ज्ञानदेवांचा समाधिसोहळा

 

 ज्ञानदेवांचा समाधिसोहळा

एकदा का दाही दिशांशी मैत्री केली की त्या तुम्हाला कुठच्या अजबघरात फिरवून आणतील सांगता येत नाही. खरतर आज मी एकटीच आळंदीला ज्ञानदेवांचा समाधिसोहळा पहायला गेले होते. पण तेथील गर्दी पाहता तशीच खालीहात उदासवाणी परत फिरले. विमनस्कपणे इकडे तिकडे काही पुस्तकांची दुकान हिंडून रस्त्यावरच बसलेल्या पुस्तकविक्रेत्याकडून दोन तीन किरकोळ पुस्तकं घेऊन आळंदीहून सुटलेल्या एस.टीत चढले.  ``वेळ निघून जाईल चल लवकर'' म्हणत एवढ्या गर्दीतून पश्चिमेनी माझा हात धरून मला खिडकीशेजारी बसवलं. त्याक्षणीच माझा गर्दिचा, बसचा, शेजारी बसलेल्यांचा सबंध संपून गेला.         

``अपूर्वा!, आज ज्ञानदेवांचा समाधि सोहळा पहायला एकटीच गेले होते आळंदीला''. ``मग भेटलीस का ज्ञानराजाला?'' पश्चिमेनी आपलेपणानी विचारलं आणि लहान मुलासारखा हुंदका आला. ``नाही भेटले गं ज्ञानराज! किती गर्दी होती. मला कोण आत सोडणार? '' हंऽऽ! म्हणत पश्चिमा स्तब्ध झाली. अजून आमचे दोघींचे गुंफलेले हात तसेच होते. बस धावत होती. ‘‘भेटशील थोड्यावेळात!’’ अस्पष्ट शब्द पश्चिमेच्या  ओठातून आल्यासारखे वाटले.

कासराभर वर असलेला सूर्य खाली उतरण्याच्या तयारीला लागला होता. दिवसभर आपल्या दिव्य प्रकाशानी तळपणारा सविता गुलाबाच्या पाकळ्यांसारखा शांत सौम्य तरी धीर गंभीर दिसत होता. तेजाचं वलय त्याच्या लाल बुंद मुद्रेभोवती दिसत होतं. ढगांच्या पायर्‍यांवरून हळुवार पावलं टाकत एक एक पायरी खाली उतरत होता नीळ्याशार आकाशाचा हात धरून! ह्या सौम्य शांत फिकट निळ्याच्या खाली आकाशात उभा होता अजून एक रंग—दाट गडद नीळा! - - - - सावळा निवृत्ती आणि घननीळ पांडुरंग स्वतः हात धरून त्या स्वयंप्रकाशाला ढगांच्या पायर्‍यांवरून घेऊन सावकाश खाली उतरत होते. पोपटांचे आणि इतर पक्ष्यांचे थवे आकाशात परतीच्या वाटेवर जाण्याच्या घाईत  किलबिलाट करत होते.

सहज हातातलं पुस्तक उघडलं वाटलं, आळंदीला जाऊनही आलंदिवल्लभाचा न पाहिलेला समाधिसोहळा मी पश्चिम क्षितिजावर अनुभवत आहे. हृदयानेही तशी ग्वाही दिली.

देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर बैसावया ॥१॥

नदिचिया माशा घातले माजवण । तैसे जनमन कालवले ॥२॥

दाही दिशा धुंद उदयास्तावीण । तैसेचि गगन कालवले ॥३॥

जाउन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी  । पुढे ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४॥

ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा । पादपद्मी ठेवा निरंतर ॥५॥

तीनवेळ तेव्हा जेव्हा जोडिले करकमळ । झाकियले डोळे ज्ञानदेवे ॥६॥

भीममुद्रा डोळा निरंजन मैदान । झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव ॥७॥

नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्त ॥८॥

 

एका क्षणी पश्चिम क्षितिजावर तो तेजस्वी गोल पश्चिमक्षितिजाच्या पायर्‍या उतरून कुठल्याशा विवरात अदृश्य झाला.  ज्ञानाचा प्रकाश लोपला. त्याचा हात धरून आकाशात गंभीरपणे उभे असलेले नील आणि घननील रंग थोडाकाळ तिथेच थबकले. जराशानं त्या स्वयंप्रकाशाबरोबर हळु हळु तेही लुप्त झाले. ---  सर्व जग अंधारात बुडालं. क्षितीज रेखा गडद झाली.

निवृत्तिने बाहेर आणिले गोपाळा । घातियेली शिळा समाधीसी

         इतकावेळ सूर्यप्रकाशात झळाळणारी निसर्गाची रंगांची दुनिया लोप पावली. झाडं हिरवी कधी होती? आकाश कुठे निळं होतं? हरणाच्या रंगाची चित्रल जमीन? - - -ज्ञानदेव बघता बघता समाधिस्त झाले. लोपलेल्या ज्ञानासवे अज्ञानाची तीव्र जाणीव झाली. विश्वाची जाणीव क्षीण झाल्याचं जाणवलं. सारे रंग लोपले. डोकं सुन्न झालं.

 

निवृत्तिदेव म्हणे करिता समाधान । काही केल्या मन राहात नाही ॥१॥

बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट । ओघ बारा वाटा मुरडताती ॥२॥

बांधल्या पेंडीचा सुटलसे आळा । तृण रानोमाळा पांगलेसे ॥३॥

हरिणीविण खोपी पडियेली वोस । दशदिशा पाडस भ्रमताती ॥४॥

मायबापे आम्हा त्यागियेले जेव्हां । ऐसे संकट तेव्हां झाले नाही ॥५॥

नामा म्हणे देवा पेटला हुताशन । करा समाधान निवृत्तिचे ॥६॥

पश्चिमेने माझ्या डोळ्यासमोर साकारलेला ज्ञानदेव-समाधी सोहळा नामदेवाच्या अभंगांनी हृदयावर खोल खोल रेखाटला जात होता.  ``नीर वाहे डोळा वैष्णव नाचतो वैष्णव नाचतो'' म्हणत वैष्णव झालेलं मन नाचत होतं.

                 डोळे मिटून किती काळ गेला न कळे. डोळे उघडले आणि मघाशी तेजोहीन वाटणारं आकाश लक्ष लक्ष चांदण्यांच्या ज्योतींनी उजळून गेलं होतं. जणु निवृत्ती ज्ञानदेव हे चंद्रसूर्य लोपले तरी नामदेव अजून लडिवाळ झाला होता. सार्‍या जगाला पुन्हा एकदा वेगळ्याच तेजात न्हाऊ घालत होता. एका वेगळ्याच दुनियेत ज्ञानदेव-समाधि सोहळा अनुभवत होते.

            ‌``ए मावशे उतरते ना! '' कंडक्टरच्या जोरदार हाळीनी दचकले. ``काय बाई आहे! सगळे उतरले ही बाहेरच बघत बसलीए!'' भारल्यासारखी खाली उतरले. पश्चिमेला शोधत भिरीभिरी इकडे तिकडे पहायला लागले. ``मावशे आलं नाही का तुला कोणी न्यायला'' ``नाही रे बाबा आत्तापर्यंत ती हात धरून बरोबर होती ती कुठे गेली शोधत आहे.'' ``काय येडी बाई हाय. आत्ता पत्तुर एकटीच होती. एकटीच चढली गाडीत. आत्ता म्हणत्ये आत्ता पर्यंत तिचा हात कुणीतरी धरला व्हता ती कुठे गेली. जा बाई जा घरला जा ''. म्हणत जोडलेले हात कपाळाला लावत त्यानं बाहेरचा रस्ता दाखवला. पश्चिमा हलकेच कानात कुजबुजली, `` भानावर आलीस का? आपल्या दोघींच्या जगातून माणसांच्या जगात आलीएस.''

लेखणीअरुंधतीची-

 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती