्रवीणसरांना यायला मिळेलच
असं नसे.
अशा वेळी किती
वाजले असतील ह्याचा
अंदाजच
यायचा नाही.
एक? दोन?
साडेतीन?
छे! कळावं कस? माझ्याकडे
जीवाभावाचा
असा पोलीसांचा
100 नंबरच
असे.
एकदा फोन लावून विचारलं
दीक्षित
सर आहेत का? त्यांच्या
घरून बोलतीए.
पलिकडून
आदबीने
``सर आत्ता कामात आहेत.
SP साहेबांसोबत
आहेत.’’
सांगितल्यावर
मी पटकन किती वाजलेएत
विचारून
घेतलं.
पण हाय रे दैवा! पलकडून
उत्तर यायच्या
आतच स्वतः SPनी फोन हायजॅक केला. स्वतः SPच फोनवर आले. ``मिसेस दीक्षित घाबरू नका. तुमचा नवरा माझ्यासोबत आहे. अजून प्रवीणनी मला लग्नाची पार्टी दिली नाही. आता मी तुमच्याच हातचे बटाटेवडे खायला येणार आहे.’’ मला धीर देण्यासाठी
ते पाच मिनटं बोलले.
मला भीती वाटत नव्हती
पण बाहेर किती वाजलेएत हा
माझा प्राथमिक गरजेचा प्रश्न होता. बाहेरच्या निसर्गाशी माझ्या शरीराच्या घटनाक्रमाला जोडणारा प्रश्न होता. मनाला दिशाहीन, सैरभैर करणारा, झोप न लागू देणारा प्रश्न होता. मी आता काय करायचय? झोपायचय? उठायचय? आवरायचय? माझ्या अज्ञानातून निर्माण झालेला प्रश्न होता. रात्र किती झाली होती माहीत नाही.
पहाटे फटफटतांना एक वारकरी रोज एकतारी वाजवत गात जाई. मला तो साक्षात देवदूत वाटे. त्या एकाकी शांततेत त्याच्या एकतारीसोबत भजनाचा आवाज आला की अपसूक देवाच्या देव्हार्यासमोर येउन हात जोडावेत तशी मी सज्जात येऊन उभी राहत असे. पैरण/ गुडघ्यापर्यंत धोतर, वर पांढरी बंडी, पांढरी वारकरी टोपी, हाताततल्या एकतारीवर भजन गात संथ पावले टाकतांना त्याच्या गळ्यातून उमटणारे सूर `` जग शांत झोपले हे ----- घेऊन एकतारी -- - गातो कबीर दोहे ‘’– असं काहीसं वाटे. त्याचा तो एकतारा कानांना ऐकू येईपर्यंत आणि वळणावर तो नजरेआड होईपर्यंत मी त्याला डोळे भरून पाहत असे. बाकी वेळला तशीही त्या रस्त्याला गर्दी नसे. संध्याकाळनंतर हळु हळु सारंच शांत होत होत रात्री तुरळक एखादा माणूस तासा दोन तासांनी दिसला तरी खूप बरं वाटे. सज्जात एकट्यानी बसून कोणी माणूस दिसायची वाट पाहात रहावे लागे. अशी एकटीनी रहायची माझ्यावर माहेरी कधीच वेळ आली नव्हती. हा एकांत नवीनच होता. तेवढ्यात रस्त्यातून जाणार्या एका माणसाला पाहून इतकं बरं वाटलं की काय सांगू! तो हाकेच्या टप्प्यात जवळ येताच उत्स्फूर्तपणे ``ओ दादा! ओऽऽऽ दादा!! किती वाजलेएत हो?’’ मी वरतून अधीरपणे ---- खरतर आधाशासारखच विचारलं. माझ्या अशा हाका मारण्याचा परिणाम मला माहित नव्हता. निर्जन रस्त्यावर त्यानी मागे वळून पाहिलं. बाजूला इकडे तिकडे पाहिलं. त्याला कळावं म्हणून मी त्याला सांगितलं, ``दादा मी वरतून बोलतीए.’’ त्यानी वर पाहिलं. मला तो स्पष्ट दिसत असला तरी त्याला झाडामुळे वा बाल्कनीच्या ग्रिलमुळे मी दिसत नसावे. तो घाबरला. भ्यायला. मध्यरात्र, रस्त्यावरचे मिणमिण दिवे, निर्जन रस्ता, तरुण मुलीचा आवाज, किती वाजलेएत विचारणा, झाडाकडे वरती बघायला सांगणं, त्याच्या तोंडातून शब्द फुटेना, तो प्रचंड घाबरून जीव खाऊन पळत सुटला. काही क्षण सर्व पाहून मी थिजून गेल्यासारखी, पुतळ्यासारखी उभीच राहिले. मग भानावर येताच मला हसावं का रडावं कळेना. कदाचित कुठल्याशा कंपनीची वा रेल्वेची कामाची शिफ्ट संपवून तो घरी जात असावा कारण पुढच्या दिवशीही मला तो माणूस त्याच वेळेला लांबून येतांना दिसला. ओळखू आला. तोच सुनसान रस्ता, मिणमिणता प्रकाश, स्तब्ध उभी असलेली झाडं, नीरव शांतता. तोच कालचा माणूस! मधेच सर्रकन अंगावरून जाणारी गार वार्याची झुळुक! आणि ऽऽऽ मीही तशीच सज्जात ---- फक्त आज तो घराच्या बाजूने न जाता रस्त्याच्या पलिकडच्या बाजूने जात होता. आज त्याची चाल थोडी विचलित वाटत होती. रस्त्याच्या पलिकडच्या बाजूनेही बहुधा राम राम म्हणत जात असावा. घाबरलेला दिसत होता. घर आणि ते झाड जवळ आलं मात्र, --
घराच्या टापूत प्रवेश करताच, नुसत्या
कालच्या आठवणीनेच तो
कालच्या
सारखाच
जीव मुठीत धरून जीवाच्या आकांतानी पळत सुटला. मला हसू येत होत. पण जोरात हसू आलं असतं तर अनर्थ झाला असता. मन माणसांमधून भुतं कशी निर्माण करतं, एका माझ्यासारख्या तरुणीची पिशाचीण कशी होऊन जाते-- ह्याचा
मी अनुभव घेत होते.
आपण कोणाच्यातरी
मनात चेटकीण वा हडळ
म्हणून
पक्के बसलो आहोत ही गोष्ट कधी मला आश्चर्यकारक
वाटे.
कधी खेदाची
वाटे.--- तर कधी माझीच हसता हसता मुरकुंडी
वळे.
त्या पळत जाणार्या
माणसाला
मी हाक मारली तर कदाचित
तो भीतीने
बेशुद्ध
पडेल नाही तर भुताने पछाडल्यागत खरोखरचा ठार वेडा
होईल ह्या भीतीने परत मी कधी कोणालाच
किती वाजले विचारायचं
धाडस केलं नाही.
पण दोन चार दिवसात
बाहेरच्या
बाल्कनीत
बसलेल्या
मला आकाशातून
प्रवास
करणारे
तारे एखादा दुसरा ग्रह खुणावून
जाई.
वार्यांच्या
उष्णतेत
येणारी
नमी,
पहाट होत असेल तर येणारा
सुखद गारवा कळू लागला.
अंगप्रत्यंगांनी
निसर्गाचं
घड्याळ
मला जाणता येऊ लागलं.
बाल्कनीत
येताच दोन वाजले,
पहाटेचे
चार वाजले हे निसर्ग
मला सांगू लागला.
आकाशातील तार्यांचं पुढे सरकणं, आकाशाचा रंग दाट काळा पासून फटफटण्यापर्यंतचे रंगबदल, दूरवरून येणारे फुलांचे सुगंध, हवेत पसरलेले इतर वास---वातावरणातील तापमानाचा फरक--- आजपर्यंत मनातच दुमडून ठेवलेल्या माझ्या मन-बुद्धीच्या अँटेना बाहेरच्या
दिशांनी
दाही दिशांमधे उघडला गेला.
दिशादिशातून
येणारे
संकेत ग्रहण करायला
सज्ज झाल्या.
दूरवर झालेल्या
पावसाचे
वास मला येऊ लागले.
धुळीच्या
वादळाची
धूळ धुळीच्या
वादळाचे
संकेत देऊ लागली.
दशसुंदर्यांनी, भुवनसुंदर्यांनी, दाही दिशांनी
मला त्यांची
मैत्रीण
होशील का विचारत
हात पुढे केले.
त्यांच्या
हातावर
हात ठेऊन मीही माझी सम्मती
दिली.
त्यांचे
हात कायमचे हातात
धरले.
---कधी
न सोडण्यासाठी--
आणि आम्ही जिवलग मैत्रिणी
झालो.
यथावकाश
फावरलुबाचं
गजराचं
घड्याळ
घरात आलं तरी आमच्या
अतुट मैत्रीत
खंड पडला नाही.
-------------------------------------------
1 माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी
3
4
5
6
7
8
9
10
Comments
Post a Comment