रामायण Express – भाग -12 प्रयागराज ते शृंगवेरपूर
रामायण Express –
भाग -12
प्रयागराज ते शृंगवेरपूर
मनाने नित्य प्रजाहित वा जनकल्याणाची कामना आणि तनुने त्यानुसार कर्तव्यकठोरपणे आचरणात आणलेली सत्यकृती हे प्रभु
रामाच्या चरितसरितेचे दोन तीर होते. एकवचनी आणि एकपत्नीत्वाचा सहज स्वीकार करणारा श्रीरामांचा
निर्मळ जीवनप्रवाह हया दोन किनार्यांमधून प्रवाहित झाला होता. ही कल्याणकारी रामसरिता
इतर सरितांप्रमाणे निम्नगा म्हणजे उताराकडे धावणारी आणि इतरांनाही उतरणीला लावणारी
कशी असेल? ती कोणाही भक्ताला वर वर यशोशिखरावर नेणारी उर्ध्वगामीच असणार.
‘‘प्रभूराम-श्रीजीवनी’’ नाम कोणी
सदा वाहते रम्य ती निर्झरीणी
उभी राहता मी तिच्या रम्य काठी
तरंगातुनी मांडते राम गोष्टी ।।
1
मुखी रामनामावली मेघ येता
सुवेगेचि ओथंबुनी थोर जेंव्हा
सुखे वर्षती नेत्र आनंद धारा
महापूर ये मानसीच्या सराला ।। 2
सुखाच्याच
लाटांवरी
सौख्य धारा
अहा नाचती खेळती पद्मगंधा
सुखाची नदी ना मिळे सागरासी
स्वये सौख्यसिंधूच `रामाकृती'ही ।।
मनाच्या तलावी हिचा जन्म होई
सुखाचा झरा निववीतो मनासी
नसे निम्नगा ही असे उर्ध्वगामी
सदा नेतसे
`सौख्यशृंगी'
गिरीसी
श्रीराम आणि श्रीशिव ह्या दोन कल्याणकारी विभूतींना एकमेकांचा लोभ ना
जडता तरच नवल. काशीला मरणासन्न असलेल्या शिवभक्तांच्या कानात शिव ‘‘श्रीराम जयराम जयजय
राम’’ हा तारक मंत्र सांगतात. त्यामुळे तो भक्त तरून जातो. मोक्ष प्राप्त करतो. (मणिकर्णिकाष्टकम्)
असं म्हणतात.
गंगा तीर सुदीर्घ सुंदर असे त्याच्यात काशी खुले
तेथेही मणिकर्णिका अनुपमा विश्वेश राहे जिथे
तो योगीश्वर देतसे सकलची जीवांस मुक्ती इथे
सांगे `तारकमंत्र' त्याचि मनुजा अज्ञान दूरी करे॥4.1
तर श्रीरामांचे आराध्य शिवशंभू!
श्रीराम जेथे जेथे गेले तेथे तेथे शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा केल्याचे
पौराणिक पुरावे असल्याने श्रीरामांच्या पदचिह्नांसोबत शिवलिंगाचे दर्शन हे अतूट नाते
आहे. विश्वकल्याण आणि नजर ठरणार नाही असं मनमोहक सौंदर्य असं सहज एकमेकात गुंफलं जाण्याचा
हा अमृत योग! जेथे राम तेथे हनुमान हेही समीकरण
दृढ आहे त्यामुळे रामचरण शोध सोपा होऊन जातो.
सुमन्ताने वनवासाला निघालेल्या श्रीराम, जानकी आणि लक्ष्मणाला रथातून
शृंगवेरपूर पर्यंत पोचविल्याचा वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे. काही ठिकाणी वनवासातील
पहिली रात्र तमसा नदीच्या किनारी थांबल्याचा उल्लेख आहे. सिरसा ह्या गावाजवळ तमसा आणि
गंगेचा संगम प्रयागराज पासून 32 कि.मि. वर आहे. शृंगवेरपूरला तमसा आणि गंगा दोघी एकत्रच
आहेत.
रथातून जाताना गंगा नदीचे मनोहारी दर्शन वारंवार ह्या तिघांच्या चित्त
वृत्ती प्रफुल्लित करत होते. गंगेचं पाणी आपली दुःखद कहाणी क्षणभरासाठी का होईना विसरायला
लावते. तिच्या भव्य पात्रात मनही स्वच्छ धुवायची प्रचंड ताकद आहे. बहुधा अनेक ऋषींच्या
आश्रमात थांबत, त्यांचे आशीर्वाद घेत, त्यांचे आगत्य स्वीकारत हे सारे शृंगवेरपूरला
पोचले असावेत. ऋषींनी वनवसासाठी उपयुक्त सामग्री, अस्त्र, शस्त्र श्रीरामाला दिले.
हे तिघे प्रयागराज येथे असलेल्या भरद्वाज मुनींच्या आश्रमात आल्याचा
उल्लेख आहे.
महर्षी भरद्वाज ह्यांना भारताचे भाग्यविधाता म्हटलं जातं. प्रयागराजला त्यांचा आश्रम आहे. तेथे त्यांची भव्य
मूर्ती आहे.
आयुर्वेदाचे जनक, अर्थशास्त्राचे प्रणेते, धनुर्वेदाचे ज्ञाता अशी त्यांची ख्याती आहे. भरद्वाज मुनींना इद्राने सर्व
विद्यांचं स्वरूप असलेल्या अग्नीला जाणून घेणयाची, नियंत्रित करण्याची सावित्र्य अग्निविद्या
दिली. इंद्राकडून व्याकरण शास्त्राचाही अभ्यास केला. भृगुंकडून ते धर्मशास्त्र शिकले
होते. धनुर्वेद ह्या विषयावर भरद्वाजाने प्रवचन दिल्याचा महाभारतात उल्लेख आहे. भरद्वाजांनी
राज्यशास्त्रची ही रचना केली. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात पूर्वीच्या महासुरींना वंदन
करताना भरद्वाजाचं नाव ही आदराने घेतलं आहे.
व्याकरणशास्त्र, धर्मशास्त्र, शिक्षा शास्त्र, राज्यशास्त्र,अर्थशास्त्र, धनुर्वेद,
आयुर्वेद, भौतिक विज्ञान ह्या सर्वांचं सखोल
ज्ञान भारद्वाज मुनींकडे होतं.
भरद्वजांचा शिष्य अग्निवेश
म्हणजेच चरक. त्यानेच भरद्वाजाच्या सर्व आयुर्वेद सूत्रांचे संकलन करून चरक संहिता
लिहीली.
त्यांच्या गुरूकुलात अनेक आचार्य तयार होत. (म्हणजे आत्ताचे पेशाने
डॉक्टर, डॉक्टरेट मिळवणारे वैज्ञानिक, आणि इतर अनेक विषयातील तज्ज्ञ. ) ह्या सर्वांनी
मध्य आशियापर्यंत सनातन संस्कृतिचा प्रसार केला होता. अनेक ठिकाणी दूरवर पसरलेले हे
भरद्वाज आश्रमातील आचार्य एका ठराविक तिथीला एका ठराविक नक्षत्रावर एकत्र येत. त्यांनी
विकसित केलेल्या कला, त्यांचे अनेक विषयातील संशोधन, अनेक विषयावरील शोधनिबंध, ह्यावर
एक मोठी कॉन्फरन्स होत असे. त्या शोधनिबंधांवर साधकबाधक चर्चेच्या फैरी झडत. सर्व ज्ञानी
आचार्यांनी होकार दिल्यावरच शोधनिबंध मान्य अथवा अमान्य ठरवले जात. ज्यांचे शोधनिबंध
स्वीकारले जात त्या आचार्यांना मंत्रद्ष्टा ऋषी म्हणत. कालान्तराने ह्या सम्मेलनाला
माघ मेळा म्हणू लागले. तर कुंभमेळा हे त्याचं पुढचं स्वरूप!
शृंगवेरपूरलाच श्रीराम आणि निषादराज ह्यांची भेट झाली. गंगा तमसांचा
शांत शांत प्रवाह काही काळ नुसता बघत रहावा. गंगेच्या पश्चिमेला माता शांता आणि शृंगीऋषींचा
आश्रम गऊ घाट, ब्रह्माश्रम तर, गंगेच्या पूर्व बाजूला निषादराज मंदिर, निषादराज किला,
श्री रामजानकी आश्रम, रामशयन आश्रम, हनुमान गढी, राम चौरा घाट आहेत. येथील रामचौरा
घाटावरून निषादराजाने राम-जानकी आणि लक्ष्मणांना स्वतः नाव वल्हवून गंगा पार पोचवलं
होतं. गंगेच्या अथांग मनोहर पात्राशिवाय कुठे नागरी जीवनाच्या समृद्धीची लक्षणं, दिसत
नव्हती. आपली पवित्र, निसर्गाची लयलूट असलेली सुंदर ठिकाणं स्थानिकांच्या उदासीनपणामुळे
गलिच्छ असावीत ही जागोजागी जाताना वाटणारी खंत मनात दाटून आली असताना एक छोटसं देऊळवजा
बांधकाम व बाहेर लिहीलेली पाटी पाहून धन्य वाटलं. पाटी होती ‘‘धनगर समाज आश्रम – महारानी
अहल्याबाई होल्कर धनगर विकास संघ.’’ ह्या महाराणीसाठी न कळत हात जोडले गेले. ह्या राणीने
कुणासाठी कुठे कुठे काय काय सुविधा निर्माण केल्या त्याला गणतीच नाही.
सर्व प्रवासी येईपर्यंत थांबणं भाग होतं. बस शेजारीच असलेल्या एका खोपटासारख्या
स्वच्छ जरा मोकळ्या दुकानात तेथील सासू सुनांना विचारून बसलो. तेवढ्यात आतून हाता पायावर रांगत एक गुटगुटित गोड बाळ बाहेर
आलं. गुडघे न टेकता त्याचं ते रांगणं मोठ गोड
होतं. अरे अरे म्हणे तोवर ते बाळ रस्त्यावरही गेलं. आम्हालाच भीती वाटली. आई शांत होती.
रस्त्यावर एक फळवाला गाडी घेऊन आला होता. बहुधा हा प्रसंग सर्वांच्या सवईचा असावा.
थेट गाडीपाशी जाऊन लटपटत उभं राहत पडत, बसत, परत उठत त्याने गाडीवाल्याजवळ हात पुढे
करताच त्यानीही एक केळ त्याच्या हातात ठेवलं. बदल्यात एक प्रसन्न हास्य देऊन लटपटत
बसत, उठत केळ घेऊन आत आलेल्या बाळाला पाहताना तेथे बसलेले आम्ही सर्वजण सर्व काही विसरून
त्याच्या लीला पाहण्यात इतके रमलो की त्याचा फोटो काढावा हेही विसरून गेलो. गाडीत बसल्यावर
सर्वांनाच त्या बाळाचा मोहक वेगळेपणा आठवून त्या प्रसन्न बाळरूपात रामलला भेटल्याचा
आनंद झाला होता. असाही एखादा भेट क्षण कायमचा
आपल्यासोबत राहू जातो.
----------------------------------
#लेखणीअरुंधतीची-
Comments
Post a Comment