5 अपूर्व पूर्वा

 

5 अपूर्व पूर्वा


            माझ्या सख्यांचा हात धरून मी एका वेगळ्याच स्वप्नात, एका वेगळ्याच नशेत जात होते. कुठेही! प्रवीणची नोकरी नेईल तिथे. आणि - -रेल्वेनी जातांना इतरवेळी रुक्ष पण रेल्वे जंक्शन असल्यामुळे अपरिहार्य वाटणार्‍या दौंडला, S.R.P. Group 7 ला commandant  म्हणून प्रवीणची  बदली झाली. (1981) S.R.P. group 5 आणि 7 दोन्हीही दौंडला आहेत

नगरहून दौंडला बदलीचे खलिते पोचताच दौंडला स्वागताच्या पायघड्याच अंथरायला सुरवात झालीदौंडहून स्वागताच्या नौबतीच वाजू लागल्यादौंडच्या SRP ग्रुपला पहिल्यांदाच pramotee officer ऐवजी डायरेक्ट IPS Officer  नेमला जात होता.  सर आपली एक कंपनी नगरच्या जवळ आहेच आपलं सामान किती आहेसामान पॅकिंगला माणसं आणि न्यायला दोन फायु टनर गाड्या पाठवू?” SRP चे ऑफिसर्स विचारत होते.  तेव्हा पॅकर्स मूव्हर्स  पद्धतच नसल्याने आम्हाला प्रायव्हेट ट्रक्स जरी मिळाले तरी पॅकिंगला पोलीसदलाच्या मदतीवरच अवलंबून रहावे लागेआमचं सामान साडेतीन महिन्यांनंतरही तेवढच होतंत्यामुळे फायुटनरच्या कोपर्‍यात मावून गेलं.        

                    सर्वांनी सांगितलं की नगर दौंड रेल्वेनी जाणं जास्त सुरक्षित आहेआणि लवकरही पोचालकारण तेव्हा सिद्धटेक आणि दौंड जोडणारा भिमा नदीवरील पूल झाला नव्हताशिवाय रस्त्यांची स्थितीही दयनीय होतीखड्ड्यातून जातांना बसणारे हादरे माझ्या स्थितीला अवघड वाटत होतेट्रेन वेळेवर सुटली पण घोडा आडवा आलाआपल्याकडे घोडा का अडला? , 2 भाकरी का करपली, 3 तलवार का गंजली अशा तिनही प्रश्नांचं एकच उत्तर मिळत असे कीफिरवला/ली नाही म्हणूनपण आत्ता मात्र घोडा का अडला ह्याचं उत्तर फार दयनीय होतंघोड्यासारखे वेगवान प्राणी वा बैलासारखे ताकदवान प्राणी फार दूरवर पळून जाऊ नयेत म्हणून त्यांचे एका बाजूचे दोन पाय दोरीने एकत्र बांधून ठेवायची माणसाची क्रूर पद्धत एका चांगल्या उमद्या प्राण्याचे प्राण घेऊन गेली.

                       पण असे  कितीही घोडे अडले आणि कितीही माशा शिंकल्या तरी ते आम्हाला अडवू शकत नव्हते किंवा प्रवीणसरांच्या कामात बाधाही घालू शकत नव्हते. तीन चार तास उशीरा का होईना आम्ही दौंडला पोचलो.


      पहिल्यांदाच दौंडच्या फलाटावर सामानसुमान घेऊन राहण्याच्या इराद्याने उतरलो. इतके दिवस ट्रेनचं इंजिन मागे किंवा पुढे लावण्यासाठी थांबणार्‍या फलाटापुरतीच ओळख असलेलं दौंड आता अंतरंगात शिरून बघणार होतो. अनेक बंद, मोर्चे, उत्सव, कायदा, सुव्यवस्थेची अवघड परिस्थिती हाताळणार्‍या S.R.P. परिवाराचं आयुष्य असतं तरी कसं हे जवळून पहायची, अनुभवायची संधी मला मिळणार होती. त्यांच्या परिवाराचं सदस्य होणं हेच मला मोठं अप्रूप होतं. मनात अपेक्षांपेक्षा कुतुहल ओतःप्रोत भरलेलं असलं की पुढे येणारी प्रत्येक गोष्ट नाविन्यानी भरलेली राहते. माळरानावरही गवतफुलं तुमच्या स्वागताला सज्ज असतात. भर मध्याह्नीला काटेरी बाभळही इवल्या इवल्या केसाळ गोंड्याच्या पिवळ्या फुलांची छत्री डोक्यावर धरून उभी राहते. तिचा दोन इंचाचा काटाही जवळून बघतांना टोकदार म्हणजे किती टोकदार ह्याचं परिमाण दाखवून जातो. जमिनीच्या पोटातले झरेही तुम्हाला ऐकू यायला लागतात. पारावर बसलेला एखादा गावरान म्हाताराही तुम्हाला शिल्पाहून सुंदर असल्याचं लक्षात येत. इथे तर एका मोठ्या परिवाराचे कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही पोचलो होतो. त्यामुळे आमच्या स्वागतालाही पन्नासएक कडक इस्रीच्या गणवेशांचा हसरा ताफा पुष्पगुच्छ घेऊन हजर होता.  ह्या 1100 लोकांच्या परिवाराचा मुख्य ह्या नात्याने प्रवीणवर कुटुंबप्रमुखाची जबाबदारी होती तर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्यासाठी कल्याणकारी कार्यक्रमात प्रवीणला साथ देणं हे माझं काम होतं. प्रवीणसर 25 वर्षांचे आणि मी 22 वर्षांची. पण वय महत्त्वाचं नसतच मुळी. तुम्ही कुठल्या आसनावर बसला आहात त्यानुसार ते आसन तुम्हाला तसं वागायलाच लावतं.

त्यावेळचं दौंडही वेगळच होतं. गावाबाहेर एका छोट्याशा टेकडीवर असलेला लांब रुंद  बंगला मनाला सुखावून गेला. सकाळीच बंगल्यामागे पसरलेल्या प्रशस्त टेकडीवर आलो



    


अपूर्व पूर्वा / प्राची -

नृत्याच्या वेगवेगळ्या मुद्रा साकारत बाभळी तोल सावरत उभ्या होत्या. कमरेत तीन तीन ठिकाणी वाकलेल्या ह्या बाभळी अंगाला तीन ठिकाणी बाक देऊन उभ्या असलेल्या दक्षिणेतील त्रिभंगाकृती देवांच्या सुबक मूर्तींसारख्या वाटल्या. झिपरे कडुनिंब स्वानंदाच्या ओलाव्यात सुस्नात होऊन उभे होते. आधे मधे तुरळक आंब्याची, चिंचेची झाडंही दिसत होती. खुरट्या गवतावर मेंढ्यांचे कळप मेंऽऽऽमेंऽऽऽ  करत माना वर खाली हलवत उड्या मारत धावत होते. त्यांचे कानही त्याबरोबर वर खाली होत होते. खिल्लारी बैलांची एखादी गाडी रस्त्यावरुन दुडुदुडु धावत होती. त्यांच्या गळ्यातल्या घंटा किणकिणत होत्या. गवळणी डोईवर घडे घेऊन पाण्याला चालल्या होत्या. क्षितिजापर्यंत पसरलेली ओसाड सपाटीही सुंदर असू शकते असं वाटलं. ज्या प्रमाणे लग्नाआधी भेटणारे प्रेमवीर लोकांच्या नजरापासून लपण्यासाठी कुठला तरी आडोसा शोधत असतात. पण काळ्या पोतीचा धागा गळ्यात असला  तर हातात हात घालायला समाजाचं भय रहात नाही तसा इथे आकाश आणि पृथ्वीच्या मिलनाला ह्या माळरानावर डोंगराच्या आडोशाची गरज नव्हती. दोघांच्या मिलनातून पूर्वेच्या क्षितिजावर मे फ्लॉवर सारखा लालबुंद गोळा जमिनीच्या पोटातून वर येत होता. हिरण्यगर्भाचा जन्म सोहळा! तेवढ्यात घराच्या परिसरात असलेल्या विलायती चिंचेवरून पेलिकनच्या जोडीनी आकाशात झेप घेतली. आम्ही हरखून गेलो. हे पेलिकन रोज आमचे रात्रीचे सख्खे शेजारी होते. छे छे आमच्या कुटुंबाचाच भाग होते. रोज सकाळी शाळेत जाणारी मुलं संध्याकाळी परत घरी येतात, तशी सूर्योदयाला बाहेर पडणारी ही पेलिकनची जोडी रोज सूर्यास्ताला विलायती चिंचेच्या झाडावर परत येई. तेवढ्यात कुऽऽऽऽऽऽ,झुकझुकझुक आवाज करत खेळातली ट्रेन जावी तशी नॅरोगेज दौंड-बारामती ट्रेन शिट्या वाजवत आली. दिवाळीचा किल्ला मांडून ठेवावा तसं समोरचं दृश्य होतं.  रोज कुकगाडीच्या वेळेला ही शिट्या वाजवत जाणारी छोटी ट्रेन पहायला आम्ही सहसा विसरत नसू.




               सूर्य उगवतो ती पूर्व आणि सूर्य मावळतो ती पश्चिम ह्या माझ्या बालपणीपासून शिकलेल्या ज्ञानाला मन मात्र कधी दुजोरा देत नसे. एकदा एका तळ्यात एक बदकआई तिच्या 8-10 पिटुकल्यांना घेऊन पोहता पोहता त्यांच्या सोबत खेळतांना पाहिली होती. पोहता पोहता मधेच ती पाण्यााखाली बुडी मारायची. सर्व पिल्लं बावचळून इकडे तिकडे पहात असताना ही कुठतरी लांब पाण्यातून डोक वर काढत बाहेर येई. सर्व पिल्लं भराभर त्यांच्या पायाची पायडल्स मारत तिच्या दिशेनी पोहायला सुरवात करत. तिच्या पर्यंत पोचतात न पोचतात तोपर्यंत ती परत डुबी घेई. त्यांचा हा खेळ मीही काळाचं भान हरपून बघत राहिले.  आज असं वाटलं हा सविताही आपल्यासोबत हाच खेळ खेळत आहे. आज ह्या डोंगरामागून येणारा सूर्य उद्या अजून थोडा पलिकडून बाहेर निघतो. 22 जून ते 21 डिसेंबर रोज हातभर दक्षिण कडे सरकणारा सूर्य आज कुठून बाहेर येतोय पहायला मी डोळे लावून वाट बघत राहते. 21 डिसेंबर ते 22 जून पर्यंतचा त्याचा उत्तरेकडे चाललेला प्रवास पहाता केवढ्या लांबच लांब क्षितिजरेषेवर तो फिरत असताना पूर्व कशी ठरवावी?

 

 सगळ्यात मोठा दिवस 21 जून ते सगळ्यात छोटा दिवस 21 डिसेंबर पर्यंत सूर्य चांगला दक्षिण-उत्तर कितीतरी अंशात फिरतांना दिसे. थंडीत एका  खिडकीतून डोकावणारा सूर्य उन्हाळ्यात वेगळ्याच खिडकीतून डोकावतांना दिसे. रोज सूर्य वेगवेगळ्या जागी उगवतांना पाहून ही कोणालासूर्य नक्की पूर्वदिशेलाच उगवतो काहोअसा प्रश्न विचारायची माझी कधी हिम्मत झाली नाही. नागपूरला श्री. चंद्रगुप्त वर्णेकर भेटले आणि आणि अचानक गुंता सुटला. “भारतीय खगोलशास्त्राप्रमाणे सूर्य उगवतो ती पूर्व असं आपण मानत नाही. कृत्तिका उगवते ती पूर्व.” ते ऐकल्यावर मला माझ्या मनातली पूर्व सापडल्याचा आनंद झाला.  मनाच्या तळाशी खोल खोल बाटलीबंद करून ठेवला तरीही छळणारा विचारांचा राक्षस मुक्त झाला. पूर्वा भेटण्यासाठी मी कृत्तिका शोधू लागले. पण पूर्वा गवसत नव्हती.

             रस्त्यातून चालतांना आपल्यासोबत अनेक जण चालत असतात, म्हणून गर्दीतील त्या सर्वांची आपली ओळख असतेच किंवा होतेच असं नाही. कधी तरी कुठेतरी आपली भेट झाली, गप्पा झाल्या म्हणजे आपण जीवाभावाचे मित्र होतोच असंही नाही. पण कधी सगळ्या गर्दीतसुद्धा एखादा चेहरा आपल्या मनाला स्पर्श करून जातो. मग आपण शोधत राहतो-- तो चेहरा - - मनाला चाटून गेलेला. कधी कधी नुसती नजरा नजरही आश्वस्त करत असते--- खोलवर हृदयात! ही पूर्व पश्चिमेची जोडी आपल्याला अशीच सतत भेटत असते. आपण दिल थामके त्यांची वाट बघत असतो आणि ह्या जराही लक्ष देता निघून जातात. त्यामुळे `सनराईझ' आणि सनसेट'-पॉईंटच्या रँपवरून नजाकतीनी चालत येणार्‍या ह्या गजगामिनी अनेकांना नेत्रसुख देत असल्या तरी त्यांच्याशी गुज साधेलच असं नाही. कधी महत्प्रतिक्षा करूनही ह्या रूपगर्विता तुमची भेट नाकारून अशा काही सहजतेने निघून जातात की जशी कॉलेजमधे सगळ्यांची धडकन ठरलेली एखादि सुंदरी अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलाबरोबर झटपट लग्न होऊन अचानक कॉलेजमधून नाहिशी व्हावी. कधी आपली काहीच अपेक्षा नसते. कुठल्यातरी भलत्याच कामाचं बोचक पाठीवर टाकून आपण जात असतो आणि अचानक ह्या सुंदरी अशा काही नखर्‍यात सामोर्‍या येतात की `` हाय मार डाला!'' निरभ्र आकाशातून मन मानेल तसं हिंडणार्‍या पांढर्‍या एकट्या दुकट्या गबदुल्या ढगाला अचानक गुलाबी करणार्‍या सूर्यकिरणासारख्या अचानक एखाद्या सुंदरशा रंगानी तुम्हाला उजळवून टाकतात. सुंदरसं स्वप्न हृदयात अंकुरीत करून जातात.

प्रवीणसर ऑफिसला गेल्याने मी घर हिंडून बघत होते. नगरला लावलेल्या झाडांची फळं आम्हाला नगरला जरी मिळाली नाहीत तरी दौंडला वाट बघत होती. बंगल्यामागे  लावलेल्या केळीमधून केळफूल पूर्ण बाहेर येऊन डोकावत होतं. शेजारीच विलायती चिंचेच्या उंच झाडावर पांढरट गुलाबी आकडे जिलब्यांसारखे वेटोळी घालून लोंबत होते. पक्षांच्या किलबिलाटाने झाड गजबजून गेलं होतं. त्यांनी खातांना खाली चिंचेच्या भुग्याचा पांढरा सडा सांडला होता. वार्‍याने फाटलेल्या केळीच्या पानांच्या सावल्या जमिनीवर पडत होत्या.  त्या सावलीप्रकाशाच्या पट्ट्यात  खाली एका कुत्र्याची समाधी बांधलेली दिसत होती. ``आपल्या मालकासाठी ज्याने प्राण सोडला त्याच्या स्मरणार्थ’’ अशा आशयाचं काही तरी वाक्य त्यावर लिहीलं होतं. त्या कुत्र्याचं नावही लिहीलं होत. तेवढ्यात झाडीमधून पलिकडून कोणी तरी हात केला आणि लक्षात आलं अरेच्च्या! पलिकडे पण एक बंगला आहे.  मीही हात केला. ``येऊ का भेटायला’’ त्या आदबीने विचारत होत्या. माझ्या बरोबर असलेल्या S.R.P. च्या जवानाने सांगितलं, ``असिस्टंट कमांडंट पलिकडेच राहतात. त्यांच्या बाईसाहेब आहेत.’’ मीही ``या या !!’’ म्हणत स्वागत केलं. कोणाचं कुत्र होतं हे? मालकासाठी काय केलं त्यानं? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तसच राहून गेलं. आणि आम्ही गप्पा मारत आहोत हे पाहून बरोबर आलेला बंगल्याचा पोलीस गार्ड शिस्तीचे पालन करत निघून गेला. मी अजूनही कुत्र्याच्या समाधीकडे अधुन मधुन बघत असलेली पाहून बाईंनी खालच्या आवाजात ``माहित आहे का तुम्हाला ?’’ नी सुरवात केली. ``काय झाल?’’ – माझं कुतुहल.

ह्या बंगल्याचे एक *****  कमांडंट होते. शिकारीचा शौक होता त्यांना. मुलाबरोबर गाडीतून जात होते. अचानक रस्त्यात खड्डा आला. गाडीच्या त्या धक्क्याने बंदुकीतून गोळी उडाली ती थेट मुलाच्या डोक्यातच! जागच्या जागीच गेला बिचारा.’’ अत्यंत करूण कहाणी होती. वडिलांच्याच हातून आपल्याच मुलाची अशी शिकार व्हावी ही मनाला चटका लावून जाणारी गोष्ट होती. ``अरेरे!!! ‘’माझ्या तोंडातून आपोआप निघून गेलं. ----``आणि कुत्र?’’

``ते कुत्र त्या मुलाने पाळलं होतं. मुलाचा मृतदेह पाहून  तो तेथेच बसून राहिला. तेथून उठलाच नाही. अन्न पाणी सोडून दिलं त्यानी आणि तेही मरण पावलं.’’ एक दुःखद करूण कहाणी होती. त्या कुत्र्याबद्दल मनातून अत्यंत सहानुभूती, प्रेम वाटलं. थोडा वेळ मी गप्प उभी राहिलेले पाहून  त्या म्हणाल्या, ``तुम्ही तुमचं देवघर केलं आहे आणि त्याच्या शेजारच्या खोलीत बसायला जो पलंग ठेवला आहे ना तिथेच त्या मुलाला ठेवलं होतं. ती खोली माझी फार आवडती खोली होती. उतरत्या छपराखालची कडेची खोली असल्याने तेथे बसून बाहेरच्या निसर्गाची गम्मत पाहण्यात वेळ सहज जाई. ``अहो आमावास्येला अनेकांना त्याचं भूत येथे हिंडतांना दिसतं.’’ आता मी सावध झाले. एका भूतासोबत राहून आल्याचा अनुभव माझ्या गाठीशी होता. असल्या छोट्या छोट्या गोष्टींनी माझ्या मनावर फारसा परिणाम होणार नव्हता.

खरं सांगायचं तर मी लहान असतांनाच भूतभयाचा क्रॅश कोर्स माझ्या मोठ्या भावानी माझ्याकडून करून घेतला होता. तो माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा होता. दिवे गेलेले असतांना मी घराच्या अंधार्‍या बोळातून एकटी येत असतांना अचानक चेहर्‍यापुढे पंजा आणणे आणि मला किंचाळायला लावणे, घरातले लाईट गेले की हळूच मला उचलून खाली ठेवणे आणि मला भूतानी उचललं असं वाटायला लावून माझी बोबडी वळेल असे करणे, माझ्या कंपासबॉक्समधे मोठ्ठ झुरळ ठेवणे, बाकी सूर्याची पिल्ल दाखवणे, अशा महा भयंकर प्रत्यक्ष भूतबाधेतून पार पडल्यामुळे मला ह्या काल्पनिक  भूतांची भीती वाटत नव्हती. एका मोठ्या रेघेला छोटं करायचं असेल तर त्याच्यापुढे एक अजून मोठ्ठी रेघ ओढायला लागते. ती बालपणातच ओढली गेली होती.

``या नां आमच्याकडे आमचं घर बघायला’’ असं म्हणत दोन बंगल्यांच्या मधे असलेलं छोटसं फाटक उघडून आम्ही पलिकडे त्यांच्या हद्दीत गेलो. त्यांचं घर जरा अंधारं वाटलं पण मी छान आहे छान आहे म्हणून  त्यांच्या सर्व गोष्टींचं कौतुक करत असतांना त्या म्हणाल्या, अहो आमच्याकडे ना एक खोली गमतीशीरच आहे. त्याला ना कुठे खिडकी आहे ना प्रकाश यायला जागा पण त्या खोलीला कोणीतरी खालपासून छतापर्यंत सिरॅमिकच्या टाइल्स लावून घेतल्या आहेत. खरतर ह्या खोलीबद्दल, घराबद्दल मला आधीच इतरांकडून माहिती मिळाली होती. मीही ती खोली बघितली. पण काही बोलले नाही. पूर्वी अशा छोट्या पांढर्‍या टाईल्स स्वयंपाकघरातल्या ओट्याला थोड्याफार लावत असत.  वा छान आहे की. तुमचं देवघर इथे केलं अगदि योग्य केलं मी त्यांच कौतुक केलं. खरतर वयानी त्या माझ्या आई एवढ्या असल्या तरी माझ्याकडे गटप्रमुखाच्या पत्नीची जबाबदारी असल्याने मला त्यांच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवणं भागच होतं. बाई तशाही थोड्या थोड्या गोष्टींना घाबरणार्‍या होत्या. त्यांना जर मी खरं खरं सांगतलं असतं की------

-------------------------------------

--------------------------

-----------------

ती खोली दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी इग्रजांनी बांधलेलं प्रेतागार आहे तर माझ्याऐवजी त्याच बेशुद्ध पडल्या असत्या. आणि त्यांनी त्या घरात राहायलाच नकार दिला असता तर? मला माझा एकुलता शेजार घालवायचा नव्हता.  असो!!!!!!!

            S.R.P. च्या जीवनाची सवय होत होती. पूर्वेच्या हातात माझा हात गुंफून माझं मन सर्वत्र बागडत असे.  ह्या पूर्वेच्या देवाचं स्वागत करायचा इथला S.R.P. साम्राज्याचा रिवाजही फार विलोभनीय असे. पहाटे पाच वाजताच लांबवरून मुख्यालयातून (headquarters) मधून बिगुलची ललकारी कानावर येई. ही गटाला जागं करण्याची उत्साहाने रसरसलेली सूरमयी हाक असे. ``जागे व्हा आवरून तयार व्हा.'' पहाटे पहाटे headquarter मधे लावलेल्या सनई, भूपाळ्या, अभंगांच्या सुरेल आवाजाने परिसर दुमदुमून जाई. अभंगांच्या सूरांसोबत उत्साह गल्लीगल्लीतून कोपर्‍याकोपर्‍यातून सगळ्यांच्या मनावर आनंदाची थाप देत पुढे पुढे धावत असे. थोड्याच वेळात सर्वांचा भाग्यदाता सूर्यनारायण आकाशाच्या क्षितीजावर येणार आहे असं सांगणारी बिगुलची दुसरी हाक येई. सूर्यनारायण क्षितीजावर येणार असत किंवा आलेले असतं.

जे आत्मतत्त्व स्फुरते हृदयी सदैव

त्याचे करी स्मरण मी अरुणोदयास

असं आद्य शंकराचार्यांचं `प्रातःस्मरण' म्हणतच बिगुलचे सूर दाही दिशात खोलवर घुमत राहत. तर,

अज्ञान संपुनि उरेचि प्रकाश जेथे

 ते आत्मतत्त्व स्मरतो नित मी पहाटे

देदिप्यमान जणु तेचि सहस्ररश्मी

सर्वत्र सर्वसमयी भरुनीच राही

असा प्रतिसाद हृदया हृदयातून उमटत राही.

बिगुलाची ही सांकेतिक भाषा  आमच्या दलात सर्वांनी आत्मसात केलेली असते. खरं सांगायचं तर हे छोटसं वाद्य सार्‍या गटाला एकत्रित आणि नियंत्रित ठेवतं. जवानांचा सारा दिवसच बिगुलच्या तालावर चाललेला असतो. रोजच्या नित्य घटनांची सूचना ज्याप्रमाणे बिगुलवरून मिळते तशा काही नैमित्तिक घटनांची सूचनाही बिगुलमधून निघणारे सूर सर्व गटात पोचवत असतात. प्रत्येक वेळी वाजवली जाणारी बिगुलची छोटी आणि सांकेतिक धुन ही वेगवेगळी असे.  मान वरती करून आरवणार्‍या कोंबड्याप्रमाणे हे `बिगुल कॉल्स' अनेक गोष्टी मैलांच्या परिसरात विखुरलेल्या परिवाराला उच्च रवाने दिवसरात्र सांगत असतात

पहाटे पाच वाजता होणारा Bugle call हा First call हा सर्वांना उठण्यासाठी. रिवाली (Reveille) च्या धुन बरोबर सूर्याला मानवंदना देत देत सूर्योदयाबरोबरच S.R.P.चा झेंडा वर चढे. सात अश्वांचा रथ चौखूर उधळीत क्षितीजावर येणार्‍या तेजस्वी भास्कराच्या आगमनाचा हा रोजचा सोहळा असे. सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी Assembly ची धुन वाजे आणि बंदोबस्ताला न गेलेल्या कंपन्यांचे लोकं आवरून परेडसाठी सज्ज होत. Drill Call सोबतच left right - - left right च्या दमदार कंमांडवर तालात हलणार्‍या पावलांच्या खाड्खाड् आवाजांनी परेड-ग्राउंडस् दुमदुमून जात. मातीलाही आळसात खाली लोळत पडणं आवडत नसावं. परेडच्या उत्साही वातावरणात तीही सामील होउन गुलालासारखी  सार्‍या हवेत पसरून जाई.  

                     अनेक वेळेला पहाटे फिरायला जातांना लांबवरून येणारे अनेक पायातील अनेक बुटांचा एकाच तालावर येणारा संथ दमदार अस्पष्ट आवाज कानात घुमत राहीअसह्य उन्हाळा असो की कडाक्याची थंडी असो 40- 50 जवानांचा गट हाफ पँट आणि बनियन ह्या ड्रेसमधे दाये-बाये ह्या एका ठेक्यात दौडतांना जवळ जवळ यायला लागला की त्यांच्या बुटांचा अस्पष्ट आवाज हळु हळु स्पष्ट होत, मोठा होत जवळ येई. फोनवरील आवाजाच्या रेषेवरील कर्सर हळुहळु उजवीकडे फिरवत नेला की जसा आवाजाचा व्हॉल्युम हळुहळु वाढत जातो तसा.  कमांडंट दिसले की पळण्याची लय थोडी मंदावून त्यांचा गटप्रमुख सॅल्यूट करून जाई. प्रवीणकडूनही सॅल्यूटला प्रतिसॉल्यूट जाई. ``जय हिंद सर !’’  ह्या कडक सलामीला जय हिंद! चा प्रतिसाद प्रवीणकडून जाई. अंघोळी करून धुतलेले युनिफॉर्म्स घातलेली शाळकरी मुलं-मुली घोळक्या -घोळक्यांनी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून दप्तरं खांद्याला अडकवून SRP कँपच्या रस्त्यांवरून शाळेत जातांना दिसत. प्रवीणची गाडी दिसली की शिस्तीचं बाळकडू मिळालेली ही मुलं रस्त्यातच ताठ उभं राहून सॅल्यूट ठोकत. जयहिंद सरछोट्यांच्या मुखातूनही अनुकरणातून उचललेला कडक घोष बाहेर येई. ह्या मुलांना कमांडंटच्या गाडीतून शाळेपर्यंत लिफ्ट मिळाली की सारे खूष होऊन जात. परिसर कुठल्या ना कुठल्या शिस्तबद्ध काम करणार्‍या खाकी गणवेशधारी युवकांच्या अधिभाराने चार्जड् असे. मी युवक म्हणाले कारण मोठ्यांचा उत्साहही तरुणांना लाजवेल असा असे. S.R.P. सगळेच `जवान' असतात. उत्साहाच्या या लाटेवर स्वतःलाही झोकून द्यायचं ब्बास! सगळा दिवस एक उत्सवच होऊन जाई. शिस्तबद्ध आयुष्याचा हा दररोजचा उत्साह सोहळा अपूर्व होता. सूर्याकडे तोंड करून उगवणार्‍या सूर्यफूलाचा दिवस सूर्याकडे बघतच मावळतो. सूर्योदयाला वर चढणार्‍या झेंड्याचा दिवस सूर्यास्ता सोबत Retreat च्या बिगुलानेच संपे. बिगुलाच्या स्वरांसोबत खाली उतरणारा झेंडाही शिस्तित खाली येई. परिवार जागाच असे. कधी महिनोन्महिने बंदोबस्तासाठी बाहेर गेलेल्या जवानांच्या तुकड्या आपल्या परिवाराला भेटण्याच्या आनंदात उत्साहाने परत येत. रात्री अपरात्री येणार्‍या ह्या तुकड्या कँप मधे येताच ``शिवाजी महाराजकी जय'' च्या घोषाने रात्रीची सुनसान मरगळलेली शांतता उत्साहात बदलून जाई.शांत जलाशयावर भरतीच्या लाटा उठाव्यात तसे संपूर्ण ग्रुपला उत्साहाचे उधाण येई. रात्री अपरात्रीच्या घोषणांनी आम्हीही सुखावून जात असू. `मुलं आली वाटतं' म्हणत त्यांचीच वाट बघत असलेले प्रवीण दीक्षितसर त्यांच्या स्वागताला जात. बंदोबस्ताला जायला सज्ज झालेल्या तुकड्याही अशाच जयघोषात निघत. युनिफॉर्म करून त्यांचे दीक्षितसर त्यांना भेटायला जात. काम चोख बजावण्यासाठी, अत्यंत स्फोटक परिस्थितीतही कचरता योग्य निर्णय घेण्यासाठी, त्यांना आधार वाटेल, उत्साह वाटेल असे चार शब्द बोलून त्यांच्या पाठीवर कुटुंब  प्रमुखाचा हात ठेऊन त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहत

                 दौंडला SRP चे दोन ग्रुप होते. पाचवा आणि सातवा. आमच्या ह्या दोन्ही गटांचा एक रक्षणकर्ता होता. त्याच्यावर सर्व लोकांची अपार श्रद्धा असे. तो म्हणजे म्हसोबा. राज्य राखीव पोलीस बलाच्याच जवानांनी मिळून बांधलेल हे मंदिर. आपण बाहेर असलो तरी आपल्या कुटुंबियांचं रक्षण हाच म्हसोबा करेल अशी त्यांची अपार श्रद्धा होती. त्या श्रद्धेला बोट लावावं असं वाटलं नाही. श्रद्धा दगडातही देवत्व निर्माण करते असा अनुभव मी नंतरही ठायी ठायी घेत होते. दगडाचा देव केला तरी दगड दगडपणे राहतो आणि देवाला केलेला नमस्कार दगडाच्या माध्यमातून देवापर्यंत पोचतो. काशाची अंबाबाई केली तरी कासे कासेपणे राहतं. आणि भक्ताचा भाव अंबेपर्यंत पोचतो. प्रह्लादासाठी खांबातून देव प्रकट झाला हे कित्येक दिवस माझ्या तर्कांला पटत नव्हतं. इथे आल्यावर मात्र माणसाची प्रगाढ श्रद्धा अशक्यालाही शक्य करु शकते ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास बसला.

            नेहमी S.R.P.च्या जवानांनी केलेल्या लाठी चार्जच्या आठवणी वृत्तपत्रातून प्रकाशित होतात; परंतु ह्या जवानांचा खडतर आयुष्यक्रम मात्र अजुनही जनतेला अंधारातच आहे. त्यांच्या जीवनात वारंवार येणार्‍या खडतर क्षणांपैकी एक छोटासा क्षण जेंव्हा पहिल्यांदाच डोळ्यांनी पाहिला, प्रवीण आणि मी गलबलून गेलो. हैद्राबादला महिनाभर गणपती बंदोबस्त करून प्रवीण दौंडला येत होता. बरोबर मीही होते. आमच्या कंपनीला मात्र दुसरीकडे बंदोबस्ताला जाण्याची ऑर्डर होती. गाड्या दौंडजवळूनच जाणार असल्याने दौंडला थोडावेळ आपल्या परिवाराला भेटून पहाटेच मग पुढे जा असं प्रवीणने त्यांना सांगितलं होतं. आपल्या परिवाराची अशी धावती का होईना भेट होईल ह्या कल्पनेने सर्व आनंदित होऊन दौंडला निघाले होते.

          रात्री एक दोन वाजताच्या मिट्ट काळोखात कुरकुंभच्या घाटात गाडी दौंडकडे वळण घेण्यापूर्वी रस्त्यात शेकडो स्त्रिया, मुले उभी होती. हा काय प्रकार आहे असे विचारताच कळले की हैद्राबादहून दौंडला यायच्या तयारीत असलेल्या पाच ग्रुपच्या S.R.P. कंपन्यांना दौंडला थांबताच तडक दुसरीकडे बंदोबस्ताला पाठविण्याचे आदेश आहेत. अशा वेळेस तीन चार महिने एखादा बंदोबस्त करून येणार्‍या तुकडीला आपल्या कुटुंबाला भेटायला मिळेल ह्या आनंदात असतांनाच जड अंतःकरणानी दुसर्‍या ठिकाणी रवाना व्हावे लागे. अशा आदेशाने जवानाच्या आनंदावर विरजण पडे. आपल्या कुटुंबाशी त्याबद्दल बोलायला मोबाईलही नव्हते. तेंव्हा घरोघरी फोन ही कल्पनेतही बसणारी गोष्ट होती. हेडक्वार्टरहून एखादा ऑफिसर घरोघरी स्वागतासाठी जागत बसलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना ही माहिती देई. रात्री दोन अडिच - - - अगदि कतीही वाजता ह्या कुटुंबीयांना घेऊन SRP च्या गाडया कुरकुंभचा घाट पार करून मुख्य रस्त्याला येऊन  वाट बघत उभ्या राहत. अर्थात दुसर्‍या बंदोबस्ताच्या गावाला जाणारा रस्ता दौंडवरून असला तरच हे शक्य होई. त्या रस्त्यावर  मिट्ट काळोखाशिवाय कोणाचीच संगत नसे. अंधारात अधुन मधुन येणार्‍या ट्रक्सचे प्रकाशझोत एवढीच काय ती प्रकाशरेखा. भर अंधारात शेकडो स्त्रिया, मुलं बाळं आपल्या घरच्या कर्त्या वडीलधार्‍याची वाट बघत किती तरी तास उभे असत.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर फक्त स्त्रिया आणि मुले अंधारात अशा अवेळी उभी असलेली पाहून आम्हीही थांबलो.  SRP च्या जवानांना घेऊन येणार्‍या गाड्याना लांबूनच गाडीच्या प्रकाशात उभा असलेला हा जथा दिसला. दोन्ही बाजुंनी आनंदोत्सवाला सुरवात झाली. त्यांना बघून निळ्या काळ्या गाड्याही तालासुरात हॉर्न वाजवत आनंद व्यक्त करायला सुरवात केली. अंधारात गाडीच्या प्रकाशाची तिरीप उत्साहाची पहाट फुलवुन गेली. अंधारात आपल्या कुटुंबीयांचे उजळलेले चेहरे निरखत जल्लोश झाला. वस्तुंचं , खाऊचं आदान प्रदान झालं. आणि सुखाच्या पहाटेची सांगताही . सूर्याशिवाय उजळलेली पहाट सूर्य उगविण्या आधीच मावळून गेली. शिस्तीच्या ह्या जीवनात नाही आणि अशक्य हे शब्द शरद ऋतुतील निरभ्र आकाशात दोन चार पांढरे ढग विरून जावेत तसे विरून जात. पाण्यात पडलेल्या मीठाच्या कणांसारखे कधीच अदृष्य होत.

