2 सप्टेंबर- आज नारळ दिवस!
2 सप्टेंबर- आज नारळ दिवस!
नारळाचं उंच झावळीदार
झाड मला फार आवडतं. वारा येताच जाहिरातीमधल्या सुंदरीप्रमाणे वार्यावर सार्या झिपर्या
वार्याच्या दिशेने सोडून वार्याच्या सोबत
खोडासकट मंदमंद हालणार झाड पाहूनच मला ते फार आनंदी वाटतं. कायम उत्साहाने सळसळत असत.
‘समुद्र आहे का कुठे जवळ’ म्हणून उंच वाढून आकाशातून डोकावून बघत असतं. समुद्र किनारपट्टीला
वाढणारे माड कायम नार्सिसस सारखे समुद्रात डोकावून डोकवून बघत आपलं सुंदर रुपडं न्याहाळत असतात. समुद्राच्या दिशेने
वाढल्यास आपले सर्व खाली पडणारे नारळ समुद्र सुरक्षित कुठेतरी किनार्याला लावेल आणि
तेथे ते रुजतील, माझा वंश दूर दूर वाढेल ही सुप्त इच्छाही त्यात असते. समुद्राशी प्रेमाच्या
बंधानं बांधलं गेलेलं झाड जवळ इमारत किंवा भिंत असेल तर मात्र घाबरतं आणि त्याच्यापासून
दूर वाढण्याचा प्रयत्न करतं.
नारळाचे प्रकार तरी किती!
बुटका नारळ, उंच नारळ, सिंगापुरी नारळ , फिलिपिनी नारळ, मलेशियन नारळ, उंच बाणवली नारळ,
चेन्नगी नारळ, सनंगी नारळ, ह्या कमी की काय !----परवा मारवाड्याच्या दुकानात ‘एक नारळ
दे’ म्हणताच तो बाहेरच्या पोर्याला ओरडून
म्हणाला, ‘एक टकला भेजो!’ मी जरा सतर्कपणे येणार्या टकल्याची वाट पहात असताना एक गुळगुळीत
शेंडी काढलेला नारळ माझ्या पिशवीत पडला. चेन्नईहून येतानाच हे नारळ छान शेंड्या काढून
आल्याने त्याचं टकला हे भन्नाट नामकरण मला पहिल्यांदा मेंदुला झिणझिण्या आणि नंतर ओठावर
हसू देऊन गेलं. आता मीही परत गेले की ‘एक टकला दे दो’ असं म्हणताना मनातून काहीतरी
गुप्त गम्मत आल्याचा आनंद अनुभवत असते. असो!
‘गरुडी नारळ’! हे अजून एक नाव! महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीला नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळफोडीचा अनोखा खेळ खेळला जातो. दोन व्यक्ती समोरासमोर हातात नारळ घेऊन उभ्या असतात. आपल्या हातातल्या नारळाने दुसर्याच्या नारळावर आघात करून दुसर्याचा नारळ फोडण्याची ही स्पर्धा असते. कोण जास्तीतजास्त नारळ फोडेल त्याला विजयी (नारळसम्राट) घोषित केलं जातं. ह्या स्पर्धेसाठी लागणारा नारळ चांगला टणक आणि छोटा असावा लागतो. ह्यांना ‘गरुडी नारळ’ म्हणतात.
‘प्रसादाचा नारळ’ धारण
करणारं झाड बोनसाय केलेलं असतं की काय असा मला संशय आहे. इतके चिटुकले नारळ बाकी कुठेही
माझ्या बघण्यात नाहीत. ते जर पोस्टाने कुठल्या देवाचा प्रसाद म्हणून येणार असले तर
ते कौतुकास्पद लहान पण आतल्या खोबर्याच्या जाडीला महान असतात. हे नारळ कधी खराब निघत
नाहीत.
‘असोला’ नारळ हा प्रकार
घरी आल्यावर तुमची शक्तीपरीक्षा करणारा असतो. त्याला पाहूनच मी दोन पावलं मागे सरकते
आणि त्याला माझ्या घराच्या दिशेने येणार्या पिशवीत बसू देत नाही. अशा नारळांनी माझ्या
पळ्यांचे दांडे, स्क्रू ड्रायव्हर ह्यांना कचरापेटी दाखवली आहे.
‘मोहाचा नारळ’ हा अजून
एक प्रकार! त्याचं खोबरं, पाणी अत्यंत मधुर असतं. मोहाच्या झाडाचे नारळ लावून मोहाचे माड येत नाहीत.
एखाद्या सामान्य बुद्धिमत्तेच्या, गरीबाच्या घरात एखादा विद्वान पंडित वा जगन्मान्य
कलाकार जन्माला यावा त्याप्रमाणे नारळाचा आस्वाद
घेतल्यावरच अरे हा मोहाचा माड आहे हे लक्षात
येतं. मोहाच्या शहाळ्यातील अमृतासम पाण्याचा आस्वाद घेणे आणि त्याची गोड मलाई खाणे
हा स्वर्गीय अनुभव असतो.
ह्यामधे मोदक्या नारळ, गुहागरी नारळ हे अजून प्रकार येऊ शकतील.
त्या त्या प्रदेशातील वा देशातील माती व पाणी ह्यामुळे नारळाच्या खोबर्याची आणि पाण्याची चव बदलते. सेशल्समधे जुळे नारळ मिळतात. 'कोको डी मेर' (Coco de Mer) हे संपूर्ण वनस्पती सृष्टीतील सर्वात मोठे आणि जड बीज (Seed) म्हणून ओळखले जाते. शास्त्रीय भाषेत याला लोदोइसिया माल्दिव्हिका (Lodoicea maldivica) म्हणतात. हे अनोखे फळ दोन नारळ एकमेकांना जोडल्यासारखे (दुहेरी) दिसते, म्हणून याला 'जुळे नारळ' किंवा 'डबल कोकोनट' म्हणतात. या एकाच नारळाचे (बीजाचे) वजन साधारणपणे १५ ते ३० किलो असू शकते आणि त्याचा व्यास ४० ते ५० सेंटीमीटर असतो.. या नारळाचा नैसर्गिक आकार मानवी नितंबासारखा (Hips) किंवा पेल्व्हिससारखा दिसतो. यामुळे स्थानिक लोक याला प्रेमाने 'बट नट' (Butt nut) किंवा 'कोको फेसे' असेही म्हणतात. हे झाड अत्यंत संथ गतीने वाढते. जमिनीखाली बीज रुजायलाच २ वर्षे लागतात. झाडावरचे एक फळ पूर्णपणे पिकून तयार होण्यासाठी ६ ते ७ वर्षे लागतात. ही झाडे ३०० ते १,००० वर्षांपर्यंत जगू शकतात.
प्रत्येक भारतीयाच्या
जन्मापासूनच तो नारळाच्या साथीने वाढत असतो. कुठलाही प्रसंग असो नारळ पाहिजेच! लग्न
ठरलं की पूर्वी मुलीकडचे गरीब असतील आणि मुलाकडचे उदार असतील तर फक्त मुलगी आणि नारळ
द्या म्हणून लग्न करून घेत. मुलीच्या सोबत नारळाचा प्रवास हा असा जुना आहे.
पोटुशीची ओटी भरायला नारळ लागतोच. तिची सुखरूप सुटका
होवो म्हणून अंबाबाईला नवस बोलून तुझी खणा नारळानी ओटी भरीन गं बाई म्हणतानाही नारळ
सोबत असतोच. बाळंतिणीची खणानारळाने ओटी भरणं
असो वा आलेल्या सुवाष्णीची ओटी भरणं असो! नारळ पाहिजेच! वा आलेल्यांना ‘या आता म्हणत’ नारळ देणं असो. प्रसंगाच्या
सुरवातीपासून शेवटपर्यंत नारळ हा अविभाज्यपणे प्रसंगाशी बांधलेला असतो.
प्रमुख पाहुण्यांचं स्वागतकाळी
भले पुष्पगुच्छ, मेमेंटो, पुस्तके हे सर्व काही दिलं तरी शाल पांघरून हातात श्रीफळ
दिले की सत्कार झाला असं वाटतं. तोच टाळ्यांचा मुहूर्त असतो.
काही देवांना मात्र नारळ
फोडायला लागतो. शनी, मारुती, दत्त काय भक्ताच्या
शक्तीची परीक्षा बघणारे देव आहेत की काय कोण जाणे. दगडु हलवाईच्या गणपती सारखे श्रीमंत
देव मात्र कमानीला नारळाची तोरणं बांधून आरामात लोडाला टेकून बसलेले असतात. देवांचा
भक्तांना पावण्याचा रेट हा बाहेर बांधलेल्या नारळाच्या तोरणांवरून आजमावता येतो. काम
सिद्धीस जाण्याची निकड लक्षात घेऊन 11 नारळाच्या तोरणापासून 111 नारळाच्या तोरणापर्यंत
नवस बोलले जातात.
कुठलीही नवीन सुरवात
मग ती घराची, इमारतीची पायाभरणी असो, खेळांचे, नाटकाचे शुभारंभ असोत, नवीन गाडी खरेदी
असो, नव्या नवरानवरीचं स्वागत असो, नारळ फोडूनच होतं.
नारळाचे पदार्थ आपल्या
रोजच्या तसेच खास सणावाराच्या जेवणांनाही नारळाच्या झाडासारखी खास उंची प्रदान करणारे
असतात. नारळाची चटणी, ताजा ताजा
नारळ झाडावरून उतरवून त्याची केलेली सोलकढी, दडपे पोहे, ओल्या नारळाची करंजी, नारळीभात,
उकडीचे मोदक, तळलेले मोदक, रवा-नारळाचे लाडू, नारळाची बर्फी, पोहे, खिचडी, भाज्या, आमट्या ह्यांना वरून घातलेलं
ताजं खोबरं, गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपतीपुढचा नारळ खोवून त्यात साखर घालून बनवलेली
खिरापत ------ अजूनही बरच काही! असा नारळाच्या पदार्थांचा broad spectrum नारळदिनाच्या दिवशी जिभेवर आला नाही तर काही तरी
चुकलंच म्हणायला लागेल.
--------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
Comments
Post a Comment