कमितकमी-

 

कमितकमी-


‘‘मैं ने कौनसा ड्रेस या साडी कब पहनी थी, ये तो मैं डायरी में लिखकर रखती हूँ। जिससे वो कभी रिपीट नहीं होती हैं...’’

...

‘‘मुझे हर एक साडी के लिये मॅचिंग ज्वुलरी, जुते और पर्स चाहिए ही! उसके बिना मैं वो कभी पहनती नहीं हूँ..!’’

वेगवेगळ्या पार्ट्यांमधून ऐकू येणारे हे संवाद अवाक् करणारे असतात.

 

हे सगळे ऐकल्यावर अमेरिकन राजकारणी आणि वकील फ्रँक क्लार्क यांचे म्हणणे आठवल्याशिवाय राहत नाही. क्लार्क म्हणतात, ज्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठीही वेळ नाही, अशा गोष्टी विकत घेण्यासाठी कमाई करण्याचा उन्मत्त प्रयत्न आजचा आधुनिक माणूस करताना दिसतो. आपल्या आजूबाजूला एक नजर टाकल्यावर क्लार्क यांचे म्हणणे पटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक गोष्टीचा हव्यास आजच्या माणसाला असलेला पाहायला मिळतो. वास्तवात, हव्यास आणि आता बास हे एका रेषेचे दोन टोकांचे बिंदू आहेत. आपल्या रोजच्या गरजेनुसार या दोन बिंदूंदरम्यान आपण कमितकमी हा सुवर्णबिंदू किती अंतरावर स्थिर ठेवायचा, तो प्रत्येकाच्या आवड, निवड आणि निकड ह्याचा प्रश्न आहे.

...

‘‘अरे ये तो बता दो की, अगली पार्टीकी थीम क्या हैं?  बेंगॉली या राजस्थानी? पहलेही बता दो, वैसे मुझे साडी-ज्वुलरी खरीदनें मे वक्त लगता हैं।’’ 

 

हे थीम प्रकरण लग्न, मुंजीपासून सहस्र चंद्रदर्शनापर्यंत सिंदबादच्या खांद्यावर बसून छळणार्‍या आणि त्याला झोपेतही न सोडणार्‍या म्हतार्‍याप्रमाणे सर्वांच्याच बोकांडी बसून जेवढी जमेल तेवढी जास्तीतजास्त वसुली केल्याशिवाय कोणालाही सोडत नाही.

कोणाच्या घरी गेल्यावर त्याच्या प्रतिष्ठेची कल्पना घर पाहून यायला लागते. ‘‘हा शो पीस लंडनचा, हा न्यूयॉर्कचा, हा जपानचा... मी इथे गेलो होतो/गेले होते...’’  संपूर्ण घर हे, घर कमी आणि वस्तुसंग्रहालय जास्त झालेले दिसते. कुठे बसावे तर आपला धक्का लागून कुठली महागाची गोष्ट फुटणार तर नाही ना, ह्याची काळजी वाटत राहते. घराच्या भिंतीवर ओरिजनल पेंटिग्ज असतात. ती खूप भारी आहेत हे सूचकपणे सांगितले जाते; ती भले शोभिवंत असोत वा नसोत. जागोजागी आकर्षक काचपात्रात बोनसाय, वेडेवाकडे चिनी बांबू, पुरुषभर उंचीचे व्हास, म्यूरल्स, आडव्यातिडव्या झोपलेल्या, बसलेल्या लचकलेल्या निरनिराळ्या धातूंच्या मूर्ती..! इंचभर जागा आपल्याला हात हलवायला शिल्लक नसते. हे ओरिजिनल क्रिस्टलचे ग्लास बरं का! म्हणत आपल्या हातात आलेल्या ग्लासमधून पाणीच प्यायचे ना, हा प्रश्न पडत असताना शेजारी दोन-दोन भले दांडगे अत्यंत कुरूप श्वानोबा फतकल मारून तुमच्याकडे एक भुवई उंचावून बघत असतात. त्याच वेळेला ‘‘ये हमारी लाडली गोल्डी बॉक्सर हैं और ये सुल्तान- इंग्लिश शेफर्ड,’’ असा दिमाखदार कौतुकमिश्रित सूर ऐकून मी गरीब चरावू शेळीप्रमाणे वागू लागते. असंख्य भारी सामानासोबत कुठलीशी अब्दुल गब्दुल costly  श्वानावली आणि तिच्या सोबत येणारी तिची कौतुक-केकावली ऐकणे भागच असते. शी..! म्हटले तर त्याचे श्वानदंत, लळलळती जिह्वा, त्याची उचललेली भुवई तुमची चटणी करण्याच्या तयारीत असतात. मालक आणि कुत्र्यांच्या कामाची अदलाबदल झालेली असते. घरात जागा नसली, तरी भारीची श्वानावली प्रेस्टिजचा भाग म्हणून घरात आलेली असते.

तेवढ्यात कोणीतरी अत्यंत शेखी मिरवित म्हणते, ‘‘Oh! No! I can’t eat these fried समोसाज! मी फक्त air fry food  खाते.’’ असे सांगताना आत्ताच घेतलेल्या air fryer मशीनचे कौतुक सगळ्यांकडून अपेक्षित असते. पण समोरची तेवढीच चंट असते. कुठल्या कंपनीचे air fryer आहे हे विचारून, ‘‘तुझ्याकडे Grill, roast, bake ची सोय नाही का?’’ म्हणत समोरचीला सरळ सरळ जमिनीवर आणते. हे मशिन जेवढे परदेशी तेवढे त्याचे रिझल्ट्स ``एक्सलंट’’च असणार! असे एकदा-दोनदा वापरलेले मायक्रोवेव्ह, कुकर, कॉफी ग्राइंडर, कॉफी मेकर, डिकँटर, आइस ब्रेकर, तंदूर, राइस कुकर, मिक्सर-ग्राइंडर सोबत हौसेने घेलेल्या एक्स्ट्रा अ‍ॅटॅचमेंट्स, ज्यूसर, आटा निडर, टाळ्या ऐकताच कामाला लागणारा पंखादी उपकरणे, १८ प्रकारच्या शिवणी घालणारे भारीचे सुइंग मशिनपासून स्टेपलरप्रमाणे टिपा घालणारे इलुसे मशीन... असे असंख्य अप्लायन्सेस; शंभर रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत पैसे खर्चून, अमक्या ढमक्याने घेतली मग माझ्याकडे का नको म्हणत घरात सतत येत राहतात. घरबसल्या ऑनलाइन खरेदी, २४ तास ते सात दिवस किंवा महिन्याभरात परत केल्यास ५० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत मिळणारा रिफंड, ह्या सारखी खरेदीसाठी मिळालेली लालूच ह्यामुळे खरेदीची ही यादी लांबत जाते. यथावकाश ह्या वस्तू मग अडगळीच्या सामानात सरकवल्या जातात. काही दिवसांतच उंटाला दिला तंबू म्हणत संपूर्ण घर व्यापून घरच्या लोकांनाच हलायला जागा उरत नाही.

अमक्या मालिकेतील जान्हवीचे मंगळसूत्र पाहून ‘‘आहाहा!’’ म्हणत सोनाराकडून घडवून घेतलेले तेच मंगळसूत्र वर्षभरात ‘‘शी बाई!’’ होते. मालिका आणि सिनेमातील कपडे, साड्या, अलंकार, चपला-बूट लगेच बाजारात आणून व्यापारी स्वतःची चलती करून घेतात. I am fed up with my wardrobe. I want to change it completely (माझ्या वॉर्डरोबचा- कपड्यांचा मला कंटाळा आला आहे. पूर्णपणे बदलून टाकणार आहे मी) अशी तरुणाईची भाषा सर्रास ऐकायला मिळते. चाणाक्ष बहुराष्ट्रीय Branded कंपन्यांनी अत्यंत धोरणीपणे, कुटिलतेने तयार केलेलं Shop till you Drop हे लोभस, गोंडस आणि हवहवसं वाक्य म्हणजे तरुणाईला सापळ्यात अडकवण्याचा चमकदार सापळा आहे. त्याच्या जोडीला क्रेडिट कार्डचा `जिन्न खिसा कधी साफ करून जाईल हे सांगताच येत नाही.

