मान्यवरांचा सत्कार

 

मान्यवरांचा सत्कार -

``आता मान्यवरांचा सत्कार करु या.’’ भर समारंभात हे वाक्य ऐकलं की मला भीतीने कापरं भरतं. व्यासपीठावर शालीची घडी उघडताच मला भर उन्हाळ्यातही अंगावर काटा उभा राहतो. वा थंडीत घाम फुटतो. शाल उचलतांना तबकात गडगडणारा नारळ आता माझ्याच डोक्यात पडल्याच्या वेदना होतात. भूतबाधा झालेल्यावर मोराच्या पिसांचा कुंचा फिरवून त्यानी `झाडानी धरलेल्याला’ झोडपतात त्याप्रमाणे पुढे येणारा पुष्पगुच्छ “मला कुठलीही मोठेपणाची बाधा झाली नाही” असं मी केविलवाणेपणाने सांगत असतांनाही माझ्यावर फट्टकन बसतो आहे असं मला वाटतं. कित्येकवेळा फुलांच्या पार्श्वभागात काड्या खुपसून त्यांना तारा गुंडाळून सरळ उभं रहायला भाग पाडणारे फुलवाले मला पोर्च्युगीज वा इंग्रजांइतके क्रूर वाटतात.

 

कधी कधी घरात उन येत नसतांना वा बाल्कनी झाडांनी ओथंबून वाहात असतांना मिळणारी झाडाची/ तुळशीची कुंडी ‘ठेव आता मला तुझ्या डोक्यावर आणि चल पंढरीला’ म्हणून मला घराबाहेर ढकलत असते. चिमुकल्या कुंडल्यांपासून थेट पामच्या प्रशस्त झाडांपर्यंत असा भला मोठा स्पेक्ट्रम माझ्या घरात येण्यासाठी आसुसलेला असतो. त्यांनी घरात प्रवेश करता कामा नये ह्या जिद्दीने पदर बांधून आमच्यात होणारी कुस्ती अनेकवेळा मलाच चितपट करू जाते.

झाडावर उलटा लटकणारा वेताळ विक्रमाकडे पाहून जसा खदखदा हासत असतो त्याप्रमाणे दुसर्‍या तबकातून येणारा प्रशस्त मेमेंटो माझ्याकडे बघून खदाखदा हसत असल्याचा भास होतो. माझ्या मेंदूची हजार शकलं एव्हाना माझ्या पायावर लोळत असल्याचा भास हा भास नसून सत्य असल्याचा अनुभव मला यायला लागतो. ----कारण-----

घराच्या बंद दारातूनही घरात घुसू पाहणार्‍या ह्या गोष्टींना गाडीत अजिबात घ्यायचे नाही अशी सक्त ताकिद पतिदेवांनी दिली असली तरी आमच्या न कळत त्या गाडीवानदादांकडे पोचवलेल्या असतात. ‘‘साहेबांनी काहीही गाडीत घ्यायचं नाही असं सांगितलं आहे.’’ असं ड्रायव्हरनी सांगितलं तरी काही जणं ‘‘हे साहेबांनीच गाडीत ठेवायला सांगितलं आहे.’’ असं खुशाल सांगून त्या गोष्टी गाडीत ढकलतात. कित्येकवेळा माझ्या मिळमिळितपणाचा फायदा घेऊन सुळी चढवण्याचा खोडा जसा त्या आरोपीलाच वहायला लावतात त्याप्रमाणे दीक्षित इतरांबरोबर बोलत असतांना वा फोटोसेशन जोरात चालू असतांना कोणीतरी सत्कारवस्तूंची पिशवी माझ्या हातात कोंबून घाईने निघून जातात. समारंभ संपेपर्यंत मी केविलवाणेपणे कधी शाल लोंबकाळतीए तर कधी नारळ घरंगळतोय, फुलांच्या पाकळ्यांनी, त्यांना लावलेल्या चमचमीनी माझी चांगली साडी खराब होतीए हे सर्व सहन करत ते सत्कार पोतं सांभाळत राहते. संधी मिळालीच तर कोणाशी तरी फार फार आनंदाने, अत्मीयतेने बोलायच्या नादात चुकून विसरून गेल्यासारखे दाखवत खुर्चीखाली सरकवून पटकन दाराच्या दिशेने धाव घेते. पण कित्येक वेळेला हात जोडून, दिलगिरी व्यक्त करून, नम्रपणे घरी नेण्यास असमर्थता दाखवलेल्या गोष्टी आमच्याच पाठोपाठ दुसर्‍या गाडीत बसून अथवा ब्ल्यू डार्ट वा तत्सम सेवेचा हात धरून जेव्हा धावत धावत घरी पोचतातच तेव्हा मात्र माझ्याच पायात गोळे आलेले असतात.

दरवेळी होणारा पतिदेवांचा हा सत्कार समारंभ माझ्या पोटात गोळा आणत असतो. ह्याचा अर्थ मी सत्कार करणार्‍यांच्या भावना दुखावते वा मला पतिदेवांचा मत्सर वाटतो असा नाही. त्याच्या मनात असलेला आदरभाव, आपुलकी, ह्या एकाच गोष्टीचा मान ठेऊन दीक्षितांनी सन्मान स्वीकरलेला असतो. पण! माझ्या काही कमतरता, वेदना असतात. कित्येकवेळा ह्या मेमेंटोंमधे 4-5 किलोंच्या पितळी घंटांपासून कशाकश्याच्या मूर्त्या, समया अशा अ पासून ज्ञ पर्यंत आयोजकाच्या कल्पकतेतून निर्माण झालेल्या कुठल्याही वस्तू असू शकतात. एकदा आमच्या घरात घुसलेला ‘‘लाफिंग बुढ्ढा’’ माझी होणारी दयनीय स्थिती पाहून दोन्ही हात वर करून त्याचे सुटलेले पोट थुलथुल हलवत येता जाता मला खदखदा हसत आहे असे मला वाटत असे.  तर चायनीज बांबूंचे हात पाय पिळून पिळून, डोके उडवून त्यांचा बाधलेला गठ्ठा वा मोळी ‘कधी येऊ घरी?’ म्हणत माझ्याशी केविलवाणेपणाची शर्यत लावत असते. आपल्याला ज्या विषयाची आवड नाही अशाच विषयांची पुस्तकं सोनेरी, चंदरी चांदीत लपून छपून नेमकी मला शोधत कशी येतात न कळे.

पूर्वी डिजिटल फोटोंचे फॅड नव्हते तेव्हा आमच्या लग्नात काढले नसतील इतके फोटो काढून त्याचा जाडजूड अल्बमही सत्कारमूर्तींना पाठवायची तजवीज होत असे. ह्या सर्व अल्बममधे मी चोरून नजर टाकत असे. कारण सगळ्या फोटूत हसर्‍या पतिदेवांसोबत माझे भलतेच केविलवाणे फोटो  (कारण मी फोटोजेनिक चेहरा घेऊन जन्माला आले नाही शिवाय हसा म्हटलं की मला हसूही येत नाही.) पाहणार्‍यांना ‘‘कमिशनरसाहेबांना ह्यापेक्षा खूप चांगली बायको मिळाली असती.’’ असे रुमाल तोंडावरून ठेऊन पुटपुटलेले उद्गार मला स्पष्ट ऐकू येत. आता सर्व डिलिट करायची सोय भलत्या न्यूनगंडातून माझी सुटका करते; असं वाटत असतांनाच बेल वाजते आणि दरवाजा उघडायला गेले तर भलं मोठं पार्सल ब्ल्यू डार्टवाला माझ्या हातात कोंबून आला त्याच लिफ्टने पसारही झालेला असतो. वरतीच पतिदेवांचा हसरा भव्य फोटो पाहून ‘‘अग्गबाई ह्यांच्यावर कॉलेंडर काढलं की काय ? बर झालं पुढच्या वर्षाची कॉलेडरची सोय होईल.’’ म्हणत मी उघडते खरं ---- पण हाय राम!  हाही सत्काराचा भला थोरला जाडजुड अलब्म! असे फोटो ना गळ्यात मिरवता येत ना टाकून देता येत. आजपासून उशाखाली घ्यावा का टिव्ही बघताना सोफ्यावर पाठीशी ठेवावा विचार करतीए! सर्वांच्या प्रेमाखातर होणारा हा सत्कार सोहळा ‘भरल्या ब्राह्मणा दही करकरीत’ ह्या उक्तीप्रमाणे माझ्यासारख्या अरिसक बाईला सुखकारक वाटत नाही. असे सोहाळे Eसत्कार स्वरूपात ठेवायला काय हरकत आहे? असा विचार मनात घोळत राहतो.

 ह्या व्हर्च्युअल सत्कारात उगाच वाया जाणारा वायफळ खर्चही वाचवला जाऊ शकेल. ज्याप्रमाणे लग्नासाठी तुम्हाला कसे डेकोरेशन पाहिजे त्याचे अल्बम असतात त्याप्रमाणे सत्कार सोहळ्यासाठीही अशी काही सोय असावी. तात्पुरते भले मोठे गिफ्ट, सुंदर मेमेंटो सोबत फोटु काढून हॉलवाल्यांना त्याची वापसी व्हावी.

शंभरातल्या नव्वद वेळा आयोजकाने हा सत्कारसमारंभ कुठल्यातरी छानशा कार्यक्रमाच्या आधी ठेवलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांची स्थिती ‘‘पिंजडेमें बंद बुलबुल सैयाद/ (आयोजक) मुस्कुराए कहा भी न जाए चुप रहा भी न जाए।’’ अशी असते. (आयोजकही खूष आणि प्रेक्षकही खूष! कारण आयोजकांना ऐते प्रेक्षक मिळतात तर प्रेक्षकांमधल्या स्त्रीवर्गाला मैत्रिणींबरोबर राहून गेलेल्या गप्पा मारायची संधी!) तर आलेल्या वजनदार पाहुण्याचा एकदा सत्कार करून त्याला त्याच्याच गाडीत बसवायची आयोजकाला घाई असते. चुकुन प्रमुख पाहुणा थांबलाच तर पुढचे दोन तीन तास त्याच्या खिदमतित राबणं त्यालाही परवडणारं नसतं त्यामुळे पुढचा चांगला कार्यक्रम जड अंतःकरणानी सोडून देऊन मलाही पतिदेवांमागे पतिव्रतेप्रमाणे कार्यक्रमातून मावळणं भाग असतं.   

 

हे कमी की काय की ज्यामुळे, लग्न समारंभ, मुंजी, बारशी येथे हॉलमधे प्रवेश करतानाच माझी नजर पहिल्यांदा जेथे सर्वांना द्यायच्या पिशव्या मांडून ठेवल्या आहेत त्या कोपर्‍याकडे जाते. मांजर जसं हातातील काठी पाहताच दूर पळून जातं तसं त्या कोपर्‍यापासून मी माझी सुटका कशी करून घ्यायची ह्या विचारात पडते. एकदा काशी वा गयेला जाऊन आलं की कशापासून तरी सुटका करून घ्यायची तुम्हाला मुभा असते. त्यामुळे मी गंगेला ‘‘कोणाकडूनही काहीही घेणार नाही.’’ असं बोलून आले. मला वाटलं आता सुटका होईल पण काही नातेवाईक असे चिवट असतात की त्यांना सर्व सांगूनही ते दुप्पट जोरात ह्यात फक्त सौभाग्यलेणं हळदीकुंकु ओटी आहे म्हणून त्याच्याआडून अजून काय काय हातात सरकवून त्यांची सुटका करून घेतात.

 

असं म्हणतात की हत्ती ह्या प्राण्याचा जन्मदर सर्वात कमी आहे. असं असूनही जर जन्माला आलेला एकही हत्ती मेला नाही तर दहा वर्षात ही सर्व पृथ्वी हत्तीमय होऊन जाईल. त्याप्रमाणे येणार्‍या सर्व भेटवस्तू मी घरात येऊ दिल्या तर महिन्याभरातच आम्हाला घराबाहेर रहायची वेळ येईल. त्यामुळे मांजराच्या पिल्लाला त्याची आई जशी घरात घुसवतेच तशा रेट्याने घरात घुसणार्‍या गिफ्टांना ‘‘ढकल बाहेर’’ हा एकमेव उपाय माझ्याकडे असतो.

 

अनेक वेळा मला एकच स्वप्न पडतं की , मी जोरजोरात धावत आहे. मला धाप लागली आहे आणि माझ्या मागे अग्नेय अस्त्र किंवा अश्वत्थाम्यानी सोडलेलं पण त्याला परत घेता येत नसलेलं ब्रह्मास्त्र किंवा श्रीकृष्णाने शिशुपालावर सोडलेलं सुदर्शनचक्र त्यांच्या लक्ष्याला सोडून चुकून माझ्यामागेच गिफ्ट वा मेमेंटोचं आक्राळविक्राळ रूप घेऊन लागली आहे. मी जोरजोरात धावा करत आहे, ‘‘देवा----  देवा ह्या गिफ्टांच्या अत्याचारांमधून मला वाचव! ह्या अतिरेकातून सोडव.’’ क्षीरसागरात झोपलेला विष्णू आणि कैलासावर ध्यानस्थ बसलेला शंभूमहादेवही हळूच एक डोळा उघडून मला म्हणत आहेत, ‘‘अगं त्या हार, तुरे, पेढे, नारळाची तोरणं, दुधाचे घडे, ओट्या ह्यांना घाबरूनच आम्ही इथे खोल समुद्रात डोळे मिटून झोपेचं सोंग घेऊन अथवा कोणी चढू शकणार नाही अशा बर्फाळ कैलासावर ध्यानस्थ बसल्याचं नाटक करत बसलो आहोत. तू पृथ्वीवर असेपर्यंत आम्ही तुझी मजा बघतो. ---- हा! हा! हा! दचकुन मला जाग येते. मला घाम फुटलेला असतो. खरोखरच धाप लागलेली असते….... समोरच माझा केविलवाणा फोटो मला अजूनच केविलवाणं बनवतो.

-----------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -