रामायण Express भाग 3 - रामलला

 

रामायण Express 

भाग 3

 रामलला




थोरलं आपत्य जन्माला येतं ते जणु मोठं होऊनच. ‘‘अरे आपलं बाळ लहान आहे ना? तुला शहाण्यासारखं नको का वागायला’’ हे ऐकत ऐकतच ते मोठं होत असतं. गुलाबावर कलम करताना जसा त्याच्यावर दुसर्‍या गुणी गुलाबाचा डोळा बांधला जातो त्याप्रमाणे ह्या थोरल्या आपत्याच्या बालवयातील अवखळ बाललीलांवर उपजत सोशिकपणा, विचारीपणा, क्षमाशीलता, समजुतदारपणा, धाकट्या भावंडांची काळजी, कामसूपणा, सर्व कुटुंबाचा विचार ह्या सर्व गुणांचे डोळे समाजाकडून बसवले जाऊन त्यातून एक आदर्श व्यक्तिमत्वाची अपेक्षा केली जाते.

त्याउलट लहान भावंडांच्या खोड्याही गोड मानल्या जातात. त्यांच्या अवखळ वागण्याचं कौतुक सर्वचजण करत राहतात. राम आणि कृष्णाचं थोडसं असच समिकरण आहे. कृष्णाच्या बाललीला, लोणी खाणं, गोपींच्या घरातील लोणी पळवणं, ‘‘मैया मैं नहीं माखन खायो’’ हया सर्वांचं कौतुक आजही आपण मनात अनुभवून तृप्त होत असतो.

राम मात्र इतका समंजस, समजुतदार की सावत्र आईचा स्वार्थाने बरबटलेला, द्वेषाने अंधळा झालेला, रामाला दंडकारण्यात संपवण्याचा हट्ट पुरवण्यासाठी असो वा वडिलांचं अविचारने मोहवशात दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी असो! वनात जायचा समुतदारपणा उपजतच त्याच्याकडे आहे. ते कमी की काय म्हणून त्याने कायम कोदंड खांद्यावर घेऊन सर्व जनतेचं रक्षण करायला पाहिजे अशी कर्तबगार मूर्तीच आमच्या डोळ्यासमोर ठसवली गेली.

जयाच्या सवे नित्य नाहीच सीता । नसे हाति ‘कोदंड’ ज्या भूपतीच्या

नसे कीर्तिशाली नसे शौर्य मोठे । नसे साथ द्याया च सौमित्र संगे।।

 

नसे काळ जो रावणाचाच मोठा । नसे सुग्रिवासारखा मित्र ज्याला

नसे राम संज्ञेस जो पात्र कोणी । नसे देव तो माझिया लेखि कोणी ।।

   

नसे स्थीर वीरासनी वीर जोची । धरेनाचि जो ज्ञानमुद्रा विरागी

प्रकाशात तत्त्वामृताच्याच न्हाले। नसे मारुतीच्या समा भक्त ज्याचे।।

 

धरे ना शिरी सावली कल्पवल्ली । नसे पुष्पमाला जयाचीच कंठी

नसे राम संज्ञेस जो पात्र कोणी । नसे देव तो माझिया लेखि कोणी ।।

(श्री आद्यशंकराचार्य कृत श्रीरामस्तोत्रम्)

असा आदर्श राम आमच्या हृदयावर कोरला गेला आहे. तसं म्हटलं तर खरं ही आहे. एखादं व्यक्तिमत्त्व एकटच हवेत उभं राहू शकत नाही. त्याच्या बरोबरच्या सर्व व्यक्ति व घटनांमधून त्याचं सार्वभौमत्व सिद्ध होतं. त्याची आभाळाएवढी  प्रतिमा उभी राहते. त्याची इतरांपेक्षा असलेली तौलनिक सरसता, उंची त्याच्या बरोबरची पात्र नसली तर कशी लक्षात येणार?

पण, ह्या संकल्पनेला काहीसं बाजूला ठेऊन जेव्हा अयोध्येला रामललाच्या बालमूर्तीची स्थापना झाली तेव्हा आम्ही गांगरून गेलो क्षणभर! बालक राम अनुभवलाच नव्हता इतक्या वर्षात. पण ‘अरुण योगीराज’ ह्या म्हैसूरच्या शिल्पकाराने पाच सहा वर्षाच्या गोंडस अशा रामबालकाच्या (51 इंची) सव्वाचार फुटी मूर्तीच्या रूपाने राम बाळ ‘राक्षसांच्या’ तावडीतून सोडवून, पुन्हा आपल्या सूपूर्द केला. योगीराजाचं ‘बोट धरून’ अवतरलेला हा बाळ,----   त्याचा मोहक चेहरा, गोबरे गाल, निर्व्याज हसू ह्या रूपात तो 22 जानेवारीला लोकांच्या मना मनात जन्मला आणि थोडयाशा गांगरलेल्या जनसमुदायानी क्षणातच त्याला आपल्या मनामनात उचलून घेतलं. एका नव्या आनंदपर्वाची सुरवात झाली. जो तो अयोध्येला जायचं स्वप्न बघू लागला आणि गुणी, गोंडस रामबालकाच्या दर्शनासाठी आतुर झाला.

बाल रामानी चंद्र मागितला आणि सुमन्तानी त्याला तो आरशातून दिला एवढंच माहित असलेल्या रामाच्या बालपणाला लाखो लाखो मनातून पालवी फुटली आहे. मनामनातून कोणी त्याला उचलून कडेवर घेत आहे. कोणी त्याला घास भरवत आहे. बालसुलभ मांडीवर बसायची आवड असलेला राम कुणाच्या मांडीवर बसून त्यांच्या गळ्यात इवले इवले हात टाकून ‘‘किती वाट पहात होतो रे’’! म्हणत आहे.

उचलून कोणी घेई । रामा कडेवरी माई

‘‘रामा एक घास घेई’’ । अम्मा भरवी बाळासी ।।

ओठा लागला दहीभात । राम हसे खोडकर

ओठ टेकवे गालावर । मुका घेण्यासी सत्वर ।।

ओठ भिजले दहीभाती । कसे गालावर उमटती

दही-धनुष वात्सल्याचे । तोडु शके ना दाशरथी ।।

कोणी बसवी मांडीवर । प्रेमे आलिंगे रघुवीर

गळा घालून दोन्ही हात । म्हणे पाहिली मी वाट फार ।।

(लेखणीअरुंधतीची-)

मला वाटतं अशा असंख्य असंख्य भावना अनेकांच्या मनात असतील.

All roads lead to Rome हे वाक्य वाळक्या पानासारखं उडून गेलं आहे. सगळे रस्ते अयोध्येलाच जात आहेत हा प्रत्यक्षदर्शी अनुभव अयोध्येत अनुभवला. रामाच्या गोड संकल्पनेनी सारा भारत पुन्हा एक झाल्याच्या सुखद जाणीवेनी हृदय भरून आलं.

भारत सरकारनी सुरू केलेल्या, रामायण Express; (Incredible India) ह्या उपक्रमात  आम्ही सामील झालो. रामाची पावलं भारतभूवर जिथे जिथे पडली तिथे तिथे त्यांना अनुसरत जाणारी ही ट्रेन! आमच्या सोबत भारताच्या अनेक भागातून तसेच, ऑस्ट्रेलिया, लंडन, अमेरिका, अफ्रिका सर्व ठिकाणाहून रामलल्लाला भेटण्यासाठी, पाहण्यासाठी प्रवासी दाखल झाले होते. दिल्लीपासून सुरू झालेली ही यात्रा रामनामाच्या गजरात पहिल्यांदा अयोध्येला पोचली.

 

 वेगाने धावणार्‍या आगगाडीने जाताना; रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त लोकांनी उत्स्फूर्तपणे घराघरावर उभारलेले भगवे रामध्वज महाराष्ट्रापासून दिसायला सुरवात झाली ते थेट नेपाळपर्यंत! बाकी वाणीनी फार बोलायला लागत नाही. मनामनात दबलेली अस्मिता भगव्या झेंड्यांच्या रूपाने दिमाखात, आनंदात, मुक्तपणे फडकत आहे. जनतेचा केवढा हा भावनाकल्लोळ! एखाद्या बीजामधे जपून ठेवलेल्या अंकुराला पाणी मिळताच तो जसा दीर्घ निद्रा सोडून तरारून जमिनीतून वर येतो तशा हजारो वर्ष जपलेल्या सोनेरी भावना एका हाकेसरशी जणु ध्वजरूपाने तरारून आल्या आहेत.  कृत्रिमपणे आखलेल्या सीमा आणि बळजबरीने लादलेले विचार कायमस्वरूपी नसतात. ते मनांना नाही दूर करू शकत. बळानी दाबलेला चेंडू वरती उसळून येतोच!

ऐकलं होतं, पथ भव्य केले आहेत म्हणे! पण!! रस्ते भव्य आहेत कुठे! सर्व सर्व रस्ते माणसांनी फुलून गेले आहेत. पावलाएवढी जागा प्रत्येकाला आहे. बसेसची रांग लागली आहे. विमानांची दाटी आहे. रेल्वेच्या अनेक गाड्यांनी अयोध्येचाच मार्ग अनुसरला आहे. पंचतारांकित ते धर्मशाळा भक्तभेटित बुडाल्या आहेत.  तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, ओरिसा, ------भारताच्या प्रत्येक प्रांतांमधून ताई, माई अक्का, दादा, भाऊ, अम्मा, अण्णा, अच्चा, तंबी, बाबुजी, माँ ---- रीघ लागली आहे. एका वेळेस लाख, दोन लाख, दहा लाख---! सर्वांना सामावून घेत जनसागर मंदिराच्या दिशेने जात आहे. अनेक अम्माच्या पायात पादत्राणं नाहीत, अनेकांनी ती बसमधेच उतरवलेली, फोनही अनेकांचे गाडीतच सर्व असुविधांमधे सुविधा मानत चाललेले लाखो पाय धन्य होत आहेत.  

51 इंची मूर्ती! लांबून भाव कसे दिसावेत? प्रत्यक्ष क्रिकेट मॅचमधे उंच मारलेला सिक्सरचा चेंडू नजरेस पडतोच असं नाही. पण टिव्हीवर वर वर वर जाऊन खाली येणारा त्याचा पॅराबोला सारखा पथ छान जाणता येतो. तसं प्राणप्रतिष्ठेला हृदयात बसवलेली रामललाची मूर्ती घेऊन सर्वजण आले असल्याने समोरील मूर्तीमधे हृदयस्थ मूर्ती जणु स्पष्ट दिसत होती. रांगेत दर्शन असल्याने कुठे धक्काबुक्कीचा सामना नाही झाला.

हा निरागस गुणी बाळ आपण राजपुत्र आहोत जनतेचं रक्षण करण्यासाठी आयुधसज्ज हवेच हेही विसरला नाही. त्यामुळे लाखो लाखो भक्त त्याच्या पायी मस्तक नमवून हृदयात चैतन्याची ज्योत जागवत आहेत. त्याच्या पराक्रमाच्या भव्य दिव्य तेजावर आपली पणती पेटवून

 ‘‘निर्दाळु असुरांस पुन्हा । संघटित होऊच पुन्हा

 मिटवू पारतंत्र्य खुणा ।। धरु सर्वोपरी देशहिता’’

अशी ही खूणगाठ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी मनाशी बांधत आहेत.

रामासारखीच शरयूही भव्य आणि शांतच! तिचं भव्य पात्र अनुभवणं ही मनाची शांती! मग ती अयोध्येत अनुभवा वा गुप्तारघाटावर अनुभवा! त्यात डुबकी मारून धन्य व्हा वा नेत्रांनीच तिची खोली अनुभवा! अयोध्येला रामाला तिच्या अंकावर खेळवता खेळवता गुप्तारघाटावर रामाच्या सर्व दुःख, शोकाचा अंत करत त्याला स्वतःत सामावून घेणारी शरयू रामासारखीच घनगंभीर शांत शांत होऊन गेली असावी. शरयूच्या ‘झांझावाती’ आरतीचा अनुभव  भक्तांना सखद वाटत असेल पण!  शांत शरयू समवेत मन लगेचच लीन होतं हा माझा अनुभव!

-----------------------------------

 #लेखणीअरुंधतीची-




Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)