रामायण Express भाग - 9 बक्सर

 

रामायण Express

भाग - 9

बक्सर

Railway, Bus, आणि E-Rickshaw ह्यांचे पेड गुंफत आमची त्रिवेणी यात्रा सुरू होती. इतिहासाचा घटनाक्रम जरी मागेपुढे होत असला तरी फार फरक पडत नव्हता. रामायण आपल्या रक्तात बालपणापासून असल्यामुळे रामायण कालीन घटनेला अनुस्यूत असलेली, पण न पाहिलेली/माहित नससलेली  ती पवित्र स्थानं मनातल्या रिकाम्या जागांमधे अपसूक जाऊन बसत होती. काल सीतामढी रोड वरून निघालेली रामायण express बक्सरला पोचत होती.

बक्सर म्हटलं की, ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध बनारसचा राजा बलवंतसिंह, बंगालचा नबाब मीर कासीम आणि अवधचा नबाब शुजाउदौला ह्या तिघांनी एकत्र येऊन 22,23 ऑक्टो. 1764 मधे झालेली बक्सरची लढाईच आपल्याला माहित असते. दुर्दैवाने तेव्हा विस्तारवादी ईस्ट इंडिया कंपनीने हे युद्ध जिंकून बिहार,बंगाल अवध ह्या अत्यंत समृद्ध क्षेत्रातून सारा वसुलीचे अधिकार मिळवले आणि भारताची आर्थिक घडी पार विस्कटवून टाकली.

हेच बक्सर शहर रामाच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असल्याचं ऐकून मात्र फार प्रसन्न वाटलं.  सकाळचा चहा ब्रेकफास्ट आटोपून मंडळी रामरेखा घाटच्या दिशेनी निघाली. ग्रीन रिक्शा हे स्टेशन ते घाट हे १५ मिनिटात पोचवणारं दुव्याचं साधन

यात्रेत घडलेलं हे गंगामैयाचं पहिलंच दर्शन! गंगांमैयाचा विस्तार डोळ्यांना सुखावणारा! आश्वासित करणारा! हिच्या शांत गहन जलस्त्रोतानी काय काय घटना पाहिल्या असतील, अनुभवल्या असतील त्या सर्व अनुभवूनही त्यांना आपल्यात सामावून काळाची पुढची गती देणारं पात्र धीर गंभीर, अत्यंत शांत होतं. गंगा  पाहूनच मन शांत शांत झालं. ज्यांना गंगा स्नान करायचं होतं त्यांना गंगास्नानाने मनाला शांत पवित्र वाटलं. गंगाजलस्पर्शाने शरीर आणि चित्तवृत्तीही प्रफुल्लित झाल्या.

विश्वामित्रांनी राजा दशरथाकडून राम लक्ष्मणाला मागून घेऊन ते इथेच बक्सरला आले. पाटलीपुत्र म्हणजेच आत्ताच्या पटण्यापासून 150 कि.मि. वर गंगेच्या पश्चिम तटावर असलेलं हे गाव त्या काळी खूप शांत, सुंदर तर असणारच पण हे सारे ऋषीआश्रम त्याकाळची संशोधन केंद्र आणि अत्यंत प्रगत विद्यापीठं असणार. त्या संशोधनांसाठी आवश्यक असलेला अग्नी कधिही सहज उपलब्ध व्हावा म्हणून यज्ञकुंडांची निर्मिती होऊन त्यात यज्ञ ही संकल्पना आली असणार. ह्या संशोधनकेंद्रांमधे होणार्‍या संशोधनाचं ज्ञान सूत्रबद्ध करून श्लोकाद्वारे ऋचांद्वारे संग्रहित करून अनेकजण ते मुखोद्गत करत असावेत. ज्ञान लिहून ठेवलं तर ते अनंत काळ टिकण्याच्या दृष्टीने  योग्य असलं तरी राक्षसांचा वारंवार होणारा हल्ला, लिखितं व सामानाची नासधूस, आश्रमांना आगी लावणे ऋषींची, विद्यार्थ्यांची होणारी हत्या पाहता. लिखित आणि मखोद्गत ज्ञान ह्या दोन चाकांवरून ज्ञानाची गाडी सुरक्षित वाटचाल करत असावी.

नुसत्या यज्ञाचे राक्षसांना वावडे असायचे कारण नाही. पाच पन्नास वीटा आणि त्यात असलेला अखंड अग्नी हा त्यांचं लक्ष्य नव्हता तर तेथील प्रयोगशाळा, विविध अस्त्र शस्त्रांचे कारखाने, त्यामधे होणारी संशोधनं आणि खतरनाक उत्पादनं राक्षसांच्या अस्तित्त्वाला दहशत उत्पन्न करणारी असावीत. त्यांच्या तोंडचं पाणी पळवणारी असावीत. असं मला वाटतं. कारण---,

ह्या अशा अनेक आश्रमांमधून श्रीरामांना वनवासात जातांना उत्तम प्रतिची अस्त्र, शस्त्र मिळाल्याचे उल्लेख आहेत. तर सीतेला वनातल्या मातीत,काट्याकुट्यात चालूनही खराब होणार नाहीत, रोज वापरूनही ज्याला वास येणार नाहीत, मळणार नाहीत अशी वस्त्र मिळाल्याचे उल्लेख आहेत.

गंगा नदीतीरावर विश्वामित्रांचा शांत आश्रम पाहताना रामायण काळ डोळ्यासमोर उभा राहत होता. कुमार वयातील रामलक्ष्मण विश्वामित्रांसोबत येत असताना तेथे अनेक पांढर्‍या रंगाच्या टेकड्या लागल्या. त्याबद्दल कुमार वयातील रामाने विश्वामित्रांना विचारले असता मोठ्या खेदाने ते सांगू लागले, ‘‘हे सर्व त्राटिकेने मारलेल्या आश्रमकुमार आणि ऋषींच्या हाडांचे ढीग आहेत.’’ तेथील स्थानिकांकडून अजूनही तेथे काही जागी अशा प्रचंड राख किंवा भस्मासारखी भुकटी  असलेल्या जागा आहेत असे कळले.

विश्वामित्रांनी रामलक्ष्मणांना बला अतिबला विद्या अनेक अस्त्र शस्त्रांचं ज्ञान दिलं. बला अति बला  ह्या विद्या ग्रहण केल्याने तुम्हाला तहान भूक व्याकूळ करणार नाही. तसेच तुम्हाला श्रम, थकावट जाणवणार नाही; कुठलेही रोग, ज्वर, चिंताजनित कष्ट होणार नाहीत. वार्धक्याने तुमचं रूप बिघडणार नाही.

झोपल्यावर असावधान अवस्थेत कुठलाही राक्षस तुमच्यावर आक्रमण, हल्ला करू शकणार नाही. ह्या भूतळावर तुमच्या बाहुबलाचा सामना करू शकेल असा कोणी वीर नसेल.  बुद्धी, सौभाग्य चातुर्य, बुद्धीसंबंधी निश्चय प्रश्नांची उत्तरं देण्यात तिन्ही लोकात तुमच्या तोडीस तोड कोणी असणार नाही. असा आशीर्वाद आणि राक्षसांशी लढायचं धाडस दिलं. (बालकाण्ड अध्याय २२)

तुम्ही म्हणाल मग ह्या विद्या त्यांनी आश्रमवासीयांना का दिल्या नाहीत? तर पूर्वी मुलांचे गुण, क्षमता, नम्रपणा पाहून; थोडक्यात जो उतणार नाही मातणार नाही अशा योग्य आणि अत्यंत गुणी युवकालाच त्या दिल्या जात. नाहीतर ह्या विद्या मिळाल्यावर असंख्य रावण वा भस्मासूरच तयार व्हायचे.

सर्व विद्या शिकवल्यावरच विश्वामित्रांनी सुसज्ज अशा राम लक्ष्मणाला त्राटिकेसमोर पहिल्यांदा उभं केलं. राक्षसांना माहित होतं की, ऋषी व आम जनता हे नैतिकतेनी वागणारे आहेत. ते स्त्रियांवर शस्त्र चालवत नाहीत. ह्याच नैतिकतेची ढाल करून त्राटिका ही रावणाची बहीण सज्जनांच्या प्रगतीत खीळ घालत होती. भले मोठे धोंडे शिळा ऋषींवर, आश्रमावर टाकत होती. अशा ह्या त्राटिकेला, महिलेला पाहून  क्षणभर कुमार वयीन रामही विचलित झाला. विश्वामित्र त्याच्या पाठीवर हात ठेऊन नक्की म्हणाले असतील,

ओळखून रामाचे मानस । विश्वामित्रहि देती धाडस

नसेचि अबला ही तर राक्षस । जहरी सर्पचि जणु ही घोणस ।।

दया न हिजला आहे माहित । सदा वागते नित्य निरंकुश

अस्थिंचे जे दिसती पर्वत । हीन कृत्य हे तिचे अमानुष ।।

दुःखी कष्टी पाहुन सज्जन । खळांस मिळते नवसंजीवन

तडफडुनी हे मरोत सज्जन । खळांस वाटे असे मनातुन

विध्वंसास्तव असुरांचे नित । रक्त सळसळे राहुन राहुन

कार्य विधायक घडते पाहुन । पित्त खवळते देती दूषण

लोक हिताचे कार्य विधायक ।  होऊ ना दे ही असमंजस

 चेव येतसे हिला भयंकर । महा शिळांचा पाडे पाऊस ।।

निरपराध जे ऋषी,मुनीजन । हिने आणिले त्यांना रंजिस

कलंक ही तर स्त्रीजातीवर । निःशंक मनाने चालव सायक ।।

दया न उपयोगाची कणभर । हिला मारणे धर्म खरोखर

नर वा नारी जनहितबाधक । मरण तयांचे उपकार जगावर ।।

रामा होउ नको तू विचलित । कीर्ती येइल तुजला शोधत

परि न दंडिले त्राटिकस ह्या । सत्याचा होईल पराजय ।।

अघोर कृत्ये आचरण्या हिज । लंकापतिचे मिळे समर्थन

दशानना संदेश जोरकस । आज देइ तू रघुकुलनंदन ।।

अधर्मास देता प्रोत्साहन । अपरंपारचि मरतिल सज्जन

विवेक होउन जागृत सत्वर । सज्ज जाहला रघुकुलनंदन ।।

बरस-बरसला सायक पाऊस । त्रिटिकेसवे मेले राक्षस

अती कोवळा राघव राजस । परी तयाचे पाहुन धाडस ।।

विश्वामित्रहि म्हणती डोळस। योग्य लाभला रघुकुळ वारस

राजपुत्र हा आहे श्रेयस । अम्हा लाभला धीर समंजस ।।

ओळखून हा जनतेची नस । देइल तिजला सौख्य निरालस

सुकृत का हे? अमुचे संचित । रामरुपाने निकटचि प्रेयस।।

श्रीशिव महादेव हे रामाचे दैवत! त्यामुळे जेथे जेथे श्रीरामांचे वास्तव्य होते, तेथे तेथे शिवमंदिर आहे. येथेही त्राटिका म्हणजे एका महिलेला मारल्याने  त्याचे प्रायश्चित्तस्वरूप श्रीरामांनी तेथील वाळूची एक पिंड तयार केली. वाळू दाबून दाबून ही पिंड तयार करताना रामाच्या हातावरील रेघा त्या पिंडीवर उमटल्या म्हणू हा रामरेखा घाट व रामेश्वरनाथ मंदिर.

आश्रम आणि मंदिर दोन्हीही स्वच्छ, शांत , पवित्र  आहेत.

#लेखणीअरुंधतीची-

---------------------------------

  सुहृत् हो!

दोन तीन दिवस बर्फ पडून नंतर मातीसोबत त्याचा रंग बदलून चिखलमय झालेला असतानाच अचानक सूर्याची तिरीप त्या मळक्या साठलेल्या बर्फावर पडताच मातीत मिसळलेलं बर्फही त्याचं अस्तित्व दाखवत अचानक चमचम चमकायला लागावं त्याप्रमाणे बालपणापासून ऐकत आलेल्या, माहित असलेल्या कथा वा एखादा ऐतिहासिक प्रसंग त्या गावाला, त्या स्थानी जाउन अनुभवताना एक वेगळीच प्रचिती आल्या सारखं वाटतं.  त्या प्रसंगाची मनात उजळणी करताना एक वेगळाच इतिहासाचा पैलू मनात चमचम चमकायला लागतो.

काल बक्सरचा सांगितलेला अनुभव काळाच्या मधल्या रिकाम्या जागा भरत मनात वर्तमानाला जोडत गेला तेव्हा असच काहिसं वाटलं. कुमार वयातील रामानी तडागा/ त्राटिकेला  मारलं ही गोष्ट सचित्र मनात असली तरी तिचा आवाका लक्षात आला नव्हता. पण त्राटिकेला मारून रामाने केवढा मोठा अवाक करणारा पराक्रम केला हे तेथे गेल्यावरच लक्षात आलं. किंबहुना त्या प्रसांगाची महानता, त्या प्रसंगाचा आवाका तेव्हाच्या राक्षस जगताला केवढा दणका देणारा असेल हे पाहण्याचा डोळसपणा मिळाल्यासारखं वाटलं. ‘‘पुराणातली वानगी पुराणात’’!  ही म्हण आपण कायमच ऐकत आलो; त्यामुळे वर्तमानाचे इतिहासाला जोडणारे दरवाजेच बंद करून घेतले. वर्तमानातील असंख्य घटनांचे दुवे इतिहासाशी कसे जोडले गेले आहेत हा विचार न करता नुसत्या वरवरच्या आरती, पुजापाठातच अडकलो. आजच्या अनेक समस्यांची उत्तरं ही इतिहासात किंबहुना त्याहून मागे म्हणजे रामायण काळात वा त्या मागेही दडलेली आढळतील.

प्रत्येक युगात आपल्याला सर्वधिकार मिळावेत ह्यासाठी जनतेचं अहित चिंतणारे दुष्ट दुर्जन असतातच. ‘‘माझ्या शिवायच सर्व अलबेल चालू आहे मला त्यात कोणी विचारत नाही.’’ ह्या विचारांनी मनात ठुसठुसणारे मत्सरी लोक ‘‘लोकांना दाखवून देतो मी कोण आहे ते’’! अशा विचाराने पछाडलेले अनेक जणं असतात.

  आज आपण ज्याना दहशतवादी, अतिरेकी, नक्षलवादी म्हणतो किंवा शहरात शहरी नक्षल म्हणतो. त्यांना पुराणकाळात राक्षस म्हणत असतील. जंगलांमधे लपून तेथील वनवासी प्रजेला छळून, ओलीस धरून कुठलीही प्रगती होऊ न देणं, प्रगतीची साधनं नष्ट करणं, प्रजेला मागास ठेऊन पर्यायानी त्यांना आपल्याप्रमाने वागायला लावणं--- हे आज आणि रामायण कालातही सारखच दिसणारं चित्र आहे. रावण शहरी नक्षल होता जो साधन संपत्ती भल्या बुर्‍या मार्गांनी जमवत होता. आणि त्याचा उपयोग त्याचा दबदबा सुदूर वाढण्यासाठी करत होता.

राक्षस म्हणजे डोक्यावर शिंग, मोठे दात असे नसून त्यांची उपद्रवी पशुवृत्ती दाखवण्यासाठी शिंग, दात प्रतिकात्मक आहेत. त्राटिकेला हजार हत्तींचं बळ होतं म्हणजेच ती मोठी राक्षससेना बाळगून होती. शिवाय तिचे बाहेरच्या शत्रू देशांशी अत्यंत मैत्रिपूर्ण संबंध होते. रावणाची ही बहीण भारतीय नव्हतीच! लंकेच्या रावणाची बहिण! मग तिला भारतीयांविषयी त्यांच्या समृद्धि, प्रगतीविषयी आस्था कशी असणार? भारतीय वंशाच्या राजांचा समूळ नाश व्हावा, येथील ऋषीमुनींचे प्रयोग, संसोधन नष्ट व्हावे, लोकांना त्याचा लाभ मिळू नये हेच धोरण ह्या ‘‘परदेशी बहूचं’’ होतं. 

ऋषीमुनीही हे नुसते होम हवन करणारे नसून त्याकाळचे नुसते संशोधक नव्हेत तर संशोधनकेंद्रे, विद्यापीठे व उद्योजक होते. शिक्षण, त्याला संलग्न उद्योग व उद्योगांना आवश्यक संशोधन असा integrated approach  एकत्रित मार्ग तेव्हा अवलंबिला जात होता. रामाला वेगवेगळ्या आश्रमातील ऋषींनी दिलेली शस्त्रास्त्र, विद्या, उपकरणं, वनवासात राहूनही न मळणारे, वाईट वास न येणारे सीतेला ऋषीस्त्रियांनी कपडे म्हणजे त्या त्या आश्रमांची उत्पादनं होती.

आज नक्षल्यांना बाहेरच्या देशातून पैसा, शस्त्र, दारुगोळा, रसद पुरवली जाते. तेव्हाही लंकेचा राजा ह्या त्राटिकेला हवा तेवढा पैसा, शस्त्र पुरवून भारताची होणारी प्रगती होऊ नये म्हणून कार्यरत होता. किंबहुना आपल्याच बहिणीला/ त्राटिकेला त्याने अयोध्येशेजारील सुंदरवनात म्हणजेच बक्सरच्या जंगलात पाठवून ऋषीमुनींच्या अनेक विषयांरील संशोधन कार्यात, तयार मालाचे उत्पादन करणार्‍या कारखान्यांमधे, त्यांच्या अस्त्र शस्त्रांच्या कारखान्यांमधे अनागोंदी माजवणे, लूटमार करणे, वारंवार आग लावून संशोधन नष्ट करणे अशा महत्त्वाच्या कमावर नेमलं होतं.

भारत बलाढ्य देश बनू नये म्हणून आज जसे अनेक बाहेरील देश सक्रीय असतात, तुकडे तुकडे गँगला हजारो डॉलर्स आणि अद्ययावत शस्त्रांस्त्रांची रसद पुरवत असतात, काही भारतीयांनाच भडकवून त्यांच्याकरवी अनेक खोट्या बातम्या विविध माध्यमातून प्रसारीत करत राहून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करून त्यांचं मतपरिवर्तन करत असतात; त्याच धर्तीवर अयोध्येशेजारील सुंदर वनात राहून त्राटिकेनी सर्वांना सळो की पळो करून सोडलं होतं.

सुचारूपणे यातायात होऊ नये ह्या साठी रस्ते उखडणे, नदीवरील ब्रिज/पूल तोडणे, झाडे तोडून रस्त्यात टाकून रस्ते आडवणे, महत्त्वाच्या व्यक्तिंना मारून दहशत पसरवणे हा प्रकार दोन्ही काळात सारखाच आहे. हे लक्षात घेता आजच्या संकटांसाठी मिळणारी उत्तरं ही इतिहासात सापडणारी आहेत.

त्राटिकेच्या ह्या कारवायांना प्रखर उत्तर देत ऋषी अगस्तींनी त्राटिकेच्या नवर्‍याला म्हणजे सुंद राक्षसाला ठार मारलं. त्याचा बदला घेत ह्या त्राटिकेनी अगस्तींचा सर्व आश्रमच उध्वस्त केला. अगस्तींची मुलं, आश्रमवासी, ऋषीकुमार सर्व मारले गेले. त्राटिकेच्या ह्या उच्छादाला आपण पुरे पडणार नाही हे लक्षात येऊन अगस्तीऋषींनी आपला सर्व कारभार--- अगस्ति विद्यापीठ आणि त्याला संलग्न उद्योगधंदे दक्षिणेकडे हलवले. पण त्राटिकेच्या दहशतीने समाजाचे backbone/ तारणहार असलेल्या ऋषींनी परागंदा होणे हे उत्तर नव्हते. तर त्राटिकेला सुबाहू आणि मारिच ह्या तिच्या मुलांसहित योग्य जागी पोचवणे हा एकमेव मार्ग होता.

कुठल्याही राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला राजाश्रय लाभणे आवश्यक असते; तरच त्या कार्याला लोकांचा पाठिंबा, लोकांचा सहभाग लाभतो. रामलक्ष्मण ह्या दोन राजपुत्रांचा राक्षसांच्या विरुद्ध लढाईतील सहभाग त्यासाठीच आवश्यक होता. विश्वामित्रांचं हे राजकारण, विश्वामित्रांच्या योजनेला राजाश्रय किती आवश्यक आहे हे वसिष्ठांना बरोबर उमगलं आणि त्यांनी राजा दशरथाला राम लक्ष्मणांना विश्वामित्रांबरोबर पाठवण्यास सांगितले.

त्राटिका मेली हा थेट लंकापतीला शह होता. ‘‘याद राख आमच्या येथे लुडबुड केलीस तर!!! तुझीही गत हया त्राटिकेसारखीच व्हायला वेळ लागणार नाही’’.

रावणानी तेव्हापासूनच रामावर, रामाच्या पराक्रमावर आणि रामाच्या सर्व हालचालींवर लक्ष केंद्रित केलं नसेल तरच नवल!

----------------------------------------

लेखणीअरुंधतीची-

लंकेशा! तुझी घेरांबंदी झाली आहे हे सांगणारा दुसरा शह दंडकारण्यात शूर्पणखेला मिळालेलं योग्य उत्तर हे होतं. त्राटिकेला मारणार्‍या रामलक्ष्मणानी शूर्पणखेला नाक, कान कापून सोडून द्यायचं कारणच हे होतं की तिचा बोंब मारत थेट लंकेला व्हॉटस् अ‍ॅप मेसेज गेला पाहिजे. अरे सुंदरवन गेलचं आता दंडकारण्यही गेलं! मग रावण खडबडून जागा झाला.

मित्रांनो इतकं होऊनही काही जण आपल्याला रामायण घडलच नाही; राम जन्मला नाही, हे सांगत असतात. ही तर नुसती गोष्टच!  आजही अशक्य वाटणारा रामसेतू बांधलाच नाही. त्यावरही जनता मानायला तयार नाही म्हटलं की, मग हे लोक अजून खालच्या पातळीवर उतरतात. राम मांस मच्छी खायचा तो नॉनव्हेज होता, असा सामन्य व कच्या दिलाच्या जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करतात.

भारतासारखा बडा मासा आपल्याला मिळवायचा असेल तर संघटित हिंदूना तोडणं हेच त्यांचं राजकारण आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांच्यावर फेकलेल्या चार दमड्यांसाठीही आपल्या महा परंपरेला नाव ठेवायची सोशल मिडियावर अहमहमिका सुरू आहे. कोणी हिंदूचा ध्वज भगवा असतो म्हणून आपण जणु काही तोच खाल्ला हे दाखवायला संत्र सोलून खातांना मुद्दाम त्याचे चित्रण दाखवतील तर कोणी मटण कोंबड्या एकादशीच्या दिवशी गिळून आपल्याला मुद्दाम डिवचायचा प्रयत्न करतील. किंवा अहिंसा हाच आपला खरा धर्म आहे हे आपल्याला वारंवार सांगत राहून आपल्याला नेभळट करतील.

 आजसुद्धा काहीकाळ शत्रूच्या ताब्यात असलेल्या माणसावर लगेच विश्वास न ठेवता त्याला काही काळ वेगळं ठेऊन तो शत्रूला तर सामील नाही? तो शत्रूचा हेर तर बनला नाही? झालेल्या शारिरिक व मानसिक छळला घाबरून त्याने आपल्या राज्याचे  भेद शत्रूला तर सांगितले नाहीत? ह्याा सर्वाचा शहानशा करून मगच त्याला स्वीकारलं जातं. स्वीकारल्यावरही त्याच्यावर सक्त पाळत ठेऊन त्याचं वर्तन तपासलं जातं.

 जेव्हा कुठच्याही कारणाने असली तरी एक राणी शत्रूकडे काही काळ राहिली, तर तिला  ह्या सार्‍या अग्निदिव्याला सामोरं जाणं राज्याच्या हितासाठी आवश्यक आहे. त्यात तिची चूक आहे किंवा नाही ही नंतरची गोष्ट आहे. त्यामुळे  ‘‘ज्याने सीतेला सोडलं तो कसला राजा?’’ हे विचारणारे लोक आपल्या मनातील दृढ असलेले धर्माचे स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

 ह्यामागे एक महान राजकारण आहे. सांगणारे लोकं अडाणी मुळीच नाहीत. त्यांना भारताची होणारी प्रगती बघवत नाहीए. आजसुद्धा अनेक जण स्वतःची नाव बदलून लंकेश, रावण अशी करून घेत असतील तर ह्या लंकेशांना, रावणांना, ह्या त्राटिकाना, योग्य जागी पोचवले पाहिजे. आपल्याला डिवचणार्‍या आपल्या आस्थांना मूळापासून फेकून देण्याच्या तयारीत असलेल्या व एकादशी वा आमच्या पवित्र दिवशी मुद्दाम मटणलॉलिपॉप चघळत आम्हाला टिव्हीवरून डिवचत, भलत्यांचेच लांगूलचालन करणार्‍यांना योग्य जागा दाखवली पाहिजे. तरच रामराज्य अवतरेल.

---------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-






 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)