रामायण Express – भाग 5 नंदिग्राम -

 

रामायण Express –

भाग

नंदिग्राम -

अयोध्या रेल्वे स्टेशनवर गाड्यांची धावपळ बघता आमच्या ट्रेनला दोन दिवस प्लॅटफॉर्म मिळणं अशक्यच होतं. अयोध्यपासून 80 कि.मि वर गोंडा रेल्वे स्टेशनवर ट्रेन सोडून आम्ही  कृष्णा पॅलेस नावाच्या हॉटेलवर आलो होतो. एक दिवस अयोध्या आणि एक दिवस नंदिग्राम पहाणार होतो. अयोध्या नंदिग्राम 10 ते 20 कि. मि. अंतर असल्याने अयोध्या नंदिग्राम लेख सोबत आलेले बरे! म्हणून आजच देत आहे.

 आज नंदिग्रामला जायचं होतं. नंदिग्रामचं महत्त्व दोन प्रसंगांसाठी महत्त्वाचं आहे.

राज्याचा त्याग करून वनवासाचा स्वीकार करणार्‍या श्रीरामाच्या पादुका घेऊन आलेला भरत परत अयोध्येला गेलाच नाही. नंदिग्रामला त्याने आपल्या थोरल्या भावाप्रमाणे विरक्त वनवासी आयुष्याची 14 वर्ष व्यतीत केली. नंदिग्रामला एक विशाल सरोवर निर्माण करून तेथेच आपल्या पित्याचे / दशरथाचे श्राद्ध करून. नंदिग्रामहूनच राज्यकारभार केला. आयोध्येचं रक्षण आणि काही तात्काळ सेवांसाठी शत्रुघ्न अयोध्येत राहिला.

वाटलं काही वेगळीच माणसं होती ती! एकानी क्षणात राज्य सोडलं. दुसरा क्षणाचाही विचार न करता त्याच्या पाठीशी उभा राहिला. थोरल्याच्या काट्याकुट्या्च्या रस्त्यानी जायला त्याने जराही  हूँ का चूँ केलं नाही. ज्याच्यासाठी थोरल्याला वनात पाठवलं तो तर राज्यावर बसलाच नाही. ते न स्वीकारता थोरल्या भावाची अत्यंत अमूल्य ठेव सांभाळल्याप्रमाणे, जणु दरवेळी त्याचीच आज्ञा घेत आहोत असे समजून, थोरल्याच्या पादुका सिंहासनावर ठेऊन राज्य कारभार केला. एक नंदिग्रामहून राज्य कारभार सांभाळत होता तर एक अयोध्येत राहून अयोध्येचं रक्षण करत होता. 

 पायात काटा रुतावा, बोटानी तो अलगद काढावा, डोळ्यात पाणी यावं तर ओठानी हळूच जखमेवर फुंकर घालावी अशी हया चौघा भावांची एकाच शरीराच्या अवयवाप्रमाणे घडणारी आपापसातील प्रतिक्षिप्त क्रिया मोठी लोभस आहे. सावत्र भावांमधील हा प्रेमाचा गोफ अनेक प्रसंगांना, ते प्रसंग अनुभवलेल्या स्थानांना एकमेकात गुंफत जातो. यात्रेच्या निमित्ताने आपण तो निखळपणे अनुभवत जावा.

 दुसरा प्रसंग म्हणजे दशाननावर विजय मिळवून सीतासमवेत प्रभूराम जेव्हा अयोध्येला परत यायला निघले तेव्हा त्यांनी ‘‘श्रीराम लंकेवर मोठा विजय मिळवून येत आहेत.’’ असा निरोप घेऊन श्री मारुतरायाला नंदिग्रामला पाठवले. तेथे प्रथम भरत व मारुतरायाची भेट झाली. व नंतर ती प्रसिद्‌ध‌ राम-भरताची भेट झाली.

शांत जागा आहे. त्या विशाल सरोवराला आजही भरतकुंड म्हणतात. कुंड ह्या शब्दासमवेत येणारा पाण्याचा हिरवा रंग येथे नाही. पाणी नितळ स्वच्छ  सुंदर आहे. रस्तेही भव्य सुंदर आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेली खूप वर्ष जुनी, भलीमोठी झाडं , त्यांनी तयार होणारी कमान पाहून भर दुपारीही त्या भव्य भरत कुंडची परिक्रमा करायचा मोह आवरला नाही. मनातला राम भेटला.

ज्या जागी भरत आणि मारुतरायाच्या भेटीचं आणि रामभरत भेटीची छोटी टुमदार मंदिरं आहे. ती पाहताना वाटलं,

आपण प्रवासाला जातांना रस्त्याच्या कडेला बसवलेले  माइलस्टोन छोटे छोटे असतात. पण तुम्ही तुमच्या इच्छित गावापासून किती दूर आहात वा जवळ आला आहात, चुकून भरकटला तर नााही हे सांगत असतात. बघता बघता कोणी भरकटला वा रस्ता चुकलाच तर परत त्याला योग्य मार्गावर यायला मदत करतात.  हरिद्वार, मथुरा, काशी असे लिहिलेले माइलस्टोन म्हणजे प्रत्यक्ष ती गावं नसतात. तुम्ही त्या गावाला पोचल्याची ती खूण असते. 

1965 साली भारतानी पाकिस्तानवर मिळवलेल्या दणदणीत विजयाच्यावेळी लाहोर शहर जिंकून घेतलं. त्यावेळी तेथील काढून आणलेला लाहोर 8 Km. चा काढून आणलेला माईलस्टोन ‘ले’ ला पाहतांना उर भरून आलं होतं. म्हटलं तर एक छोटासा दगड पण त्याच्यामधे एक मोठा पराक्रमाचा इतिहास दडलेला असतो.

त्या प्रमाणे ही देवळं, ही पवि्त्र स्थानं तुम्ही इतिहासात किती वर्ष मागे आला हे सांगत असतात. कधी ती सुंदर असतात, आकर्षक असतात तर कधी इवली टिवली मनाची निराशा करणारी असतात. कधी स्वच्छ सुंदर पवित्र असली तर मन प्रसन्न करतात. कधी त्यांच्या भोवतालच्या परिसराने मन प्रसन्न करतात वा कधी उबगही आणतात.  पण ती ह्या mile stones सारखी असतात. त्यांच्या अस्तित्वात दडलेला आपल्या पूर्वजांच्या अलौकिक पराक्रमाचा, त्यांच्या सद्गुणांचा, अथक मेहनतीचा, अद्भुत सत्यनिष्ठेचा, सत्यप्रतिज्ञेचा---- इतिहास एक वेगळीच उर्जा देणारा असतो. आपल्याला भारतीयत्वाची एक अनोखी ओळख देणारा असतो. भारतीयत्वाच्या सोनेरी प्रकाशात सर्वांनाच सोनेरी करणारा, एकत्र आणणारा असतो. आपल्या भरभक्कम मुळांची साक्ष देऊन, आपल्या सनातन वृक्षाच्या पसरलेल्‌या फाद्यांच्या विस्ताराला सुप्रतिष्ठित करणारा, बळकटी देणारा, मनामनांना मजबूत करणारा असतो. गुलामीच्या जबर रोगानंतर गलितगात्र व आगतिक झालेल्या आपल्या मनांवर औषधाच्या थंड लेपाप्रमाणे असतो. आपल्या दिव्य संस्कृतीला कमी लेखणार्‍या मनांना परत नवसंजीवन देणारा असतो. जगात ताठ मानेन जगायला  उद्युक्त  करणारा असतो.

पुस्तकं वाचताना मनात मैलाच्या दगडांप्रमाणे ठामपणे बसलेले प्रसंग ह्या प्रत्यक्ष ठिकाणाना भेट देतांना सजीव होऊन एकमेकांना प्रत्यक्ष भेटतात. तीच ही रामभरत भेट! वा हनुमान भरत भेट!

जेव्हा दगडाच्या देवाला आपण नमस्कार  करतो तेव्हा दगड दगडपणेच राहतो. नमस्कार, आपल्या भावना त्या देवापर्यंत पोचतात. तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे काशाची वा सोन्याची अंबाबाई बनवली तरी ते कासं किंवा सोनं सोनपणे राहतं. पण त्याची भक्तीभावाने केलेल पूजा अंबेला जाऊन पोचते.  आम्हीही हृदयातील प्रसंगांना प्रत्यक्ष ठिकाणांना भेटवून जणु प्रत्यक्ष भरत आणि मारुतरायाची भेट तर राम भरत भेट अनुभवत होतो.

------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती