रामायण Express भाग 18 सीता अपहरण

 

सीता अपहरण

सुहृत् हो!

मी रामायण express मधे बसून माझ्यासोबत तुम्हाला माझ्यासोबत रामचरित सरितेच्या काठाकाठाने न्यायचा प्रयत्न करत आहे. प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा क्रम आणि रामायण express ने बरीच स्थळे दिलेल्या मोजक्या वेळात दाखविण्यासाठी घेतलेला मार्ग ह्यात फरक आहे. रामायण express ठिकाणांचे बिंदू तिला जसे जमतील त्या shortest route  नी जोडत जाते; त्यात घटनाक्रम मागपुढे होतो.

रामायण कथेच्या ओघाने गेल्यास गाडीचा रूट सांगता येत नाही. मी रामायण express प्रमाणे जात आहे. त्यामुळे दंडकारण्यात शिरताना नागपूर येथे झालेली अगस्ती श्रीरामांची भेट ही थोडक्यात सांगितली तरी आमच्या गाडीचा तो शेवटचा थांबा असल्याने सर्वात शेवटी सांगायला लागेल.

सुहृत् हो!

चौदा हजाराच्या चतुरंग सेनेला नुसतीच धूळ चारली नव्हे  तर संपूर्ण सैन्याला धराशायी केलं. अत्यंत पराक्रमी बलशाली आणि क्रूरपणाचा अर्क असलेल्या त्रिशिरा, दूषण, खर ह्या राक्षसांना यमसदनाल धाडलं तेही एका तारुण्यात प्रवेश केलेल्या, एकट्या, पायी असलेल्या रामाने! रणकर्कश राम म्हणतात त उगीच नाही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट! पण ती सत्यात उतरवली त्याने.

रामाचा अजोड पराक्रम, विश्वामित्रांनी दिलेली विद्या, अगस्तिंनी दिलेलं वैष्णवी धनुष्य, अजोड बाण आणि अक्षय भाते, असंख्य ऋषी मुनींनी दिलेली उपयोगी सामग्री, अस्त्र, शस्त्र, मौलिक उपदेश आणि शुभाशीर्वाद! ह्या सर्व कल्याणकारी गोष्टी एकत्र आल्यावर त्यांचा झालेला प्रचंड विस्फोट सर्व विनाशकारी शक्तींचा धुव्वा उडवून गेला.

चांगल्या शक्तींनी एकत्र येणं, सत्यमार्गावर चालणार्‍या सुस्वभावी नम्र व्यक्तीच्या पाठीशी उभं राहणं, त्याला सर्वतोपरी मदत करणं ह्या गोष्टी कदाचित अनेकांना मिळमिळीत वाटत असतील, ह्याने काय साधणार असा निराशेचा सूर लढाई लढण्या आधीच काही हतबल लावत असतील, दुर्जन त्याची टर उडवत असतील तरीही त्या केल्याच पाहिजेत. त्यातूनच आश्चर्यकारक परिणाम समोर येतात.(अनेकांना मी मत कशाला देऊ? त्यातून काय होणार? आजपर्यंत त्याने काय साधले? तुम्हाला मला काय मिळाले? असा निराशाजनक सूर लावायची सवय असते. पण एका मताची शक्ती किती अलौकिक असते हा साक्षात्कार त्यांना झालेला नसतो.)

खर, दूषणाला त्याच्या चतुरंगसेनेसहित यमसदनाला धाडल्यावर महर्षी अगस्तिंसोबत देव, राजर्षी, महर्षी ह्यांनी रामाला भेटण्यासाठी गर्दी केली. त्यांनी रामाचा सत्कार केला. त्याचं आत्यानंदानी  कौतुक करत ते म्हणाले,

‘‘हे दशरथनंदन श्रीरामा, शरभंग ऋषींकडे इंद्रदेव हयासाठीच आले होते. खर दूषणाच्या वधासाठीच तुला पंचवटी पर्यंत आणून पोचविण्याची ही योजना होती. आज तू दंडकारण्य राक्षसमुक्त केलस. सर्व ऋषीमुनींना भयमुक्त केलस. ह्या दंडकारण्याच्या विविध भागांमधे आता ऋषीमुनी निर्भयपणे संचार करू शकतील.’’ तोवर जानकी आणि लक्ष्मणही गुहेतून परत आले. इतक्या घोर संग्रामात जिंकलेल्या आपल्या पतीला, रामाला सुरक्षित पाहून भावुक झालेल्या सीतेने रामाला आलिंगन दिले. रामाची जणु सारी थकावट त्याने दूर झाली. अत्यंत प्रसन्नपणे तिघेजण आश्रमात आले.

पण जनस्थानात युद्धातून वाचलेला, उरला सुरला अकंपन नावाचा राक्षस मोठ्या त्वरेने लंकेकडे धावला. ‘‘लंकेशा, जनस्थानातील बहुतेक सर्व राक्षस मरण पावले. खर, दूषण ही स्वर्गवासी झाले. कसाबसा माझा जीव वाचवून मी एकटाच तुला हा वृत्तांत सांगण्यासाठी आलो आहे.’’

रावणाचा नुसता तिळपापड झाला.  ‘‘कोणाला? कोणाला एवढी मरायची घाई झाली आहे. मी काळाचाही काळ आहे. मला जर क्रोध आला तर मी सूर्य आणि अग्नीलाही भस्म करून टाकीन.’’ रावणाने गर्जना केली

अकंपन म्हणाला, ‘‘हे कार्य एकट्या रामाने केले आहे. ना त्याला देवतांची मदत आहे ना अजून क्षत्रीय राजांचे पाठबळ! दिव्य अस्त्र, शस्त्रांच्या ज्ञानात तो इतका पारंगत आहे की कोणी कितीही तरबेज असला तरी एकट्या रामाच्या पासंगालाही पुरणार नाही. त्याने एकट्याने आपल्या जनस्थानांचा विनाश करून टाकला आहे.

सर्व असूर, सर्व देव एकत्र आले तरी त्याला कोणी हरवू शकणार नाही. रावण रागाने नुसता धमसत होता. खरदूषणाच्या मृत्यूने अत्यंत दुःखी झाला होता. खाऊ का गिळू सारखे बघणार्‍या रावणाकडे पाहून अकंपन ही घाबरला. त्याच्याकडे अभय मागत तो पुढे म्हणाला, ‘‘पण त्याच्या वधाचा एक उपाय आहे. त्याची पत्नी सीता आत्ताच  यौवनात आली आहे. ती अत्यंत सुंदर आहे. तिच्या सौंदर्यापुढे  अप्ससराही फिक्या पडतील. तू तिचं हरण केलस तर तिच्यावर अत्यंत प्रेम करणारा राम तिच्या वियोगाने जिवंत राहू शकणार नाही. (जे अकंपनासारख्या राक्षसाला सहज कळत होतं ते राम-सीतेचं अतूट प्रेम आजही आपल्याला कळत नाही. राजा म्हणून न्यायव्यवस्थेनुसार कठोर निर्णय घेताना स्वतःच्या सुखाचा बळी देणारा राम आम्हाला कळलाच नाही. आम्ही रामाला पुरूषप्रधान संस्कृतीतला खल नायक ठरवलं. सीता त्यागामागची त्याची मनाची ससेहोलपट, कोंडमारा कुणाला कळू नये ही खरी शोकांतिका आहे.)

रावणालाही ही सोपीशी पण हुकमी एक्क्‌याप्रमाणे काम करेल अशी कल्पना आवडली. पटली आणि गाढवं जोडलेल्या सूर्यासारख्या तेजस्वी रथावर बसून आकाशमार्गाने /नक्षत्रांच्या मार्गाने थेट मारिच जेथे रहात होता तेथे तो आला.

रावणाचा यथोचित सत्कार केल्यावर मारिचाने रावणाच्या येण्याचे प्रयोजन विचारले. ‘‘माझ्या राज्याच्या सीमांचं रक्षण करणार्‍या खरं दूषणाला  मारल्याचे सांगत रावण म्हणाला, ‘‘माझ्या अवध्य असलेल्या जनस्थानातील सर्व राक्षसांना रामाने युद्धात मारून टाकलं आहे. (मित्रांनो, ह्यावरून रावणाचं राज्य नुसतं लंकेपर्यंतच मर्यादित नव्हत तर ऋषींना त्रास देण्यासाठी ,त्यांच्या विधायक कामात बाधा आणण्यासाठी आणि वेळ पडलीच तर त्यांचा खातमा करण्यासाठी त्याने भारतभर ठिकठिकाणी राक्षसांची जनस्थानं वसवली होती. )

त्यावर मारिच म्हणाला, ‘‘हे निशाचरशिरोमणी! हा कोण मित्र म्हणविणारा तुझा शत्रू आहे ज्याने तुला असा बदसल्ला दिला? तो तुला भलत्या गोष्टींना प्रोत्साहन देऊन अत्यंत जहरी सापाच्या तोंडात तुला हात घालायला लावून तुझ्याकरवी परस्पर त्याचे दात उपटून घ्यायला बघतोय. तू लंकेला परत जा आणि तुझ्या राज्यात सुखाने रहा.’’ मारिचाचा तो उपदेश क्षणभर पटून लंकेश लंकेला परत गेला. पण अशा हलक्या कानाच्या लोकांचे कान भरायला अनेकजण पुढे सरसावतात. अकंपनाची डाळ शिजली नाही हे पाहून शुर्पणखा पुढे सरसावली.

शूर्पणखा आली. रामलक्ष्णाने कायमची अद्दल घडवल्याने मनात उकळत होती. तिने रावणाची निर्भत्सना करायला सुरवात केली. ‘‘तू स्वेच्छाचारी, निरंकुशपणे विषय भोगांमधे बुडाला आहेस. जो कुठेही गुप्तचरांची नियुक्ती करत नाही, प्रजेला ज्याचं दर्शनही दुर्लभ असतं, भोगांमधे आसक्त झाल्याने जो आपली स्वाधीनताही हरवून बसला आहे असा राजा स्मशानातल्या अग्नीप्रमाणे असतो. त्याचा कोणी आदर करत नाहीत. हत्तींचा कळप ज्याप्रमाणे नदीच्या चिखलयुक्त दलदलीपासून दूर राहतात त्याप्रमाणे अशा राजाचा  प्रजा त्याग करते.’’

शूर्पणखेच्या ह्या वक्तव्याने रावण क्रोधाने लाल झला. मोठ्याने गर्जना करून त्याने सभेमधे  विचारल, कोण हा राम?, त्याच्याजवळ कोणकोणती अस्त्रशस्त्र आहेत, शूर्पणखेचं नाक-कान त्याने का कापलं हे जाणून घेतलं. सीतेच्या सौंदर्याचा वारंवर उल्लेख करून शूर्पणखेनेही नको ते काम करायला रावणाला भरीस घातलं. रावणानेही रामाच्या आणि आपल्या बळाचा विचार करून किंवा रामासारखा अननुभवी, सैन्याचे पाठबळ नसलेला वनवासी माझे काय बिघडवणार आहे? असा विचार करून सीताहरणाचा निश्चय केला. रावणाच्या इच्छेनुसार जाणारा रथ घेऊन गुप्तपणे रावण आकाशमार्गाने निघाला. मरिचाकडे आला. मरिचाला खर-दूषणाच्या त्या जनस्थानाचा नेमका पत्ता माहित असल्याने त्याने मरिचाला त्याला मदत करण्यास सांगितले. सर्व योजना नीट समजाऊन दिली. मारिचाने सुवर्णमृगाचं रूप घ्यायचं, सीतेच्या मनात त्याबद्दल मोह उत्पन्न करायचा, रामाला घेऊन लांब लांब जायचं अस त्या योजनेचे भाग त्याला समजाऊन सांगितला.

रामाच्या अनुपस्थितीत रावण सीतेचं अपहरण करणार म्हटल्यावर मारीच भयभीत झाला. त्याच्या घशाला कोरड पडली. तो रावणाला म्हणाला, ‘‘हे निशाचरपते! तुझा स्वभाव अत्यंत चंचल आहे. कोणाच्याही बहकाव्यात येऊन तू निर्णय घेऊ नकोस. तुझी खोटी स्तुती करणारे स्तुतीपाठक पुष्कळ भेटतील पण तुला अप्रिय वाटेल असा हिताचा सल्ला देणारा माझ्यासारखा क्वचितच असेल. एकतर तू तुझ्याकडे हेरखातं ठेवत नाहीस. त्यामुळे योग्य, जबाबदारपणे गोळा केलेली खरी, योग्य माहिती तुझ्यापर्यंत येतच नाही. तू रामाला ओळखलेलं नाहीस. रामाच्या पराक्रमाची तुला यत्किंचितही कल्पना नाही. मला तर वाटतय की ही जनकनंदिनी सीता तुझा नाश करण्यासाठी तर उत्पन्न झाली नाही? तुझ्या ह्या दुराचारी, पापी वागण्याने फक्त तुझाच नाही तर सार्‍या राक्षस कुळाचा आणि राष्ट्राचा नाश तू ओढवून घेणार आहेस. सीता अग्निज्वाळेप्रमाणे आहे. तू तिच्यावर कुठलीही सक्ती वा बलात्कार करू शकणार नाहीस. आणि धर्मात्मा रामाच्या पराक्रमाबद्दल एक गोष्ट सांगतो. एकेकाळी मला माझ्यामधे हजार हत्तींचं बळ आाहे असा गर्व होता. ऋषीमुनींचं मांस खाऊन मी रहात असे. एक दिवस दंडकारण्यात विश्वामित्रऋषी यज्ञ करत होते. त्यांच्या रक्षणासाठी बारा वर्षाचाही नसेल असा राम धनुष्याची प्रत्यंचा ताणून यज्ञाच्या रक्षणाला उभा राहिला. मी हा बालक मला काय करेल ह्या समजुतीने यज्ञवेदीकडे धावलो. तेव्हा जराही न घाबरता त्याने एक असा काही जोरकस बाण सोडला की मी मेलो नाही पण अनेक योजने दूर असलेल्या समुद्रात येऊन पडलो. (रामाने त्याच्या पराक्रमाने राक्षसांना त्याची जनस्थानं  सोडून जायला भाग पाडून थेट समुद्रापर्यंत मागे हटवलं असं नक्कीच मानता येईल)

पण!!!

 रावणाला हा हिताचा उपदेश कसा पचनी पडावा? त्याने मारिचालाच फटकारले. शेवटी मारीच म्हणाला हे निशाचर! काकतालिका न्यायाने म्हणजे टाळी वाजवायला जावी आणि चुकून त्यात एखादा कावळा सापडून तो मरण पावावा त्याप्रमाणे अकस्मात मला मरावे लागणार आहे. पण एक नक्की सांगतो की, ह्यात तुझा संपूर्ण विनाश आहे. आयुष्य संपत आलं की, मरणासन्न माणसाला सुहृदांचा हितकर उपदेश पटत नाही.

राजाच्या भयाने मारीच रावणाला मदत करायला तयार झाला. ‘‘आता कसा तू माझा नेहमीचा मारिच वाटतोयस!’’ असं म्हणत रावणाने त्याला आनंदाने मिठी मारली. ‘‘चल माझा रथ तयार आहे. त्याला पिशाच्यांचे मुख असलेली गाढव जोडली आहेत. चल लवकर बैस. तू तुझं काम नीट कर आणि विदेहहकुमारी सीतेच्या मनात तुझ्याविषयी लोभ निर्माण कर. एकदा का राम लक्ष्मण आश्रम सोडून दूर गेले की, मी तिला जबरदस्तीने उचलून नेईन. तथास्तु म्हणून मारिच गप्प बसला. रामायणातील वर्णनाप्रमाणे (अरण्यकाण्डातील 44 सर्ग श्लोक 10,11)

अनेक राज्ये, अनेक वन, अनेक पर्वत, अनेक नद्या अनेक राष्ट्र ओलांडत त्यांचा रथ दंडकारण्यात रामाच्या आश्रमाजवळ येऊन पोचला.( मित्रांनो इतका लांबचा प्रवास केल्याचा उल्लेख पाहिल्यावर ते नाशिकजवळ पंचवटीत आले असावे.)

रामाचा आश्रमाभोवती सर्वत्र केळी लावल्याने तो केळीच्या झाडांमुळे झाकाला गेला होता. रावण मारीचाचा हात हातात घेऊन म्हणाला, ‘‘मित्रा, ज्यासाठी आपण येथे आलो, ते काम तू तातडीने कर.’’ मारीचाने एका सुंदर हरणाचं रूप घेतलं आणि तो रामाच्या आश्रमाजवळ फिरू लागला. त्याची शिंगं इंद्रनील मण्याची होती. शुभ्र चेहर्‍यावर काळे काळे ठिपके होते.  तोंड लाल कमाळाप्रमाने सुंदर होतं. तर कान नील कमलाप्रमाणे होते. मान उंच होती. तर पोटाचा भाग इंद्रनील मण्यासारखा नीळसर, चमकदार होता. पार्श्वभाग मोहाच्या फुलाप्रमाणे शुभ्र होता तर कमळाच्या सोनेरी पिवळट परागांप्रमाणे त्याची बाकी अंगकांती चमकत होती. त्यावर चांदीप्रमाणे चमचमणारे ठिपके होते. खूर वैडूर्यमण्याप्रमाणे चमकदार सुंदर होते तर शेपूट इंद्रधनुष्याप्रमाणे सप्तरंगी होती. बाकी हरणांच्या कळपांमागे तोही जात होता. कसंही करून सीतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होता. आणि फुलं गोळा करणार्‍या सीतेची नजर नेमकी त्याच्यावर पडली. असा हा रत्नमयमृग तिने कधी पाहिला नव्हता. मारीचाच्या मायेने जणु तिची विचारशक्तीच हरण केली. तिने हाका मारून रामाला लक्षमणाला बोलावले. लक्ष्मणाला हा राक्षस असावा असा लगेचच संशय आला. त्याने तो व्यक्तही केला. सीता म्हणाली, असा हा सुंदर मृग आपण पाळू या. आपला वनवास संपला की आपण हयाला अयोध्येला घेऊन जाऊ या. तेथेही सर्वांना हा आवडेल. हा जिवंत नाही पकडता आला तर त्याचं कातडं ह्या गवतावर टाकून आपण बसू या. राम म्हणाला , आकाशात मृग नक्षत्र तर जमिनिवर हा मृग असे आकाश मृग आणि महीमृग दोन्ही सुंदर आहेत. पण लक्ष्मणाच्या म्हणण्याप्रमाणे हा जर मारीच राक्षस असेल तरीही त्याला मारायलाच पाहिजे. जसं अगस्तीऋषींनी वातापी राक्षसाला मारलं तसा हा मारीचही मेला पाहिजे. लक्ष्मणा, तू कवच वगैरे घालून मिथिलेशकुमारीच्या रक्षणासाठी सुसज्ज रहा मी आत्ताच्या आत्ता ते हरीण वा हरीणाचं कातडं आणण्यासाठी जातो. लक्ष्मणा, हा जटायूही बलवान सामर्थ्यशाली आणि सावधान आहे. कुठल्याही बाजूने राक्षस येऊ शकतात त्यामुळे अत्यंत सावध रहा. रामानेही कमरेला सोन्याच्या मूठीची तलवार लावली खांद्याला भाता बांधला आणि दुसर्‍या खांद्यावर धनुष्य घेऊन सोनेरी मृगाचा पाठलाग करू लागले. तो कधी दिसे कधी गवतात दिसेनासा होई. कधी हरिणांच्या कळपात दिसे. रामाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो हाती येईना. शेवटी रामाने ब्रह्मदेवाने बनवलेला तेजस्वी बाण धनुष्याला लावून तो  सोडताच मारीच त्याच्या मूळ रूपात खाली कोसळला. लक्ष्मण सांगत होता ते बरोबरच होतं. मायावी मृगाच्या रूपातील तो मारीच राक्षसच होता. रावणाला दिलेल्या वचनाचं मरताना त्याला स्मरण होऊन कसंही करून आश्रमातून लक्ष्मणालाही बाहेर काढण्यासाठी अगदी रामासारखाच आवाज काढून आर्त स्वरात ‘‘हा सीते! हा लक्ष्मणा! वाचव!’’ करून जोरात ओरडला.

मारीचाचं असं रामाच्या आवाजात आर्त साद घालणं ऐकून पुढे काय घडेल ह्याची सुस्पष्ट कल्पना रामाला आली आणि भयाने रामाच्या अंगावर काटा उभा राहिला. मित्रांनो घडलं ही तसच! सीता प्रचंड घाबरली. तिचं मन थार्‍यावर राहिलं नाही. लक्ष्मण अविचल होता. रामाच्या केसालाही कोणी हात लावू शकत नाही. त्याने मला तुझ्या रक्षणासाठी येथे ठेवलं आहे असं ठामपणे सांगितलं पण!! लक्ष्मणाने रामाच्या मदतीला जावं म्हणून सीता त्याला नाही नाही ते बोलली. शेवटी तिचे कठोर शब्द ऐकून लक्ष्मण म्हणाला, तू केवळ स्त्री आहेस म्हणून असे दुष्ट आरोप माझ्यावर करत आहेस. मला माहित नाही की मी परत आल्यावर तुला सुयोग्य स्थितीत पाहू शकेन का नाही!   हात जोडून विनीत होऊन लक्ष्मण तिला वारंवार नमस्कार करत तिच्याकडे बघत बघत वनात गेला.

लक्ष्मणाने लक्ष्मणरेखा ओढल्याचा वाल्मिकी रामायणात संदर्भ नाही. रावण मुनी वेषात आला. त्याने सीतेच्या सौंदर्याची अशी काही वारेमाप प्रशंसा केली की ब्राह्मण वेषातल्या रावणाचा सीतेनेही अतिथी सत्कारसाठी जी जी सामग्री वापरतात ती देऊन योग्य सत्कार केला. त्याला भोजनही देऊ केलं आणि जंगलात चोहीकडे दृष्टी टाकुन ती राम लक्ष्मणाची वाट पाहू लागली. रावणानी तिला ती कोण कुठली विचारल्यावर तिने आपली सर्व कहाणी सांगितली आणि त्याला म्हणाली आात तुझाही कुल परिचय दे. त्याबरोबर अत्यंत कठोर शब्दात  सीतेच्या मनात भय उत्पन् करण्यासाठी रावणाने आपल्या कुल, बल आणि आपल्या कर्माचा परिचय देत मी रावण आहे आणि सीतेला हस्तगत करण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. परिव्राजकाचं रूप सोडून तो भयंकर दशमुख रावण झाला. सीतेच अपहरण करून गाढवं जोडलेल्या सोन्याच्या रथात टाकून तो आकाश मार्गाने निघााला.

 त्याचवेळी सीतेची आर्त हाक रडणं ऐकून जटायू जागा झाला  आणि रावणाच्या आकाशमार्गाने जाणार्‍या रथामागे उडाला.

--------------------------



 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)