॥ दश-सुंदरी-चरितम् ॥ 3 दश मैत्रिणींनी दाखवलेली नवी दिशा-

 

   

॥  दश-सुंदरी-चरितम्  ॥  

3 दश मैत्रिणींनी दाखवलेली नवी दिशा-  

 ह्या दिशांनी निरनिराळी माणसं भेटवली, पोलीसदलाचीही ओळख करून दिली तशीच इतर वेळेला आपण गेलोच नसतो अशा किती किती  इवल्या टिवल्या गावां पासून ते मति गुंग व्हावी अशा भव्य शहरांतून फिरवलं. आपला देश असा आतून आतून पाहतांना त्याचं अंतरंग काही प्रमाणात माझ्या मनात उलगडत गेलं. चित्रित झालं; जे एका गावाला कायमचं राहून कधीच कळलं नसतं. विशाल भारताचं व्यक्तिमत्त्व माझ्या मनावर काही अंश का होईना कोरलं जात होतं. विशाल भारताच्या छत्रछायेत मला खरोखरच्या वैविध्यातील एकतेचा, सर्वत्र एक असलेल्या भारतीय संस्कृतीच्या स्पंदनाचा अनुभव येत होता.

           व्यास महर्षी त्यांच्या  नवग्रह स्तोत्रात चंद्राचं वर्णन करतांना, चंद्राचा पांढरा शुभ्र रंग समजाऊन सांगतांना कधी समुद्रावरचा धवल शंख उचलून दाखवतात, कधी हिमालयात नेऊन हिवाळ्याच्या सुरवातीला तेथील झर्‍यांवर तयार होत असलेले पांढरेशुभ्र बर्फाचे स्फटिक दाखवतात, तर कधी नुकता नुकता पडलेला पांढराशुभ्र हिमवर्षाव दाखवतात, तर कधी स्वयंपाकघरात आणून ``दधि शंख तुषाराभं --- ’’ (चंद्र दही, शंख, पाण्याचे तुषार, हिम ह्यांच्याप्रमाणे शुभ्र आहे.) म्हणत घट्ट विरजलेलं, पांढरं शुभ्र दही दाखवतात; त्याप्रमाणेच ह्या दश मैत्रिणींनी बाहेरचं विशाल जग , विश्वाचा अफाट पसारा दाखवता दाखवता मला कानाला धरून संसाराची आणि सोबत स्वयंपाकघराचीही दिशा दाखवली. आवडते पदार्थ खायला आवडत असतील तर ते करताही यायला पाहिजेत असं खडसावून सांगितलं शिकायला लावलं. ``कमलाबाई ओगलें’’नी पाठीवर ठेवलेल्या हाताने आणि लग्नात मैत्रिणींनी हाती ठेवलेल्या ``रुचिरा’’ने भलतच स्फुरण येऊन कधी भल्या तर कधी भलत्याच पककृती माझ्या हातून घडू लागल्या. तेव्हा मिक्सर ज्यूसर हा प्रकार फार भारी वाटायचा. म्हणजे अईकडेही अजुन आला नव्हता. मिक्सर वापरून इडली तर ज्यूसरवर वेगवेगळ ज्यूस बनवायचा मी चंग बांधला. थोडं चुकत माकत सुरू केलेले स्वयंपाकाचे प्रयोग कमलाबाई ओगल्यांनी हात धरल्यावर बरे होऊ लागले.  मी आणि कमलाबाई ओगले आजही एकमेकींचे हात धरून आहोत. कोणता बर पदार्थ बनवावा असा अभिनव विचार डोक्यात घोळू लागले की मी रुचिरा उघडून चाळत बसते. नंतर कितीही पुस्तकं निघाली, घेतली, घरात आली, तरी रुचिरा ते रुचिराच!    

------------------------

          सासू सासरे नसले तरी येथे बंडुसिंग, मेहताब आणि शेखलाल असे मला आखाडसासरे किंवा साहेबव्रता सवतोबा होते. माझ्यावर कडक लक्षही ठेउन होते.  प्रवीणसरांवर नितांत निष्ठा. हे पोलिस परिवारातील शिपाई प्रवीणसरांची सर्व कामे करत. मला हातही लावू देत नसत. युनिफॉर्म सतत तयार ठेवणे हे  शेखलालच्या आखत्यारीतील काम असे. गणवेश हा सर्व पोलीसांचा एकच असतो; बदल असतो तो खांद्यांवर. कोणाच्या खांद्यावर जबाबदारीचे किती ओझे आहे हे पाहून त्याच्या खांद्यावर चमकणारे तारे, सिंह, Sword Betton  आणि  Collar tabs/ gorget patches बदलत जातात. किंवा कोणाच्या खांद्यावर काय आहे हे पाहून पोलीसदलात तो ती उच्च पदावर आहे हे लक्षात येते.  युनिफॉर्मवर बरच काही लावावं लागे. स्टार्स,  नेमप्लेट, IPSच्या खांदयांवरील पट्ट्या  निळ्या सुंदर विणीच्या दोरीला लावलेली शिट्टी (whistle cord)  हे सर्व लावायची काही खास पद्धत असते. खूप दिवस सगळे मोजे अर्ध्यावर उलटे दुमडून ठेवलेले पाहून मी ते सुलट करून ठेवत असे आणि शेखलाल त्यांना परत टाचेपर्यंत येतील असे अर्ध्यावर उलटे दुमडून ठेवीत असे. मोज्यांची सुद्धा घडी घालायची रीत असते हे मी पहिल्यांदाच शिकले. मोज्यांची अशी घडी घातली की अत्यंत गडबडबीच्या वेळेलाही पावलात सरकवलेला मोजा सरळ वरपर्यंत ओढता येतो. सहज सरळ. कुठलीही झटापट न करता पटकन पायात वरपर्यंत सरकवला जातो.    

           प्रवीणसरांच्या प्रमोशनची आणि त्याला जोडून बदलीची वेळ जवळ येत होती. त्यामुळे आमच्या दोघांच्याही घरचे भरपूर पाहुणे येऊन जात होते. त्यांच्यासोबत त्यांना औरंगाबाद दाखवत मी फिरत होते. अजंठा, वेरूळ, घृष्णेश्वर, दौलताबाद तर शहरातील पाणचक्की,  झू------! बघता बघता मी पाहुण्यांना औरंगाबाद दाखवण्यात तरबेज झाले.

आधी कळस मग पाया असलेले हे वेरुळ लेणं खडकात वरपासून खोदायला सुरवात करून खालपर्यंत उतरत आलेलं! जमिनीच्या पोटात शिरत शिरत  जमिनीच्या पोटात भव्य कलादालन निर्माण करणारं! एकेकाळच्या ऐश्वर्यसम्पन्न तरीही अत्यंत सुसंस्कृत नागर संस्कृतीची साक्ष देणारं! शब्दांविना सर्व भावना पराकोटीच्या सुंदरपणे व्यक्त करणारं, अत्यत बोलकं मूर्तिमय विश्व! एक एक शिल्प  आपल्या इतिहासातील गोष्टी उलगडत जाणारं. शिल्प बॅले म्हणावं का? का शिल्पनृत्यनाट्य ?  त्या गोष्टी गाईड भास्करराव पोखारेंकडून ऐकता ऐकता त्या त्रिभंगाकृती कमनीय मूर्तींचे भाव बघत असतांना जणु जिवंत होऊन समोर उभ्या राहत. विवाहसमयी शिवाने हात हातात घेतल्यावर लाजून पायाच्या अंगठ्याने जमिन उकरणारी पार्वती सुंदर का; रावणाने कैलासपर्वत गदगदा हलवायचा प्रयत्न केल्यावर, मुखावरील स्मितहास्य जराही मावळू न देता पायाच्या नुसत्या अंगठ्याने कैलास पर्वत पूर्ववत दाबून रावणाला पाताळात गाडणारा सिंहकटी कमनीय देहाचा तरुण शिव सुंदर? ----- ही शिल्प नगरी पाहतांनाा तर अजंठ्याची रंगीत चित्र नगरी पाहताना  माझा हात धरून असलेली धरा  हळुच एका शिल्पासमोर मला नेऊन उभी करे. एक गंधर्व पाठीवर ओझे वाहून दमलेला. त्याच्या शेजारीच एक गंधर्व पतिपत्नी त्याच्यापेक्षा कितीतरीपट मोठं ओझं सहज हसत खेळत घेऊन जात आहेत. एकट्याला जीवनाचं ओझं दुःखद कष्टदायक  वाटतं. पतिपत्नी दोघं असले की तेच जीवन कसं उत्साही मधुर होऊन जातं! संकटाच्या राशीसुद्धा सहज उचलल्या जातात. ‘‘तू तिथे मी’’ हा मंत्र धरा मला देऊन गेली. जमिनीच्या पोटातील दिशा माझ्या जीवनाला दिशा देऊन गेली. अजिंठ्याची चित्र नगरी माझं आयुष्य चित्रमय करून गेली. तर दौलताबादचा किल्ला आणि शूलीभंजनसारखी ठिकाणं एकनाथांच्या पायाशी घेऊन गेली. पैठणची गोदावरी आणि नाथांचा वाडा आजही श्रीखंड्या कुठे भेटेल का?  ह्या उत्सुकतेने मी पाहून आले.

माझा एकटेपणा जावा म्हणून कधी प्रवीणसरांसोबत कामाच्या गावाला ही जायला मिळे. मग चोर पकडणारं पोलिसांचं कुत्रं वासाने माग काढता काढता एकदम त्याच्या हँडलर सह धावू लागे आणि बघता बघता चोर वा खुन्यावर झेपावत त्याला जागचं हलू देत नसे.  हे सर्व थरारक ड्रिल आणि कुत्र्याला हात लावायला मिळाल्याचा आनंद पुढचे काही दिवस मला सुखी ठेवत असे.

-----------------------------------------


Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)