रामायण Express – भाग 26 भद्राचलम्

 

रामायण Express –

भाग 26

भद्राचलम्

रामेश्वरम् ह्या तामिळनाडू प्रांतातून  तेलंगाणातील भद्राचलम् च्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. सकाळी 11 वाजता अचानक तेनाली गाव दिसलं आणि तैलबुद्धीचा हजरजबाबी तेनालीराम भेटल्याचा आनंद झाला.  चिलुवुरूला असंख्य क्रॉस दसत होते. तर कोलुनकोडा ला एकमेव पर्वत जमिनीतून वर आलेला दिसत होता. ह्या भागामधे डोंगर रांगा नसून असे एकटे दुकटे पर्वत/ धराधर अधूनमधून दिसतात. अयोध्येला रामललाच्या प्राणप्रतिष्ठे निमित्ताने मोदीजींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देणारे  तुरळक भगवेध्वज दक्षिणेत प्रथमच दिसले. आत्ताच्या लोकसभेच्या निडणुकात दक्षिणेत मोदिजींना मिळालेला विजय जणु आम्हाला आधीच कानात गूज सांगून गेला होता. कृष्णेचं भव्य पात्र अनेक ठिकाणी नाममात्र दिसत होतं. पाण्याबरोबर वाहून आलेल्या वाळूने ते भरलं होतं. ठिकठिकाणी म्हशींचे तांडे त्यात निवांत रमतगमत चालले होते. कुठे भल्या मोठ्या पुलांच बांधकाम अर्धच राहिलेलं दिसत होतं. तेवढ्यात विजयवाडा जं. आलं. आणि निळी पांढरी चपल चुणचुणीत वंदेभारत ट्रेन आली. सामान घ्यायला इ-रिक्शा आली. आजादी का अमृत मोहोत्सव लिहिलेल्या मालगाड्याही सुंदर होत्या. मालगाड्यांमधून जाणारा माल आश्चर्यचकित करणारा होता. मालगाडीभरून किमान 500च्या वर तरी JCB ,लोखंडी गर्डर्स जणू गर्जून सांगत होते,--- ‘‘ भारत बदलत आहे , सुधारत आहे!’’ ----; हे वाटत असताना  सगळीकडे प्लॅस्टिकचा unlimited कचरा भय उत्पन्न करत होता. जमिनीतून डोक वर काढणारे एकटे दुकटे डोंगर ह्या भागाचे वैशिष्ट्य वाटले. तेवढ्यात दिसले बर का दोन डोंगर एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून उभे!

गावांची नावं वाचायला जरा तर लक्षात रहायला फारच अवघड होती. पंदिल्लपल्ली, डर्नकल, ---------! उजळणी करता करता  आम्ही भद्राचलम् रोड ला पोचलो.

पुढचा 35 कि.मि. प्रवास बसने करायचा होता. हा भाग कृष्णेमुळे फार सुपीक दिसत होताच बकूळ, रक्तचंदन, शिसम आणि न ओळखू येणार्‍या पण किमती अशा वेगळ्याच वनश्रीने नटला होता. ट्रक्स भरभरून ही वनसंपत्ती जात असताना अनेक ठिकाणी तिची योग्य रीतीने लागवड केल्याचेही दिसत होते.

तेलंगाणामधील खम्मम ह्या जिल्ह्यातील प्रसिद्ध श्रीसीतारामचंद्र मंदिर आम्ही पाहणार होतो. अनेक अनेक आख्यायिका ह्या मंदिरासोबत जोडल्या गेल्या आहेत. हजारो भक्त सतत त्या मंदिराला भेट देत असतात.

सतराव्या शतकात हे मंदिर संत गोपण्णा ने बांधलं असं म्हणतात. लिंगण्णा मूर्ती आणि काम्मम्बा ह्यांचा मुलगा गोपण्णा हा गोवळकोंड्याच्या सुलतानाकडे तलाठी होता. सतत रामनाम घेत अत्यंत सचोटीने करत तो त्याचं काम असताना पालवोंचा परगण्यातील लोक जत्रेला भद्राचलम् ला जाणार होते. त्यांनी जत्रा पहायला गोपण्णाला बोलावलं. त्यांच्या बोलावण्यावरून कुतुहलाने तो तेथे गेला. तेथील लोकांनी त्याला त्याच्याकडील सरकारी पैसे खर्च करून राममंदिर उभारण्यास मदत मागितली. शेतात पीक आलं आणि ते विकलं गेलं की आम्ही तुझे पैसे परत करू अ‍से सांगितले

 त्या काळी म्हणजे  सतराव्या शतकात  तब्बल सहा लाख मोहरा इतके सरकारी पैसे खर्च करून त्याने हे मंदिर उभारलं. हे मंदिर बांधतानाची अशी आख्यायिका आहे की हे मंदिर बांधून झालं पण कळसाच्या जागी जे सुदर्शन चक्र स्थापित करायच असत ते काम काही पूर्ण होत नव्हतं. तेव्हा एका रात्री गोपण्णाला स्वप्नात श्रीरामाने सकाळीच गोदावरीत स्नान करून हे काम करायचा आदेश दिला. गोपण्णा सकाळी गोदावीत स्नान करत असताना त्याला गोदावरीच्या पात्रात दगडात कोरलेले सुंदर सुदर्शन चक्र  दिसले. तेच ह्या मंदिराच्या कळसावर बसवले आहे.

सुलतानाला सरकारी पैशांचा अपव्यय झाल्याचे लक्षात येताच त्याने गोपण्णाला 12 वर्ष  गोवळकोंड्याच्या तुरुंगात खडतर परिश्रमाची शिक्षा दिली. ह्या काळात अत्यंत हालाखीच्या अवस्थेत तेथील छळ सहन न होऊन तो श्रीरामाला त्या छळातून सोडविण्याची विनवणी करणारी अत्यंत भावविभोर गाणी म्हणू लागला. लिहू लागला. गोपण्णा त्याच्या निःस्सीम राम भक्तीमुळे रामदास ह्या नावाने तेलगूत प्रसिद्ध आहे.  त्याने रामाच्या भक्तीत निथळणारी अनेक भजनं लिहीली. ती पुढे ‘‘दाशरथीराम शतकम्’’ आणि ‘‘भक्त रामदास कीर्तन’’ हया काव्यसंग्रहाच्या रूपाने तेलगूमधे आजही प्रसिद्ध आहेत. आजही तेलगू लोकांच्या घरोघरी ती म्हटली जातात.

 असं म्हणतात की स्वतः राम-लक्ष्मण सुलतानाच्या घरी रामोजी आणि लक्ष्मोजी ह्या रामदासाच्या सेवकांच्या रूपात येऊन हे पैसे फेडून गेले. त्यांनी सुलतानाकडे रामदासला सोडण्याची विनंती केली. सुलतानाकडून सहा लाख मोहरा मिळाल्याची घेतलेली परतफेडीची पोचपावती त्यांनी रात्री कारावासतील गोपण्णाच्या उशापाशी ठेवली. हे सर्व जेव्हा सुलतानाच्या लक्षात आलं की, प्रत्यक्ष रामलक्ष्मणच आपल्याला भेटून गेले; तेव्हा तोही काल भेटलेल्या त्या अत्यंत आकर्षक मनोवेधी रामलक्ष्मणाच्या भेटीने अचंबित झाला. त्याने गोपण्णाला तुरुंगातून मुक्त करून ते सहा लाख रुपये गोपण्णाच्या पायापाशी ठेवले. गोपण्णाने ते घ्यायला नकार दिला. पण राम-लक्ष्मणाच्या स्पर्शाने पावन झालेल्या त्या मोहरांमधील दोन मोहरा त्याने आठवण म्हणून आपल्याकडे ठेऊन घेतल्या. त्या आजही भद्राचलम् च्या मंदिरात पहायला मिळतात.

अशीही आख्यायिका आहे की येथे असलेल्या भद्रगिरी ह्या पर्वतावरून ह्या मंदिराला भद्राचलम् हे नाव पडलं. भद्र हा मेरू आणि मेनकेचा मुलगा. तो अत्यंत रामभक्त होता. सीताहरणानंतर रामप्रभू आणि लक्ष्मण जेव्हा तेथे आले तेव्हा ह्या भक्तानी रामाने तेथे काही काळ रहावे अशी इच्छा व्यक्त केली  पण श्रीराम सीतेच्या विरहाने वयाकूळ असल्याने, रावणाला मारून सीतेला घेऊन येताना आम्ही थांबू असे वचन रामाने दिले. पण ते रामावतारात त्याला पूर्ण करता आले नाही.   भद्र रामनाम घेत तपश्चर्या करत बसला. त्यामुळे स्वतः विष्णु वैकुंठरामाचे रूप घेऊन रामावतारातील लक्ष्मण आणि सीतेला घेऊन तेथे गेले. आपल्या हातातील शंख वाजवून त्याने भद्राला आपण आल्याचे सांगितले. पर्वतरूप झालेल्या भद्राचलाच्या मस्तकावर म्हणजे शिखरावर बसले. भद्राचलम् ची एकमेव राम मूर्ती बसलेल्या स्थितीत आहे. सीता रामाच्या डाव्या अंकावर स्थित आहे. राम आपला 14 वर्षांचा वनवास संपवून, सर्व राक्षसांचा संहार करून लंकेहून सीतेला घेऊन आल्यामुळेच कदाचित सीतामाईसहित पहिल्यांदाच असा स्वस्थ बसला असावा असा आपला माझ्या मनातील विचार!

17 व्या शतकात पोकाला दाम्माका नावाची एक रामभक्त स्त्री हया स्थानापासून मैलभर लांब रहात होती. तिच्या स्वप्नात येऊन रामाने दृष्टांत दिला. तिला सागितले की भद्रगिरीवर काही साधूसंत माझ्या सगुण साकार रूपातील मूर्तीची पूजा करत आहेत. दामाक्का दुसर्‍या दिवशी सकाळीच भद्रगिरीवर गेली. सगळीकडे शोधताना तिला एक वारूळ दिसलं. त्यात डोकावून बघताना तिला रामाची मूर्ती दिसली. गोदावरीचं पाणी आणून तिने ते वारूळात ओतून स्वच्छ करून त्या मूर्ती बाहेर काढल्या त्याच आज भद्राचलम् च्या श्रीसीतारामस्वामी मंदिरात आहेत.

भद्राचलम् मंदिर येईपर्यंत सांज झालीच होती. मंदिराशिवाय बाकी कुठे जाणे शक्य नव्हते. मंदिर सुंदर आहे. फोटो काढायला मनाई आहे.  मंदिर आणि मूर्ती मनाला प्रसन्न करणार्‍या आहेत. प्रथमच कोदंडधारी रामाला असं छान बसलेलं पाहून मनालाही प्रसन्न वाटलं. 14 वर्षांचा, नुकता तारुण्याचा उमलता काळ अनेक दुःखाना संकटांना यशस्वी रीत्या तोंड देत, राक्षसांचं पारिपत्य करण्यात खर्ची घालून, ऋषी मुनी आणि सज्जनांसाठी चंदनाप्रमाणे जीवन झिजवणार्‍या शांत, संयमी, प्रेमळ रामाचे हे दोनच क्षण सुखाचे असावेत. भद्राचलम् चे! मन भरून आलं. हात जोडले गेले. रामायण express ला  शेवटच्या गंतव्यापर्यंत जायची आता घाई झाली होती तर आमची पावलं रामाच्या भारत यात्रेच्या पाऊल खूणांवर मागेच रेंगाळत होती.

अजून अमुक दाखवायला पाहिजे होतं. तमूक राहून गेलं. फार घाई केली. दर वेळेस भर दुपारी सर्व पहायला नेतात. -----------अशा अनेक उद्गारांसोबत हेही खरं होतं की 18 दिवसात आपण एकट्याने जायचं ठरवूनही हे सर्व नियोजन जमलं नसत. डोक्याला पुढे काय? आता काय करायच? असा जरा ही ताप न होता झालेला आरामशीर, सुखद प्रवास मोदीजींच्या कल्पकतेला आणि IRCTC ला धन्यवाद देत शेवटच्या पडावाजवळ येऊन पोचला होता. ह्या रामायण यात्रेची मोदीजींची कल्पना IRCTC प्रत्यक्षात आणली. एकूण खर्चाच्या मागे 33%  खर्च भारत सरकार उचलतं.

ओह! रेल्वे फलाट  मशिननी स्वच्छ पुसून घेतले जात आहेत. दिमाखदार रामायण express उभी आहे. त्याच्या समोर रेड कार्पेट पसरलं जात आहे. ही तर सर्व आपल्याला सुस्वागतम् करणारी प्रत्येक फलाटावरची सुखद अनुभूती आहे. काही तांत्रिक बाबींमुळे कधी ट्रेन आणि तीर्थस्थळे दाखवून आणणार्‍या बसेसमधे थोडा वेळेचा फरक पडत असला तरी नंतर होणारं सुखद स्वागत सुखावणारं!

नागपूर उद्या शेवटचं गंतव्य!

---------------------------------------

लेखणीअरुंधतीची-

 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)