लेबल -

 

लेबल -

लेबल हा अत्यंत चिकट, बिकट आणि काढण्यासाठी अत्यंत किचकट विषय आहे. बाजारातून घरी आलेल्या प्रत्येक गोष्टीला लेबलविरहीत करून तिला परिवार-फ्रेंड्ली” करण्यासाठी मला हातात कात्री, सुरी, सुई, चिमटा असली आयुध घेऊन कायम सज्ज रहावं लागतं. ही लेबलविरुद्धची लढाई भारत-चीन किंवा भारत-पाकसारखी रोजची चालू राहणारी असते.                          

 100% cotton असं लेबल असलेल्या कपड्यावरचं `तेलेबल मात्र 100% synthetic असतं. शर्ट/अंगरख्यावर त्यांना कॉलरशिवाय दुसरी जागा लेबल लावायला सापडत नाही. 100% cotton च्या शर्टवरचं100% synthetic लेबल  pain in the neck  ही इंग्रजी म्हण शब्दशः खरी करणारं असतं. अत्यंत वातड पोताचं कडक लेबल दुमडून, दुहेरी करून शर्टच्या कॉलरच्या शिवणीच्या आत खुपसून डोळ्याला दिसणार नाही अशा बारीक पण अत्यंत चिवट बळकट दोर्‍यानी खुबीने दोनतीन शिवणी घालून शिवलेलं असतं. एकवेळ कपडा फाटेल, लेबलावरचं कंपनीचं नाव धुवून धुवून अदृश्य होईल, कुचक्या दोर्‍याने लांब लांब विरळ टिप घातलेला कपडा एकवेळ सहज उसवेल पण, लेबल...... छे!!! कापावं तर  मानेवर फाटतं, उसवलं तर फरफरा नको तेही उसवतं. मला सिंदबादच्या गोष्टीतला खांद्यांवर बसलेला समुद्रावरचा म्हाताराच आठवतो. तो जसा त्याच्या पायांनी सिंदबादला घट्ट आवळून ठेवायचा तसं रोजंचं मानगुटीवर बसणारं हे लेबल काढलं नाही तर घालणार्‍यावर मानगुटीच्या भुतासारखं बसून रोज छळत राहतं. सुई घेऊन त्याचा एक एक टाका  उसवणं म्हणजे भारताच्या LAC वरून एक एक चिनी पाऊल मागे घ्यायला लावण्याइतकं खडतर असतं. लेबलचं आणि लेबलधारी गोष्टीचं नातं हे ``ये दोसती हम नहीं छोडेंगे; तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’’ सारखं जन्मज्मांतरीचं पक्क असतं.

 समजा हे लेबल तसच ठेवलं तर त्यावरून गरम इस्त्री फिरताच ते इस्त्रीच्या गालाला असं चिकटतं की पुढचा इस्त्रीचा कपडाही इस्त्रीच्या गालाला गाल लावताच लेबलचा जळित भाग शिक्क्यासारखा स्वतःवर उमटवून घेतो. शिवाय जळकं खरखरीत लेबल घालणार्‍याच्या मानेला घायाळ करतं ते वेगळच!

बरं शर्टावर किंवा कपड्यावर एक लेबल असेल तर ना? एक लेबल कंपनीच्या नावाचं, दुसरं, 100% Cotton चं, तिसरं किमतीचं, चौथं घशात जिभेमागे लोंबणार्‍या छोट्या पडजिभेप्रमाणे साईज सांगणारं छोटं लेबल. पाचवं प्लॅस्टिकच्या कडक दोर्‍याने शर्टच्या पुढच्या काज्यात शिताफिने कुलुप घातल्यासारखे किंवा हिंदी शिणुमातल्या नायिकेनी लग्नाच्या पहिल्या रात्री नाकात घातलेल्या बांगडीस्वरूप नथनी वा लमाण बाईच्या नाकातल्या बांगडी एवढ्या नथनीप्रमाणे! कुठल्यातरी प्राण्याच्या आतड्याप्रमाणे ती दडस प्लॅस्टिक तार कापताना माझ्या अनेक अशक्त कात्र्यांनी राम म्हटला आहे. पँटिवर असलेलं लेबल मणक्याची धुलाई केल्याशिवाय रहात नाही. पायमोजांच्या बाबतीत पायमोजांच्या जोडीला छेदून जाणारी प्लॉस्टिकची तार आणि त्यात डकवलेलं लेबल कमी पडत असावे म्हणून चिकटवलेले स्टिकर चारवेळा कपडा धुतल्यानंतरही कपड्याचा चिकटपणा सोडत नाही. गण्डस्य उपरी पिटीका संवृत्ता  म्हणजे दुखर्‍या टेंगळावर अजून काळपुळीचं काय दुःख असतं ते लेबल कडून शिकावं. सर्व लेबलं काढली ह्या आनंदाने अंगरखा परीधान करावा तर कडेच्या शिवणीत बेमालूम शिवलेलं लेबल हाताला कडकडून घासत माझ्याकडे पाहून  गब्बरसारखं खदाखदा हसत असतं. ``अभी कितने बचे हैं रे?’’ असं मीच बिचकून विचारत असते. लेबल कुठे कसं लावू नये आणि आपल्या ब्रँडचा उच्छाद किमान व पैसे देऊन वापरणार्‍यांना तरी देऊ नये हे ह्या कंपन्यांना कधी कळणार?

स्टिल आणि प्लॅस्टिकच्या वाट्या भांड्यांपासून चमच्यापर्यंत निर्दयीपणे चिकटवलेले हे असे असंख्य स्टिकर्स स्टीलची नवी भांडी जरा गरम करून लेबल काढायला जावं तर त्यावरचा फक्त पातळ प्लॅस्टिकचा कागद हातात येतो आणि लेबल बेरडपणे माझ्याकडे बघतच असतं. ग्लासाला जिथे लावायला नकोत तिथेच लेबल्स कशी काय लावतात न जाणे. लेबल जरी महत्प्रयासानी निघालं तरी एक चिकट पदार्थ मागे सोडूनच जातं. प्रत्येकवेळी ग्लास ओठाला लावला की हा चिकट पॅच ओठालाही चिकटवून ठेवतो. चमच्यांच्या पुढच्याच गोल भागांवर वर, खाली दोन्हीकडे असलेली लेबलं चमच्याची किम्मत निम्म्याने जरी कमी केली तरी, असे चमचे न घेणं हेच श्रेयस्कर वाटतं. चपलेच्या टाचेवर चिकटवलेलं लेबल काढलं तरी चिकट झालेल्या टाचेवरील लेबलच्या जागेवर धुळीचा काळा पॅच उमटवूनच विजयी मुद्रेने  कचर्‍याच्या पेटीत विसावतं. घरात येणार्‍या प्रत्येक लेबल्ड गोष्टी म्हणजे माझ्यासाठी खर्ड्याची लढाईच असते.

नवीन गोष्टींवरची लेबलं जेवढी जिकीरीची असतात त्याच्यापेक्षाही जुन्या गोष्टी खराब झाल्या म्हणून त्यांना दुरुस्तीला दिलं की लेबलात लडबडून येताना पाहून अ‍ॅक्सिडेंटमधे कसाबसा वाचलेला आपला नातेवाईक सर्वत्र बँडेज बांधून आल्याने ओळखूही येऊ नये तसे वाटते. हा थोड्याच दिवसाचा सोबती असल्याने त्याला डॉक्टरांनीही ठेऊन घ्यायला नकार दिलेला असतो. त्याप्रमाणे आपल्याला इतकेवर्ष साथ देणारे मिक्सर ओव्हनादि त्यांच्यावर एवढा खर्च करूनही आपल्याला लवकरच सोडून जाणार की काय असे वाटायला लागते.

ऑपरेशन झालं की टाक्यांच्या खुणा जशा शिल्लक राहतात, तशा मिक्सर, मायक्रोवेव्ह इत्यादि उपकरणं दुरुस्तीला गेली की एक पक्क लेबल पोटावर घेऊन येतात. पूर्वी युद्धामधे लढलेल्या सैनिकाच्या अंगावरील घावांचे व्रण पाहून तो किती लढायात मुर्दुमकी गाजवून आला हे कळायचं तसं ग्राइंडर मिक्सर, मायक्रोवेव्ह वरील न निघणारी लेबल्स त्यांनी माझ्याकडे काढलेल्या वर्षांची मोजदाद ठेवत असतात. त्याच्यावर कितीवेळा उपचार केले गेले, किती शस्त्रक्रिया केल्या ह्याच्या द्योतक असतात. दुरुस्त करणार्‍याचा पत्ता मात्र त्या लेबलवरून कधीच उडून गेलेला असतो. पुढच्यावेळेला नवीन डॉक्टर!  गाडी जितक्यावेळा सर्व्हिसिंगला जाईल तितकी लेबलं पाठीवर, गालावर लावून येते. अ‍ॅप्लायन्सेसवर चिकटलेली लेबलं निवडणुकीच्या आधी अमुक फुकट तमुक फुकट असा ‘‘सर्व फुकटचा’’ मखमली पावडरपफ मतदाराच्या गालावर फिरवून फिरवून ‘‘आता कसं गोड गोड वाटतय ना?’’ किमान असं तरी म्हटलं जातं.-- आणि मांजरीच्या डोक्यावर हात फिरवत राहिल्यावर मांजर जशी सुखावून डोळे मिटून घेते त्याप्रमाणे मतदारही चेहर्‍यावर फिरणार्‍या ‘‘फुकटच्या’’ मुलायम पावडरपफनी सुखावून डोळे मिटून बसतात. पण येथे मात्र पैसे देऊन महागडे कपडे घेतल्याची जाणीव आम्हाला निवडलं ना! आम्हाला मत दिल्याबद्दल ‘‘ भोगा आता आपल्या कर्माची फळ’’ टाईप अ‍ॅटिट्युड दाखवणारी असतात.  ``छोटा पॅकेट आणि वेदनेचा डबल धमाका म्हणजे लेबल.’’

----------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -