रामायण Express – भाग 15 चित्रकूट सोडून श्रीरामांचा दंडकारण्य प्रवेश

 

 

रामायण Express –

भाग 15

चित्रकूट सोडून श्रीरामांचा दंडकारण्य प्रवेश

( श्री वाल्मिकी रामायणाप्रमाणे )

चित्रकूट उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशमधे विभागले गेले आहे एका बाजुने बुंदेलखंड तर दुसर्‍याबाजून म. प्र. चा सतना जिल्हा.

राजा दशरथ मरण पावल्यावर तशी सूचना रामाला देण्यासाठी आणि त्याला परत घेऊन जाण्यसाठी चित्रकूट पर्वतावर रामाला भेटायला भरत, कौसल्या, सुमित्रा, महर्षी वसिष्ठ सारा राजपरिवार लवाजमा घेऊन, सैन्यासहित आले. दशरथाचे  अन्त्यविधीही  तेथे करण्यात आले.

(स्थानिक लोकांच्या सांगण्याप्रमाणे चित्रकूट हे स्थान सर्व तीर्थस्थलांमध्ये अत्यंत पवित्र आहे. सर्वात पवित्र मानल्या जाणार्‍या प्रयागराजपेक्षाही. कुंभाच्या वेळी सर्व तीर्थे प्रयागराजपाशी येतात. पण चित्रकूट आले नाही म्हणून प्रयागराज चौकशी करू लागले. त्यावेळी त्याला असे समजले की, रामाने चित्रकूटला आपल्या पित्याचे मरणोत्तर सर्व क्रियाकर्म, श्राद्ध चित्रकूटला केले. रामाच्या कुळाचे जे राजपुोहित त्या वसिष्ठऋषींनी स्वतःच हे श्राद्ध रामाकडून करवून घेतले. श्राद्धाच्या सुरवातीला सर्व देवांना आवाहन करून वसिष्ठांनी बोलावले खरे पण श्रीराम वनात राहणार असल्याच्या दुःखात ते सर्व देवांना परत जा म्हणायचे विसरून गेले. त्यामुळे आजही सर्व देव चित्रकूटलाच राहतात. त्यामुळे हे स्थान सर्व तीर्थांचे तीर्थ मानले जाते. बाकी काही असो पण चित्रकूटच्या डोंगरांमधली प्रसन्नता खास आहे एवढं खरं!  )

 आपल्या रामायणाकडे जाऊ. रामाकडे सर्व राजपरिवार येऊन गेल्यावर त्यानंतर थोड्याच दिवसात चित्रकूटचे बहुतेक ऋषीमुनी भुवया उंचावून रामाकडे कटाक्ष टाकून एकमेकांमधे गुप्तपणे काही बोलताना दिसू लागले. श्रीरामांनी विनम्रपणे त्यांना विचारलं, ‘‘मुनीमहाराज माझ्याकडून वा माझ्या भावाकडून वा सीतेकडून काही चूक झाली का? आमच्याकडून आपल्या सेवेत काही कमी तर राहून गेली नाही ना? मग अपण पूर्वीसारखे आमच्याशी मनमोकळेपणाने का वागत नाही?’’ ऋषींच्या बोलण्यातून रामाला कळलं की,

राम तेथे असल्याची खबर मिळून अनेक राक्षस तेथे येऊन तेथील ऋषीमुींना त्रास देऊ लागले. रक्त मांस टाकून सार्‍या पवित्र आश्रमांना अपवित्र करू लागले. बेसावध ऋषीमुनींवर हल्ला करून त्यांना मारून त्यांच्या आश्रमाचा विध्वंस करू लागले. त्यांचा म्होरक्या होता रावणाचा भाऊ खर.  म्हणून   अनेक ऋषी त्यांच्या कुलपतीसह जवळ असलेल्या अश्वमुनींच्या आश्रमाजवळ स्थलांतरीत होण्यासाठी चित्रकूट सोडून निघून चालले होते. पण रामाजवळ सर्व ऋषिमुनींचं रक्षण करण्याचं सामर्थ्य आहे  असे वाटणारे काही ऋषी रामासोबतच राहिले. मित्रांनो,

रावण जरी लंकेचा राजा असला तरी त्याचे दुष्ट चेले थेट अयोध्येच्या जवळील सुंदरवनापासूनच पेरलेले होते. ते भारताला खिळखिळे करण्यासाठी तेव्हाही कार्यरत होते. आजही आहेतच! तेव्हा ते राक्षस नावाने संबोधले जात होते आज अजून वेगळ्या नावाने परकीय शक्तींच्या पाठिंब्याने भारताला खिळखिळे करण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांना वारंवार धडा शिकवणे, नियंत्रणात ठेवणे आणि वेळ पडली तर मोक्षमार्ग दाखविणे हा एकच भारताच्या प्रगतीचा योग्य उपाय आहे.

ह्या राक्षसांच्या त्रासाला कंटाळून, घाबरून अनेक ऋषी निघून गेले. पण राम मात्र न घाबरता तेथेच राहिला. पण चित्रकूटला त्या आश्रमात रामाला त्याच्या माता, भरत, अयोध्येचे  अनेक नागरीक येऊन भेटले होते. रोज त्यांच्या त्या प्रेमळ आठवणी रघुरामाला शोकमग्न करीत राहिल्या. अयोध्येचं सैन्य काही काळ तेथे राहिल्याने घोड्यांची लीद, हत्तीचे पोह पडून सारी जागाही खराब झाली होती..  सरतेशेवटी रामानेही चित्रकूट सोडण्याचा निर्णय घेतला.

चित्रकूट कायमचे सोडून ते अत्री आश्रमात वृद्ध झालेल्या मुनिवर अत्रींना आणि अत्यंत प्रेमळ, वृद्ध सती अनसूयेला भेटले. तिने सीतेची चौकशी केली. तिला धीर दिला. तिला उपदेशपर चार गोष्टीही सांगितल्या. मोठ्या आत्मीयतेने सीतेच्या लग्नाची सर्व हकिकत विचारली. सीतेनेही ती लहान असताना शेतात कशी सापडली, मातीने माखलेल्या त्या छोटुकलीला स्व्छ करून जनकानी तिचा प्रेमळपणे कसा सांभाळ केला, शिवधनुष्य भंग केलेल्या श्रीरामासोबत तिचा कसा विवाह झाला हे मनातील सर्व आनंदाचे क्षण  आजीसारख्या प्रेमळ सती अनसूयेला सांगितले. अनसूयेनी सीतेला पोटाशी धरून मोठ्या प्रेमळपणे तिला सुंदर वस्त्र, आभूषणं देऊन ते घालायला लावले. सीता मोठी मोहक दिसू लागली. तिच्या ह्या छानशा रूपाकडे श्रीरामही आश्चर्याने बघतच राहिले. 

एक रात्र अत्रीऋषींकडे राहून श्रीराम  पुढे निघाले. अत्री ऋषींनी त्यांना त्या भयंकर वनातील मार्ग दाखवला  तेथे असलेल्या अत्यंत भयंकर अशा राक्षसांपासून, जंगली प्राण्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला. रामाने दंडकारण्यात प्रवेश केला होता. ( कथित रूपाने जरी 11 वर्ष राम चित्रकूटला राहिले असं सागितलं जात असलं तरी वाल्मिकी रामायणाप्रमाणे एकदिड वर्षांपेक्षा जास्त राम तेथे राहिल्याचे दिसत नाही. कदाचित त्याही पेक्षा कमीच काळ असावा. ) 

येथे अयोध्या कांड संपून रामायणातील आरण्यकांडाची सुरवात होते. अत्री ऋषींनी दाखवलेला मार्ग अनुसरत गहन आणि सुंदर वनातून जाताना वनाची शोभा पाहून  तिघांचं मन प्रसन्न होतं होतं. तेथे अनेक ऋषींचे आश्रम होते. ह्या सुंदर, सुशील, सुसंस्कारीत राजकुमारांच्या आणि सीतेसारख्या सुकुमार राणीकडे पाहून सर्व ऋषी त्यांची चौकशी करून त्यांचं आदरातिथ्य करत होते. राम हा अयोध्येचा राजा आहे हे कळल्यावर सार्‍या ऋषीमुनींनी त्याचं उत्तम आतिथ्य केलं आणि आम्ही तुझी प्रजा असल्याने त्यांचं राक्षसांपासून रक्षण करण्याची विनंतीही केली. ‘‘राजा! ज्या प्रमाणे गर्भातील अर्भकाची संपूर्ण काळजी त्याच्या मातेनी घेणे अपेक्षित आहे त्याप्रमाणे संरक्षणासाठी आम्ही तुझे प्रजाजन तुझ्यावरच अवलंबून आहोत’’- हे सांगून रामाला त्याच्या कर्तव्याची जाणीवकरून दिली. त्याचं आदरातिथ्य स्वीकारून तेथे एक रात्र राहून हे तिघे अजून अजून गहन वनात प्रवासाला निघाले. 

अयोध्येत राहिलेल्या ह्या राजपुत्रांनी असं गहन आरण्य कधीही पाहिलं नव्हतं. तेथील भीषण परिस्थितीचा कधी सामना केला नव्हता. कुठे पाण्याचा स्त्रोतही दिसत नव्हता. ते भीषण जंगल पाहून श्रीरामांना कैकयीच्या मनातील खरं काळबेरं काय होतं हे कळून चुकलं. अशा जंगलात कोणाचा निभाव लागणच शक्य नव्हतं.

दंडकारण्यात श्रीरामांची पहिलीच भेट झाली ती विराध नावाच्या राक्षसाशी! ब्रह्मदेवाच्या वरामुळे हा राक्षस कुठल्या अस्त्र वा शस्त्राने मरणार नव्हता; असं त्या गर्विष्ठ राक्षसाने स्वतःहूनच सांगितले.  हा राक्षस महाप्रचंड शक्तिशाली, पहाडप्रमाणे धिप्पाड होता. तो सीतेला घेऊन तो पळून जायला लागला. त्याच्यावर बाणांचा वा शस्त्राचा काहीच परिणाम होत नव्हता. रामाचा शोक पाहून कैकयी आणि भरतावरचा सर्व संताप त्या राक्षसावर काढत लक्ष्मणाने त्यावर बाण सोडायला सुरवात केली. रामानेही निकराचा हल्ला चढवला. रक्ताने माखलेल्या राक्षसाने सीतेला खाली ठेऊन  राम लक्ष्मणाला खांद्यावर उचलून घेऊन तो चालू लागला. ही चांगली संधी आहे त्याचा फायदा ह्या दोघा भावांनी उठवायचे ठरवले . एक तर तो ज्या दिशेने चालला होता त्या दिशेने रामलक्ष्मणाला वनातला मार्ग कळणार होता. दुसरं म्हणजे त्याच्या खांद्यावर बसून दोघांनी तलवारीने त्याचे दोन्ही हात धडापासून अलग केले. विराध खाली कोसळला. तेव्हा रामाने लक्ष्मणाला एक मोठा खड्डा खोदायला सांगितला. त्यात ह्या राक्षसाला ढकलून दोघांनी त्याच्यावर माती लोटून त्याला जमिनीत गाडून ठार मारलं.

 मित्रांनो, जेव्हा कोणी असंभाव्य मोठ्या वराची ढाल घेऊन ‘‘मी अमर आहे.’’ म्हणत वावरत असतो तेव्हा त्याचं मरण एखाद्या छोट्याशा कृतीत सामावलेलं असतं. हे आपणही लक्षात घेऊन कोठल्याही महान शक्तींशी लढताना हतोत्साह न होता आता माझं कसं होईल हा विचारही न करता, योजकस्तत्र दुर्लभः  हे लक्षात घेऊन साध्याशा उपायांचाही विचारही करायला पाहिजे.

चित्रकूटाहून श्रीरामांनी दंडकारण्यात प्रवेश केला आणि त्यांच्या चरणकमलांचे ठसे गोष्टीरूपातून आठवत, आत्ताच्या युगाला सांधण्याचा प्रयत्न करत आम्हीही चित्रकूटहून दंडकारण्य शोधत माणिकपूर जंक्शन वर पोचलो. सर्व स्टेशन्स अत्यंत सुंदर होती.

-------------------------

#लेखणीअरुंधतीची-

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)