इस्त्री
इस्त्री - इस्त्री हा माझा जिव्हाळ्याचा विषय. झाडांना पाणी घातलं की, डगळे टाकलेली, माना टाकलेली, मलूल झालेली झाडं हळु हळु ताठ होताना पहायला जे आंतरिक सुख मिळतं तेच सुख सुरकुत्या पडलेल्या दमटसर जुन्या वा नवीन कपड्यांना इस्त्री करून त्यंच्यावर पसरलेल्या वृद्धत्वाच्या सुरकुत्या घालवून परत एकदा कडक, ताठ बनवून त्यांना तारुण्यावस्था प्राप्त करून देण्याने लाभते. एकाचा ओलावा राखून तर दुसर्याचा घालवून त्यांना नवसंजीवनी देण्याच्या क्रिया विरुद्ध वाटल्या तरी सारख्याच चैतन्यदायी व कृपाळू असतात. माझ्या लहानपणी आत्तासारख्या smart इस्त्र्या नसत. आज्जी जशी चूलीतल्या लाकडावर वा कोळशांवर तिचं काम चालवत असे त्याप्रमाणे अवजड लोखंडी इस्त्र्या कोळशावरच काम करत. हे अग्नीतत्त्व जागृत करण्याचं काम कोणा वडील नात्याकडे असे. इस्त्रीत कोळसे घालून त्यावर किंचित रॉकेल घालून वा शेगडीतला निखारा इतर कोळशांवर ठेऊन कोळसे रसरशीत पेटले की तिचं वरचं झाकण लावून ते लॉक केलं जाई. ह्या झाकणाच्या वरच्या बाजूस इस्त्री धरायचं लाकडी हँडल असे. काही काळाने तेही तापून गरम होई. मग त्याला एखादं फडकं गुंडाळून इस्त्री केली जाई. ...