1॥ दश-सुंदरी-चरितम् ॥ माझ्या जीवाभावाच्या दहा मैत्रिणी -

 


।।सुन्दरीरिम् ।।

1 माझ्या जीवाभावाच्या दहा मैत्रिणी -

माझ्या मैत्रिणी, माझ्या जीवाभावाच्या सख्या, सांगाती, सोबती, माझ्या पाठीराख्या, माझ्या प्रत्येक गोष्टींच्या साक्षीदार! विश्वसुंदरी म्हणू का स्वर्ग-सुंदरी?  काय म्हणू तरी काय मी त्यांना ! मी जिथे  जिथे जाईन तिथे तिथे माझ्या हातात हात घालून त्या माझ्या सोबत असतातच.  त्यांचा हात धरुन माझं मन सतत सुंदरसा बॅले करत असतं - - कुठल्यातरी गूढगूढ प्रदेशात. कधी हिमालयाच्या बर्फाच्छादित मणिमहेश, कांचनगंगा शिखरांवर, कधी लडाखच्या गोलबकांग्रीच्या शिखरांवर, तर कधी वसुंधरेच्या हिरव्यागार हिरवळीवर. कधी समुद्राच्या नीलम तलम तरंगांवर, तर कधी शारदीय पौर्णिमेला यमुनेच्या काठाकाठानी कदंबवनातून येणारे बासरीचे सूर ऐकत. कधी कधी झाडांच्या हिरव्यागार छत्रीतून येणार्‍या सूर्य किरणाचा सोनेरी धागा पकडून त्या मला एखाद्या कोळ्यासारखं सरसर वर घेऊन जातात निळ्या निळ्या नभात तर कधी चंदेरी चंद्रकिरणाला पकडून वर - - वर - - वर- - - सप्तर्षिंचा पतंग उडवत साती आकाशांना भेदून, पार करून, सूर्य, चंद्र पृथ्वी - - -सार्‍या सार्‍या ग्रह मालेच्या  पलिकडे ! कुठल्यातरी विलक्षण जगात!

माझ्या ह्या प्रत्येक सखीची ऐटच न्यारी. प्रत्येकीचा वेगळाच तोरा. प्रत्येकीच्या डौलाचा अंदाजच काही और. प्रत्येकीच्या रुबाबाची खासियतच अनोखी. प्रत्येकीच्या दिमाखाचा बाजही लाजवाब. डोळे दीपून जावेत अशी प्रत्येकीची श्रीमंती. त्यांचा मोह न पडणं हेच अशक्य. ह्या दशसुंदरींनी माझ्या जीवनचा प्रत्येक कप्पा व्यापून टाकलय!  माझ्या मनाला भुरळ घालणार्‍या दहा विश्वसुंदरी म्हणजे दुसर्‍या तिसर्‍या कोणी नसून माझ्या भोवती सतत फेर धरणार्‍या दाही दिशा !

 

    

                             जीवनाला योग्य मार्गावर घेऊन जाते ती दिशा. माझ्या ह्या सर्व सख्यांच्या  सौंदर्याचा पडलेला विलक्षण मोह मला आयुष्याची एक सुंदर दिशा दाखवतो. परम परम आनंदाची----- विलक्षण उत्साहाची------गूढ रम्य कुतुहलाची - -माझी स्वतःची - - माझीच - -अगदी एकटी एकटीची! मी कुठेही गेले तरी ह्या सर्वजणी सोबतीला असतातच. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या चार दिशांसोबत येणार्‍या अग्नेय ,वायव्य, नैऋत्य ईशान्यही त्यांच्या आयांसोबत सतत बागडत असतात.

                  आई महालक्ष्म्या बसवायची तेंव्हा दोन्ही महालक्ष्म्यांच्यामधे माझ्या एखाद्या बाहुलीला त्यांचं बाळं म्हणून बसवत असे. हे बाळ नक्की कोणत्या महालक्ष्मीचं?  हा प्रश्न मला नेहमी पडे. तशी दोन दिशांचा हात धरून बागडणारी एक उपदिशा ही कोणाचं बाळं हे जरी आजही मला सांगता येत नसलं तरी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या चौघींनी धरलेल्या भोंडल्याच्या गोल फेरात अग्नेय ,वायव्य, नैऋत्य ईशान्यही त्यांच्या आयांसमवेत बागडत असतात. उरलेल्या दोघी उर्ध्वा आणि धरा मात्र ह्या आठही दिशांच्या कलाविष्कारासाठी सुंदरसा रंगमंच उभारून सतत नवचैतन्याने सजवून, किती प्रकारचे अद्भुत गालिचे घालून, डोळे दीपून जातील अशा नयनरम्य रंगसंगतीचे पडदे सोडून , वर रत्नजडित मेघडंबरी उभारून आणि अभिनव प्रकाशयोजना करून सज्ज असतात.  दाही जणीतली कुठली विश्वसुंदरी कधी, कुठे तिच्या कोमल हातात माझा हात धरून कसं आणि कुठलं अद्भुत जग दाखवून आणेल हे सांगताच येत नाही.

              इमारतीच्या टोकावर बसवलेला वातक्कुक्कुट वारा येईल तसा फिरत राहतो. त्याच्या सोबत असलेला बाण वार्‍याची दिशा दाखवत राहतो. बदलीचे मौसमी वारे वाहू लागले की किंवा राजकीय बदलाचे वारे वाहू लागले की बदलाच्या दिशेने अथवा बदलीच्या दिशेने तोंड वळवणं क्रमप्राप्तच असे. बदलाच्या दिशेने नाही गेला तर वारंवार बदलीच्या दिशेनी जाणं हा राजमार्ग ठरतो. पटणार्‍या बदलाच्या दिशेने जाऊन मनाची फरपट होण्यापेक्षा दुसरा राजमार्ग प्रवीण दीक्षितांनी पत्करला;

जाऊ देवाचिया गावा  घेऊ तेथेची विसावा 

घालू देवासीच भार   देव सुखाचा सागर 

म्हणत आम्ही बदलीच्या दिशेने जात राहिलो आणि डोक्यावर तुळस घेऊन विठुला भेटायला पंढरपूरच्या वारीला जावे तसा जीवनाचा प्रवास आमच्यासाठी आनंदयात्राच झाली.

-------------------------------------

2  पहिली मैत्री

3

4

5

6

7

8

9

10


Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती