सोन्याचे कण

 

सोन्याचे कण

                          ‘गीतेवर हात ठेऊन शपथ घेतो/घेते की, खरं सांगेन, खोटे बोलणार नाही.’ हे वाक्य ऐकलं की वारंवार माझ्या मनात विचारांचा कल्लोळ उठायचा. आज जी भगवद्गीता शाळेत निधर्मी राष्ट्राचे कारण सांगून शिकविली जात नाही, घराघरातूनही जिचे प्रभावीपणे उच्चाटन करण्यात आपण यशस्वी झालो आहोत, ज्या भगवद्गीतेकडे पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुसरण करतांना अप्रासंगिक वाटून आम्ही सोयीस्कर रित्या पाठ फिरवली आहे, ज्या भगवद्गीतेत काय सांगीतलं आहे हे आज आपल्याला माहीतही नाही - त्या? - - त्या?  गीतेवर हात ठेऊन खरे बोलण्याची  शपथ घ्यायची? - - केवढा हा विरोधाभास!

ज्ञानेश्वरीची ओवी -

परंतु आदरणीय विनोबांनी भगवद्गीतेला ‘गीताई’ संबोधले आणि मला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सोपी झाली. कुठल्याही परतफेडीच्या अपेक्षेविना आई मुलाला घडवत असते आणि मूलही तिचे अनन्यभावाने अनुकरण आणि अनुसरण करत असते. आईनी आपल्याला वाढवितांना सांगितलेल्या रामाच्या, कृष्णाच्या, अनेक महापुरुषांच्या गोष्टी, आणि गोष्टी सांगत भरवलेले घास आपण कालौघात  विसरूनही जातो पण प्रत्येक घासासोबत न कळत झालेले चांगले संस्कार, जीवनातले  प्रत्येक निर्णय घेतांना आपल्याला स्वाभाविकपणे चांगलं वागायला लावतात. योग्य निर्णय घ्यायलाच भाग पाडतात. म्हणूनच मनातल्या सर्वश्रेष्ठ सिंहासनावर बसवलेल्या आईची  शपथ घेऊन खोटं बोलायला कोणी धजावत नाही. त्याप्रमाणे अनन्यश्रद्धास्थान असलेल्या गीतेवर हात ठेऊन खोटे बोलणे सोपे राहत नाही.

 ‘ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता’ हे मराठीमायचे शब्द कानावर आले आणि लक्षात आलं की भगवद्गीतेच्या हृदयीचे तत्त्वज्ञान सर्व मराठी जनतेच्या हृदयी घालण्याचे काम ज्ञानदेव माऊलींनी इतके बिनबोभाट केले आहे की महाराष्ट्रच्या पिढ्यानुपिढ्यांमधे जनुकातून पाठवलेल्या संदेशाप्रमाणे गीतेचेच तत्त्वज्ञान वाहत आहे. पुढेही तत्त्वज्ञानाची ही जनुकं प्रत्येक मराठी पिढीला आपला अमृतस्पर्श करीतच राहतील.

 पाण्यावर साठलेल्या शेवाळ्यामुळे पाणी दिसू नये किंवा ढगांमुळे सूर्य झाकला जावा त्याप्रमाणे भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाचा अमूल्य खजिना संस्कृतच्या अज्ञानामुळे आपल्याला अप्राप्य होता. इतर भाषांमधे आजही तो दुर्लभच आहे. श्रीकृष्णानी सांगितलेले तत्त्वज्ञान व्यासमहर्षिंनी गीतेत सूत्ररूपात लिहून ठेवले. ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर वस्त्राची घडी उलगडून पाहिल्याशिवाय त्याचा रंग, पोत, त्यावरील वेलबुट्टी हे कळून येत नाही त्याप्रमाणे ही सूत्र रूपातील गीता जाणून घेण्यासाठी जिज्ञासूंना ती सविस्तर उलगडून दाखविण्याची गरज होती.  हे काम ज्ञानरायांनी केले. ज्ञानरायांनी हे सर्व तत्त्वज्ञान मराठीत आणले. जे शिशू जेमतेम दूध पचवू शकते ते ह्या तत्वज्ञानरूपी पक्वान्नाला कसे  बरे पचवू शकेल? ह्या विचारांनी त्यांनी रोजच्या व्यवहारातल्या अनेक दृष्टांतांच्या आधारे सर्व तत्वज्ञान सामान्य जनांना आवडेल, रुचेल, पचेल असे सोपे केले. वेदांच्या अध्ययनासाठी जो जो वर्ग उपेक्षित होता. त्यांनाही आपल्या पंक्तित बसवून त्यांनाही हा अमृताचा आनंद मिळवून दिला. मराठी जनासाठी अमृतमय तत्त्वज्ञानाचा क्षीरसागर तयार केला. ह्याच क्षीर सागरातून कावडी भरभरून घेऊन इतर संतांनी तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचविला. ‘बुडते हे जन पाहवेना डोळा’ अशा कळवळ्याने संतांनी ह्याच अमृतांनी, बुडणाऱयांना संजीवनी दिली. ज्यांच्या जवळ समर्थ शब्दांच्या कावडी नव्हत्या त्यांनी ओंजळीनी हे अमृत प्राशन केले. त्यांचेही जीवन धन्य झाले.

                        आज अनेक ठिकाणी फिरल्यानंतर महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे, श्रेष्ठ आहे असे प्रत्येकालाच कबूल करायला लागेल. महाराष्ट्रात येणारे परप्रांतीयही इथेच राहणे पसंत करतात. सर्वांचे म्हणणे एकच असते, की इथे सुरक्षित वाटते. इथे आमच्या मुली सुरक्षितपणे रात्रीबेरात्री फिरू शकतात. केवढी ही आश्वासक बाब!

                  अनेक छिद्रे असलेल्या घटात दिवा ठेवला तर त्याचा प्रकाश प्रत्येक छिद्रातून बाहेर डोकावतो. त्यानुसार मराठी माणसांच्या हृदया हृदयात जे ज्ञानेश्वरीच्या अमृतानुभवाचे तत्त्वज्ञान तेवत आहे ते त्यांच्या सर्व इंद्रियांद्वारा प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच एखाद्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेलाही बिकट प्रसंगात सापडल्यानंतर महाराष्ट्रच्या भूमीवर नुसतेच सुरक्षित वाटले नाही तर आईचा मानही मिळाला. द्रौपदीच्या  वाट्याला आलेले ‘कशास तोरा भोगदासीला’ असले हीण शब्द महाराष्ट्रात तिच्या वाट्याला कदापी आले नाहीत. शिवरायांच्या वर्तनातून डोकावणारा, समाजाला भानावर ठेवणारा हा लख्ख प्रकाश ह्याच तत्त्वज्ञानाच्या ज्योतीचा नव्हता का? तुकाराम, रामदास ह्या संताच्या शिकवणुकीचाच हा जय नव्हता का? शिवरायांच्या आचरणातून तमाम मराठी घराघरांमधे हृदया हृदयांमध्ये ह्याच तत्त्वज्ञानाची ज्योत चेतवली गेली. अगदी आत्ताचे ताजे उदाहरण घेतले तर मुंबईला झालेल्या बाँबस्फोटांच्यावेळी, किंवा ढगफुटीच्यावेळी एकमेकांचा परिचय नसतांना अनेकांनी एकमेकांना आसरा दिला. रस्त्या रस्त्यात उभे राहून लोकांना अन्न पाणी पुरवले. ही सहृदयता महाराष्ट्रात भिनलेल्या ‘पुण्य पर उपकार पाप ते परपीडा’ ह्या तत्त्वज्ञानाचा प्रकाश तेवत ठेवणारी नाही का? ह्या तत्वज्ञानाची नाळ त्या भावार्थदीपीकेच्या अमृतानुभवाला जोडणारी नाही का?

मराठी माणसाच्या सुदैवाची । अपूर्वता वर्णावी कैसी ।

की गंगा लाभे अमृताची। ज्ञानेश्वरीच्या रूपाने ।।

असे म्हटले तर वावगे ठरू नये.

                            अमेरीकेत दोन वर्ष असतांना तिथल्या प्रोफेसरांनी मुलांना विचारलेला प्रश्न आठवतो. “सुखी राहण्यासाठी माणसाला काय काय गोष्टींची आवश्यकता आहे? ” आणि मुलंही “बंगला, चांगला बँकबॅलन्स, S.U.V - - - '' अशी आपल्या आवडीची न संपणारी अनेक नावे घेत राहिली. जेंव्हा त्यांना ‘सुख बाहेरच्या गोष्टींमधे नाही. सुख आपल्या मनातच असते ’ असे सांगीतले तेंव्हा प्रोफेसरांसकट सर्वजण चक्रावून गेले. जवळ काहीही नसतांना माणूस आनंदात कसा असू शकेल? ‘कौपीनवन्त खलु भाग्यवन्त’ (अत्यल्पवस्त्री महाभाग्यशाली ) हा विचार त्यांना पटण्याच्या पलिकडे होता.

ज्ञानदेव सुखाचे लक्षण सांगतांना सांगतात (गीता अध्याय 13) ज्याचा लाभ झाल्यावर माणूस सर्व काही विसरून जातो तेच खरे सुख! 

‘ जे इंद्रियांच्या वृत्तीसी । निवांतपणे हृदयासी।

एकांती आणुनी तयासी । झोपविते थोपटुनी’

तेच खरं सुख! हा तत्वज्ञानाचा घास त्यांना झेपण्यासारखा नव्हता. सुख हे भोगावर नाही तर त्यागावर उभे असते हे कळण्यासाठी त्यांचा पाया इतका कच्चा राहून गेला आहे की त्यांची कीव करावी तेवढी थोडीच. त्या उलट महाराष्ट्रातल्या खेडेगावात राहणाऱया एखाद्या अशिक्षित  आज्जीबाईंना ‘आज्जी कशा आहात?’ विचारल्याबरोबर ‘ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असु द्यावे समाधान’ असं सहज त्यांच्या तोंडातून येते. हे उत्तर जसे वाटते तसे सहज येत नाही. जेंव्हा समाजाच्याच्या पिढ्यानु पिढ्या भारतीय-तत्वज्ञानाच्या अमृतरसात सम्पृक्त होतात, जेंव्हा हे तत्वज्ञान जीवनाचा भागच होऊन जाते, तेंव्हाच हृदयात स्थापित केलेल्या अमृताच्या निस्यंदिनी सारखे ते मुखावाटे पाझरायला लागते.  आणि कृतीवाटे आचरणातूनही उमटायला लागते.

                          आज एखाद्या पंचतारांकीत हॉटेलला सुद्धा आमच्या कुठे कुठे शाखा आहेत, आमच्याकडे काय काय सुविधा आहेत, आमच्याकडे इतरांपेक्षा काय वेगळं आहे. किती डिस्काऊंट आहे ह्याच्या जाहिराती कराव्या लागतात. पण पंढरीच्या वारीची ना जाहिरात ना डिस्काऊंट! सोयी सुविधांची नामोनिशाणीही नाही. तरीही ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा’ म्हणत लाखो लोकं वाटेवरचे दगड धोंडे काटेकुटे आजारपणं ह्यांची पर्वा न करता पायात चप्पल असेल तर असेल नाही तर अनवाणी मैलोनमैल चालत, पळत, टाळमृंगांच्या गजरात अभंग गात गात ज्या आसोशीनी पांडुंगाला भेटायला जातात आणि जे सुख मिळवतात ते पंचतारांकीत संस्कृतीला कळण्या पल्याडचेच म्हणावे लागेल. आणि एकदा का ‘तुका म्हणे देह भारीला विठ्ठले’ हा अनुभव आला की अशा लोकांच्या सहवासात आलेल्यांनाही ह्या विचारांची लागण झाल्याशिवाय रहात नाही. 

