रामायण Express भाग 8 पुनौराधाम-

 

रामायण Express

भाग 8

पुनौराधाम-

आज काय बोलावं कळत नाहीए! लेखणीही मूक झाली आहे. ज्या सीतामातेला जनतेच्या कद्रू मनोवृत्तीचा सामना अखेरच्या क्षणापर्यंत करायला  लावला त्या जनतेचे प्रतिक म्हणून आज आपण हयात आहोत ही गोष्टच मनाला कुठेतरी कुरतडत आहे. कोणीतरी बोलून जातं काहीही! आणि मग तेच बोल दुसर्‍याचं आयुष्य बनून जातात. त्याचा सारा सारा संसार मूळापासून उद्ध्वस्त करतात. तो लाखांचा पोशिंदा असला तरी जनतेच्या हितास्तव ते मरणप्राय दुःख सहन करत राहतो. दुःखाचा डोंगर गिळताना, तो सहज गिळला जावा, गिळतांना मुख फाटू म्हणून, कोणी विष प्यायला द्यावं; तशी संकट गिळली ह्या परिवारानी! पण जनतेला आपत्याप्रमाणे मानणार्‍या ह्या परिवाराने जनतेवर जराही आच न येऊ देता, जनतेतील कोणाविरुद्ध अक्षरही काढल नाही मुखातून! फक्त सहन केली सारी दुःख!

हात जोडून त्या चरणांवर नतमस्तक होण्यापलिकडे आपण काहीही करू शकत नाही असं वाटलं.

आज पुनौराधाम (बिहारमधील) येथील सीतेचे जन्मस्थळ पाहण्यासाठी आलो होतो.  नेपाळ भेट आटोपून भारताचा मार्ग धरला. सीता मढी ! मढीचा अर्थ मिट्टी, माती. भारतवर्षात जनकाचं राज्य नेपाळपासून बिहारपर्यंत पसरलं होतं. भयंकर दुर्भिक्षाचा सामना करत असताना आकाशवाणी झाली की, जनक राजाने स्वतः जर जमिन नांगरली तर दुष्काळ संपेल. जनकानेही राजेपणाचा कुठलाही अभिनिवेश न दाखवता स्वतः पुनौराधामला नांगर मातित/ जमिनीत घातला. राजाच कामाला लागल्यावर जनतेच्या उत्साहाला दसपट उधाण आलं असणार. अक्षरशः सोनं पिकलं असणार. जमिन तर सुपीकपणाची परिसीमा आहे.

 मित्रांनो, एका पाथरवटाला खडक फोडायला काही काळ लागेल पण एखादं छोटं बीज दगडावर रुजून भली मोठी शिळा भेदून दाखवतं. कमळाची कळी कोमल वाटली तरी तिच्यात चिखल, पाणी भेदून वर येण्याची महान क्षमता बाळगून असते. लसलसत्या हिरव्यागार अंकुराप्रमाणे सीता त्या चरी आणि वोळंब्यांमधून प्रकट झाली. सोन्याच्या पेटीतून महान ऐश्वर्य, सुख, समृद्धी देत प्रकट झाली. परिसर सुजला, सुफला करत प्रकटली. प्रजेचं दैन्य, भूक हरण्यासाठी प्रकट झाली. आपल्या धरणी मातेचा जात्याच निगर्वी नम्रपणा, सोशीक क्षमाशील स्वभाव घेऊन प्रकट झाली. जगाचे अपराध पोटात घालणारी ही भारतीयांची माय झाली.

आजही हीच जनक कन्या समृद्धीच्या रूपात, क्षितिजापर्यंत डुलणार्‍या गव्हाच्या हिरव्यागार शेतीच्या, केळीच्या बागांच्या, इतर भरभरून आलेल्या अन्नधान्याच्या दृश्य रूपात, मोहराने लगडलेल्या आंब्याच्या बागांच्या रूपात सर्वांवर कृपा बरसवत असलेली दिसत आहे.

 पुनौराधाम मधे तिचं वेगळ्याच प्रकारचं धवल सुंदर मंदिर आहे. शुभ्र मंदिरावर असलेली सोनेरी नक्षी मंदिराचं पावित्र्य आणि घरंदाज श्रीमंती; सीतेचा सात्विकपणा आणि उच्च राजकुलातील राजकुमारीपण दर्शवणारी वाटली. सीतेच्या जन्माची माहिती स्वतः सीता अत्री आश्रमात आल्यावर सती अनसूयेला देते. त्या माहितीचा आधार घेत, ती जागा शोधून हे मंदिर बांधलं आहे. मंदिरामागेच छान बाग व कुंडही आहे.

म्हटलं तर प्रत्येक तीर्थक्षेत्री सापडणारं धोंडा पाणीच! पण तेथील दगड अन् दगड बोलायला लागले आणि त्यांचं कथन तुम्हाला ऐकू येऊ लागलं की ते आपल्या संस्कृतीचे अत्यंत मोलाचे मैलाचे दगड होऊन तुम्हाला आपला इतिहास, संस्कृती, आपल्या श्रद्धा ह्यांची नव्याने ओळख करून देतात.

सीता मंदिर

सीतामाईचं अजून एक मंदिर गावात जाऊन पहायचं होतं. मंदिर सुंदर आहे. पण---! गावातून जाताना गावाचा चेहरा मोहरा पाहतांना मनात कुठेतरी एक कळ उमटत होती. स्वच्छता आणि सुधारणा, शिक्षण सर्वाचीच फार मोठी जरुरी आहे अजून! जेथे नजरेला क्षितिजापर्यंत हिरवेगार शेतीचे गालिचे पसरले आहेत. समृद्धीच्या गंगा, यमुना वहात आहेत तेथे लोकांचा जीवनस्तर 75 वर्षांनी आता तरी उंचावेल अशी आशा करू या.

----------------------------------

लेखणीअरुंधतीची-












 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती