रामायण Express – भाग 16 माणिकपूर ते दंडकारण्य, नाशिक, पंचवटी

 

रामायण Express –

भाग 16

माणिकपूर ते दंडकारण्य, नाशिक, पंचवटी

वाल्मिकी रामायणातील अरण्यकाण्ड

रामाच्या पदचिह्नांचा शोध घेत माणिकपूरहून आमची रामायण Express नाशिकला येऊन दाखल झाली. आपलं नाशिक हो! ज्या नाशिकधे लहान असताना गंगा काठाकाठानी हिंडले, काळाराम, गोराराम ह्यांना येताजाता आले रे! म्हणत त्यांच्या देवळात काचापाणी खेळत मनसोक्त बागडले त्या महाराष्ट्रात, नाशकात अनेक दशकांनंतर यात्रेकरू म्हणून येताना एका नव्याच ठिकाणाला भेटल्यासारखं वाटत होतं. ‘‘उताराने गेलं की गंगा आणि चढाने गेलं की घर’’ असं रस्ता न चुकण्यासाठी बरोबरच्या बाळगोपाळांनी सांगितलेलं टुमदार शहराचं समिकरण पूर्णच बदलल्यासारखं वाटलं. गृहित धरलेली देवळं, एका वेगळ्या नजरेने पहायला होत होतं. अनेक गोष्टी बदलल्या होत्या. यात्रेकरूंना आकर्षक केल्या गेल्या असल्याने नवीनच होत्या.

 

राम तिथे शिव आणि शिव तेथे राम म्हणजेच कल्याण वा हितावह गोष्टींमधे पुरेपुर सौंदर्य असतं आणि असली सौंदर्य तेच जे हितावह असतं हे साांगणारं रामशिव प्रेमाचं प्रतिक त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेण्यासाठी आम्ही देवळात पोचलो. त्रयंबकेश्वरचं देऊळ असो वा काळारामाचं ; त्याच्या भोवती असलेला भलामोठा मोकळा अंगण परिसर मला फार आवडतो. देवळांचं हेमाडपंथी बांधकाम मनाला मोहविणार असतं. त्यावरील शिल्पकला बरच काही सांगत असते.  काळाराम मंदिराला असलेल्या अंगणाभोवती असलेल्या रुंद भिंतीवरून  गस्त घालणार्‍या सैनिकांना चालण्यासाठी  असलेला प्रशस्त रस्ता महाराष्ट्राच्या मंदिरांची खासियत आहे. आज यात्रेकरू बनून येताना माझ्या महाराष्ट्राबद्दल जास्तच आत्मीयता वाटत होती.

गौतम ऋषींचा मत्सर करणार्‍यांनी त्यांच्यावर गोहत्येचा आरोप केला. त्यातून मुक्तता मिळण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न करून घेतले. गौतमऋषींच्या विनंतीनुसार त्रिमूर्ती रूपात राहू लागले. येथील शिवपिंडीत अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपारी ब्रह्मा विष्णू आणि महेशाच्या रूपात विद्यमान आहेत. तीनही देवांचा निवास असलेलं हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे. असे मानतात. इतर ज्योतिर्लिंगापेक्षा अजून एक वगळेपण म्हणजे गोदावरीच्या पाण्याचे झरे ह्या ज्योतिर्लिंगातून वाहतात.

 

सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरीतीरपवित्रदेशे ।

यत् दर्शनात्पातकमाशु नाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे ।।

सह्याद्रीच्या शिखरावर गोदावरीच्या पवित्र तीरावर असलेल्या प्रदेशात असलेल्या ज्या त्र्यंबकेश्वर देवाच्या नुसत्या दर्शनानेही सर्व पातकांचा नाश होतो. त्या तीनही ब्रह्मा, विष्णू, महेशस्वरूप देवाची मी स्तुती गातो. पूजा करतो.

 रुद्राभिषेक तेथे देवळाच्या सभामंडपात बसून करता येणे हे इतर ठिकाणांपेक्षा वेगळं सौख्य आहे.

---------

कुशावर्त

 मुख्य देवळापासून हे कुंड 300 मि. वर आहे. मोहिनीरूपातील विष्णू अमृतकुंभ घेऊन जात असताना काही अमृताचे थेंब कुशावर्तात पडल्याचे सांगतात. ब्रह्मगिरीवर उगम पावलेली गोदावरी लुप्त होऊन येथे कुशावर्तात प्रकट होते असे मानतात. ह्या कुंडात जमिनीच्या पोटातून जिवंत झरे वाहत असतात. 20-22 फूट खोल कुंडाला चारी बाजूनी छान पायर्‍या बांधलेल्या आहेत. भर दुपारी कुंडातील थंडगार पाणी आह्लाददायक वाटत होतं. गौतम ऋषींनी पूर्वी गोदावरीला येथे आडवलं होतं असं कोणी सांगतात. ह्या कुंडात अंघोळ करून मग ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला भाविक जातात. कुंभमेळ्याच्या वेळी ह्या कुशावर्तात स्नान करायला लाखो साधु येतात. ह्या कुंडाच्या जवळ छोटी छोटी मंदिरं  सुंदर शांत व रमणीय वाटली.

‘‘ वेळ झाली भर मध्याह्न, माथ्यावर तळपे ऊन

 नको जाऊ कोमेजुन ----  असं मनाला समजावत पोटपूजेसाठी बसने पाटिलवाड्यात दाखल झालो. पाटिवाड्याच्या पुरणाच्या  कागदासारख्या पातळ मांड्यांनी व आमरसाने जीव सुखावला. वाड्यांची संस्कृती सांगणारं हे हॉटेल सर्वांनाच सुखावून गेलं. नंतर बाकी नाशिक पहायचं होतं.

-----

कैकयीने रामाला 14 वर्ष दंडकारण्यात राहण्याचा आदेश दिला आणि रामाने तो स्वीकारलाही. पण! ---- दंडकारण्याची प्रत्यक्षातली भीषणता पाहिल्यावर आपल्याला आपल्या सावत्र आईने येथे 14 वर्ष राहण्याची आज्ञा का दिली असावी हे हळुहळु रामलक्ष्मणांच्या लक्षात येऊ लागले. अशा गहन वनात, भयंकर श्वापदांच्या संगतीत, भयद राक्षसांशी सततचा संग्राम करत दोन मिसरुड फुटलेल्या तरुणांचा कितीसा निभाव लागणार ह्या कैकयीच्या दूरदृष्टीतील अत्यंत कुटील, हीन विचार त्यांच्या लक्षात येऊन तिचा वारंवार राग येत होता.

 येथील राक्षस सीतेची क्षणात चटणी करून टाकतील. सीतेविना राम मनानेच खचून जाऊन अत्यंत बलहीन होईल हे कैकयीच्या मनातील दुष्ट विचार प्रत्यक्षात उतरताना पाहून रामही प्रथम घाबरून गेला. शोकाकूल झाला पण विराधाला मारल्यावर स्वतःच्या अंगभूत पराक्रमाची जाणीव होऊन राम व लक्ष्मण नव्या दमाने पुढच्या प्रवासाला सज्ज झाले. त्यांचा पराक्रम पाहून तेथील ऋषीमुनींनाही राम लक्ष्मण आपलं रक्षण करू शकतील असा विश्वास निर्माण झाला.

दोन्ही हात तुटेलेल्या विराधानेही सांगितले,

अवटे चापि मां राम निक्षिप्य कुशली व्रज ।

रक्षसां गतसत्त्वानाम् एष धर्मः सनातनः ।। 22

श्रीराम, कबर खोदून त्यात माझं शरीर दफन करून तू प्रसन्नतापूर्वक येथून जा. राक्षसांचे मृतदेह  पुरावेत ही त्यांची परंपरा आहे.

 

अवटे ये निधीयन्ते तेषां लोकाः सनातनाः

एवम् उक्त्वा तु काकुत्स्थं विराधः शरपीडितः ।। 23

बभूव स्वर्गसम्प्राप्तो न्यस्तदेह महाबलः ।(अरण्यकाण्डे चतुर्थ सर्गः)

ज्या राक्षसांना जमिनीत पुरलं गाडलं जातं त्यांना  सनातन धर्माची प्राप्ती होते. असं बोलून विराधाचा गळा पायाने दाबून श्रीराम उभे राहिले  त्याच्या शेजारीच लक्ष्मणाने खड्डा खणला आणि खणलेल्या खड्ड्यात बलपूर्वक विराधाला फेकलं. तो जोरजोरात ओरडत असतानाच लक्ष्मणाने फावड्याने माती लोटली. अशा प्रकारे विराध संपला. असे अनेक विराध दुष्ट प्रवृत्तींच्या रूपाने समाजात असतात. कुठल्याही अतिरेकी दुष्ट प्रवृत्ती ससहजासहजी नष्ट होत नाहीत. मरत नाहीत. जणु ब्रह्मदेवाने अमरत्व दियासारख्या कायम जिवंतच असतात. त्यांच्या दुष्कर्माला वारंवार खीळ घालावी लागते. तेच त्यांचे हात तोडणं होय. दुष्कर्मापासून रोखलेले/ हात तोडलेले असे अनेक विराध समाजात जनतेची दिशाभूल करण्यासाठी अनेक प्रसारण माध्यमांमधून खोट्याचा डंका पिटत, अन्यायाच्या वावड्या उठवत, धडधडीत खोटं बोलून खोटच खरं वाटायला लावतात. खोट्यालाच प्रतिष्ठा मिळवून देतात. अशा वेळी त्यांच्या गळ्यावर पाय देऊन रामासारखं उभं रहायला लागतं आणि लक्ष्मणाारखा चर खणून  वारंवार त्यांना गाडायलाच लागत. असो!

 

विराधाने सांगितल्याप्रमाणे राम,लक्ष्मण सीता शरभंग ऋषींकडे गेले. मुने, आम्ही फक्त थोडाकाळ आपल्या आश्रमात निवास करू इच्छितो. परंतु शरभंग ऋषी फक्त रामाला भेटण्यासाठीच थांबले होते. ते म्हणाले येथून जवळ असलेल्या सुतीक्ष्ण ऋषींकडे तुम्ही जा. रामाचं दर्शन होताच शरभंगानी अग्निप्रवेश करून ते ब्रह्मलोकाला पोचले.

नंतर तेथे राहणारे सारे ऋषीमुनी रामाभोवती जमा झाले. आणि त्याला म्हणू लागले, ‘‘हे रामा तू इक्ष्वाकु वंशासोबत सार्‍या भूमंडळाचा स्वामी आहेस आमचं जीणं ह्या राक्षसांनी अशक्य केलं आहे. त्यांच्यापासू आमचं रक्षण कर. चित्रकूट पर्वताच्या आश्रयाने राहणार्‍या तसेच पम्पा सरोवरा जवळ राहणार्‍या आणि तुंगभद्रेच्या काठी राहणार्‍या सर्वऋषीमुनींना ठार मारायचा ह्या राक्षसांनी चंगच बांधलाय. तुझ्याशिवाय आम्हाला कोणी आधार दिसत नाही.  ह्या भयंकर विनाशकांडातून आम्हाला वाचवेल असा तुझ्याविना कोणी दुसरा आधार आम्हाला दिसत नाहिए.’’

‘‘मुनीवर अशी प्रार्थना करू नका मला आज्ञा द्या. तुमच्या रक्षणासाठीच पित्याच्या आज्ञेने, तपस्वी, मुनींचा छळ करणार्‍या राक्षसाचा संहार करण्यासाठी दैववशात येथे पोचलो आहे.  आपण माझा पराक्रम बघा.’’ असे त्यांना आश्वासन देऊन राम, लक्ष्मण सीता सुतीक्ष्ण मुनिंच्या आश्रमात पोचले. अनेक पाण्याने पात्र पूर्ण भरलेल्या नद्या ओलांडत विविध वृक्षांनी भरलेल्या दाट जंगलात एका अत्यंत उंच पर्वतापाशी आले. (सप्तम सर्ग आरण्यकांड - वाल्मिकी रामायणातील ह्या उल्लेखामुळे रामाने नर्मदे सारख्या अनेक नद्या व विंध्यच्या रांगा ओलांडल्या असाव्यात. )

तेथेच सुतीक्ष्ण ऋषिंनी आलिंगन देऊन रामाचे स्वागत केले. ते त्याचीच वाट बघत होते. रामाला वनवास मिळून तो चित्रकूटला आला आहे तेथून पुढे दंडकारण्यात येणार आहे हे इतर ऋषींकरवी त्यांना माहित होते. ( वाल्मिकी रामायणातील हा उल्लेख ही चित्रकूट आधी लागतं, मग दंडकारण्य येतं हे दाखवणारा आहे.) एकरात्र त्यांच्या आश्रमात राहून श्रीराम पुढे निघाले. ऋषीवर मला आाता दंडकारण्याची ओढ लागली आहे. तेथील ऋषीमुनींना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. म्हणून आपल्या आश्रमात अजून रहात नाही; मुनींच्या पायांना स्पर्श करून प्रणाम करत श्रीराम म्हणाले. सुतीक्ष्णमुनींनी रामाला गाढ आलिंगन दिलं. सर्व मुनींचा  निरोप घेऊन सकाळीच तिघे पुढच्या प्रवासाला निघाले.

अनेक पर्वतांची शिखर, पाण्याने भरलेल्या नद्या, सुंदर वनं, अनेक सुंदर पक्षी, प्राणी पहात तिघेही मार्गक्रमणा करत होते. वाटेतल्या ऋषीमुनींच्या आश्रमात थोडा काळ रहात ते पुढे चालले होते. त्यांना अगस्तिऋषींच्या आश्रमात जायचं होतं.  त्याच्या आश्रमाचा पत्ता घेऊन  ते अगस्ति आश्रमात पोचले. लक्ष्मणाने पुढे आश्रमात जाऊन अगस्त्यशिष्यांची भेट घेऊन राम, लक्ष्मण सीतेसहित ऋषीवरांना भेटायला आल्याचे सांगितले. ठीक आहे म्हणून शिष्य आत निरोप घेऊन गेला.

 हे तर माझं सौभाग्य आहे. त्यांना भेटावे ही इच्छा कित्येक दिवस माझ्या मनात होती.तुम्ही त्यांना घेऊन का नाही आलात? जा लौकर घेऊन या. ऋषींच्या आज्ञेचं पालन करत शिष्य त्यांना मोठ्या आदरसत्कार करून घेऊन आला. स्वतः त्याचं स्वागत करण्यासाठी  महर्षी अगस्ती अग्नीशालेतून बाहेर आले. भगवान रामाला आलिंगन देऊन त्याचं स्वागत केलं. रामानेही त्यांच्या दोन्हीचरणांना स्पर्श करून नमन केले. त्यांना फळं कंदमुळे इत्यादिचे भोजन देऊन, सीतेचंही कौतुक करत तिला विश्रांतीची गरज स्पष्टपणे जाणवून विश्रांती घेण्यविषयी सांगितले.