 

 

 

योग्यता नसता लठ्ठ पगारी नोकरी

ई.एम आय.वर अॅमेझॉन शॉपिंगची उधारी

जे जे दिसे बाजारी ते ते हवे घरी

 

ह्या तमतृष्णेने आंधळे झालेले लहान-मोठे मासे दिखाऊ चमकधमक असलेल्या पाश्चिमात्त्य संस्कृतीच्या जाळ्यात गवसत राहतात. Shop till you Drop हा गळाचा हूक खिशाच्या कंठनालेत अडकून खिसा फाटेपर्यंत ग्राहकाला गंडवत राहतो. तरीही Shop till you Drop हीच खरी आनंदाची व्याख्या आहे असं मोठ्या दिमाखात सांगणार्‍यां काही थोड्यांच्या रुबाबाला भाळून इतरही त्यात अडकत राहतात. आणि पार कफल्लक होतात.

अमेरिकेत एकदा विद्यापीठात प्रश्न विचारला गेला, की तुम्ही सगळ्यात आनंदी कधी व्हाल? कोणी म्हणे मला हीच गाडी हवी; कोणी म्हणे मला हीच  नोकरी हवी; कोणी म्हणे मला खूप खूप पैसे हवे. एका भारतीयाने सांगितले, आनंद मनातच असतो. तो कुठल्या बाहेरच्या गोष्टीने मिळत नाही. (Happiness is a state of mind). सारे खो खो हसले. तिथूनच माझ्या मनाने `हव्यास ते आता बास! हा बॅक टू इंडिया प्रवास सुरू केला. आयुष्यामधे कामनेच्या दोरावरून तोल सावरत जाणं हे सोपं नाही. ह्या कामनेच्या दोराचा सर्वात आपल्या जवळच्या टोकाचा बिंदू असतो `बास हा! तर त्याचं `हव्यास हे दुसरं टोक कुठल्या मेरू पर्वताच्या शिखराला बांधलेलं असतं ते दृष्टीपथातही येत नाही. जसजसं पुढे चालत जावं तसतसं आत्ता इथे आहे असं वाटणारं क्षितीजही पुढे पुढे सरकत जात पण आपण त्याला हात लावू शकत नाही तसे `हव्यास हे दुसरं दुर्गम टोकही कधी हाती येत नाही. till you Drop हा क्षण आला तरीही नाही. जीवनातील आनंद मात्र कधीच विरून जातो.

त्यामुळे हव्यास ते आता बास ह्या दोन टोकाच्या शब्दांमध्ये भारतीय अध्यात्म जेवढे लवकर मुरेल तेवढा हा प्रवास कमितकमी अंतरात आणि सुखकारक होतो. हव्यास ते आता बास हा प्रवास झाला नाही, तर त्रास आणि र्‍हासच संभवतो.

जे जे मध्ये येईल ते खा खा लागल्याप्रमाणे गिळंकृत करत चाललेल्या, पुराने दुथडी भरून वाहणार्‍या यमुनेला कृष्णपावलांचा स्पर्श झाला मात्र! यमुनेची खा खा संपली. ती शांत झाली. त्याप्रमाणे सामर्थ्य आणि महत्त्वाकांक्षेतून निर्माण झालेली हाव आणि सुटलेली खा खा निवळण्यासाठी सगळ्या गोष्टींची निरर्थकता कळायला हवी. त्यासाठी श्रीमद् आद्य शंकराचार्य आणि आपल्या संतांच्या वाङ्मयाचा पावन पदस्पर्श एकदातरी मनाला व्हायला हवा.

कमितकमी म्हणजे नेमके किती? कमितकमी ह्याचा मानक सांगताना श्रीमद् आद्य शंकराचार्य म्हणतात, ‘‘कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः।’’ लाज झाकण्यापुरते एक वस्त्र पुरे. ज्ञान आणि वैराग्य प्राप्त झाले, की कमितकमीचा मानक (प्रमाण- standard) फार लवकरही सापडतो. मग फाटकी झोळी कचर्‍यात भिरकावून द्यावी त्याप्रमाणे अपार ऐश्वर्याचाही माणूस सहज त्याग करतो. घराच्या काल्पनिक भिंती ढासळतात आणि  सर्व विश्वची माझे घर होते. एखाद्या झाडाखाली बसून मिळालेले दोन घास हाताचीच थाळी करून तो आनंदाने खातो. असा तो कौपिनवन्त (लंगोटीधारी) अत्यल्पवस्त्रधारी माणूस सर्वांहून भाग्यवान असतो.

 

वेदान्त ज्याच्या मुरला स्वभावी    भिक्षान्न ज्यासी सुखवी विशेषी

शोकास ना स्थान कदापि चित्ती    तरूतळी राहतसे सुखानी

 भिक्षेस ज्या ओंजळ हेचि पात्र । सार्‍या दिशा हे घर ज्या नरास

द्यावीच झोळी भिरकावुनी ती    आव्हेरली ज्या कमला तशी ती

ना आडकाठी कुठल्या दिशेची  । अत्यल्पवस्त्री नर भाग्यशाली

 

कबीरही काही वेगळे सांगत नाही,

मन लागो मेरो यार फकिरी में।

जो सुख पावो रामभजनमें

वो सुख नाही अमिरी में ।।

कमितकमीचा त्याचा मानक ‘‘हाथ में कुंडी, बगलमें सोटा। चारो दिशा जागिरी में’’ इथेच संपतो.

एक ओळखीचे अधिकारी वारले तेव्हा त्यांच्या अमेरिकास्थित साठीपुढच्या मुलीला भेटण्याचा प्रसंग आला. ती म्हणत होती, ‘‘मम्मा आणि डॅडींनी इतकं सामान जमवलं आहे आता ते काय काय आहे, हे एकदा बघून त्याची विल्हेवाट लावणंही माझ्याच्याने शक्य नाही.’’ डोक्याला हात लावून बसली होती.

एक राजस्थानी तडफदार तरुण भेटला. घरदार सोडून वनवासी लोकांसाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्व जीवन वाहून घेतले होते त्याने. म्हणला, ``मी घरचा घरंदाज श्रीमंत आहे. वडिलांना निरनिराळ्या भारी कपड्यांची आवड होती. कपाटेच्या कपाटे त्यांच्या वेगवेगळ्या कपड्यांनी भरलेली असत. पण आमच्याकडे माणूस गेल्यावर त्याचे कपडे, भूताचे कपडे म्हणून कोणीही घेत नाहीत. वडिलांचे वय पाहून मी त्यांना आपला कपड्याचा शौक आवरता घ्यायला सांगितला. आहेत ते कपडे गरीबांना देऊन टाका म्हणून सांगितले; पण तसे झाले नाही आणि ही सगळी कपाटेच्या कपाटे कपडे भुताचे कपडे म्हणून पडून आहेत.’’ तो तरुण मात्र दोन जोडी कपड्यांमध्ये आनंदी दिसत होता.

एकदा पत्रकार श्री.उत्तम कांबळे यांचे भाषण ऐकायला मिळाले. हव्यास आणि आता बास ह्यामधला कमितकमी हा मानक बिंदू त्यांना फार लवकर सापडला होता. एक दिवस आपल्याला किती कपडे लागू शकतात, ह्याचा आढावा घेत बाकी सर्व कपड्यांचे एक गाठोडे बांधून गाडीत घालून वनवासी बांधवांच्या वस्तीत ते सोडून आले आणि एका शांत खोल आनंदसागराचा अनुभव त्यांनी घेतला.

हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून मांडलेली श्रीमद् आद्य शंकराचार्यांची वचने म्हणूनच जुनी होत नाहीत. जो जागा होतो, त्याला पुन्हा पुन्हा त्याची प्रचिती येते आणि श्रीमद् आद्य शंकराचार्यांच्या पाच रत्नांप्रमाणे असलेल्या लक्ष्मीनरसिंहपञ्चरत्नाचा आस्वाद घेत तो मनाला सांगतो,

मना मधुकरा ऐकुन घे रे बोल हिताचे दोन तुझ्या

जरी निरंतर सौख्य मिळावे असे वाटते सतत तुला

जागे होता जसे संपते स्वप्नांचे ते राज्य वृथा

तसे समज रे सुख वैभव हे, स्वप्न तुझे रे हो जागा ।। 5.1

 

मना- मधुकरा फुका फिरसी का,  निरस अशा ह्या संसारी

मरुभूमी ही इथे न मधु रे मकरंदाची आस धरी

लक्ष्मीनरसिंहाच्या पावन पदकमलांची कास धरी

अनुपम सुख-मधु मिळेल तुजला, तृप्त करे जो जन्मभरी ।। 5.2

------------------------

-अरुंधती दीक्षित


Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती