रामायण Express – भाग 6 नेपाळ (जनकपूरधाम)

 

रामायण Express –

भाग 6 

नेपाळ (जनकपूरधाम)

जंगलात वाघाच्या पायाच्या ठशांचा मागोवा घेत वाघोबा कुठून कुठे गेले. कुठल्या पाणवठ्यावर कधी येऊन गेले ह्याचा शोध घेतला जातो. ठसे लांबट असतील तर मादीचे व गोल व मोठे असतील तर ते नराचे असंही ठरवलं जातं. लांबट ठशांमागे जर छोटे छोटे पंजे उमटले असतील तर मादीला किती बछडे आहेत ह्याचाही छान अंदाज लावता येतो.  प्रत्येक पंजाच्या ठशांमधे प्लॅस्टर ऑफ पॅरिस घालून त्याचे मोल्ड बनवून कुठल्या वाघाचे कुठले ठसे हाही अभ्यास केला जातो. एक वाघ शेकडो कि.मि अंतर पार करून एका जंगलातून दुसर्‍या जंगलात पोचतो कसा त्याची आणि संपूर्ण व्याघ्र परिवाराची यथासांग माहिती उपलब्ध केली जाते.

त्याचप्रमाणे काळाच्या पावलांचा मागोवा घेत, तेथील जुन्या वास्तुंचा अभ्यास करत, त्यांचा रामायणातील, वेदातील, पुराणातील कथांमधील स्तोत्रांमधील संदर्भांशी, अनेक उल्लेखांशी सयुक्तिक संबध जोडत हजारो वर्षांपूर्वी घडलेली संपूर्ण रामायण कथा अनेक आधारबिंदु जोडत चित्र तयार केल्याप्रमाणे; अनेक गावांना, स्थानांना, नद्यांना सांधत प्रत्यक्ष प्रवासातून उलगडत नेणं, आपल्या मनावर परिणामकारक रीत्या ठसवणं; ही संकल्पनाच मोठी आश्चर्यकारक व आनंदायी आहे.

चित्रपट पडद्यावर साकार होत असतो; तर नाटक रंगमंचावर घडत असतं; आपण प्रेक्षक म्हणून अंधारात बसलेले असतो. त्रयस्थपणे ते अनुभवत असतो. आपण त्याचा भाग नसतो. त्यात शरीराने सामील होता येत नाही.

 पण! कुठल्याही प्रवासात, यात्रेत आपण प्रत्यक्ष अनुभव घेत असतो. तेथील जललतेचा स्पर्श अनुभवत असतो. तेथील मातीचा रंग, गंध, स्पर्श, ह्यांची अनुभूती घेत असतो. तेथील झाडांची विविधता, ऋतुचक्राचा विविध ठिकाणांना झालेला एक वेगळा स्पर्श व त्यातून निसर्गाने दिलेला वेगवेगळा प्रतिसाद आपण तन मनानी अनुभव असतो. प्रवासाची ही विलक्षण गम्मत आहे. प्रत्येक क्षण वेगळा असतो. त्याचप्रमाणे त्याच क्षणाचा प्रत्येकाचा अनुभव निरनिराळा असतो.

काही नावं अभिन्न असतात. धातुंच्या alloy प्रमाणे स्वतःचं स्वत्त्व राखत एकत्र येऊन काही वेगळीच चमक दाखवतात. जानकीराघवाचं ही तसच! एकाचं नाव आलं की दुसर्‍याचं नाव ओठावर येणारच! अयोध्येला रामाचा जन्म अनुभवण्यासाठी आपल्याला शतकांची प्रतिक्षा करायला लागली. सीतेच्या जन्मस्थळाला मात्र नेपाळमधे थोडी सुरक्षितता मिळाली. त्यासाठी संघर्ष न होण्यामुळे फार तीव्रतेने त्याच्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष वेधलं नाही.

रामजन्मभूमी आपल्याला जितकी पवित्र तितकीच जानकी जन्मभूमी ही नेपाळमधे पवित्र मानली जाते. आम्हाला घेऊन रामायण Expresss सीतामढीला पोचली. जानकीच्या माहेरी जायचा योग साधासुधा नव्हता. जनकपूर भारत नेपाळच्या सीमारेषेवरील गाव. प्रवाशांची voters ID cards नेपाळी अधिकार्‍यांनी तपासून मग गाड्या पुढे सरकल्या म्हणून फक्त दुसर्‍या देशात प्रवेश केल्याची जाणीव झाली नाहीतर, तोच निसर्ग, तीच भूमी एकाच धर्माच्या सूत्रात गुंफलेले दोन मोती! सांस्कृतिक सारखेपण जपलेल्या ह्या दोन देशांच्या वेगवेगळ्या राजसत्तांचा फरक मात्र लगेचच जाणवत होता. देशाची गरिबी डोळ्यांना जाणवत होती. दुकानाच्या पाट्यांवरील नावं मात्र जानकी, सीता, मैथिली, मिथिला अशी सीतेशी जोडणारी होती.

जनकपूरधाम -

असं म्हणतात की, 1657 मध्ये येथे देवी सीतेची एक सोन्याची मूर्ती तेथे सापडली. तसेच जे अधुनिक जनकपूरचे संस्थापक मानले जातात त्या महान संत कवी व सन्यासी शुर्कीशोरदासांनाही ह्या जागेवर देवी सीतेच्या प्रतिमा सापडल्या.

भारतातली देवळं असोत वा बाहेरची!  त्यांच्या पुनर्निर्माणाचं काम मात्र अपल्या भारतीय राण्याचंच! कुठलाही घाट असो वा मंदिर ! सोमनाथ असो वा वाराणसी अहिल्यादेवींचं नावं आलं नाही असं होणार नाही. तसच जनकपुरचं भव्य मंदिर बघताना ही राणी वृषभानु कुमारीचं नावं नक्की घेतलं जातं.

नेपाळ जानकी मंदिर

उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशमधे पसरलेल्या बुंदेलखंड ह्या भूभागासोबत श्रीरामांच्या वनवासातील प्रवासाच्या, वास्तव्याच्या अनेक खुणा, अनेक कहाण्या अनेक प्रसंग जोडले गेलेले आहेत. तेथील चंदेले आणि बुंदेले ह्या राजांच्या अनेक पराक्रमाच्या गोष्टींसाठी बुंदेलखंड ओळखला जातो. इंग्रजांच्या गुलामीच्या काळातही ह्या राजपरिवाराच्या राण्यांनी भव्य देवळे बांधली आहेत. एकीनी श्रीरामाला अयोध्येहून  औरछा येथे येण्यास भाग पाडलं तर दुसरीने सीतेचे माहेर असलेल्या नेपाळच्या जनकपूर येथे 1910 साली जानकीचे भव्य देऊळ उभारलं. तेच नौलाखा मंदिर म्हणून ओळखलं जातं.

 हया राणीने त्या काळच्या नऊ लाख सुवर्णमुद्रा खर्चून हे सुंदर देऊळ बांधलं आहे. भारत नेपाळ सीमेवर मिथिला ह्या राज्यात धनुषा जिल्ह्यात जनकपूरधाम ह्या गावात हे हिंदू मंदिर देवी सीतेला समर्पित आहे. ते कोइरी हिंदू वास्तुकलेचे उदाहरण आहे. हिंदु कुशावह प्रकारचे आर्किटेक्चर आहे. पाहता क्षणीच हे मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं. पांढरा शुभ्र चमकदार संगमरवर आणि दगडी बांधकाम आहे. 1,480 चौरस मिटरमधे ही तीन मजली वास्तु मोठी आकर्षक आहे. मंदिराच्या भिंतींवर सुंदर मधुबनी चित्रे आहेत. रंगित काचा, कोरीव काम, जाळीदार खिडक्यांनी सजलेल्या ह्या वास्तुत 60 खोल्या आहेत. ह्या मंदिराला जनकाचा दरबारही म्हणतात.

 हे एकमेव असे मंदिर आहे जेथे जनकाचा सर्व परिवार पहायला मिळतो. राजा जनक ज्याचे नाव सीरध्वज असे होते त्याची पत्नी सुनयना  धाकटा भाऊ ( सीतेचे   काका) कुशध्वज, त्याची पत्नी, सीरध्वजाच्या मुली सीता व उर्मिला तर कुशध्वजाच्या मुली श्रुतकीर्ती आणि मांडवी हे सर्वजण जनकाच्या दरबारात म्हणजे जनकपूरच्या मंदिरात मूर्तीरूपाने आहेत. आख्यायिका आणि महा काव्यानुसार राजा जनक याने जनकपूरच्या ह्या भागातून विदेह राज्यावर राज्य केले. जे रामायण काळात मिथिलेची पहिली राजधानी म्हणून उभे राहिले.

दक्षयज्ञ नष्ट केल्यावर अत्यंत कोपलेल्या शिवाने धनुष्याचा टणत्कार करत शिवाला यज्ञाचा भाग न देणार्‍या सर्व देवांची शिरे त्याच्या बाणानी उडवून टाकीन असे सांगितले. देवतांनी खूप स्तुती केल्यावर शांत झालेल्या भोलनाथांनी ते धनुष्य देवतांना देऊन टाकलं. देवांनी ते जनकाच्या पूर्वजांकडे म्हणजे निमीचा जेष्ठ पुत्र देवरातकडे  ठेव म्हणून सांभाळयला दिले . राजा जनक ह्याने (सीरध्वज) येथेच शिवधनुष्याची पूजा केली असा दावा पौराणिक कथेत आहे. जे शिवधनुष्य राजा जनकही उचलू शकत नव्हता ते शिवधनुष्य बाल सीता हसत हसत घोडा घोडा खेळायला घेत असे.

 

देवळाच्या सभामंडपाच्या बाहेरच नेपाळी कुटुंब मोठे मन लावून पूजा करत होते. गुरुजी पूजा सांगत होते. विवाहित तरूण स्त्रिया गात होत्या. तर एक तरूण आपल्याकडच्या प्रमाणे सोवळे नेसून पूजा करत होता. विचारल्यावर त्यांनी बोललेला नवस पूर्ण झाल्याने पूजा करत असल्याचे सांगितले. मोठ्या पुण्यानेच माणूस येथे पोचतो अशी नेपाळी लोकांची श्रद्धा आहे मंदिर बघण्यासाठी हेलिकॉप्टर्समधूनही अनेक जणं येत होते. पाच पाच मिनिटानी येणारया हेलिकॉप्टर्स मधून मंदिरावर पुष्पवर्षा होत होती.

मंदिराच्या मागच्याबाजूस श्रीरामसीतेचा विवाह झाला तो विवाहमंडप तसेच मोठी बाग आहे.  आहे. स्त्रिया येथील सिंदूर/शेंदूर घेऊन जात होत्या. येथील शेंदूर अखंड सौभाग्य देतो अशी येथील स्त्रियाची श्रद्धा आहे. येथील सर्व स्त्रियांच्या भांगात कुंकवा ऐवजी खरोखरचा शेंदूर भरलेला होता.

अयोध्येला राममूर्ती बनविण्यासाठी जी गंडकी शिळा नेपाळमधून पाठवली होती ती आता त्या बागेत ठेवली आहे.  तिच्यावर रामाचे पदचिह्न दिसतात असे म्हणतात. भारतात तिची ट्रकमधून काढलली मोठी मिरवणूक सर्वांना आठवत असेल.

------------------------

लेखणीअरुंधतीची-

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)