ज्ञानदेवांचा समाधिसोहळा
ज्ञानदेवांचा समाधिसोहळा एकदा का दाही दिशांशी मैत्री केली की त्या तुम्हाला कुठच्या अजबघरात फिरवून आणतील सांगता येत नाही. खरतर आज मी एकटीच आळंदीला ज्ञानदेवांचा समाधिसोहळा पहायला गेले होते. पण तेथील गर्दी पाहता तशीच खालीहात उदासवाणी परत फिरले. विमनस्कपणे इकडे तिकडे काही पुस्तकांची दुकान हिंडून रस्त्यावरच बसलेल्या पुस्तकविक्रेत्याकडून दोन तीन किरकोळ पुस्तकं घेऊन आळंदीहून सुटलेल्या एस . टीत चढले . `` वेळ निघून जाईल चल लवकर '' म्हणत एवढ्या गर्दीतून पश्चिमेनी माझा हात धरून मला खिडकीशेजारी बसवलं . त्याक्षणीच माझा गर्दिचा , बसचा , शेजारी बसलेल्यांचा सबंध संपून गेला . `` अपूर्वा !, आज ज्ञानदेवांचा समाधि सोहळा पहायला एकटीच गेले होते आळंदीला ''. `` मग भेटलीस का ज्ञानराजाला ?'' पश्चिमेनी आपलेपणानी विचारलं आणि लहान मुलासारखा हुंदका आला . `` नाही भेटले गं ज्ञानराज ! किती गर्दी होती . मला कोण आत सोडणार ? '' हंऽऽ ! म्हणत पश्चिमा स्तब्ध झाली . अजून आमचे दोघींचे गुंफलेले हात तसेच होते . बस धावत होती. ‘‘भेटशील थोड्यावेळात!’’ अस्पष...