रामायण Express भाग 7 धनुषमंदिर आणि परशुरामकुंड

 

 रामायण Express

भाग 7

धनुषमंदिर आणि परशुरामकुंड

भारताची सर्वांगसुंदर ओळख कशी करून द्यावी हे आपल्या पूर्वजांकडूनच शिकावं. निसर्गाच्या पाऊलखुणा गोष्टी रूपाने आपल्या इतिहासाशी जोडत, गोष्ट रंगवत रंगवत, सार्‍या भारतखंडाची सफर घडवत, तेथीळ थोर व्यक्तिमत्त्वांची ओळख करू देत, थोर वैचारिक परंपरा आपल्याला सांगत त्या मागच्या, भूतकाळातील सूत्रात ते आपल्यालाही कधी गुंफून घेतात तेच कळत नाही. Methyl blue ह्या tissue colour करणार्‍या stain मधे निशिगंधाचे फक्त दांडे बुडवून ठेवले तरी तो stain सर्वच निशिगंधाच्या फुलांना निळसर छटा देऊन जातो त्याप्रमाणे आपणही ह्या सावळ्या रामकृष्णांच्या रंगात कधी रंगून जातो हेच कळत नाही. एक केशराची काडी दुधामधे केशरी रंग तरंगही निर्माण करते आणि एक अनोखा स्वादही देते त्याप्रमाणे सामान्यांच्या जीवनालाही भारतीय संस्कृती आपल्या रंगात रंगवून टाकते आणि एक कृतार्थतेचा आमोदही देऊन जाते.

नेपाळचं धनुष मंदिर बघताना आणि तेथील गुरुजींची कॉमेंट्री ऐकताना पहिल्यांदा `‘काहीही काय!’’ असा विचार मनात डोकावत असतानाच त्यात फार मोठी गोष्ट दडल्याचे जाणवू लागले. ती म्हणजे आपलीच आपल्याला नव्याने होणारी ओळख! आपल्या देशाच्या सीमांची ओळख!

तेथील पुजारी सांगत होते, इंद्राने दधिचींकडून त्यांची हाड मागून घेतली.  इंद्राने त्यांच्या पाठीच्या मणक्यांपासून वज्र बनवलं तर शिवानी त्याच्या मस्तकापासून पिनाक धनुष्य बनवलं. तर विष्णूने त्याच्या हाताच्या हाडांपासून नंदकी नावाचं खड्ग बनवलं.

ह्या पिनाकी धनुष्याने त्रिपुरासुराचा वध केल्यावर हे धनुष्य यथावकाश राजा जनकाकडे  त्याच्या देखभाली साठी आलं. धनुषधाम येथे राजा जनक त्याची 12 वर्ष पूजा करत होता. त्याचवेळेला जनकाच्या राज्यात दुष्काळ पडला आणि आकाशवाणी झाली की जर राजा जनकानी स्वतः जमीन नांगरली तर राज्यात पाऊस पडेल. आकाशवाणीला अनुसरून पाऊस पडला आणि शेतं पिकली. राजा नांगरत असतांना (ही जागा पनौराधाम भारतात आहे. ) त्याला शेतात सोन्याच्या पेटीत नवजात बालिका सीता सापडली. आपली मुलगी मानून राजा तिला घरी घेऊन आला. सीता सात वर्षाची झाली तेव्हा एकदा आई सुनयनानी तिला शिवधनुष्याची पूजा करायला पाठवलं तर हिने सहजपणे डाव्या हातात उचललं ते!  माझी मुलगी जर हे शिवधनुष्य डाव्या हातात उचलू शकत असेल तर हे धनुष्य पेलू शकेल असा तिचा वर ह्या पृथ्वीवर जन्मलाच असला पाहिजे म्हणून जनकाने /( काही कथांमधे परशुरामाने राजाला सांगितल्याचा उल्लेख आहे की ), ‘‘जो हे शिवधनुष्य उचलू शकेल त्यालाच माझी पुत्री सीता माळ घालेल’’ असा पण ठेवला. 

जरा थोडा विचार केला तर,

राजाच जेव्हा शेतात काम करायला सरसावतो तेव्हा प्रजा हातावर हात धरून बसेल का? प्रजाही आळस झटकून कामाला लागली असेल. कडक झालेल्या जमिनीत नांगर चालवल्यावर जमिनीची आर्द्रता वाढायला मदत होते. तेथील जमिन पाहिली तर, सर्व नद्यांनी आणलेल्या, जणु काही सपीटाच्या चाळणीने चाळलेल्या अत्यंत मऊ पांढर्‍या शुभ्र वाळूने तयार झाली आहे. ही वाळू अत्यंत मऊ आणि ओलावा असलेली आहे. भल्या मोठ्या नद्यांमुळे ह्या मऊशार मातीखाली पाण्याचे जिवंत स्त्रोत आहेतच. आजही आपल्याकडे दुष्काळ पडू नये म्हणून नदीचं कोरडं पडणारं पात्र नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध वा आडव्या दिशेनी नांगरतात. त्याने पाणी साठून रहायला, जमिनीतील पाणी पिकांना मिळायला मदत होते. 

नांगरल्यावर शेतात उमटणार्‍या रेषा/ सरींना सीता म्हणतात. राजाच्या परिश्रमातून नांगरणीच्या सरी, वोळंबे ह्या रूपातून सोन्याच्या पेटीतून लाभलेली भाग्यवान ऐश्वर्यसम्पन्न कन्या म्हणजेच सीता. ‘‘केल्याने होत आहे रे’’ ह्या विचारातून जन्मलेल्या सीतेला अवघड ते काय असावे? सातव्या वर्षी आईने तिला एक दिवस शिवधनुष्याची पूजा करायला पाठवले तर डाव्या हातात उचललं तिने!  शिवधनुष्य म्हणजे अत्यंत अशक्यप्राय वाटणारं काम! उद्यमशील अशा छोट्या सीतेनी ते हसत हसत केलं नसेल तरच नवल!

त्राटिका आणि इतर राक्षसांना आपल्या अतुलनीय पराक्रमाने मारणारा राम आता कुमार न राहता नुकती मिसरूड फुटलेला युवा होत होता. अशा वेळेस आत्मविश्वासाने पराक्रम दाखवण्याचच वय! उचललं धनुष्य --- आणि त्याला दोरी लावायला वाकवलं तर तीन तुकडे झाले. ह्या इतिहासासोबत इथून पुढे आपल्या भारताचा भूगोल गोष्टीरूपाने सांगायला सुरवात होते. भारताच्या सीमा आपल्या मनात निश्चित केल्या जातात.

शिव धनुष्याचा एक तुकडा पोखरा येथे पडून तेथे धनुष्याच्या वरच्या भागाचा वक्र आकाराचा तलाव तयार झाला. तो पोखरा तलाव. पिनाक धनुष्याचा मधला भाग धनुषा धाम मंदिरला नेपाळमधेच पडला. जनकपूरधाम हून काही अंतरावरच  (साधारण 20 कि.मी.) हे ठिकाण आहे. तिथेच उभं राहून आम्ही तेथील गुरुजींची live comentry ऐकत होतो. जमिनीवर उमटलेला धनुष्याचा ठसा बघत होतो. जेथे हा तुकडा पडला तेथे मधेच एक भव्य पिंपळाचं झाड आहे. त्याच्या शेजारी असलेल्या कुंडातील पाण्याचे आकारमान पाहून ह्यावर्षी पाऊस कसा  व किती पडणार ह्याचा अंदाज बांधला जातो.  त्या धनुष्याच्या तुकडयाच्या आकाराची जागाही अशी होती की त्यावर ओलसरपणा सतत टिकून होता. पुजार्‍यांच्या सांगण्याप्रमाणे खालील दगडावर धनुष्याकार दिसणारा तो जाळीदार दगडाचा विशाल तुकडा जेव्हा प्रयोग शाळेत तपासला गेला तेव्हा तो दगड नाही, तो कुठच्या धातूचाही नाही असं सांगण्यात आलं.

रामाच्या हातून भंग पावलेल्या शिवधनुष्याचा खालचा भाग मात्र उडून थेट धनुष्कोडीला रामेश्वरम् ला पडला. तोच म्हणजे तेथील रामसेतू! भारतात प्रवास करणार्‍याला भारताच्या उत्तर दक्षिण सीमांची अचूक माहिती देणारे हे मैलाचे दगड मौखिक इतिहासातून किती बेमालूम सांगितले जातात नाही! तेही नेपाळमधे! 

उत्तरेत मिळालेल्या माहितीप्रमाणे तपासून पाहिल्यास रामेश्वरम जवळील धनुष्कोडीचा रामसेतू सरळ नसून लाटेच्या आकाराचा वा धनुष्याच्या अर्ध्या भागाच्या आकाराचा आहे. नावही धनुष्याशी जोडलं गेलंलं आहे. इतिहास किती सहज उत्तरेतून दक्षिणेकडे वहात यावा! किती सहज दोन दिशांना, भारताच्या सर्वदूर दोन टोकांना जोडला जावा ह्याचं कौतुक नक्कीच वाटलं.

 एक गम्मत आठवली. मुंबईत चिंचपोकळी रेल्वेस्टेशनवर बांधलेला भायखळा सेंट जॉर्ज रुग्णालय ते जिजामाता उद्यानापर्यंत एक ब्रिज आहे. त्याला S ब्रिज म्हणतात. तो सरळ नसून वळणदार असयला एक कारण आहे. पूर्वी सामान, भाजी घेऊन बैलगाड्या त्यावरून जात. ह्या मालानी भरलेल्या बैलगाड्या ओढत सरळ जाण्यापेक्षा S ह्या वळणदार आकारात जाताना बैलांना त्रास होत नाही म्हणून तो तसा बनवला आहे. नदी कधी सरळ न जाता वळणं घेत जाते तेव्हाच तिचा प्रवाह सुगम रीतीने पुढे सरकतो. एखाद्या बीजाला मोड येतांनाही तो अर्ध धनुष्याकृती असतो.

कुठल्याही स्पीड ब्रेकरशिवाय हळुवार आपला सांस्कृतिक, धार्मिक वारसा आपल्या नकळत आपल्याकडे हस्तांतरीत केला गेला हे मनोवेधी होतं.

 जेणे करून त्या त्या जागेचे landmarks ही मनात पक्के होतात, घडलली गोष्टही मनात पक्की होते. त्या स्थानावर गेल्यावर पहायच्या प्रेक्षणीय स्थळांची यादीही मनात तयार होते. आज मी ती यादी गोष्टीतून तुम्हाला सांगून पुढे न्यायला न कळत मदत करत आहे.

धनुषमंदिराशिवाय तेथे असलेली छोटी छोटी मंदिरं पाहून घेतली.

परशुराम तलाव-

थोड्या कि.मि. वर असलेला परशुराम तलाव पहायचा होता. विवाह सोहळा पार पाडून वधू घेऊन आनंदात अयोध्येला जाणार्‍या दशरथाच्या परिवाराला परशुरामानी इथेच आडवलं! आतापर्यंत शिवधनुष्य मोडल्याची महान आश्चर्यकारक बातमी वार्‍यासोबत रानोमाळ पसरलीच होती! कोण असावा हा तरूण? योग्य माणसांना योग्य गोष्टीचं महत्त्व, गांभीर्य कळतच! त्या तरुणाचं कौतुक इतकं सहज केलं तर परशुराम कसला? रामाच्या पराक्रमाची चुणुक पाहण्याचा मोह त्यालाही झालाच! दशरथ परशुरामापुढे गयावया करत असताना, तेजस्वी रामानेही तू असशील पराक्रमी तर आहेसच! इतका आरडाओरडा कशाला ? लढायचच आहे ना ? लढू की! म्हणत धनुष्याला बाण लावला --- आणि परशुरामाला आह्वान दिलं. धर्म, न्याय, नीतीचं सखोल ज्ञान असलेल्या श्रीरामानी मी ब्राह्मणाला ठार मारत नाही पण माझा बाण वाया जाणार नाही तुझं सर्व पुण्य मी त्याने नष्ट करतो म्हणून परशुरामाचं पुण्य नाहिसं केलं. एका गुडघ्या एवढ्या पोराकडून हार मान्य करण ही नाचक्कीच की!  पुण्य वेगळं जायला लागत नाही. भव्य परशुरामकुंड जरा छान ठेवता आलं असत असं वाटलं. जवळच असलेलं पिटुकलं पार्वती मंदिर आणि अजून एखाद मंदिर शांत छान होती. सर्व प्रवासात घमघमणारा आंब्याचा मोहर, लाल पालवी येथेही आमच्यासारख्या आयुष्याचा शिशिर गाठलेल्या यात्रेकरूना वसंताच्या आगमनाने सुखवत होती. येथील विरळ जंगलात काही जंगली प्राणीही असावेत कारण बाहेरच लावलेला फलक Save Small Wild Cats असं सांगत होता.

-------------------------------------

 #लेखणीअरुंधतीची-















 

 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)