              तेंव्हा (1980 च्या जमान्यात ) बँकाही एवढ्या पुढारलेल्या नव्हत्या आणि आमचे हे साधेभोळे लोकही. त्यावेळी पगारपार्टी ही एक मोठीच मोहिम राबवली जायची. प्रत्येक महिन्यात पगार घेऊन पगारपार्टीचे ऑफिसर, कारकून इत्यादि मंडळी जिथे  जिथे S.R.P. च्या कंपन्या असत तिथे तिथे रवाना होत. तिथे प्रत्येकाला सही करून पगार दिला जाई. हीच पगार पार्टी परत येतांना सारेजण आपल्या कुटुंबियांसाठी हा पगार त्यांच्याबरोबर परत पाठवीत. तो पर्यंत कुटुंबीयांना तग धरावी लागे. बर्‍याचवेळेला हा पगार ह्या कुटुंबीयांपर्यंत पोचण्याआधीच दलाल, सावकार, दुकानदार यांच्या टोळ्या तो हडप करीत. त्यांच्या पगारावर पडलेला असा घट्ट विळखा  आणि त्यांचा पगार परस्पर दुसर्‍यांच्या खिशात न जाण्यासाठी कमांडंट असलेल्या दीक्षितसरांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागे. जवानांना मिळणारा TA DA त्याने प्रत्येकाला महिन्याच्या 21 तारखेलाच मिळेल ह्याची खात्री केली. कारण साधारण वीस तारखेपर्यंत पगार संपून उसनवार सुरू व्हायच्या वेळेलाच हे पैसे कुटुंबियांपर्यंत पोचत. पगार झाला की संपूर्ण SRP Group मधे प्रवीण कडक बंदोबस्त ठेऊन भयंकर व्याजदराने पैसे लावून कुटुंबीयांना नागविणार्‍या दलाल आणि सावकारांना आत फिरकू दिले जात नसे. या व्यतिरिक्त ग्रुपला लागणारा किराणा, कापड-चोपड आता SRP च ठोक भावाने योग्य ठिकाणाहून घेऊन येऊ लागली. वारंवार कमांडंटचा दरबार घेतल्याने मधे पैसे खाणार्‍या लोकांची नावं आणि परिवाराच्या अडचणी सर्वजण मोकळेपणाने सांगू लागले. सर्वांच्या मदतीनेच परिवारासाठी कमी पडणारी घरही बांधली गेली.  

           30 - 35 वर्षांपूर्वीचे अनुभव आठवत आजही औरंगाबाद असो अथवा नवी मुंबईच्या आमच्या SRP ग्रुपला भेटायची वेळ आली तेंव्हाही वीज, पाणी यांचा खडतर सामना करत, वाळीत टाकल्यासारख्या दुर्गम प्रदेशात वास्तव्य करूनही त्या वाळवंटात त्यांनी ओऍसिस निर्माण केलेली पाहिली. शिस्तित काम करत रहायचं, बोलायचं नाही, कशाबद्दलही नाराजी दाखवायची नाही आणि काय करून दाखवलं हे बोलायचंही नाही ह्या त्यांच्या शिस्तीमुळे त्यांची ही भगिरथ प्रयत्नांची गाथा जनतेपर्यंत पोचण्याआधीच वाळवंटांत जिरणार्‍या नदीप्रमाणे लुप्त होते. त्यांचा हा दुर्दम्य आशावाद प्रकाशात आणतांना इतरवेळी काही विशिष्ट बातम्यांचे प्रसारण आठवडा आठवडा पोटतिडकीने करणार्‍या  `दुर्दशनच्या' वाहिन्या अथवा वृत्तपत्रे डोळ्यावर गांधारीसारखी पट्टी बांधून घेतात. चार ओळीही चांगलं न लिहिण्याची शपथ घेतलेले हे जनतेचे कैवारी ह्या जवानांच्या कठीण जीवन यात्रेत दूरवरही दर्शनी पडत नाहीत. असो.

            कुठलीही समस्या असो त्यावर मात कशी करावी हे मला S.R.P. नेच शिकवलं. दौंडच्या ओसाडवाडीत पाणी ही नेहमीच समस्या असे. रात्री अपरात्री लांबच्या बंदोबस्ताहून परत येणार्‍या आमच्या परिवाराच्या सदस्यांना एकदा पााणी गेलं की हातपाय धुवायलाही पाणी नसे. त्यांच्या रहायच्या वस्तीत पाण्याच्या टाक्या नव्हत्या.  लगेचच मोठया मोठ्या सिमेंटच्या नळ असलेल्या आडव्या टाक्या बसवण्यात आल्या. टाक्या आल्या. रात्री अपरात्री येणारे जवान त्या  पाण्यात अंगाला साबण लावून मनसोक्त शंऽऽभो करतांना पाहून मस्त वाटे.

सर आपला मळा आहे जी माणसं बदोबस्ताला गेलेली नसतात ते त्या मळ्याची छान काळजी घेतात. पण आपल्याला पाणी कमी पडतं. काय करता येईल? असा प्रश्न दीक्षित सरांनी विचारताच विहीर खणू या सर असं उत्तर आलं. विहीर खणण्याचा निर्णय रास्त आहे हे पाहून विहीर खणायची ठरवलं. शहरात राहणार्‍या मला एवढी खोल विहीर खणतात कशी हा विचारही मनाला स्पर्शून गेला नव्हता. सर आपल्याकडे एक जण पायाळू आहे. तो आपल्याला नेमकी कुठे विहीर खणावी ह्याचं मार्गदर्शन करेल. त्यांच्या श्रद्धेवर कुठलाही अविश्वास न दाखवता त्याने दाखविलेल्या जागेचं भूमिपूजन करण्याची एक सुंदर संधी मला मिळाली. पहिल्यांदाच टिकाव हातात धरला होता. जमिनीवर पहिला टिकाव टाकतांना धरणीमातेला मनोमन नमस्कार करत म्हणाले, आमच्या तृषार्त परिवारची तहान भागव माते. प्रत्यक्ष विहीर खणतांना पाहूनच एवढी खोल विहीर खणतात कशी हे कुतुहलही शमणार होतं. जमिनीवर उंच उंच इमले बांधतांना पहाणं हे जेवढं कुतुहलाचं होतं. त्यापेक्षा कित्येक पटिंनी जमिनीच्या पोटात जाऊन पाण्याचा शोध घेण आश्चर्यकारक होतं. उपस्थित असलेला संपूर्ण गट कामाला लागला. मनात साकारलेल्या विहीरीला प्रत्यक्षात जमिनीवर उतरविण्याचं कामं चालू झालं. गोल विहिरीची अर्धी बाजू एक दिवस खणून झाली की दुस र्‍या दिवशी दुसरी अर्धी बाजू खणायला घेतली जाई. खोल खणता खणता त्याबरोबर एक एक पायरी खाली उतरत जाणारा गोल जिनाही जमिनीच्या पोटात कोरला  जात होता. पाय र्‍या पाय र्‍यांनी विहीर कशी खोल होत आहे हे आम्ही बघत असतांनाच अचानक एक दिवस धरतीमातेला पान्हा फुटला आणि धरणीतून पाण्याची कारंजी उडायला लागली. पहिल्या पाण्यात भिजलेल्या लोकांनी आनंदाचा जल्लोश केला. सर्वांचेच चेहरे चिखलात, पाण्यात आणि आनंदात निथळत होते. पाण्यासोबत अंगावर उडालेल्या चिखलाच्या डागांनीही पवित्र झाल्यासारखं वाटत होतं. कालिदासाने  शाकुन्तलात वर्णन केलेल्या श्लोकाची आठवण आली. खेळून आलेल्या बाळाला आईवडिलांच्या मांडीवर बसायलाच आवडते. अशा कुशीत शिरलेल्या बाळाच्या पायाची माती ज्याच्या कपड्यांना लागली आहे असे आईवडील धन्य होत.

अङ्काश्रयप्रणयिनः तनयान् वहन्तः

धन्याः तदङ्गरजसा मलिनीभवन्ति ||

येती खेळुन पाउले चिमुकली माखून मातीत ती

धावूनी शिरती कुशीत सहजी मातीचिया पावली।

वस्त्रांना पडतीच डाग परि ते आनंददायी अती

वाटे तो क्षण धन्य धन्य अवघा त्या मायबापा हृदी।।

आज खोडकर पाण्याच्या पावलांना लागून आलेल्या मातीमुळे आम्ही धन्य झालो होतो.

दहा -बारा फुटावरच पाणी लागलं होतं. पाणी बराच काळ पुरावं, विहीर लवकर आटु नये ह्यासाठी अजून खोल खणणं भाग होतं. परत एकदा डावा गोलार्ध नंतर उजवा गोलार्ध खणायला सुरवात झाली. आता विहीरीत जमलेलं पाणी पंप लावून काढून घ्यायला लागे. पाणी भरायच्या आत बरोबर तेवढ्याच वेळात खणायलाही लागे. चिरे आले पाथरवट आले. छिन्नीचे आवज दिवसभर घुमू झाले. निराकार दगडांना आकार मिळायला लागला. मनामनात असलेली विहीर प्रत्यक्षरूपाने बांधायला सुरवात झाली. बघता बघता एक देखणी चिरेबंदी विहीर बांधून झाली. अमूर्तातून मूर्त, अदृष्यातून दृष्य. मूर्ताकडून अमूर्ताकडे नेणारा प्रवास जेवढा ज्ञानमय आणि आनंददायी असतो तेवढाच हा अमूर्ताकडून मूर्ताकडे नेणारा. काहीही बाह्य गोष्टी दिसत नसतांना ओसाडीत पाण्याचं स्वप्न पाहून ते सत्यात उतरवणं हे विलक्षण आनंददायी होतं. मग, बैलजोडी आली. नांगर आला. वर्षानुवर्ष ओसाड पडलेल्या जमिनीच्या एका तुकड्यावर, लिंबू मोसंबी, भाजीपाला बहरून आला. विहीरीचं पाणी चाचणी परीक्षा उत्तीर्ण होऊन प्यायलाही चालेल असा निर्वाळा आला.

गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती ।

नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥

हे गंगा, यमुना, गोदा, सरस्वती ह्या पवित्र पावन नद्यांनो! आमच्या ह्या विहीरीच्या पाण्यात जणु काही आपण सार्‍याच अवतरलात. आम्ही पावन झालो असं वाटे. आपल्या प्रजेचा आनंद पाहून राजाला जसा आनंद होत असेल तसा मनात न मावणारा आनंद आम्हाला होत असेसहस्ररश्मी सूर्य जसा त्याच्या प्रकाशकिरणांचा पिसारा घेऊनच येतो तशी अशक्याला शक्य करायची जिद्द घेऊनच प्रत्येक S.R.P.ग्रुप उभा असतो. आजही असं वाटतं, S.R.P.चे ग्रुप कुठेही असले तरी त्यांना एकच दिशा आहे. अरुणोदयाची -- अपूर्व प्रकाशाची - - काळोखातही प्रकाश फुलवणारी - - पूर्वा!!!  

------------------------------------

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती