रामायण Express – भाग - 17 खर दूषणाचा निःपात
रामायण Express –
भाग - 17
खर दूषणाचा निःपात
सुहृत् हो!
कोशल किंवा कोसलाची राजधानी अयोध्या आणि पूर्ण उत्तर प्रदेश, बिहार,
नेपाळ, मध्यप्रदेश आणि तेथून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा हा कितीक योजनांचा आत्ताच्या
भाषेत बोलायचं तर मैलांचा किंवा किलोमिटरचा प्रवास हा केवळ अंतराचा हिशोब नसून रामाच्या
जीवनाचा अभूतपूर्व प्रवास होता. आजही ही श्री राम चरित-सरिता गुप्त सरस्वती नदीप्रमाणे
भारतभर अदृश्यपणे प्रत्येक पर्वत, शिळा, खडक
आणि मातीच्या कणाकणाखालून वहाते आहे. प्रत्येक भारतीयांच्या विचारविश्वाला हलकेच
स्पर्श करत चैतन्याला एक नवा जोम देत आहे.
‘ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनियाँ’ --- ह्या रामलला पासून आकाशीचा
चंद्र मागणारा ---- कौसल्येचा बालक राम ---- ते कमरेला तलवार, हातात धनुष्य खांद्यावर
बाणांचा भाता लावून विश्वामित्रांसोबत कानावर भुरभुरू उडणारे केस येणारा, कानांवर केसांच्या
लाडिक लडी रुळणारा (काकपक्षधारी) 12-13 वर्षांचा कुमार दशरथनंदन राम; --- ते विश्वामित्रांकडून
अनेक विद्या शिकून तयार झालेला विजयी विनयी कोदंडधारी राम; --- अनेक राक्षसांचा निप्पात
करणारा आत्मविश्वासाने परिपूर्ण शत्रुदमन राम; ----- ते तारुण्यात नुकता प्रवेश करणारा,
शिवधनुचा भंग करणारा बलशाली पण तरीही सीतेला एकपत्नीत्वाचं वचन देणारा अत्यंत विचारी,
समजुतदार, परिपक्व जानकीपती श्रीराम; ते दंडकारण्यात असंख्य मुनीजनांचा त्राता झालेला,
दुष्टांना शासन करणारा प्रभुराम आणि शत्रूच्या लंकेत जाउन शत्रूभूमीवर अत्यंत बलशाली
दशाननाला धराशायी करणारा दशाननान्तक विश्वनेता, सार्या लोकांची मन जिंकून घेणारा विश्वहृदयसम्राट
प्रभू श्रीराम---- असा हा रामलला ते प्रभु
पर्यंतचा श्री रामप्रभूंचा जीवनपट मनात उलगडत, अनुभवत श्रीरामप्रभूंची महती जाणून घेत
आम्ही पंचवटीत पोचलो होतो.
राकट देशा कणखर देशा असा हा महाराष्ट्र खर्या वीरांचं खरं शौर्य, पराक्रम
जगासमोर आणतो. आणि दुष्टांना कायमचं शासन घडवतो.
एखाद्याचा सणणित झालेला अपमान, बेइज्जति, प्रतिष्ठा धुळीला मिळवणं इ.
इ. ‘‘नाक कापलं गेलं ’’ ह्या एकाच म्हणीतून
10 -20 हजार वर्षांनंतरही जिवंत असेल तर तो प्रसंगही नुसता रोचक नव्हे तर राक्षसांच्या हृदयांमधे भीतीने
थरार निर्माण करून गेला असला पाहिजे. खरोखरचं शूर्पणखेचं नाक इथेच कापलं गेलं का भद्राचलम्
च्या पंचवटीत हा शोध तज्ज्ञ घेत आले तरी माझ्या मनात जराही दुमत नाही. नासिक हे नावच
बरच काही सांगून जातं. बाकी भारतात दुसरं नासिक नाही. महाराष्ट्राच्या भूमीवरच असा
जन्मभर लक्षात राहील असा अपमान शक्य आहे असं मन मात्र ग्वाही देत राहिलं.
श्रीरामालाही सोपं नव्हतच इथे राहणं! राम पंचवटीत रहायला आले तसे श्रीरामांना
भेटायला अनेक ऋषीमुनी येत होते. त्याची खबर मिळून आणि शूर्पणखा आली. रामावर मोहित होऊन
ह्या कुरूप सीतेला सोडून माझ्याशी विवाह कर म्हणू लागली. श्रीरामांना हसू आवरेना. पण
थोडी गम्मत चेष्टा करत त्यांनी ‘‘हे सुंदरी मी विवाहित आहे. तुला सवत कशी आवडेल? तू
माझ्या भावाला लक्ष्मणाला विचार’’ म्हणून सांगितलं. लक्ष्मण म्हणाला, ‘‘मी तर सेवक
आहे. माझ्याशी लग्न करून तुलाही सुख मिळणार
नाही. त्यापेक्षा तू रामाची दुसरी पत्नी हो.’’ दोघांची चेष्टा न कळल्याने ती
रामाकडे गेली. सीतेमुळेच राम आपल्याला महत्त्व देत नाही असं वाटून ती सीतेला खायला
धावली. ह्या महाआपत्तीला जाणून आपल्या नुसत्या हुंकाराने तिला थांबवत अत्यंत क्रोधाने
रामाने लक्ष्मणाला त्या राक्षसीचे नाक व कान कापून कुरूप करण्याची आज्ञा दिली. आणि
एका क्षणात लक्ष्मणाने तिचे नाक व कान कमरेच्या तलवारीने कापून टाकले.
सुहृत् हो, ह्या प्रसंगाची आठवण म्हणून नासिकला लक्ष्मणाचं सुंदर देऊळ
आहे. भारतात असं रामाशिवाय एकट्या लक्ष्मणाचं हे एकमेव देऊळ आहे. त्याचं नूतनीकरण करताना
तेथे शूर्पणखेचं नाक व कान कापल्याचा प्रसंगही मूर्तींमधून साकार केला आहे.
असो वाल्मिकी रामायणानुसार,
रक्ताने माखलेला चेहरा घेऊन ती भयंकर राक्षसी दोन्ही हात वर करून भयंकर
किंचाळत वनात दिसेनाशी झाली. एक संकट अनेक संकटांना घेऊनच येतं
त्याप्रमाणे ही राक्षसी सरळ वनात राहणार्या आपल्या भावाकडे खर राक्षसाकडे पोचली. तिची
ही भयंकर अवस्था पाहून संतापलेल्या खराने तिच्याबरोबर त्याच्यासारखेच शूर, वीर 14 राक्षस
दिेले. त्यांना घेऊन ती परत पंचवटीत पोचली. पण रामही गाफिल नव्हता. सज्जच होता. शिवाय
आता अगस्तिंनी दिलेले श्री विष्णूचे कणखर वैष्णव
धनुष्य त्याच्याकडे होते. ब्रह्मदेवाने तयार केलेले बाण होते. एकाच वेळी आपल्या धनुष्यावर
14 नारीच बाण जोडून ते एकाच वेळी मोठमोठ्याने आरोळ्या ठोकणार्या आणि अंगावर धावून
येणार्या 14 राक्षसांवर सोडून त्याने त्यांना धराशायी केलं. आतापर्यंत नाक कानाच्या जखमा वाळून डिंक येणार्या
झाडांसारखी दिसणारी शूर्पणखा भयाने ओरडत रडत, किंचाळत परत आपल्या भावाकडे खराकडे गेली.
सर्व इति वृतांत त्याला सांगितल्यावर खर संतापला. ज्या कोणी हे दुःसाहस केलं असेल त्याला
त्याच्या मरणाची घाई झाली आहे. असं म्हणत
14,000 राक्षसांचं सैन्य घेऊन तो लवकरच प्रभुरामांवर चालून आला.
(मित्रांनो, येथे परत एकदा मला माझे मत मांडावेसे वाटते. ह्या अरण्यात
राहणार्या निरुपद्रवी ऋषीमुनींवर राक्षसांचा एवढा राग का असावा? ते तर सामान्य जनांपेक्षाही
कमी त्रासदायक असावेत असं आपण म्हणतो. प्रत्यक्षात
रामाशी बोलताना ऋषी म्हणतात, रामा आम्ही ह्या राक्षसांशी एकटे सुद्धा लढू शकतो पण असं
लढत राहिलो तर आमचं काम होणार नाही.’’ हे ऋषी अमोघ ज्ञानभांडार तर होतेच पण प्रत्येकाचे
आश्रम हे वेगवेगळी अस्त्र, शस्त्र, अनेक मानव उपयोगी साधने बनविण्याचे त्यावेळचे कारखानेही होते. रामाला
मिळालेली ही अमोघ शस्त्र ही त्या ऋषींच्याच आश्रमात बनली असावीत. ज्याचं तंत्रज्ञान
/technology त्यांना विष्णू, ब्रह्मदेव अशा देवांकडून मिळाले असावे. ह्या अधुनिक तंत्रज्ञानामुळे
एकटा राम कितीही राक्षसांना भारी ठरत होता.)
खर राक्षस आपल्या सैन्याला घेऊन
आश्रमापाशी पोचला तेव्हा शत्रूघाती श्रीराम हातात धनुष्यबाण घेऊन सज्ज होते.
खराने आज्ञा दिली आणि त्याच्या सारथ्याने रामासमोर आणून त्यांचा रथ उभा केला. ते समस्त
निशाचर श्रीरामांवर लोखंडी अस्त्र, शस्त्रांचा
जणु पाऊस पाडू लागले. रामचंद्र त्या शस्त्रांनी जखमी होऊन त्यांचं अंग रक्ताने माखून
गेलं खरं पण! -----
अत्यंत क्रोधाने श्रीराम त्यांच्यावर तुटून पडले. त्याने धनुष्याची
प्रत्यंचा इतकी ताणली होती की धनुष्य जणु गोलाकार दिसत होतं. एका वेळेला शेकडो हजारो
तीक्ष्ण बाण ते सोडू लागले. सहज खेळाखेळात सोडल्यासारखे ते बाण अनेक राक्षसांचा जीव
घेऊ लागले. त्या बाणांनी शत्रूंच्या ढाली, तलवारी, घोडे , हत्ती पटापट मरू लागले.
श्रीरामांनी सोडलेले नालीक, नाराच, विकर्णी नावाच्या अत्यंत तीक्ष्ण आणि भेदक बाणांच्या मार्यापुढे
सार्या निशाचरांमधे हाहाकार माजला. वणव्यात जळणार्या वनाप्रमाणे राक्षस भयाने गर्भगळित
झाले होते. गरुडाच्या पंखांच्या वार्यानेच नंदनवनातले वृक्ष कोसळावेत तसे धराशायी
होत होते. जे राक्षस वाचले ते त्राही त्राही. वाचवा वाचवा म्हणत खर राक्षसाच्या जवळ
धावले. त्यांना दूषण राक्षसाने धीर दिला आणि तो कोपलेल्या यमाप्रमाणे श्रीरामांवर तुटून
पडला. थोडासा धीर मिळताच परत उरलेले राक्षस अनेक शस्त्र, अस्त्र आणि भले मोठे वृक्ष
उखडून त्याच्यासहित रामावर धावले. परत एकदा भयंकर युद्धाला सुरवात झाली. पण महा भयंकर
गर्जना करत ह्या रघूत्तमाने गांधर्व नामक अस्त्राचा प्रयोग केला. आता त्याच्या गोलाकार
ताणलेल्या धनुष्यातून हजारो बाण दाही दिशांना वेगाने सुटू लागले. हा पराक्रमी शत्रुदमन
श्रीराम कधी हातात बाण घेऊन कधी धनुष्याला लावत होता आणि कधी सोडत होता हेच कोणाला
कळत नव्हतं. संपूर्ण आकाश श्रीरामांच्या बाणांमुळे इतकं झाकोळून गेलं की, सूर्यही झाकला
गेला. राक्षसांच्या मृतदेहांचा नुसता खच पडला. तेव्हा युद्धात कधीही माघार न घेणार्या पाच हजार राक्षसांना घेऊन दूषण परत एकदा श्रीरामांवर
चालून आला. पण क्षुर नावाच्या बाणाने रामाने त्याचे धनुष्य तोडून टाकले. त्याच्या रथाच्या
घोड्यांना आणि सारथ्यालाही आपल्या बाणाने स्वर्गाचा रस्ता दाखवला. तेव्हा परिघ नावाचं
एक भयंकर शस्त्र घेऊन दूषण रामावार धावला पण रामाच्या अचूक बाणाने त्याच्या दोन्ही
बाहूंचा वेध घेतला. हे पाहून महा कपाल, स्थूलाक्ष आणि प्रमाथी नावाचे
अत्यंत बलवान दैत्य हातात भाला, दांडपट्टा आणि
अंकुश घेऊन प्रभुरामांवर चालून आले. पण श्री रामांनी तडफेनी महाकपालीचं शिर
बाणाने उडवलं तर प्रमाथी बाणांमधे जणू गाडलाच गेला. स्थूलाक्षच्या डोळे रामबाणांनी
भरून गेले. दूषणासोबत त्याच्या पाच हजार राक्षसांच्या सैन्याचा खातमा झाला.
आता खराला यमसदनाला धाडण्याची वेळ आली. खर त्याच्या अत्यंत शूरवीर अशा
बारा योध्यांसह प्रभुरामांवर चालून आला. रामाच्या पराक्रमापुढे सर्व सैन्याची वाताहात
झाली. फक्त खर आणि सेनापती त्रिशिरा असे
दोघेच राक्षस वाचले. त्रिशिराने प्रतिज्ञा केली की, ‘‘मी माझ्या शस्त्रांवर हात ठेऊन
प्रतिज्ञा करतो की एकतर मी रामाचा काळ बनून रामाला ठार मारीन ; नाहीतर राम तरी माझ्या
मृत्यूचे कारण बनेल.’’ त्रिशिरा तेजस्वी घोड्यांच्या रथात तर रामचंद्र पायी! एका भयानक युद्धाला तोंड फुटलं दोनही बाजूंनी बाणांचा
वर्हाव सुरू झाला. पण रामचंद्रांनी त्यांच्या अचूक बाणांनी त्रशिराला असं काही अडवून
धरलं की तो तसुभर पुढे येऊ शकला नाही. जणु
महा बलशाली सिंह आणि हत्तींमधे झुंझ चालू होती. त्रिशिराचा बाण रामाच्या कपाळाला
चाटून गेला मात्र अत्यंत क्रोधित शत्रुदमन रामाने गर्जना केली, ‘‘तुझ्या बाणानी फुलासारखा
माझ्या कपाळावर प्रहार केलास आता माझ्या धनुष्यातून सुटलेल्या बाणांचा प्रसाद घे.’’
बघता बघता तेजस्वी रामप्रभुने त्याच्या अचूक बाणांनी त्रिशिराचे सर्व घोडे ठार मारले.
तसेच भयंकर बाणांनी त्रिशिराची तीनही शिरे धडापासून विलग केली.
त्रिशिरा पडला आणि त्याच्या मृत्यूने उदास झालेला खर लढण्यासाठी त्वेषाने
सज्ज झाला. एका बाजूला विना विश्राम पायी लढणारे श्रीराम तर दुसर्या बाजूला चतुरंग
दळ घेऊन आलेली खर दूषणाची 14 हजार राक्षसांची सुसज्ज सेना! मित्रांनो, विश्वामित्रांनी
3-4 वर्षात रामाला कुठल्या कुठल्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी ज्या विद्या शिकवल्या
त्या अतुलनीयच असल्या पाहिजेत. बला अतिबला, निरनिराळी अस्त्र, शस्त्र ह्या सर्वाना
धारण करणारा राम आज आम्हाला वंदनीय का आहे ह्याची उत्तरं ह्या सर्व जागांना भेट देतांना
मिळत होती.
नमुची जसा इंद्रावर आक्रमण करायला गेला होता त्याच त्वेशाने लढायला
आलेल्या खराचं धनुष्य रामबाणाने मधोमध तोडून टाकलं. अगस्त्यांनी दिेलेल्या उत्तम वैष्णव
धनुष्याने खरावर हल्ला करीत रामाने त्याचाही रथ, घोडे जमिनदोस्त केलेच पण सारथ्याचेही
मुंडके उडवले. रथ तुटलेला, धनुष्य भंग झालेला, घायाळ खर हातात गदा घेऊन जमिनीवर उभा राहिला. त्याचा आवेश
पाहून प्रभ राम म्हणाले, ‘‘अरे निशाचरा, तू तुझे हत्ती, घोडे, रथ घेऊन मोठ्या ताठ्यात
माझ्याशी युद्ध करायला आलास. पायी असलेल्या माझ्या एकट्याशी तुम्ही अफाट सैन्यासह एकदम
लढला त्यामुळे आज समस्त लोकांकडून तुझी निंदा होईल
मुळं कुजून गेलेला वृक्ष ज्याप्रमाणे लवकरच पडतो त्याप्रमाणे पापाचरण
करणारा, लोक ज्याची सदैव निंदाच करतात असा कोणी फार काळ टिकत नाही. तू येथे दंडकारण्यात राहणार्या धर्मपरायण ऋषीमुनींची जी कत्तल सुरू
केलीस त्याचं फळ तुला आज नक्कीच मिळेल. ताडगोळा ज्या प्रमाणे झाडावरून तोडतात त्याप्रमाणे
मी तुझं मस्तक कापून टाकीन.’’
‘‘अरे तू तर अत्यंत सामान्य अशा राक्षसांना मारून तू स्वतःचीच स्वतः
प्रशंसा करून घेतोएस. तुझी ही घमेंड मी क्षणात उतरवीन.’’ खर राक्षस गर्जला.
राम आणि खर राक्षसाचे महा भयंकर युद्ध जुंपले. खराने फेकून मारलेल्या
गदेचे रामाच्या बाणांनी हवेतच तुकडे तुकडे झाले. पण तो राक्षस थोडाच ऐकणार! त्याने
तेथील साखूचा एक विशाल वृक्ष दात ओठ खात उखडला
आणि तो घेऊन तो रामावर धावून गेला. रामाच्या
बाणांनी त्याचे तुकडे तुकडे झाले. रामाच्या बाणांनी घायाळ झालेला खर रामावर धावून गेला.
त्याच्यावर बाण सोडण्यासाठी प्रभुराम थोडे मागे सरकले आणि देवेंद्राने दिलेला बाण धनुष्याला
लावून आकर्ण दोरी खेचत त्यांनी तो खरावर सोडला. खर कायमचा जमिनीवर पडला. आज दंडकारण्य
राक्षसांच्या अत्याचारातून मुक्त झालं. सारे ऋषी रामाची प्रशंसा करू लागले. सीतेला
सुरक्षित स्थळी घेऊन गेलेला लक्षमण व सीताही परत आले. रामाचा काय हा अचाट पराक्रम!
पंचवटीत रामाचा पराक्रम आठवत तेथील भूमीला नमन करावेसे वाटले.
-------------------------------------
लेखणी अरुंधतीची -
Comments
Post a Comment