                                सोन्यातील हीण दूर  करण्यासाठी ज्याप्रमाणे त्याच्यावर अनेक प्रक्रीया करून त्याला मुशीतून तावून सुलाखून बाहेर काढले जावे तसेच, हाडावर चिकटलेल्या मांसाप्रमाणे समाजजीवनाला घट्ट चिकटून राहिलेल्या समाजातील चुकीच्या समजुती ज्ञानाच्या होमकुंडात हवन करून, अंधश्रद्धांना तिलांजली देऊन समाजाच्या मनातील अज्ञान दूर करण्याकरता ज्ञानेश्वरादि संतांनी आपले उभे आयुष्य वेचले. त्याचाच परिणाम म्हणून ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, रामदास, जनाबाई, गोरा कुंभार, सावतामाळी, चोखोबा अशा संत परंपरेनंतरही, समाजाला जागवणारे ‘जागले’ म्हणून समाजसुधारकांच्या पिढ्या टिळक, आगरकर, फुले, आंबेडकरांपर्यंत महाराष्ट्रात तयार होत गेल्या. मराठी मनाला जागवत राहिल्या. शिस्तबद्ध आयुष्याची, त्यागाची शिकवण देत राहिल्या. कुठचीही गोष्ट स्वीकारतांना बुद्धीच्या निकषावर पारखून घ्यायची सवय त्यांनी  आम्हाला लावली. देव सर्वत्र आहे हे म्हणणार्‍या ज्ञानरायांनी देवाचा बाजार मांडणार्‍या लोकांवर ओढलेले कोरडे आजही डोळे उघडविणारे आहेत-

(भगवद्गीता -अध्याय 13, श्लोक-11- श्री वरदानंद भारतींच्या ज्ञानेश्वरीच्या अनुवादाप्रमाणे )

वागे प्राणीमात्रासी निष्ठूर। भर मूर्तीच्या पूजनावर।

परी तेथेहि त्याचे अंतर। एकनिष्ठ न राहे कधी।।

माझी एक मूर्ती घडवी। ती घराच्या कोपर्‍यात बैसवी

आणि आपण नवीं नवीं । देवक्षेत्रे हिंडतसे।।

माझे अधिष्ठान असता घरी । नवस अन्य देवा करी

पितृकार्याच्या अवसरी । भक्त होतो पितरांचा

एकादशीच्या दिवशी। प्रेमे पूजितो विष्णूसी

त्याच भावे पंचमीसी । पूजन करितो नागाचे।।

नेमकी येता चतुर्थी । हा गणेशाप्रति प्रार्थी

चतुर्दशीसी परी स्वार्थी । म्हणे दुर्गे तुझाच मी।।

वर्णाश्रमा जी पोषक । कर्मे नित्य नैमित्तिक

त्यांचा त्याग करून देख । नवचंडीचे व्रत घेतो

सवेच अर्जुना रविवारी । भैरोबाची तळी भरी

बेल घेऊन सोमवारी । पूजू धावे शिवलिंगा

ऐसा सर्व देवांसही । एकटाच भजत राही

यथासांगपणे काही । हातून ह्याच्या घडत नसे

ऐसा अखंड भजन करी । विश्रांती न घेता क्षणभरी

जैशी वेश्या वेशीवरी । राहून तोषवी सर्वांना।।

                     पाश्चात्य विचारांच्या मातीतून उगवलेल्या आजच्या संस्कृतीत बर्थडे सेलिब्रेशनची स्पर्धा चांगलीच फोफावली असली तरी आत्ता आत्तापर्यंत, मुलांना एखादे सत्कृत्य करायला सांगून किंवा चांगली गोष्ट शिकवून वाढदिवस साजरे होत होते. आपल्या बाळाला नजर लागायला नको म्हणून वाढदिवसाच्या दिवशी असतील ते कपडे घालून शाळेत पाठवणारी, ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानात मुरलेली सानेगुरुजींची माऊली आत्ताच्या मम्यांपेक्षा जास्त लोभस वाटते.

ज्ञानदेवांनी (भगवद्गीता अध्याय -9, श्लोक 34 मधे) दिलेल्या ह्या ओळी हृदयाला कितीही खडखडीत वाटल्या तरी विवेकाच्या निकषावर घासून खर्‍या उतरलेल्या आहेत.

जो रंगला विषयोपभोगात । त्यास म्हणती आहे सुखात

जो लोभाने झाला ग्रस्त । त्यास म्हणती शाहणा हा।। 578

ज्याचे आयुष्य थोडे उरले । बुद्धि गेली बळ संपले

त्याची वंदिती पाऊलें। वडील म्हणून या लोकी।।

बाळ वयाने वाढले । मायबाप आनंदले।

आता आयुष्य उणावले । याची खंत नसेकोणा ।।

जन्मल्यापासून दिवसमासी । जवळीक होते काळासी

वाढदिवस करिती उल्हासी । त्याच्या गुढ्या उभवून हे।।

मृत्यू शब्दास घाबरती । मृत्यू होता रडत बसती ।

परी मूर्खपणे ना मोजिती । आयुष्य वाया जाणारे।।

                       इतके परखड मत मांडायचे धाडस आज सुद्धा आम्ही करू शकणार नाही. न पटलेल्या गोष्टींना नाही म्हणण्याचं धाडस त्यांनी मराठी मनात तयार केले. वर्णाश्रमाला योग्य काम म्हणजेच विहित कार्य. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण स्वेच्छेने स्वीकारलेली (तुमच्या आवडीचे वा निकडीचे ) नोकरी अथवा धंदा. ‘विश्व स्वधर्मसूर्ये पाहो’ असं म्हणतांना आपण स्वीकारलेलं काम हाच स्वधर्मसूर्य आहे तोच तुम्हाला योग्य मार्गदाखवेल हेच ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे.  ते काम मनापासून करणे हीच देवपूजा मानावी. नोकरीचं काम अर्धवट सोडून किंबहुना त्या कामशी माझा काय संबंध अशी त्याची पर्वाही न करता सुट्या टाकून आज वैष्णोदेवी, उद्या अमरनाथ, परवा कैलासमानस फिरत राहणे म्हणजे देवदेव करणे नाही. माऊलीच्या ह्या विचाराने भारलेल्या संत सावतामाळींना आपल्या मळ्यातच देव सापडला आणि ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई’ होऊन गेली. आपले काम हाच आपला देव ! इतका साधा सोपा देव आपल्याला दाखवायचे काम संतांनी केले.

साहित्यावर परीणाम

                     ज्या प्रमाणे रिलेच्या शर्यतीत बेटन मागच्या खेळाडूकडून पुढच्या खेळाडूकडे सोपविले जाते, तद्वत ज्ञानदेवांकडून तुकाराम, संत सावतामाळी इत्यादि अनेक संताच्या हातातून आलेली ही तत्त्वज्ञानाची पताका अनेक ओव्या, अभंगांमधून, गौळणी, भारुडं, गाण्यातून, अनेक भक्तिरचनातून,िलखाणातून आजच्या पिढीच्या हातात आलेली पहायला मिळते. ‘उषकाल होता होता काळरात्र झाली’ अशी परिस्थिती निर्माण होताच, ज्ञानदेवांनी पेटवलेल्या जीवनाच्या होमात अनेकांनी आपल्या आयुष्याच्या मशाली पेटवलेल्या दिसतील. ज्याप्रमाणे एका दिव्याच्या वातीवर लावलेले अनेक दिवे उजळले तरी सगळ्यांचा प्रकाश सारखाच असतो, त्याप्रमाणे सर्वच संताचा उपदेश मानवतेला साद घालत राहिला. वाटा अनेक असल्या तरी सर्वांचे गंतव्यस्थान एकच असल्याने सर्व मार्गांमधील परस्पर सामजस्य टिकून राहिले. डोळसाचा हात धरून चालणारा नेत्रहीन जसा योग्य जागी पोहोचतो तसे माझ्यासारखे अनेक अज्ञानी योग्य मार्गाला लागले.

कविवर्य बोरकरांनी तमाम कोकणी, मराठी आणि इतर कवी आणि लेखकांना आवाहन केलं की, जो पर्यंत तुम्ही मराठी संत साहित्य वाचत नाही तो पर्यंत तुमच्या लेखणीला अमृतस्पर्श होणार नाही. कविवर्यांच्या लेखणीतून उतरलेल्या खालील ओळी

‘नाही पुण्याची मोजणी । नाही पापची टोचणी । जिणे गंगौघाचे पाणी

कशाचा न लागभाग । कशाचा ना पाठलाग । आम्ही फुलाचे पराग’

ह्या काही वेगळं सांगत नाहीत. टि.व्ही. वर आजही सात -आठ वर्षाची चिमुरडी  ‘शांती हे नागवेली। पान घेऊनीया करी। मीपण जाळुनीया । चुना लावियेला वरी।। असा भक्तिरंगात रंगलेला विडा सहजपणे श्रोतेरूपी जनार्दनास अर्पण करतांना दिसते. काम करता करता गृहिणी ‘केशवा माधवा’ म्हणून त्या ईश्वराचा धावा नकळत करत असते. ‘जीवन त्यांना कळले हो । मी पण ज्यांचे पक्वफळापरी सहजपणाने गळले हो’ ह्या कवितेच्या ओळी असोत अथवा ‘कर्तव्याने घडतो माणूस - -’, ‘देव देव्हाऱयात नाही देव नाही देवालयी। देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई’ किंवा ‘देहाची तिजोरी भक्तिचाच ठेवा’ अशी गाणी जीवनाचा भाग बनून गेली आहेत. ग. दि. माडगूळकरांच्या रचना तर मराठी मनाच्या जडघडणीचा भक्कम चिराच आहेत. किती किती उदाहरणं सांगावीत? हाती घेतलेली ही तत्त्वज्ञानाची मशाल पुढच्या पुढच्या पिढीकडे सुपूर्त करणाऱयांची यादी न संपणारी आहे. सहाव्या अध्यायाचे निरूपण करतांना ज्ञानदेव मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतात

माझे कौतुके मराठी बोल । अमृता पैजेने जिंकतील

ऐसी मी अक्षरे रसाळ । गीता सांगता मेळवीन।।

ज्ञानेश्वरीच्या काठावर उभे राहून नुसती दृष्टी जरी टाकली तरी ह्या अनंत रत्नाकराची प्रचीती येईल. गीतार्थ समजाऊन सांगतांना ज्ञानदेवांनी ज्या अनंत उपमा, दृष्टांत दिले आहेत ते मराठी साहित्याची अनमोल लेणीच बनून गेले आहेत.

1) ज्या महात्म्याच्या ठायी देहभावच उरत नाही त्याच्या बुद्धीला हे काम मी केलं ही जाणीवही उरत नाही हे समजवून सांगतांना ज्ञानेश्वर सोप्या भाषेत सांगतात- जसे अर्भकाचे हातपाय सहजपणे हालत राहतात तसा कर्मयोगी सहजपणे कर्म करतो.

2) अध्याय 18 श्लोक 17 अविद्येची झोप लागून विश्वाचं स्वप्न बघणाऱयाला सद्गुरूने हाक मारून, चापटी मारून उठविल्यावर मायेची झोप सरते. जीव जागृत होतो. विश्व हा स्वप्नाभास आहे हे त्याच्या लक्षात येते. बालपण संपले की बागूलबुवाचे भयही संपते. चंद्रप्रकाश पसरला की मृगजळाचा भास सरतो. तशी प्रबुद्ध झालेल्या जीवाठायी अविद्याही उरत नाही. मी, माझे हे दोन्ही विरून गेले की कर्म बंधक होत नाही.

3) सूर्य अंधार शोधत भुयारात शिरला  तरी त्याला अंधार सापडत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान झालेल्याला अज्ञान उरत नाही.

4) पदार्थाला अग्नीचा स्पर्श झाला की जाळणारा आणि जळणारा असा द्वैत भाव संपतो. एक अग्निपण फक्त बाकी उरते

5) काष्ठात गुप्त असलेला अग्नी एकदा प्रकट झाला की लाकडाच्या पेटीत कोंडून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे ज्ञेय आणि ज्ञात्यांतला फरक संपला की  मी देह असे वाटणे संपून जाते तो सर्वव्यापक होऊन जातो.

6) पुतळ्याच्या हातातील शस्त्र, वेड्याच्या अंगावरील वस्त्र, गाढवाच्या पाठीवरील धर्मशास्त्र ह्याची जशी त्यांना जाणीव नसते त्याप्रमाणे  ज्ञानी माणसाच्या हृदयात मी कवी आहे, जिज्ञासू आहे शास्त्रप्रवीण आहे अशी कुठलीही जाणीव शिल्लक रहात नाही.

विशाल गंगेतील ओंजळभर पाणी उचलावं, पृथ्वीवरची चिमुटभर माती उचलून कपाळी अंगारा म्हणून लावावी तशी ही काही उदाहरणे. प्रत्यक्षात ज्या नशीबवान श्रोत्यांनी ही ज्ञानेश्वरी ऐकली, त्यांच्या तोंडचे उद्गार सच्चिदानंदबाबांनी ज्ञानेश्वरीत समाविष्ट केले आहेत.  श्रोते म्हणतात - “ज्ञानदेवा तुझ्या ह्या ग्रंथावर साहित्यिकांच्या पुढच्या कित्येक पिढ्या पोसल्या जातील.” आज असा एकही मराठी प्रतिभावंत लेखक, कवी,िकंवा साहित्यसम्राट सापडणार नाही ज्याला ज्ञानेश्वरीतील एकतरी उदाहरण आपल्या साहित्यात समाविष्ट करायचा मोह झालेला नाही. एकच उदाहरण देते- ज्ञानदेव म्हणतात,- भयंकर खवळलेली माया नदी स्वबळावर ओलांडून जाऊ म्हणणे हे खालील प्रमाणे आहे

अपथ्य करणारा जिंके व्याधी । साधूस कळे दुर्जन बुद्धि

वा आलेली सोडील सिद्धि । जरी विषयासक्त।।

जरी हरिणाचे पाडस। कुरतडू शकेल पाश

अथवा जरी मुंगीस । येईल मेरू ओलांडण्या।।

हे वाचल्यावर  ‘इथे ओशाळला मृत्यू’ मधील‘मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना?’ ह्या स्वगताची आठवण आली नाही तरच नवल. काही वर्षांपूर्वी वृत्तपत्रातील वाचनात आलेली एक बातमी सांगावीशी वाटते. ज्ञानेश्वरीच्या तत्त्वज्ञानानेभारून गेलेले एक मल्याळी गृहस्थ मराठी शिकण्यासाठी मुद्दाम महाराष्ट्रात आले. त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरीचा उत्तम अभ्यास केला. नंतर केरळमधे जाऊन त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरीचा मल्याळीभाषेत अनुवादही केला.

भारतीय तत्वज्ञानाची विशालता -

                    आपल्या संस्कृतीत कुठच्याही कृतीचं मीपण आपल्याकडे घ्यायची पद्धत नाही. नाहीतर पेटंट आणि मालकी हक्काप्रमाणे ‘टाईम्स सर्व्हे’नुसार  ज्ञानेश्वर  स्वतच्या बंगल्यावर सोन्याची कौल घालणारे जगातलील सर्वात अमीर व्यक्ति ठरले असते. ज्ञानेश्वरांनी नम्रपणे आपल्या कत्वृत्त्वाचं श्रेय निवृत्तिनाथांच्या पायी वाहून टाकले. श्रीमद् आद्य शंकराचार्य नावाच्या अजून एका जगद्गुरू कौपीनवन्ताच्या ‘ब्रह्मसूत्रभाष्याला’ प्रमाण मानून ही रचना केल्याचं सांगून मीपणाची उरली सुरली जळमटही झाडून टाकली. निवृत्तीनाथही सर्व श्रेय आपल्या गुंना गहनीनाथांना देतात. ही नाथपंथीयांची परंपरा, शेवटी ‘श्री शंकरांनी पार्वतीला जे सांगीतलं’ ते ज्या ऋषींनी ऐकलं त्यांच्याकडून आमच्यापर्यंत आलं अशी जाऊन पोचते. एखाद्या पुरातन विशाल वटवृक्षाला अनेक पारंब्या फुटाव्यात आणि मुळचा वृक्ष कोणता हे ओळखूच येऊ नये त्याप्रमाणे भारतीय तत्त्वज्ञानाचा वटवृक्ष अनेक फांद्या, पारंब्यांनी सघन असला तरी सर्व पारंब्यांमधे ‘सो।़हं’ हे एकच जीवन तत्त्व वाहत आहे. गंगा यमुनेच्या संगमात प्रवाहांचं वेगळेपण दिसत असलं तरी पाणीपण पाहू जाता एकताच प्रत्ययाला येते. हारातील फुलांना मोजायला उपयोगी पडणारं एक दोनचं गणित सुगंधाला मोजायला लागू होत नाही त्याप्रमाणे ह्या सर्वव्यापक तत्त्वज्ञानाला द्वैताच्या मताने आजमावता येत नाही.

भारतीय तत्वज्ञान एक परीस -

                          धर्मराजाचाराजसूय यज्ञ सफळ झाल्यावर त्यांनी सर्व प्रजाजनांना भोजन दिले. तेंव्हा तिथे एक अद्भुत मुंगूस आले. त्याचे अर्ध अंग सोन्याचे होते. ते तिथल्या उष्ट्यात लोळत होते. धर्मराजाला हा प्रकार विचित्र वाटला. धर्मराजानी त्याला तसे करण्याचे कारण विचारले. तेव्हा ते मुंगूस सांगू uççiçuçí “एका ब्राह्मणाच्या अनेक दिवस उपाशी असलेल्या कुटुंबाने, त्यांना बऱयाच दिवसांनी प्राप्त झालेली भिक्षा दारी आलेल्या अतिथीलाआनंदानी खाऊ घातली. त्या अतिथीनी जेऊन तृप्त होऊन हात धुतले. त्यातील काही शिंतोडे माझ्या अंगावर उडाले. माझ्या ज्या बाजूला ते शिंतोडे उडाले त्याबाजूचे माझे अंग सोन्याचे झाले. तेंव्हापासून मी माझे उरलेले अंग सोनेरी होण्यासाठी कित्येक अन्नदात्यांच्या घरी जात आहे. तुझा लौकीक ऐकून तुझ्याकडे आलो होतो. पण अरेरे!!  इथेही माझ्या पदरात निराशाच पडली.”

                आज मराठी माणसानी ज्ञानेश्वरी वाचलेलली असेलही वा नसेलही कदाचित. पण ज्ञानेश्वरांनी वाढलेल्या तत्त्वज्ञानाच्या ह्या सुग्रास पंचपक्वान्नाच्या थाळीतील जो एखादा अमृतकण आत्ताच्या पिढीतील लेखक, कवी, विचारवंतांच्या माध्यमातून मराठी माणसाच्या मनाला चिकटला आहे, त्याच्या हृदयाला स्पर्शला आहे, त्यानेच त्याचे जीवन थोडेफार तरी सोनेरी केले आहे. उरलेल्या जीवनालाही सुवर्णमय करायची मराठी मनाची धडपड असेल तर ते पाश्चिमात्य भोगवादी, चंगळवादी तत्त्वज्ञानाच्या खरकट्यात लोळून कधीही उजळून निघणार नाही. त्याच्यासाठी बावनकशी भारतीय तत्त्वज्ञानाचा परीसच आवश्यक आहे.

 आणि म्हणूनच श्री. वरदानंद भारतींच्या दोन ओळी उद्धृत करून ज्ञानदेवांना वंदन करते.

सुहृदं सर्वभूतानां । मातरं पितरं प्रभुम्

 प्रेमलं वत्सलं वन्दे । ज्ञानदेवं पुनपुन ।।

प्रसन्नं परमोदारं । वरदं सुस्मिताननम्।

आलन्दीवल्लभं वन्दे । ज्ञानदेवं पुनपुन ।।

----------------

ॐ तत् सत्

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -