प्रभास

 

प्रभास


मित्रांनो!

गद्य, पद्य, नाट्य, चित्र, शिल्प शास्त्र, गायन, गणित हे सर्व प्रकार स्वभावतःच एकमेकात इतके एकरूप आहेत की त्याना एकमेकांपासून पृथःक करणं म्हणजे साखरेतून त्याची गोडी काढून घेण्यासारखं आहे. पाण्यातून पातळपणा कसा काढता यावा? कठीण डोंगरातूनच नदी, निर्झर उगम पावतात तशी गद्यातून सहज कविता तयार होत जाते. गद्यात अनेक वेळा दुसर्‍या भाषेतील काव्यमय संदर्भ अथवा दुसर्‍या लेखकांची अवतरणं दिली तर लेख प्रभावी होतो.

कवितेत अशी दुसर्‍या भाषेतील कवींची अवतरण त्याच्या भावार्थासह दिली तर काय हरकत आहे? सहज लयीत जाणार्‍या कवितेला मधे दुमड पडू नये, तिचा एकजिनसीपणा कमी होऊ नये सहज ह्या भाषेतून त्या भाषेत अलगद उतरता याव आणि परत आपल्या भाषत येता यावं ह्यासाठी समानवृत्त वापरून हा छोटासा प्रयोग केला आहे.  वाचताना मागे मंद स्वरात त्याच वृत्तातील  नरेंद्रभाई ओझांच्या स्वरातील शिवमहिम्न ऐकता यावं ह्यासाठी त्याचीही लिंक देत आहे.

 

https://www.google.com/search?q=Narendra+Ojha+%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%A8&rlz=1C1CHZN_enIN1015IN1015&oq=Narendra+Ojha+%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%A8&gs_lcrp=EgZjaHJvbWUyBggAEEUY

प्रभास

 

बांद्रा ते वेरावळ ट्रेन सकाळी सकाळी सात वाजता वेरावळला थांबली आणि पूर्ण रिकामी झाली. आम्हीही उतरलो. ट्रेनमधून कुठल्याशा ओढीने उतरलेला प्रवाशांचा सारा लोंढा एकाच दिशेला चालला होता. लोंढ्यातल्या प्रत्येक ठिपक्याला शेजारच्या आपल्यासारख्याच ठिपक्याचे काही देणेघेणे नसावे.

   वेरावळ हा शेवटचा थांबा असल्याने ट्रेनमधून उतरलेले, उरलेले, एका दिशेनीच जाणारे हे सारे प्रवासी येथीलच रहिवासी असावेत, आणि सोमनाथला आलेल्या थोड्याशा प्रवाशांपैकी आपण असू  असं समजून, न राहवून मी एका तरुणाला विचारल, ‘‘सोमनाथकडे जाण्यासाठी स्टेशनच्या अजून कुठल्या वेगळ्या गेटनी बाहेर पडावं लागतं का?’’ ‘‘माँ जी!  सारेही सोमनाथ जा रहे हैं!’’ त्याच्या एका वाक्याने मला लाखो, लाखो भारतीयांच्या श्रद्धेचा रस्ता दाखवला. ‘‘लायिए आपका सामान दिजिए! ”  म्हणत त्या गुजराथी तरुणाने आमच्या दोघांच्या हातातील सामान घेत जिना उतरायला सुरवातही केली. हा श्रावणबाळ आपल्या म्हातार्‍या आईवडिलांना सोमनाथाच्या दर्शनाला घेऊन आला होता.

रिक्षानी वेरावळ ते सोमनाथ प्रवास फारसा उत्सुकता वाढवणारा, सुखकारक वा आशादायी वाटत नव्हता. लहानसं गाव माशाच्या वासानी नकोसं वाटत होतं.  सर्व किनार्‍यांवर सुनियोजित वाढलेली एकाच वंशाची लक्षणीय प्रजा धास्ती उत्पन्न करणारी! सोमनाथ ट्रस्टतर्फे ‘‘सागरदर्शन’’ येथे राहण्याची सोय व सर्व ऑनलाईन बुकिंग झालेलं होतं तेवढीच एक सुखाची गोष्ट होती.

सोमनाथ ट्रस्टच्या रेस्टहाऊसच्या सुंदर स्वच्छ इमारती समोर रिक्षा थांबली. 11 वाजता खोली मिळणार असली तरी कँटिनसेवा उपलब्ध होती.

समोर पसरलेला घनगंभीर स्वच्छ चकचकीत नीलम रत्नासारखा सुंदर निळा समुद्र क्षणात मनातील सर्व विचार धुवून गेला. बॅगा तिथेच ठेऊन आम्ही बाहेर आलो.

प्रभास-------!!! अर्थाला साजेसा सतेज, कान्तिमान, चमकणार्‍या निळ्या रंग तरंगांचा गूढ, अथांग समुद्र पसरलेला होता. ना प्रशांत सागराप्रमाणे शाईसारखा निळा ना मोरपंखी निळा---- इंदीवरश्याम --- नीलकमलासारखा निळा----त्या सावळ्यासारखा निळा!

 

 वितळलेल्या नीलम रत्नाचा रस थेट क्षितिजापाशी निळ्या आकाशाला भिडलेला. ह्या रत्नाकराचं गभीर रूप त्याच्या खोलीची साक्ष देत होतं. हिवाळ्यातल्या मंद झुळकांनी जणु समुद्रावर तरंगांचं जाळं विणलं होतं. समुद्र किनारी उभ्या असलेल्या भव्य सोमनाथाच्या देवळामागून सूर्य वर आला होता.

बघता बघता सोनेरी उन्हं निळ्या समुद्रावर पसरून असंख्य सोनेरी तारका भर दिवसा त्या महोदधीच्या नीलम तरंगांवर चमचमत होत्या. समुद्राची नीलम कांती, त्यावरील ते सोन्याच्या चांदण्याचे तेज---- सर्वच अलौकिक होतं.  ती दीप्ती, ते सौंदर्य पाहून  हेच ते प्रभास तीर्थ हे वेगळं सांगावं लागत नव्हतं. प्रभास ह्या तीन अक्षरात तेथील समुद्राचे वर्णन सामावले आहे. (प्रभासचा अर्थच दीप्ती, कांती, तेज असा आहे.)

माहित नाही का--- पण---- श्रीहरीच्या निर्वाणाचा प्रसंग डोळ्यासमोर वारंवार येत राहिला. त्या काळरूप जलधीने सर्व यदु आणि वृष्णी वंशीयांना सहज आपल्या पोटात सामावून घेऊनही तो शांतच होता. हर आणि हरीचे अभिन्न अस्तित्व इथल्या कणाकणात क्षणोक्षणी जाणवत होतं. जाता जाता त्या घननीळाने आपलं नील देहवस्त्र त्या महोदधीला दान करून टाकलं होतं. आणि ते मिळवून महोदधीही कृतकृत्य झाला होता.

 

नाजुक तरंगांना जलपृष्ठावरुन वाहून आणणार्‍या, आणि किनार्‍यावर आदळणार्‍या  लाटांच्या खळ्ळ  खळ्ळ  अशा धीरगंभीर गाजेसोबत मनावर गारूड करणारे कुठल्याशा घनगंभीर संगीताचे शांत स्वर समुद्राच्या तरंगावरून वाहत येत होते. वाटलं, वार्‍याने समुद्रावर तरंगांचं जाळं टाकलं असावं आणि ते किनार्‍यावर ओढून आणताना  वारं आणि तरंगांच्या जाळ्यात अलगद गुंफून त्यांच्या सोबत हे सूर किनार्‍यावर येत असावेत. सागराच्या प्रतलावर आसमंतात भरून राहिलेले ते स्वर वातावरण अजूनच गंभीर करत होते. जणु समुद्रच वेद म्हणत होता की काय! अंगावर रोमांच उभे राहिले. नीट कान देऊन ऐकल्यावर ‘‘महिम्न: पारं ते परमविदुषो यद्यसदृशी ---’’ शिवमहिम्नाचे शब्द कानावर पडत होते. लक्षात येणार नाही अशा रीतीने समुद्राकडे तोंड करून लावलेल्या स्पीकर्स मधून नरेंद्रभाई ओझांनी गायलेले  अत्यंत सुरेल , मंद मधुर स्तुती-संगीत जणु समुद्रावरूनच येत असल्याचा भास होत होता. काही वेळा देव देवळात न भेटता सहज जाता जाता वाटेतच भेटून जातो. मधेच मागे वळत एक स्मित कटाक्ष टाकून जातो. वा कधी अशा जागी बोलावून घेतो जेथे आपल्या दोघांशिवाय तिसरे कोणी नसावे. त्याच्या सानिध्यात काळ, वेळ, देहाचे भान मावळून जाते.  तो भेटीचा एक क्षण असो वा काही तास ----! मनाला कायमचं उजळून जातात. त्या क्षणी मनात उमटत गेलेला समुद्र काहीसा असा होता ---

 

निळ्याशा तेजाने लहरत असे तो जलनिधी

निळाई रत्नांची झळकतचि रत्नाकर जळी

प्रभा सोनीयाची पसरविच तेजोनिधि रवी

सुवर्णाचे तारे लखलख तरंगांवर करी

 

 परी चित्ता लावी हुरहुर अती गूढ स्वर ते

दुरूनी कोठूनी उमटुन किनारी परत ये

तरंगांचे जाळे जळि पवन फेके तरलसे

किनारी ओढूनी अलगद स्वये आणित असे

 

स्वरांच्या साजाने नटुनि थटुनी शब्द-सर ते

तरंगांच्या संगे उतरति किनार्‍यावर कसे

मिटावे नेत्रांनी; अलगद टिपावेच श्रुतिने

सुधा पंक्ति ऐशा सुखविति अलौकीक रितिने

 

असे वाटे हेची जणु सुखद निःश्वास हरिचे

महेशाचा का वा जणु घुमत ओंकारचि असे

श्रुतीं वा चित्ताला परिचित गमे शब्द कधि ते

महिम्नाच्या ओळी उलगडत गेल्या स्मृतिमधे

 

‘‘महिम्न: पारं ते परमविदुषो यद्यसदृशी

स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिर:।’’

‘‘नसे सीमा काही हर तव गुणाब्धीस अखिला

कसे जाणावे ते मग तव अमर्याद स्वरुपा

 

मनाच्या वाणीच्या अति पलिकडे सद्गुण तुझे

तयांसी वर्णाया सकल पडती शब्दहि फिके

स्वरूपा पाहोनी भयचकित हे वेद म्हणती

कळेना आम्हा तू शरण तुज आलो सुरपती।।

 

कसे अव्यक्ताशी जुळति मम धागे हृदयिचे

मनाला व्यक्ताची भुरळ अति स्वाभाविक पडे

मनाला वाचेला विषयचि दुजा ना उरतसे

गुणांसी वर्णाया मनहृदयवाणी न थकते ।।’’

 

पिसे हे शांतीचे मजसि करि अस्वस्थ पुरते

निळाई सिंधूची मजसि बहु अन्तर्मुख करे

कसे ओलांडूनी हृदय कळिकाळास सहजी

किती जाई मागे हरिस बघण्या उत्सुक अती

 

मारोपाचे ते वचन हरिचे अन्तसमयी

श्रुतींनी ऐकाया लव न धरवे धीर हृदयी

प्रभासक्षेत्री ह्या मिलन हरिचे हो हरसवे

हरी-देहा घेई जलनिधिच सामावुन इथे

 

प्रभासी घेई श्रीहरि सुचिर-निद्रा तरुतळी

निमाली तेजाची सकल किरणे सागरजली

निलीमा देहाचा जलमयचि हो सागरजली

हरीच्या तेजाने झळकत असे नील जलधी

 

निळ्या देहाचे का वसन हरिने दान दिधले

हो जाता जाता जलधिस बहूमूल्य अपुले

न राहे माझी मी विरघळत गेले न उरले

प्रभासक्षेत्री ह्या कण कण हरी वा हर दिसे

 

-------------------------------

#लेखणीअरुंधतीची-


 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -