रामायण Express – भाग 14 चित्रकूट सोडून श्रीरामांचा दंडकारण्य प्रवेश

 

रामायण Express –

भाग 14

चित्रकूट सोडून श्रीरामांचा दंडकारण्य प्रवेश

अयोध्येपासून 270 कि.मि.  वाराणसीहून 246 कि.मि. प्रयागराजपासून 115 कि.मि. अंतरावर चित्रकूट आहे. आत्तापर्यंत उत्तरेतील गगनाशी स्पर्धा करणार्‍या, माती, वाळू, दगड सगळ्यांना एकत्र बांधणार्‍या भुसभुशीत पोताच्या कधीही कोसळून लँडस्लाईट करणार्‍या हिमगिरी रांगा पाहिल्या होत्या. डेक्कन प्लॅटूचा खणखणित काळा पहाड अनुभला होता. विंध्यच्या रांगा मात्र खरोखरच नावाप्रमाणे अद्भुत आहेत. त्यांचा पोतच वेगळा आहे. जगभरातले डोंगर पूर्वपश्चिम पसरलेले असताना हिमालय विंध्यची जोडी मात्र पूर्वपश्चिम धावते.  उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून ह्या रांगा जातात. चित्रकूट उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशमधे विभागले गेले आहे एका बाजुने बुंदेलखंड तर दुसर्‍याबाजून म. प्र. चा सतना जिल्हा. ह्या रांगा इतक्या जवळून पाहताना  काय काय  गोष्टी आठवत होत्या.

 महर्षी अगस्तींनी अत्यंत पीडा देणार्‍या सुंद राक्षसाला मारलं पण त्याची बायको त्राटिका महा क्रूर होती. तिने अगस्तींच्या सर्व मुलांना, शिष्यांना खाऊन टाकलं. त्यांचा आश्रम उद्ध्वस्त केला शेवटी त्राटिकेच्या रोजच्या छळाला त्रासून   महर्षी अगस्ती उत्तरेकडून दक्षिणेकडे आले. ते दक्षिणेकडे जात असताना आकाशाला भिडलेल्या विंध्य पर्वताने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. महर्षी म्हणाले, “मी दक्षिणेकडे जाऊन परत येई पर्यंत असाच रहा. उठू नकोस.” पूर्व पश्चिम आडव्याच्या आडव्या पसरलेल्या रांगा आता हिमालयाशी स्पर्धा न करता बहुधा त्याच्या साष्टांग नमस्काराच्या position मधे /स्थितीत राहिल्याने  फार उंच नाहीत. पण सुंदर आहेत.

ह्या पर्वत रांगा आपल्या मकर वृत्तापाशी आहेत. त्यामुळे दक्षिणायनात दक्षिणेकडे सरकणारा सूर्य ह्या रांगांवरून जणु काही उडी मारून दक्षिण भारतात येतो तर उत्तरायणात मकर संक्रमणाच्या वेळी संक्रांतीनंतर ह्या विंध्यरांगा ओलांडून उत्तर भारतात येतो. अगस्तींनी केलेल्या आदित्यहृदय ह्या सूर्याच्या स्तोत्रात सूर्याचा उल्लेख विंध्य वीथी प्लवंगमम् असा आहे. वीथी म्हणजे रस्ता. विध्याचलाच्या पूर्व पश्चिम सरळ रस्त्यावरून उत्तर वा दक्षिणेला उड्या मारत जाणार्‍या माकडासारख्या (प्लवंगम)  सूर्य उड्या मारतो.

चित्रकूटला खूप माकडं आणि अस्वलं असल्याचे भरद्वाजमुनींनी रामाला सांगितले होते आजही खूप म्हणावी अशी माकडे यथे चित्रकूटला आहेत. कदाचित ह्या उड्या मारणार्‍या माकडांकडे पाहुनच अगस्तीमुनींना `विध्यवीथीप्लवंगम’ ( विंध्य पर्वताच्या सरळसोट रस्त्यावरून उड्या मारणारा ) हा शब्द सूर्यासाठी सुचला असावा.

अशा ह्या विंध्य पर्वतरांगांमधून पयस्विनी/ मंदाकिनी नावाची नदी  मोठ्याा डौलात वाहते. आजपर्यंत मनस्विनी माहित होती. मनस्विनी म्हणजे बुद्धिमान, स्थिरमना, उदार, अभिमानी स्त्री. पण उदारपणे सर्वांना आपलं जलं वाटत जाणारी नीरपूर्ण , स्वतःचे जलसौंदर्य दिमाखदारपणे मिरवत जाणारी नदी पयस्विनी विंध्यपर्वताच्या अंगाखांद्यांवरून वाहत जाते हे ऐकून व पाहून छान वाटलं. वळणं वळणं घेत तोर्‍यात मंद मंद वाहणारी म्हणू ही मंदाकिनी ही! ह्या पयस्विनीच्या कुशीत चित्रकूट वसले आहे.

कूट म्हणजे शिखरे. चित्र म्हणजे आश्चर्यजनक, अद्भुत, रंगिबेरंगी, विविध प्रकारची. जेथे अशी विस्मयजनक सुंदर शिखरे असलेल्या पर्वत रांगा आहेत तो चित्रकूट!  खरोखरीच इथल्या संपूर्ण भागातच पर्वतांमधे अनेक ठिकाणी वेगळ्याच धाटणीचे दगड दिसून येतात गूळ गरम केल्यावर जरा पाघळायला लागला की गॅस किंवा मायक्रोवेव्ह बंद केल्यावर पातळ झालेला, पसरलेला गूळ परत थिजून सपाट गुळगुळीत दिसायला लागतो त्याप्रमाणे, जणु तापलेल्या दगडांचा रस परत घट्ट  व्हावा असा पिवळसर तुकतुकीत खडक ठिकठिकाणी  दिसतो. त्यावर पायाचे ठसे उमटल्याप्रमाणे खड्डे दिसतात. कोणी दगडशास्त्राचा जाणकार असेल तर तो ह्या दगडांबद्दल नक्कीच सांगू शकेल. हा विशिष्ट दगड आणि त्या दगडांचे तयार झालेले विशिष्ट आकार प्रेक्षणीय आहेत हे मात्र नक्की. तसा दगड विंध्य पर्वतावरच मी पाहिला. आपल्या पूर्वजांनी दिलेलं चित्रकूट हे नाव आज हजारो वर्षांनंतर अनुभवताना ही मोठं कलात्मक आणि चपखल वाटत होतं.

 

कामदगिरी पर्वताची प्रदक्षिणा साडेचार ते पाच कि.मि. आहे. हा पर्वत धनुष्यकार आहे.  संपूर्ण परिक्रमापथ बांधलेला आहे. उन पाऊस लागू नये म्हणून वर पत्रे टाकून  परिक्रमा मार्ग आच्छादित केला आहे. परिक्रमा मार्गाच्या दोन्ही बाजूला धार्मिक स्थळांच्या ठिकाणी असतात तशी दुकानं आहेत. एक ग्रीष्म ऋतु सोडला तर बाकी सर्व ऋुतुंमधे हा पर्वत हिरवागार असतो. असं म्हणे डोंगराच्या बाजूने बांधलेला

परिक्रमामार्गाला चार द्वारे आहेत. उत्तर द्वारावर कुबेर, दक्षिणद्वार धर्मराज पूर्वद्वारावर इंद्र तर पश्चिम द्वारावर वरूण देव  द्वारपाल म्हणून आहेत. कामदगिरीच्या खाली क्षीरसागर आहे अशी लोकांची श्रद्धा आहे. येथे प्रभुराम वनवासातील 11 वर्ष राहिले होते. त्यांनी ह्या पर्वताला आशीर्वाद दिला की, जो कोणी तुझी परिक्रमा करेल त्याची मनोकामना पूर्ण होईल. त्यामुळे बहुतेक यात्री पायातील पायताण काढूनच त्याची प्रदक्षिणा करतात.

 ह्या परिक्रमा रस्त्यावर अनेक देवळं आहेत. ह्या पर्वताची मुख्य देवता कामतनाथ आहे.  कामदनाथ हे नाव रामाच्या अनेक नावांपैकी आहे. ह्या परिक्रमा मार्गावर भरत-मिलाप मंदिर आहे. येथेच ती प्रसिद्ध भरतभेट झाली. दोन्ही भावांच्या मनातील प्रेमभावना इतक्या तीव्र होत्या की आजुबाजूचे खडकही विरघळले. पर्वतही रडले. असे स्थानिकांचे म्हणणे ह्या खडकावर दोन्ही भावांच्या पायाचे ठसे मिळतात. भरत मिलाप मंदिर शेजारीच भरताच्या पत्नीचं मांडवीचंही मंदिर आहे. तेथे दरवर्षी भरत भेटीचं   छानसं नाटक रचून सादर केलं जातं.

कामदगिरीची प्रदक्षिणा करताना लागणार्‍या मानस मंदिरात तुलसीरामायणाच्या काही कांडांची हस्तलिखित प्रत जपून ठेवली आहे. काही कांड त्यांच्या वाडवडिलांच्या राजापूरमधल्या घरी ठेवली आहे असे म्हणतात. त्यांच्या 11 व्या पिढीने  ती जपून ठेवली आहेत.

परिक्रमामार्गावर माकडांच्या मर्कटलीला चालू होत्या. दूधाची बाटली घेऊन जाणार्‍या रहिवाशाच्या हातातील बाटली मागच्या मागे वानरानी अलगद काढून घेताना पाहून त्याच्या चपळाईचे कौतुक वाटले.  त्यांना केळी खायला घालणारे यात्री व त्यांना केळी विकणारे केळीवाले मुबलक होते.

---------------------------

आम्हाला ‘हनुमान धारा’ गाठायचे होते. विंध्याच्या रांगा मनोहर दिसत होत्या. हनुमान धाराच्या रांगांवर पर्वताच्या कुरळ्या केसांप्रमाणे हिरवाई टिकून होती. रोप वे ची छान सोय आहे. रोपवे ने वर जाताना मधे खालच्या घळीचे फोटो काढण्यासाठी दोन मिनिटं ट्रॉल्या थांबल्या.

हनुमानाची

 हनुमानधाराला डोंगरावर उतरून अजून 60- 70 पायर्‍या चढायच्या होत्या. डोंगरावरून झिरपणार्‍या पाण्याने तोंडावर हात फिरवला आणि त्या थंडगार जलस्पर्शाने उन्हाचा शीण एकदम नाहिसा झाला. वर हनुमानाचं देऊळ आहे. त्याच्या हातावरून सतत पाण्याची एक छोटीशी धारा वाहते.  तीच ह्या डोंगरावरून वहात लुप्तही होते. तिलाच लोक प्रभाती नदी किंवा पाताळगंगा म्हणतात. खाली असलेल्या कुंडांमधे हे पाणी साठलं जातं.

 हनुमानाच्या देवळाच्या वर अजून थोड वे चढून गेलं की सीता की रसोई म्हणून जागा आहे. येथे जानकीने त्यांना भेटायला आलेल्या ऋषीमुनींची भूक भागवली होती. ह्या पर्वताच्या शिखरावरून खालचा सुंदर परिसर  पाहता पाहता सर्व चिंताच काय पण आपल्याला घराचाही विसर पडतो.

पायर्‍या उतरून परत खाली आल्यावर परत एकदा त्या थंडगार  पिरपिर वाहणार्‍या पाण्याखाली हात धरून डोळ्याला लावताच तोच थंडगार स्पर्श चढणार्‍या उन्हाच्या तापातूनही शीतलता देऊन गेला. 

नंतर त्या मागची गोष्टही कळली. हनुमानाने लंका दहन केल्यावर तेथे लावलेल्या आगीमुळे मारुतरायाच्या अंगाचा प्रचंड दाह होत होता. रावणाने त्याच्या शेपटाला आग लावल्याने त्याची जळलेली शेपूट ही प्रचंड दाह उत्पन्न करत होती. मारुतरायाला त्याच्या कामात एकाग्रता करताना त्रास होत होता. त्याने ही गोष्ट प्रभु रामांना सांगितली तेव्हा श्रीरामांनी त्याला हसून चित्रकूटला जायला सांगितले. विंध्य पर्वताच्या शिखरावर मारुतीने 1008 वेळा रामरक्षा म्हटली  आणि अचानक एक शीतल जलधारा त्याच्या अंगावरून वाहू लागली. त्या जलधारेत काय जादू होती न कळे  मारुतरायाचा अंगाचा दाह, जळलेल्या शेपटीचे दुःख  क्षणात निवले. हनुमानाच्या अंगावरून ही जलधारा खाली पर्वतावर येते, तिला हनुमानाचा कायास्पर्श झाला आहे म्हणून ती हनुमान धारा! उन्हाळ्यातही हा पिटुकला जलस्त्रोत आटत नाही. 

फार फार पूर्वीच्या म्हणजे 10-20 हजार वर्षांपूर्वीच्याही घटनांची मौखिक इतिहासातून  (0ral History ) कशी जपणूक होते, लोकांनी पहावी अशी  पर्यटनस्थळं आपल्या इतिहासाला जोडून किती रोचक होतात, इतिहासच्या पेटीत जपलेला काळ नव्याने कसा साकर होतो  ह्या सर्वाची अनुभूती घेताना आपल्या भारतीयत्वाची नव्याने घट्ट होत होणारी जाणीव मोठी सुखद होती. कमळाच्या कळीत भुंगा बंद झाल्यावर कमळकळी आनंदाने पाण्यावर थरथरत रहावी तसं काहीसं वाटत होतं.

-------------

आम्ही स्फटिक शिळा पहायला चाललो होतो.

स्फटिक शिळा पाहताना, विंध्यगिरीचा तो खास पिवळा तुकतकीत दगड, त्यावर उमटलेली राम सीतेची पावले, त्यावर उमटलेला धनुष्याकार, कावळ्याची चोच हे दाखवताना त्यासोबत गोष्ट गुंफली जात होती. येथे रामसीता त्याचा बराच काळ घालवत असत. त्यामुळे त्यांच्या पावलांच्या खुणा येथे उमटल्या आहेत. सीता येथे शृंगार करत असताना एक कावळा तिच्या पावलांना चोच मारत असे. दगडांचीही ओळख रामकथेत गुंफत त्याचे वेगळेपण दर्शकांना जाणवून द्यायची आणि लक्षात ठेवायला लावायची पद्धतही  लक्षवेधीच!

सकाळपासून बाहेर पडलो होतो. परिक्रमा, हनुमाधारा, स्फटिक शिळा करता करता उन्हं डोक्यावर आली होती. सकाळी डोलणारं टवटवीत उत्साहाचं फूल जरा सुकायला लागलं  होतं. बाहेर काही घ्यावं का न घ्याव ह्या विचारात असताना तेथे राजस्थानचा एक उत्साही तरूण त्यांच्या कंपनीच छाज, लस्सी, दूध---- असे अनेक पदार्थ स्वच्छ कंटेनर्समधे विकत होता. गारेगार लस्सीनी मरगळ गेली. परत रेस्टहाऊसवर आलो. जेवणानंतर अनसूयेचा आश्रम आणि गुप्तगोदावरी ही ठिकाणं पहायला जायची होती.

------------------

अनसूया आश्रम आणि गुप्त गोदावरी –

ज्यांना बंद जागेचा त्रास होतो त्यांनी येथे येऊ नये तेथे अत्यंत छोट्याशा फटीतून जायला लागतं असं सांगून जरा घाबरवलच होतं आम्हाला. कित्येक जागा प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यातील नेमकेपणा कळत नाही त्यामुळे पाहुया जाऊन! जमलं तर ठिक, नाही तर परत येऊ म्हणत निघालो. रांग मोठी होती. चपलाबाईंना आधीच पायउतार व्हायला लागलं. पायर्‍या चढताना पुढच्याच्या मागे मुंगीस्टाईल जायचं एवढच कसब जरुरी होतं. मग मधे 15-20 मिनटं एकाजागीच! त्याचं कारण परत येताना कळणार होत. शेवटी त्या पर्वताच्या दगडांमधे एक फट दिसू लगली. त्या फटितून पंधरा मिनिटं लोकांना आत सोडलं जात होत तर 15 मिनिटं आतल्या लोकांना बाहेर असा वन वे जर्नी होता. दरवेळी एकच माणूस आत किंवा बाहेर येऊ शकत होता. आपण फार विचार करायचा नसतो.  त्या फटितून आत गेल्यावर मात्र थक्क व्हायला झालं. प्रचंड मोठी गुहा होती.---- त्या खास पिवळ्या तुकतुकित दगडाची. आई कधी कधी करंज्या, पुरणपोळी करताना मळलेला तो पिठाचा गोळा चांगला कुटून तरी घ्यायची किंवा पुरणाची कणिक तिंबायची त्यांतर तिला एक छान चकचकितपणा यायचा तशी ह्या दगडांची कणिक निसर्गाने का तिंबली असावी राम जाणे. छतावरून असंख्य खांब लोंबत असले तरी ते ठिबकणार्‍या पाण्यामुळे होणारे stalactite वा stalagmite प्रकारातले नव्हते. एकमेकांना चिकटलेले. त्यात टोकेरीपणा नव्हता. त्यांचे आकार अनुभवत प्रशंसा करत होतो. अशा सुंदर ठिकाणी फोटो काढायला नेमकी परवानगी नसते. असं म्हणतात की 65 मिलियन वर्षांपूर्वी त्याला 10 लाखानी गुणलं तर 650 लाख वर्षांपूर्वी गरम लाव्हारस पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरताना एकलांबच लांब मोठी  जागा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आत तयार झाली.  खव्याची बर्फी बनवताना तयार किंचित पातळ मिश्रण ताटात ओतल्यावर जसं छान सपाट पसरून नंतर घट्ट होतं तसे हे दगड तयार झाले. ह्या गुहेत आत आत अजून दालनं आहेत. येथील अजून एका गुफेत घोट्यपर्यंत पाणी कायम असतं. तीच ही गुप्त गोदावरी. ह्या गुप्त गोदावरीत स्नान करताना सीतेला मयंक राक्षस चोरून पहात असल्याचं लक्ष्मणाच्या लक्षात आल्यावर त्याने त्याला थेट उचलून वर भिरकावून दिल. ते इतक्या जोरात की, तो/ त्याचा मृत देह गुहेच्या छताला चिकटून बसला. ह्या कथेसोबत तेथील पिवळ्या गुहेच्या दालनात मयंक राक्षसाच्या रूपात एक काळा दगड दिसतो. सर्वच प्रेक्षणीय आहे. एका दालनात दोन नक्षीदार दगड म्हनजे रामलक्ष्णाचे सिंहासन मानले जातात. एका गुहा दालनात ब्रह्मा विष्णु महेशाच्या मूर्ती आहेत. ही सर्व दालनं एकाच अति प्रचंड गुहेचाच भाग आहेत.

 चित्रकूट पुराण जरा थांबवते.

------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती