रामायण Express भाग 29 यात्रा -
रामायण Express
भाग 29
यात्रा -
आपल्या ज्या कोणी दूरदृष्टीच्या पूर्वजांनी, ऋषी, मुनींनी ‘तीर्थयात्रा’
ह्या प्रवास प्रकाराची सुरवात केली; त्यांच्या दूरदर्शीपणाला वारंवार नमन! भौगोलिक
दृष्ट्या भारताचा भूभाग एकसंध होता आाणि आहे. पण!! तीर्थयात्रेच्या निमित्ताने मनानेही
सर्व भागातील भारतीयांना एकमेकांना सांधत राहिला. जोडत राहिला. तीर्थक्षेत्रे फक्त
धोंडा पाणी राहिली नाहीत; तर पवित्र गंगा, यमुना, नर्मदा, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा
अशा अनेको अनेक नद्यांचं जल शरीरातील रक्तवाहिन्यांप्रमाणे समाजाच्या धमन्या धमन्यांमधून
वाहत राहिले; आणि भारतीयांच्या हृदयातील एकत्वाच्या भावनेला पुष्ट करत राहिले. ह्या नद्यांच्या
जलौघासमवेत एकरूप असलेल्या सनातन संस्कारांनी विविध समाजातील, विविध क्षेत्रातील मनामनांना
सांधत, बांधत भारताची सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक अशी अन्तर्बाह्य एकात्मता निर्माण केली.
यात्रा एका जागेहून दुसर्या जागी जाण्याचा नुसता विनाउद्देश प्रवास
न राहता ‘आपल्या’ देशाचा ‘आपल्याला’
परिचय घडवण्यासाठीची ‘‘भारत अनुभूती यात्रा’’ झाली. ‘आपल्या’
नदया, ‘आपले’ पर्वत,
‘आपली’ जंगले असं प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला
‘आपले’पण तयार झालं. प्रत्येक तीर्थ हे ‘आपल्या’
असामान्य, अद्वितीय पूर्वजांशी निगडीत आहे. त्यामुळेच त्या त्या जागांना असामान्य स्थानमहात्म्य
प्राप्त झालं. ‘आपले’ देवतुल्य नेते राम, कृष्ण,
उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे स्त्री-पुरूष पूर्वज, ‘आपले’
थोर ऋषीमुनी त्यांचा पराक्रम, त्याचं उल्लेखनीय कार्य, असामान्य कर्तृत्व ह्यांना जाणून घेता घेता ‘आपल्या’
संस्कृतीचं एक भव्य दिव्य अनुपम मंदिर हळु हळु प्रत्येक मनामनात तयार होत गेलं. त्यात
भारतमातेची प्राणप्रतिष्ठा झाली. कारण भारत हा नुसता दगडमातीचा देश न राहता आम्हाला,
‘आम्ही श्रेष्ठ आहोत’ ‘आम्ही भारतीय आहोत’ अशी आमची ओळख देणारी, आम्हाला अभिमान वाटायला
लावणारी आमची अस्मिता तयार झाली. सर्व भारतवासीयांचे पालन पोषण करणारी जननी जन्मभूमी
भारतमाता झाली. संपूर्ण भारतभू पुण्यभू झाली. समग्र भारत दर्शनाने नम्रपणे प्रत्येकाचे
हात आपोआप जोडले गेले. आणि सहजगत्या एकमेकात गुंफलेही गेले. हृदया हृदयात आत्मीयतेचे,
श्रद्धेचे दीप तेवू लागले. त्या दीपांवर पुढली पिढीही आपल्या श्रद्धेचे दीप उजळून घेऊ
लागली.
सुहृत् हो!
लहान बाळ प्रत्येक गोष्ट मुखात घालून जाणून घ्यायचा प्रयत्न करतं. मुठी
चोखून दूध मिळालं नाही की रडतं. बाळाला आपल्या स्वतःला जाणून घ्यायचं असतं. आपला विस्तार
जाणून घ्यायचा असतो. बाळासाठी एकमेकांपासून सर्वात दूर असलेले त्याचे दोन अवयव म्हणजे
तोंड आाणि पायाचा अंगठा! तान्हं बाळ स्वतःच्या पायाचा अंगठा मुखात घालून आपला विस्तार
जाणून घेत असतो. बाळकृष्ण ह्या सर्व बालकांचं प्रतिक!
काशीची गंगा रामेश्वरला वाहतांना
(काशीचं मुख आणि रामेश्वरचा अंगठा) हाच बालकृष्ण भाव माझ्या मनात दाटून आला. काशी ते
रामेश्वर ही भारत-अनुभूती यात्रा केल्यावरच आपल्याला आपला संपूर्ण विस्तृत भारत कळतो.
भारताची वैविध्यपूर्ण भूमी, निसर्ग, आचार, विचार, भाषा, खान, पान, संस्कृती, सणवार,
ह्या सर्वांना एका सूत्रात ओवणारी भारतीय सनातन संस्कृती जाणून घेत घेत काशी ते रामेश्वर
प्रवास करावा हीच त्यामागील भावना असावी. आपला खंडप्राय देश जाणून घेण्याची ही रीतच
किती अनुपम! कर्मकांडातील अर्थ समजला तर फारच
छान! नाही समजला तरी तीर्थांच्या सानिध्यात
तीर्थयात्रेच्या परीस प्रक्रियेतून गेलेलं मन आपोआप लखलखित सोनं होतं.
पायाचा अंगठा चोखणार्या बाळकृष्णापलिकडचा भगवान कृष्ण कळायला मात्र
एकनाथच पाहिजेत. ‘‘यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति । गीता(6.30)’’ सर्व प्राणीमात्रांच्या
ठिकाणी त्या वासुदेवाला बघणार्या आणि वासुदेवातच सर्व प्राणीमात्र समाविष्ट आहेत अशा
उदात्त भावनेने एकनाथांनी मोठ्या कष्टानी काशीहून भरून आणलेली गंगेची कावड रणरणत्या
उन्हात पाणी पाणी करत मृत्युपंथाला लागलेल्या गाढवाला पाजली. त्याचा जीव वाचवला. त्यांनी
श्रीकृष्णस्वरूप देशाची संकल्पना अजून विस्तृत केली. त्यात सर्व भूतमात्र सामावले. भूतमात्रांच्या ठिकणी देवत्व अनुभवणार्या महात्म्याच्या
घरी भगवान कृष्ण श्रीखंड्या बनून पाणी भरत राहिले ते काही उगीच नाही,
‘‘केल्याने पर्यटन मनुजा चातुर्य येतसे फार’’ असं गुज सांगत आपल्या
पूर्वजांनी आपल्याला घरच्या रोजच्या ऊठाठेवीतून, धबडग्यातून, रामरगाड्यातून बाहेर काढून नवनवीन ठिकाणी जायला उद्युक्त केलं.
आपल्या पूर्वजांनी यात्रा करताना आपल्याला उग्र, रौद्र, भीषण निसर्गाला निधड्या छातीने
तोंड द्यायला शिकवलं. तर अद्भुत, निःशब्द करणार्या
अद्वितीय सुंदर निसर्गाला तेवढ्याच कोमल, रसिकतेने दाद द्यायलाच लावली. विना उद्देश्य
यात्रा म्हणजे नुसतं धोंडापाणी! हे खडसावून सांगायला रामदास विसरले नाहीत. तर फक्त
मौजमजेसाठी जीवन असेल तर ते शिश्नोदरी व्यर्थ आहे असं लोकांच्या तोंडावर अत्यंत स्पष्ट
खडे बोल सुनवायला ज्ञानोबा कचरले नाहीत.
राजा विक्रमाच्या दरबारात अनेक
ठिकाणी यात्रा करणारे यात्री येत. विक्रमादित्य आवर्जून त्यांना त्याचे काही विशेष
अनुभव कथन करण्यास सांगत असे. त्यांचे वेगवेगळे अनुभव ऐकत असे. त्यामुळे आपल्या राज्यात
राहूनही त्याला विविध ठिकाणची अद्ययावत माहिती मिळत असे. कित्येक ठिकाणी तर तो वेश
पालटून, कित्येक वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून जाऊन येत असे. घटनेची सत्यता पडताळून
पहात असे.
अशा ह्या प्रवासांमधून देशाच्या
हृदयातील अंतःप्रवाह किती सहज कळतात. (under current) पुणे ते दिल्ली आमचा रेल्वे प्रवास.
कुठेही बाहेरच्या माणसांच्या संपर्कात न येताही खिडकीतून बाहेर पाहताना कित्येक गोष्टी
जाणवल्या नॅशनल हाय वे सुंदर मोठे झाले आहेत. महाराष्ट्रात तर जागोजागी घेतलेल्या शेततळ्यांनी
बहार आणली होती. शेततळ्याचा प्रसार करणार्या आपल्या नेत्याला त्याचं श्रेय जेवढं द्यायला
पाहिजे तेवढं प्रसार माध्यमांकडून दिलं गेलं नाही ह्याची खंत वाटली. पूर्वी ओसाड वाटणार्या नगर आणि इतर दुष्काळी जिल्ह्यात
ठिकठिकाणी शिवारं हिरवीगार होती. लोकांनी सरकारी योजनांचा घेतलेला लाभ नजरेत भरत होता.
लोकांचं राहणीमान उंचावल्याची साक्ष गावगावातून फिरणार्या SUV नक्कीच देत होत्या.
एक मोठी गोष्ट जाणवली; मोदिजींनी 22 जानेवारीला घराघरावर प्रभुरामाचे
झेंडे लावायचं आवाहन केलं. मार्चमधे आम्ही रेल्वेने जाताना मागे पडणार्या प्रत्येक वस्तीवस्तीवर, झोपड्यांवर, घरांवर,
बंगल्यांवर, कारखान्यांवर, सार्वजनिक ठिकाणांवर, शेतांमधून जिथे ज्याला वाटलं तेथे
तेथे उंच ध्वजदंडावर रामाची प्रतिमा असलेले भगवे झेंडे डोलत होते. वार्यासोबत डौलात
फडकत होते. वस्त्या, झोपड्यांची दुरवस्था असली तरी रामप्रभूंसाठी हृदयाहृदयात जणु सुवर्ण
सिहासन मांडलं होतं. राम प्रभुंच्या आयोध्या प्रवेशाने सारा देश जणु गहिवरला होता.
तीर्थयात्रा पूर्वी अशी आजच्यासारखी five-star नव्हती. वाटेत चोर, लुटारू,
डाकू होतेच. पायी पायीच शेकडो मैल चालावे लागे. आजूबाजूला सदैव वावरणार्या भीतीपोटी
लोक एकमेकांना मदत करत, एकमेकांच्या सहाय्यानी, एकमेकांच्या सहवासात गप्पा गोष्टी करत
मोठमोठी अंतरं चालून जात. ‘‘काव्यशास्त्रविनोदेन
कालो गच्छति धीमताम्।’’ (प्रज्ञावंत सुशिक्षितांचा वेळ छंदोबद्ध कविता, अनेक
शास्त्र जसे न्यायशास्त्र, तर्कशास्त्र धर्मशास्त्र, वेदविधी मनोरंजन, आमोद प्रमोद, ह्यात प्रसन्नतापूर्वक जातो.) ह्या
उक्तीप्रमाणे अनेक विषयांवर चर्चा करत, एकमेकांचे अनुभव ऐकत, प्रवासवर्णनं ऐकत सहजगत्या
ज्ञानी, अनुभवी होत होते. आजही आपल्यासोबत असलेले विविध भागातील सहप्रवासी आपल्याला
त्यांच्या भागातील विविध माहिती देऊन आपल्याला समृद्ध करत असतात. भारतातल्या अनेक भागातल्या
लोकांशी आपण नंतरही जोडलेले राहतो. एखादं ठिकाण ऐकिवात असण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहिलं
असेल तर नंतरही त्याबद्दलच्या बातम्या ऐकता-वाचतांना त्या समस्येचा नेमकेपणा सहज लक्षात येतो.
आपल्याला वारंवार अस्मानी संकटांमधून तारून नेणारी आपली भारत भूमी पाहिल्यावर
सहज लक्षात येईल की रामेश्वरम् ला समुद्राच्या पोटात घुसलेला जमिनीचा भूभाग/ हत्तीच्या
सुळ्याप्रमाणे असणारे द्वीपकल्प हाच भारत भूमीला तारणारा वराहाचा सुळा आहे. हाच वराह
अवतार ! तर गुजरातचा कासवाच्या पाठीप्रमाणे असलेला आकार आणि कच्छचा कासवाच्या पंजाप्रमाणे
असलेला दंतूर किनारभाग हा तर आपला कच्छ अवतार! एकेकाळी भारतीय भूखंडाचे भाग असलेले
कंबोडिया, इंडोनेशिया हे सर्व मत्स्य अवतारांचे प्रतिक हे बघता बघता त्यातून शिकवलेली
प्राण्यांची उत्क्राती म्हणा वा प्राण्यांचं वर्गीकरण म्हणा हेही तितकच रोचक हया भारतीय
भूगोलामधेच गुंफलेला इतिहास मनू पासून टप्प्याटप्यानी इतिहास कालीन कालखंड उलगडून दाखवणारा
आहे.
घडलेल्या गोष्टींचा नेमका काळ कोणता हे सांगतांना आकाशातील ग्रह तार्यांची
नेमकी स्थिती सांगितल्याने आजही घटनांचा काळ शोधणे सोपे होते. राम-रावणाच्या युद्धापूर्वी
अगस्ती रामाला भेटून गेले. आदित्यहृदय हे स्तोत्र देऊन गेले. रामा आता त्वरा कर सांगून
गेले. आकाशातल्या सूर्यानेही त्वरा कर हेच सांगितले. आकाशातील अगस्तीच्या तार्याचा लोप झाला की महिन्याभरात
पावसाला सुरवात होते असं म्हणतात. त्यामुळे रामरावणाचं युद्ध दक्षिणेतल्या पावसाळ्यापूर्वी
झालं हे निश्चित! यात्री भूगोलासोबत आकाशाचं गणितही शिकले.
देव, मंदिरं, नद्या ----- ह्या सर्वातून जोपासली जाणारी आपली संस्कृती,
जपलेलं आणि जोपासलेलं प्रचंड ज्ञान भांडार, आपल्या पूर्वजांचा अभिमानास्पद इतिहास,
त्याला एखाद्या रेशमी वस्त्राच्या सुंदर काठपदरासारखी दिलेली कथांची जोड! सर्व विलक्षण! मन हे राम रंगी रंगले !!!
--------------------------
Comments
Post a Comment