ह्या भेटीत अगस्ती मुनींनी विश्वकर्म्याने बनवलेले सुवर्ण व हिेरेजडित  श्री विष्णुने  दिलेले धनुष्य आणि सूर्यासमान देदिप्यमान ब्रह्मदेवाने दिलेले सुवर्णाची पिसे लावलेले नाराच बाण आणि  इद्राने दिलेले अक्षय बाणांचे भाते रामाला दिले. शिवाय एक सोन्याच्या मुठीची तलवारही दिली. राक्षसांच्या वधासाठी रामाला ग्रहण करण्यास सांगितले.

त्या तिघांवर महर्षी अत्यंत प्रसन्न होते. रामाने तेथे जवळपास राहण्यासाठी योग्य स्थान विचारले तेव्हा अगस्तींनी तेथून दोन योजन दूर असलेल्या रमणीय पंचवटीत कुटी बांधून राहण्याचा सल्ला दिला.

पाठीवर बाणांचे भाते बांधून, हातात धनुष्य घेऊन दोघे भाऊ अत्यंत सावधपणे सीतेसहित पंचवटीकडे निघाले. वाटेतच त्यांना भला मोठा जटायू पक्षी भेटला. मोठ्या प्रेमळपणे तो म्हणाला, ‘‘बाळ मी तुझ्या पित्याचा मित्र आहे असं समज. रामानेही त्याचं नाव, तो कोण, कुठला हे विचारून घेतलं. विनीता ची गरुड आणि अरुण अशी दोन मुलं. अरुण आणि श्येनी ह्यांचे सम्पाति आणि जटायू हे दोन पुत्र.

 हे शत्रुदमन राम! जटायू म्हणाला, ‘‘हे वन  अतिशय दुर्गम आहे. येथे राक्षसही खूप राहतात. मी आपल्या येथील वास्तव्यात आपल्याला मदत करीन,आपण दोघे जर पर्णशाळेतून कधी बाहेर गेले तर मी देवी सथेचं रक्षण करीन.’’

रामही त्याला आलिंगन देऊन त्याच्यापुढे नतमस्तक झाला. आपल्या पित्यासोबत राजा दशरथासोबत जटायूची कशी काय मैत्री झाली हा प्रसंग त्याने जटायूच्या मुखातून अनेकवेळा ऐकला.

 

लक्ष्मणाने समतल भूमी पाहून एक सुंदर पर्णकुटी बांधली.  अगस्तींनी वर्णन केलेलं कमलांचं तळ तेथून छान दिसत होतं. गोदावरी नदीही जवळच होती. लक्ष्मण ज्या प्रकारे रामाची काळजी घेत होता ते पाहून रामालाही  लक्ष्मणाबद्दल हृदयात प्रेम दाटून आलं. ‘‘लक्ष्मणा, ज्याप्रकारे तू माझी काळजी घेत आहेस ते पाहून अजूनही मला आपल्यावरचं पितृछत्र हरपलं आहे असं वाटत नाही. पण येथे माझ्याकडे तुला द्यायला दुसरं काही नाही म्हणून मी तला गाढ आलिंगन देतो.’’ असं म्हणत रामाने प्रेमाने लक्ष्मणाला आपल्या दोन्ही बाहूंनी जवळ घेत हृदयाजवळ धरलं.

तेथील आजूबाजूचे रंगित पहाड रामाला छान सजवलेल्या हत्तींसारखे वाटत होते. तेथे असलेले मोठे मोठे अनेक जातीचे वृक्ष वनाची शोभा वाढवत होते.  शरदऋतु संपून हेमन्त ऋतु सुरू झाला होता. गोदावरीचं पाणी इतकं थंड झालं होतं की  पीण्यासारखं वाटत नव्हतं. शेकोटीची उब हवीशी वाटत होती. (अरण्यकाण्ड 15 व 16 वा सर्ग). मलाही लहानपणी थंडीचा कडाका वाढला की गोदावरीवर बर्फाचा तवंग साचल्याच्या आठवणी जाग्या होत होत्या.

-------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)