रामायण Express भाग 19 जटायू पडला

जटायू पडला               

 

जटायूने रावणाला पहिल्यांदा समजावणीच्या सुरात सांगून पाहिलं, ‘‘हे दशानना, मी जटायू! बाबा रे असलं निंद्य काम करू नकोस. दशरथनंदन श्रीराम महापराक्रमी आहेत. सार्‍या जगाचे स्वामी आहेत. जर ह्या महाबळी रामाने तुझ्या राज्यात वा नगरात येऊन तुझा काहीही अपराध केला नाही तर त्यांच्या धर्मपत्नीला उचलून नेण्याचा अपराध तू का करत आहेस?

मी काय म्हणतोय हे तुला समजत  नसेल तर तू आपल्या कपड्यांमधे अत्यंत विषारी साप बांधून नेत आहेस किंवा तू स्वतःच्या गळ्यात फाशीचा फंदा स्वतःच अडकवून घेतला आहेस असं मला वाटतं.

तू नवयुवक आहेस तर मी निःशस्त्र वृद्ध पक्षी! पण मी तुला सीतेला इतक्या सहजासहजी घेऊन जाऊ देणार नाही.’’ तू शूरवीर असशील पण पहिल्यांदा तुझी गाठ माझयाशी आहे. माझ्याशी युद्ध कर. रावणाला भयंकर क्रोध आला तो जटायूवर धावून गेला. आकाशात जणू दोन प्रचंड ढग एकमेकांवर आदळले. रावणाने अनेक प्रकारच्या बाणांचा जटायूवर वर्षाव केला. त्यांचा आघात सहन करून जटायूने आपल्या तीक्ष्ण पंजांनी रावणावर आघात करत त्याला जखमी केलं. रावणाने सोडलेल्या बाणांनी जटायूही जखमी झाला होता; पण रडणार्‍या सीतेला पाहून  परत तो रावणावर तुटून पडला.  आपल्या भरभक्कम तीक्ष्ण पंजांनी त्याने रावणाचं धनुष्य तोडून टाकलं. रावणानेही दुसरं धनुष्य उचलून इतके बाण जटायूला मारले की त्या बाणांच्या जाळ्याने जणु काही काड्याकाटक्यांच्या घरट्यात बसल्यासारखा जटायू दिसू लागला. पण आपले पंख जोरात हलवून जटायूने सारे बाण काढून टाकले. त्याने रावणाचं आणि पिशांच्यांप्रमाणे तोंड असलेल्या गाढवांना बांधलेली कवचं त्याच्या पंखांच्या जोरदार फटकार्‍याने तोडून टाकली. चोचीने त्याच्या सारथ्यालाही मारून टाकलं. रावणाचा आकाशमार्गाने जाणारा रथ तुटला. रावण सीतेला घेऊन खाली पडला.

 वृद्धावस्थेमुळे लढताना थकलेला जटायू पाहून रावणालाही आनंद झाला आणि सीतेला उचलून परत तो जाऊ लागला. ‘‘रावणा तुझा विनाश जवळ आला आहे असं म्हणत जटायू त्याच्या पाठीवर बसून चोचीने आपल्या व तीक्ष्ण पंजंनी त्याला जखमी करू लागला. त्याने त्याच्या डाव्या बाजूचे दाही हात तोडून टाकले पण एखाद्या वारुळातून साप बाहेर यावेत त्याप्रमाणे रावणाच्या बेंबीतून परत दहा हात बाहेर येऊन  ते रावणाच्या खांद्याला चिकटले. अत्यंत क्रुद्ध झालेला रावण शेवटी सीतेला सोडून जटायूवर चालून गेला. तलवार उपसून रावणाने जटायूचे दोन्ही पंख, पाय आणि पार्श्वभाग कापून टाकला. जटायू जमिनीवर पडला सीता दुःखाने जटायूकडे पळत गेली. रावणही तिच्या मागे धावला. रावणाच्या तावडीतून सुटण्यासाठी हे रामा! हे रामा! धाव अशा हाका मारत सीता झाडांना घट्ट धरून ठेवायचा प्रयत्न करत होती. पण तिच्या केसांना धरून ओढत रावण तिला घेऊन आकाशमार्गाने लंकेला जायला निघाला. सीतेच्या अंगावरचे दागिने, फुलांचे हार खाली गळून पडत होते. आकाशमार्गाने जाताना एका पर्वतावरून जाताना पाच माकडांची टोळी बसलेली पाहून सीतेने आपले सर्व दागिने आपल्या सोनेरी उत्तरीयात बांधून त्यांच्यामधे पडतील असे खाली टाकले. रावण पम्पासरोवर पार करून लंकापुरीला गेल्याचा उल्लेख रामायणात आहे.

रावणाने सीतेचं अपहरण करून तिला लंकेत त्याच्या अन्तःपुरातल्या एका भवनात आणलं. तेथे भयंकर दिसणर्‍या पिशाचिणींना बोलावून सीतेवर पहारा बसवला. ‘सीतेला माझ्याशिवाय कोणीही स्त्री वा पुरुष भेटता कामा नये, तसेच सीता जे मागेल ते ते तिला त्याक्षणी देण्याची व तिला कोणताही अपशब्द न बोलण्याची सक्त ताकिद’ त्यांना दिली.

नंतर कच्च मांस खाणार्‍या महा पराक्रमी आठ राक्षसांना भेटून त्यांना ताडतोब खरदूषणाच्या जनपदात जाऊन तेथील ताबा घेण्यास सांगितलं. रामावर नजर ठेऊन त्याच्या संबंधी बातम्या रावणाला तात्काळ कळवण्यास व  संधी मिळताच रामाचा वध करण्याचीही आज्ञा दिली.

सीतेला भेटण्यासाठी अत्यंत कामातूर व उतावळा झालेला रावण जेव्हा सीतेला ठेवलेल्या भवनात पोचला तेव्हा खाली मान घालून बसलेल्या, दुःखी, अश्रु ढाळत, विलाप करणार्‍या सीतेला पाहून तो म्हणाला, मिथिलेशकुमारी, तुझं हास्य मोठं विलोभनीय आहे. पण तुझे अश्रू तुझ्या सौंदर्यात बाधा बनत आहेत.  सीतेला रावण हे काय महाप्रस्थ आहे हे कळण्यासाठी जबरदस्तीने तो तिला त्याचा भव्य राजमहाल पहायला घेऊन गेला. इंद्राच्या प्रासादासारख्या वा देवांच्या भव्य राजवाड्यांसारख्या वा त्याहून भव्य व सोन्या, रत्नांनी मढवलेल्या, हस्तिदंताने सुशोभित केलेल्या, फुलांनी गच्च बहरलेल्या बागा व उपवनांनी सजलेल्या त्याच्या अतःपुराला पाहूनही सीता जराही आनंदित झाली नाही. रावण म्हणाला, ‘‘माझ्याकडे  बाल आणि वृद्ध सोडून  32 कोटी राक्षस माझ्या दिमतीला आहेत.’’ त्याचा सीतेवर काडीइतका परिणाम झाला नाही. सीतेपुढे रावणाने केलेल्या ऐश्वर्य बळाचा वा ताकदीच्या महा प्रदर्शनाने भारावून न जाता सीतेला ह्या अधर्मी वागण्याची  घोर शिसारी आली. रावण लंकेचं सर्व राज्य सीतेला समर्पित करायलाही तयार झाला. तिच्या पायावर मस्तक ठेऊन तिचा दास होण्यास तयार असल्याचे सांगूनही सीता बधली नाही. उलट तिने श्रीरामाचे गुणवर्णन करून ती फक्त श्रीरामाची प्रिय पत्नी आहे असे सांगून रावणाची घोर निंदा केली. श्री राम तुला यमसदनाला पाठवतीलच पण, हे रावणा तू माझ्या ह्या जड शरीराला बांधून ठेव वा तुकडे तुकडे कर. आता मला स्वतःलाच जगण्याची इच्छा नाही. ह्या शरीराला संपवण्याची मलाच तीव्र इच्छा आहे. हे ऐकल्यावर मात्र रावण संतापला. आणि म्हणाला, ‘‘मिथिलेशकुमारी! मग माझंही ऐकून घे.  मी तुला एका वर्षाचा अवधी देतो तेवढ्यात तू जर माझ्या जवळ येण्यास सम्मती दिली नाहीस तर रोज नाश्ता बनवणारा माझा स्वयंपाकी माझा नाश्ता बनविण्यासाठी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करेल.’’

इतकेच सांगून तो थाबला नाही तर रक्त, मांस खाणार्‍या अक्राळविक्राळ पिशाचिणींना त्याने सांगितले, ``तुम्ही मिथिलेशकुमारीला अशोकवाटिकेत घेऊन जा. जंगली हत्तिणीला ज्याप्रमाणे वश करतात त्याप्रमाणे, तिला भयंकर गर्जना करून धमकावून, भीती दाखवून चारी बाजुंनी घेरून, तर कधी तिला गोड बोलून माझ्यासोबत रहायला तयार करा.''

सुहृत् हो वाल्मिकी रामायणाप्रमाणे सीता अशोकवाटिकेत अशा प्रकारे नजर कैदेत ठेवली गेली. 


---------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती