हलवा -

 

हलवा -

जानेवारी महिना, पुण्याची थंडी, रात्री आम्हा मुलांची निजानीज होत आहे. सोलापुरी जाड चांदरींवर चिकटलेल्या दुलया, रग, कांबळी अंगावर ओढून घेता घेतासुद्धा आईने पेटवलेल्या कोळशांच्या रसरशीत निखार्‍यांची धग डोळ्यालाही सुखावून जातीए. आत्ताशा गॅस आल्यापासून ही शेगडी काही खास प्रसंगांनाच बाहेर निघत असे. त्यातल्या त्यात संक्रांतीच्या एक महिना आधीपासून ती माळ्यावरून ओट्यावर उतरत असे. आणि रथसप्तमीला ह्याच शेगडीच्या रसरशीत निखार्‍यांवर छोट्याशा सुगडातील दूध उतू गेलं की सूर्याला पोचलं म्हणत मगच माळ्यावर जात असे. जळलेल्या दुधाचा एक खरपूस वास तिला येत असे.

रात्री निजानीज झाली आणि थंडीची शिरशिरी जाणवू लागलेली असताना  ही रसरशीत पेटलेली शेगडी आणि तिच्या शेजारी बसलेली आई हे मोठं उबदार दृश्य असे. साखरेचा पाक असलेलं भांडं, आणि वाट्यांमधे खसखस, बदाम, भोपळ्याच्या बिया, लवंग, वेलदोडे असं काय काय घेऊन चुलीशेजारी बसत आईनी चुलीची धग मंद केली की खुर्चीवर पेंगणार्‍या मांजराने खुर्चीवरून उतरून परत पायाशी लगटून येऊन बसावं तसं मीही उबदार पांघरुण सोडून `आई आज तू कसला हलवा करणार आहेस?' म्हणत आईला चिकटत असे.

तो हलवा होतांना बघणं मोठं प्रेक्षणीय असे. मंद चुलीवर ठेवलेल्या भांड्यामधे खसखस / तीळ / लाल भोपळ्याच्या सोललेल्या हिरवट रंगावरच्या बीया / लवंग / वेलदोडे / बदाम— - - इ.  ह्यापैकी काहीतरी असे. त्यावर चमच्याने दोन तीन थेंब दोन तीन थेंब   असा साखरेचा पाक घालत हाताच्या बोटांच्या टोकांनी आई तो हळुवार हलवत राही. त्यासोबत तिचे शिवलिलामृत किंवा कुठल्यातरी स्तोत्र वा गाण्याचे सुरेल स्वरही हळुवार त्या कणाकणाने काटेरी होणार्‍या हलव्यावर बसत. खसखशीपासून वेलदोड्यापर्यंत अनेक दाण्यांवर बसणारा साखरेचा पाक त्या दाण्यावर काटा फुलवत असे.

 साखरेचा पाक बनवण्याची कृतीही लांबलचक वेळखाऊ असे. साखरेचा पाक उकळला की त्या उकळत्या पाकात आई चमच्या चमच्याने दूध टाके. पांढर्‍याशुभ्र साखरेच्या पाकातूनही काळपट फेसासारखी मळी वर येई. हा वर आलेला मळीचा थर काढून परत परत ती कृती रिपीट होत असे. कितीवेळा माहित नाही. असा दुधाने शुद्ध झालेला साखरपाक हलव्यासाठी लागे.

भर थंडीमध्ये छानपैकी शेगडीवर बसल्यावरही अंगभर काटा येणार्‍या ह्या हलव्याला संक्रांतीनंतर कणाकणाने वाढणार्‍या दिवसासारखं मोठ्ठ आणि काटेरी होतांना पाहून आश्चर्याने डोळे मोठेठे होत. त्याच बरोबर ह्या गरमागरम पातेल्यात हळुवार बोटांनी सतत हलवा हलवल्याने आईची बोटं मात्र पुढचे कित्येक दिवस हुळहुळी होऊन जात. नव्याने लग्न होऊन घरी आलेल्या सुनेसाठी, नवीन जन्मलेल्या नातवंडासाठी ह्या तयार झालेल्या हलव्याचे सुबक दागिने होतांना बघणं ही अजून गम्मत असे. `य' तप उलटली असतील ह्या आठवणींना.  आज हा वेळखाऊ पदार्थ करून वेळ घालविणार्‍यांवर काय हा वेळेचा अपव्यय अशी तरुणाईकडून टीका नक्की होईल. आमच्या पिढीपैकीही कोणी हा पदार्थ करायला सहसा आणि सहजपणे धजावणार नाही.

आज मात्र आईच्या सुरेल सुरांचा मुलामा चढवलेला तो काटेदार हलवा चांदीच्या द्रोणात बसलेला मला छान दिसतोय. तो टम्म फुगलेला काटेदार वेलदोडा उचलावा का बदामी आकाराची सुरेख काटेरी पांढरी शुभ्र भोपळ्याची बी? काटेदार लवंग हातात घेऊन चहूबाजूनी बघत खातांना  आहाहा! ती नाजुक खसखसही छोट्याशा चांदणीसारखी केवढी काटेरी. काही काटे सुद्धा न टोचणारे आणि किती गोड असतात! आधी कोणाच्या तरी हळुवार बोटांना पोळत एवढे सुंदर आणि गोड होतात.

उद्याच्या 15 जानेवारी. संक्रात शुभेच्छांसोबत हा दुर्मिळ खास घरी बनविलेला काटेरी हलवाही! सोबत खुसखुशीत तीळाची वडीही पाहिजेच ती ही घरचीच. वर्षभर गोड बोलायच्या करारावर हं!

 हो करार करा किंवा न करा तिळा तिळाने मोठा होत जाणारा दिवस  अनुभवत हलवा खायलाच पाहिजे  .  

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -