समृद्ध अडगळ का समृद्धीची अडगळ
स मृ द्ध अडगळ का समृद्धीची अडगळ एका नांदत्या घरात कुठे कुठे नीट ठेवलेली समृद्ध अडगळ असतेच. माझ्या लहानपणी आई दिवाळीच्या आधी सर्व कपाटं आवरायला काढायची तेव्हा त्यात दडलेला खजिना पहायला मी कुतुहलाने तिच्यासोबत बसत असे. आज मीही अनेक गोष्टी इतक्या सहजासहजी टाकून देत नाही. छोट्या मोठ्या रिकाम्या डब्या कशाला कामाला येतील सांगता येत नाही. घरी आलेल्या पाहुण्यांना येणारी खोकल्याची ढास पाहून जातांना त्याच्या हातात चिमुकल्या डबीत चार लवंगा घालून दिल्यावर तेही खूश! गावाला जाताना एखादी कानातल्या टॉप्सची जोडी पटकन ह्या चिमुकल्या डबीत बसून जाते. अंगठी वा कानातल्याचा निसटलेला खडा वा चष्म्याचा निसटलेला अगदी बारीकसा स्क्रू न हरवता डबीत बसून सोनाराच्या वा चष्म्याच्या दुकानापर्यंतचा प्रवास बेस्टमधे बसायला सीट मिळाल्यासारखा ऐशोआरामात करतो. सॅलडला चवीपुरतं मीठ डबीत बसून डब्यासोबत जातं. अशा डब्या दिल्या, हरवल्या वा विसरल्या तरी मनाला यत्किंचितही दुःख होणार नसतं. लोणी, चीज, हिंग, लिपबाम अशा छोट्या मोठ्या डब्ब्या डुब्ब्या तर भाजी, चटणी, लाडू अनेक गोष्टी इतरांना...