भाषेचे अलंकार -

 

भाषेचे अलंकार -

प्रत्येक भाषेत म्हणी आणि वाक्प्रचार असतात. कधी ते मनुष्याच्या स्वभावाचं बारकाईने वर्णन करणारे असतात. कधी तिथल्या निसर्गाशी निगडीत असतात. तिथल्या प्राण्यापक्ष्यांच्या स्वभाव मनुष्यप्राण्याला जोडणारे असतात. शेतात जन्मलेल्या म्हणी पिकपाण्याचं नातं माणसाच्याा रोजच्या व्यवहाराशी जोडतात तर, घरात जन्मलेल्या म्हणी स्त्री-पुरुषांच्या कर्मकहाणीशी जोडलेल्या असतात. म्हणी धान्याप्रमाणे दळदार टपोर्‍या असतात तर कधी मोत्याप्रमाणे चमकदार असतात. प्रसंगाला मोजक्या शब्दात नेमकेपणाने सांगणार्‍या असतात. एकमात्र खरं की, त्या बंदुकीच्या गोळीप्रमाणे लक्ष्याचा अचूक वेध घेणार्‍या असतात.  

म्हणी आणि वाक्प्रचार हे भाषेचे अलंकार यमक, अनुप्रास, अमुक वृत्त, तमुक छंद --- इ. इ. बारीक कलाकुसरीच्या अलंकारांसारखे नाहीत तर, पाटलाच्या बायकोच्या गळ्यातील वा शेतात काम करणार्‍या म्हातारीच्या गळ्यातील; ठसठशीत बोरमाळ वा एकदाणीसारखे डोळ्यात भरणारे, मनाचा वेध घेणारे असतात. ‘‘पटलं तर व्हय म्हना सारखे’’ निर्णायक मत मागणारे किंवा देणारे; बंद्या रुपयासारखे असतात. आता बंदा रुपया नाही. पण पेटिएम् सारखे बटण दाबताच क्षणात ह्याच्या अकाऊंट मधून त्याच्या अकाऊंटमधे पोचणारे असतात. तळ्यात का मळ्यात असं कुंपणावर बसलेले गुळमुळीत नसतात.

कधी कधी लोकं भेटीदाखल काही द्यायला लागले की त्यांना मी म्हणते ह्याच्यापेक्षा तुमच्या गावच्या दोन सुंदर म्हणी मला भेट द्या! त्या घरात जागा व्यापणार नाहीत, फुलांसारख्या उद्या सुकून जाणार नाहीत. मला जीवनभर आनंद देत राहतील. पण अचानक द्या म्हटलं तर कोणाला त्या देता येत नाहीत. पण सहज बोलताना दुकानातला मारवाडी म्हणतो, ‘‘बाई तुमच्याकडे मीठ आणि पीठ असलं की बास! घर चालू राहतं.’’ मी बराच वेळ विचार करत होते. मग लक्षात आलं खरच की! मीठ आणि पीठाचे पर्याय/ substitutes फळं होऊ शकत नाहीत. दूध होऊ शकत नाही. पिझ्झा मागवला तरी परत  मीठ आणि पीठ आलच! अमेरिकेतल्या सांताक्रूज मध्ये मी पाहिलं, एक भिकारी बॅनर लावून भीक मागत होता, -- ‘‘ for bread and wine’’ ते आठवलं. कणीक असो, डोशाचं पीठ असो वा bread dough असो! पीठ आलच! फार मागे गेलं तरी संस्कृत आणि संस्कृतीत  ‘‘सर्वकार्येषु तण्डुलाः प्रस्थमूलाः’’ (कुठल्याही कार्याला सुरवात करताना तांदूळ म्हणजे सम्पत्ति हे मूळ आवश्यक असते.) तांदूळ ही पीठाची मायच की. त्यामुळे मीठ आणि पीठाचं महत्त्व सांगणारी वाणी अद्भुत वाटली. ‘पापी पेट का सवाल’ येतो तेव्हा ‘रोटी’ कपडा मकान किंवा  ‘Bread’ for all, and Roses, too' मधूनही  मीठ आणि पीठ हे जागतिक सत्य उद्धृत होतं.

पीठाची तजवीज झाली. पण त्या सोबत भाजीपाला, फळं मिळवण्यासाठी कष्ट करायलाच लागतात. ‘‘आखातीला आळं आणि बेंदराला फळं’’ हया म्हणीनुसार अक्षय्य तृतीयाला म्हणजे आखातीला भाज्या लावाव्या लागतात. फळझाडांना आळी करायला लागतात तेव्हा कुठे श्रावणी आमावास्येला/ पिठोरी आमावास्येला फळं खाण्यासारखी होतात. ह्या श्रावणी आमावास्येला बेंदूर किंवा बैलपोळा म्हणतात.

मारवाड्यांना लोकांच्या गरजांची जितकी जाणीव आहे तेवढी क्वचितच कोणाला असेल आणि म्हणूनच 40 वर्षांपूर्वी ले सारख्या ठिकाणी मारवाड्याचं दुकान पाहिल्यावर ‘‘जिधर न जाए बैलगाडी उधर जाए मारवाडी’’ ही म्हण मला मारवाडी समुदायासमोर नतमस्तक करून गेली.

घरी आलेल्या अभ्यागतांसाठी चहा करत असताना अचानक अजून काही जण हजर झाले. चहा कमी तर पडणार नाही असं म्हणताच सीमाप्रांतालगत राहणार्‍या हरियाणातील मुलाने मला ‘‘लडाई और लस्सी कितनी भी बढाओ बढ जाती हैं।’’ अर्धा कप पाणी घालायला हरकत नाही असं सुचवून मला अवाक केलं. आज रशिया-युक्रेन असो वा इस्रायल-पॅलेस्टाईन असो लढाई थांबण्याचं नाव घेत नाही. दोघांचं भांडण आणि तिसर्‍याचा लाभ होतो आहे हे पाहूनही!

सगळ्यांना असा लाभ साधता येतो असं नाही. काहींना हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची हौसच असते. तेलगूतही अशी म्हण आहे. सुई हरवली म्हणून जोशीला विचारायला गेली तर त्याने कुंडलीच मांडली. (तेलगू) एखादी वस्तू हरवली की पोपटवाले कुडमुडे जोशी ती कुठे सापडेल ते सांगतात. बाईची सुई हरवली. आता सुई ती काय! ती सापडत नाही म्हणून ज्योतिषाकडे जायचं काही कारण नाही. पण बाई  जोश्याकडे गेली तर त्याने तिचा सारा भूतकाळ उकरून तिला सांगायला सुरवात केली.) भीक नको पण कुत्र आवार अशी वेळ तिच्यावर आली असेल.

तिला इरसाल जोशी भेटला. कोणाला वाटेल तेलगू बाईला पुण्याचा जोशी भेटला असेल पण तसं नाही. मथुरेचे लोकही सवाई पुणेरी असतात. मथुरेचे लोकं काही सरळ नाहीत. त्यांच्या वागण्यात यमुनेत असतात तसे दुसर्‍याला गोलगोल घुमवणारे भोवरे (हेरा) असतात आणि बोलण्यात गारी (गाली, अपशब्द) असतो. बचनन में हेरा बोलनमें गारी , ब्रज के सब नल कूप खारी ।। -----( मथुरा) आणि यमुना नदी जवळ असूनही व्रजात पाणी  विहरी, कूपनलिकांचं वापरलं जातं. त्यामुळे नळांना खारं पाणी येतं.

रात्री सगळे झोपले असले आणि बाहेरून कोणी कडी वाजवली तर दार उघडायला लागेल म्हणून बहुतक सारे झोपल्याचं नाटक करून झोपून राहतात. पण ‘‘कोण आहे रे?’’ म्हणून आवाज देणार्‍यालाच उठून कोण आलं आहे त्याच्यासाठी कडी उघडायला लागते. जो बोलै वो कुंडी खोलै । बघा व्रजाचे लोकही आपल्यासारखेच आहेत नं !

बोलून चालून जो ज्याचा स्वभाव तसा तो वागणारच! स्वभावाला औषध नाही. थिरिगे कालू थिटे नोरू उरीके उंडधु (तेलगू) थिरकणारे डोळे आणि वटवट करणारं तोंड (सतत चुरुचुरू बोलणारी जीभ) कधीही/ कशानेही थांबत नाहीत/ थांबवता येत नाहीत.

तसंही कोणी थांबू शकत नाही म्हणा. हातावर पोट असलेले तर नाहीच नाही. एखादं धुण्याभांड्याचं काम हातचे गेलं तरी बाकी असलेल्या कामांवर त्यांचं चालून जातं. गोम एका पायानी लंगडी झाली म्हणून काही चालायची थांबत नाही.

सुहृत् हो! संस्कृतमधल्या म्हणींना लौकिक न्याय म्हणतात. त्यातील एक दोन न्याय सांगते. तटाकपरीवाहन्याय - परीवाह म्हणजे उचंबळून येणे, वाहून जाणे. तळं  तुडुंब भरलं  तर संरक्षक भिंती वा बांध तुटू नये म्हणून त्याला थोडासा छेद ठेऊन अधिक पाणी वाहवून लावणे आवश्यक असते. दुःखाने ऊर भरूर येतो त्यावेळी रडू येईल असे उपाय करणे आवश्यक असते. त्याने दुःखाचा जोर कमी होतो.

तन्तु न्याय – अनेक धागे एकत्र येतात तेव्हा पट तयार होतो. हया आडव्या आणि उभ्या धाग्यांना ओत आणि प्रोत म्हणतात. त्याप्रमाणे अनेक लोक एकत्र येऊन एक सुंदर कार्य तडीस जातं. मग तुम्हाला माहित असलेल्या जगभराल्या सुंदर सुंदर म्हणी गोळा करायला लागा आणि मला कळवा. सुंदर म्हणींनी ओतप्रोत असा एक कोश तयार करुया.

------------------

@अरुंधतीप्रवीणदीक्षित-

 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)